संथ वाहणं हरवलंय...

By // No comments:
जगण्याचं संथ वाहणं हरवलंय. सगळ्यांनाच पुढे निघायची घाई झालीये. थोडे जरी ढेपाळलो तरी मागे पडू, ही भीती मनात अधिवास करून आहे. स्पर्धेचा कोलाहल एवढा वाढलाय की, वेदनांचा आवाजही कुणापर्यंत पोहचत नाही. जगण्यात उरलाय केवळ वेग. वेगाशी सलगी करत धावणे अनिवार्यता झाली आहे. अर्थात, या साऱ्यास तुम्ही प्रत्यक्ष जबाबदार असायलाच हवं असं नाही. कळत असेल किंवा नकळत ही पुण्याई तुमच्या पदरी जमा होत असते. ती कुठून कशी चालत तुमच्या अंगणी येईल सांगणं अवघड आहे. त्यासाठी तुम्ही आवतन द्यायलाच हवं असं नाही.
 
कधी कधी गोष्टीच अशा घडत जातात की, आपण त्या कोलाहलाचा भाग होऊन जातो. हा कोलाहल कधी आतला असतो, कधी बाहेरचा. खरं हे आहे की या दोहोंना अंतरावर राखता येतं. पण मनात एक अनामिक भीती असते मी मागे तर राहणार नाही ना! आसपासच एवढा अस्वस्थ आहे की, तुम्हांला धावण्याशिवाय अन्य विकल्प नसतो. तेव्हा मनात एक प्रश्न साहजिकच फेर धरून प्रदक्षिणा करू लागतो, माणूस आणखी किती आणि कुठपर्यंत धावणार आहे? खरंतर अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे उपलब्ध असतातच असं नाही अन् असले म्हणून प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच असंही नाही. आगंतुकासारखे आलेले असे प्रश्न उत्तरांच्या विकल्पांपर्यंत पोहचतीलच याची शास्वती देणं बऱ्यापैकी अवघड प्रकरण असतं.

चालणं जिवांचं प्राक्तन आहे म्हणा किंवा निसर्गनिर्मित भागधेय. चालल्याशिवाय त्याच्या जगण्याला  वेढून असलेल्या प्रश्नचिन्हांची उत्तरे मिळतील तरी कशी? आयुष्याच्या वाटेवर सोबत करणाऱ्या किंतुंची उत्तरे शोधायची तर पावलांना पुढे नेणाऱ्या वाटांशी सख्य साधायलाच लागतं. येथे पलायनाचे पर्याय उपलब्ध नसतात की पर्यायी व्यवस्था. चालणारी पावले प्रगतीच्या परिभाषा लेखांकित करतात. थांबले की आपलं अवकाश हरवून बसतात. चालण्याच्याही परिभाषा असतात. प्रयोजने असतात. पर्याय असतात. त्यांना पारखून घ्यावं लागतं. असले काही पर्याय पुढ्यात पडलेले म्हणून काही ते सरसकट सगळेच जतन करून ठेवता नाही येत. नाही सांभाळता येत सगळ्याच गोष्टी सगळ्यावेळी. त्यांचे तत्कालीन, दूरगामी संदर्भ तपासून पाहावे लागतात. वाटा सगळ्यांच्या वाट्याला येत असल्या म्हणून काही त्या सरसकट सारख्या नसतात की एका साच्यात तयार झालेल्या. त्यातल्या सगळ्याच मुक्कामाच्या ठिकाणी नेणाऱ्या नसतात. काही वाटा जगणं वाटेने लावतात, तर काही वाटही लावतात.  

काळ, काम आणि वेगाचं गणित समजलं की, सायासांना संदर्भ सापडतात. संदर्भांची सूत्रे सापडली की, पुढ्यात पसरलेली समीकरणे सुगम होतात. क्षणांचे कोपरे कोरत पळणाऱ्या काळाचे अर्थ कळले की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून घेण्यासाठी निघालेल्या पावलांना प्रयोजने सापडतात. अज्ञात परगण्यांचा धांडोळा घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या विचारांत स्वप्ने सजलेली असतात अन् पुढे पडणाऱ्या पावलात उद्याच्या जगण्याची उत्तरे. आयुष्याला वेढून असलेल्या ज्ञात-अज्ञात प्रश्नांची उत्तरे थबकलेल्या पावलात नाही सापडत. थकलेली असली तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी पुढे पळू पाहणाऱ्या प्रयासात ती एकवटलेली असतात. पावलांना मातीचा स्पर्श हवासा वाटण्यात प्रगतीच्या परिभाषा सामावल्या आहेत. पुढे पडत्या पावलांना गतीचे गीत गाता यावेच, पण प्रगतीची स्वप्नेही पाहता यावीत. खरंतर प्रगती शब्दही नेहमी किंतु-परंतुच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा आहे. त्याचे परिणाम जवळपास सारखेच, पण परिमाणे कधीच समप्रमाणात नसतात. याचा अर्थ प्रयत्न विसरावेत असा नाही. पर्याप्त पर्याय पुढ्यात पडलेले नसतात, तेव्हा प्रयासांशिवाय उरतेच काय हाती? प्रयास प्रामाणिक असले की, अपयशाच्याही व्याख्या करता येतात.  

माणसाने माणसासारखं वागणं, ही काही त्याला मिळालेली दैवी देणगी वगैरे नाही. ते स्वभावदत्त शहाणपण असतं. शेकडो वर्षाच्या प्रवासातून कमावलेलं संचित आहे ते. निसर्ग काही गोष्टी जिवांना उपजत देत असतो. जनुकांच्या वाटेने ते वाहत आलेलं असतं. निसर्गाला सगळंच सातत्य राखायचं असल्याने त्याने केलेली सोय असते ती. त्यात हस्तक्षेप नसेलही करता येत, पण जगणं सुसह्य व्हावं म्हणून माणसांनी केलेल्या सोयीचे भलेबुरे संदर्भ शोधता येतात. त्यामागे बरेच सायास असतात. कितीतरी वर्षांचा प्रवास सामावलेला असतो त्यात. याचा अर्थ भोवती उभ्या केलेल्या प्रत्येक सुविधेची आयुष्यात अनिवार्यता असेलच असं नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या चौकटीत स्वाभाविकपण सामावलेलं असतं. कृत्रिमतेचे कोश कोरलेले नसतात. कृत्रिमता आली की, सोबत कारागिरी चालत येते. कारागिरी आली की, तडजोडी स्वीकारणंही आलंच. म्हणूनच केलेली प्रत्येक कृती सम्यक आहे म्हणणं अर्धसत्य असतं अन् आकारास येणाऱ्या सगळ्याच आकृत्या अर्थपूर्ण असतीलच हे म्हणणंही.

जगणं देखणं वगैरे करण्यासाठी केलेल्या प्रयासांना प्रगती म्हटलं, तर त्यांच्या परिभाषा पडताळून पाहता यायला हव्यात. प्रगतीची क्षितिजे पाहत घडणारा प्रवास जिवांच्या जगण्यातील चैतन्य असतं. अर्थात, सगळेच प्रवास काही देखणे वगैरे नसतात अन् मुक्कामाची सगळीच ठिकाणे गोमटी. चालणं भागधेय असलं तरी भाग्य घडवावं लागतं. त्यासाठी स्वतःला कोरून घ्यावं लागतं. असलेच काही किंतु तर तपासून घ्यावे लागतात. प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या परिमाणात दैवाने कोरलेल्या भाग्यरेखा हरवतात, तेव्हा मागे उरतात केवळ प्राक्तन परिवर्तनासाठी केलेल्या कष्टाच्या कथा. त्या वाचता येतात त्यांना भाग्योदयाचे साचे शोधावे नाही लागत.

सुविधा अन् सुखं निर्माण करण्यात कसलं आलंय कौतुक? माणसांना मोठं करणारी व्यवस्था निर्माण करण्यात नवलाई आहे. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला आनंदाचं अभिधान होता यायला हवं. कुणाला तरी मोठं होता यावं म्हणून आपल्याला लहान होता आलं पाहिजे. स्वतःला लहान होताना पाहण्यात आनंद सापडायला हवा. तो एक संस्कार आहे. संस्कारांचा संसार सर्वकाळ सजलेला असला, तरी तो सगळ्यांना समजेलच असं नाही अन् समजला म्हणून त्यातलं सार सापडेलच असंही नाही. संस्कार स्वयंभू असू शकतात, पण स्वयंघोषित कधीच नसतात. त्यांना उभं करण्यामागे समूहाची साधना उभी असते. तो काही दोनचार दिवसात घडणारा प्रवास नसतो. की कुठल्या जादूचे प्रयोग. त्यासाठी कितीतरी पिढ्यांनी काळाचे अंधारे कोपरे कोरलेले असतात. कितीतरी कंगोरे पारखून घेतलेले असतात.

मूठभर महात्म्य सापडलं की, स्वतःभोवती प्रदक्षिणा करणारी माणसं मात्र पदरी पडलेलं शहाणपण स्वयंभू असल्याच्या उगीच वार्ता करीत राहतात. माणुसकीचे अध्याय लेखांकित करणारं मोठेपण मापदंडाच्या मोजपट्ट्यात मावत नाही. महानतेच्या व्याख्येत सामावत नाही. ते कोणी दिलेल्या मान्यतेच्या अधीन नसतं. ना कुठल्या प्रशस्तिपत्रकातल्या अक्षरात कोंडलेलं असतं. ना कुठल्या परिपत्रकाने कार्यान्वित होत असतं. आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची स्वाभाविकता आणि उमलत्या फुलाची सहजता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही ओरडून कधी सांगितले नाही. जगाने त्यांचे मोठेपण मान्य केले. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेचा प्रकाश अन् तुकोबांच्या जगण्याचा अवकाश आकळला त्यांना आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण करायची आवश्यकता नाही.

जगात एकही गोष्ट मागून मिळत नाही. पात्र बनून मिळवावी लागते. ते काही उताराचे किनारे धरून वाहणे नसते की, पुढ्यात पसरलेल्या पात्राचे कोपरे धरून घडणारा प्रवास. त्यासाठी आपणच आपल्याला अनेक कोनातून तपासून पाहायला लागतं. असतील काही खाचखळगे आपल्या असण्यात तर तासून, तपासून बघावे लागतात. रंधा मारून समतल करायला लागतात. धाग्यातून सुटणारे संदर्भ शोधावे लागतात. काट्यांचं काम करणारे काठ कोरावे लागतात. तेव्हा कुठे आकार शब्दाचा अर्थ समजू लागतो. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण त्यामुळे आयुष्याची उंची वाढते, असे नाही. जगणं खूप समृद्ध वगैरे होतं असंही नाही. संपन्नता येते, ती परिश्रमाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या विधायक कामाने. अमंगलाचा परिहार करून मांगल्याची प्रतिष्ठापना प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणूनच जगणं असावं इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तसेच वागण्यासाठी.

कृतीपेक्षा उक्तीलाच बरकत येण्याचे दिवस आहेत सध्या. हे असं करायला हवं. ते तसं नको करायला होतं वगैरे वगैरे बोधामृत पाजण्यातला आनंद अनुभवण्यापेक्षा थोडा सहानुभूतीने विचार केला अन् समानानुभूतीने संदर्भ शोधले तर बऱ्याच किंतु-परंतुची उत्तरे गवसतील. पण असं घडणं सहसा होत नाही. त्यासाठी साहस बांधायला लागतं. आपले साहसाचे प्रयोग सहसा अंतरावरून असतात, नाही का? शब्दांचा पसारा पायलीभर असतो प्रत्येकाकडे. पण त्यातले उपयोगाचे किती, हे कळायलाही शब्दांशी सख्य साधायला लागतं. त्यांचे संदर्भ समजून घ्यायला लागतात. कुणी ऋषीमुनींनी दिलेल्या शापवाणी खऱ्या ठरायच्या म्हणे कधीकाळी! आणि आता शब्दांचा फाफटपसाराच एवढा पसरला की, शब्दांनाच आपण शापित आहोत असं वाटायला लागलं असेल.

बोलण्यातून येणारे-जाणारे सगळेच शब्द काही प्रत्ययकारी नसतात. त्यांचा प्रत्यय येण्यासाठी त्यांचा प्रवास समजून घ्यावा लागतो. त्यांना समजून घेण्याएवढा वकूब यावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. कोण्या मानिनीने आपल्या कुशल हातांनी सुपात खेळणाऱ्या धान्यातून फोलपटे पाखडून अलगद वेगळे करावेत तसे आणि नेमके तेवढेच निवडता यावेत अन् वापरताही यावेत. शब्दांचे बुडबुडे उडवून महात्म्याने मंडित नाही होता येत. माणसातलं महात्म्य आधी समजून घ्यावं लागतं. मोठेपणाचा प्रवास दोनचार दिवसांचा नसतो. त्याला विराम नसतो. स्वतःचं जगणं सगळ्यांना सजवता येतं. पण इतरांचे मोडलेले संसार सजवण्यात सहकार्याचा आश्वस्त हात बनण्यात माणसांचं मोठेपण विसावलेलं असतं. जगण्यात स्वाभिमान सामावलेला असला की, सहकार्याचे संदर्भ अन् सहानुभूतीच्या परिभाषा कोशातून पाहाव्या लागत नाहीत. त्या आयुष्याच्या सगळ्या कोपऱ्यात सामावलेल्या असतात. पण खरं हेही आहे की अस्मिता कुणाच्या तरी दारी गहाण पडल्या की, आपल्या असण्याचे अर्थ अधिक धूसर होत जातात. जगण्यात मिंधेपण सामावले की, माणूस साचतो. त्याचा परीघ विस्ताराच्या परिभाषा विसरतो. विस्तार हरवला की विचार मर्यादित बनतो. आणि भोवती मर्यादांची कुंपणे पडली की, क्षितिजे हरवतात. क्षितिजे हरवली की स्वप्ने वांझोटी होतात, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: छत्तीस

By // No comments:

देवा विठू तू सावळा

देवा विठू तू सावळा
माझा करपला मळा
तुझ्यासवे चंद्रभागा
माझा सुकलाय गळा

तुझा रांगोळीचा ओटा
माझा हंबरतो गोठा
पिलं झोपली उपाशी
पोटा घेऊन चिमटा

सुखी रखुमाई तुझी
सखी वादळात माझी
किती मोजू मी हुंदके
साद ऐक ना रे माझी

तुझी आनंदी पंढरी
शोकसभा माझ्या दारी
पाय थकले चालून
कशी करावी मी वारी?


- चंद्रकांत वानखेडे

काही नावांभोवती विस्मयाची वलये असतात, काहींभोवती कुतुहलाचे कंगोरे. काही नावे खरी असतात, काही कल्पित. पण काही नावांना अक्षय आशय प्राप्त झालेला असतो. अनेकांच्या अंतर्यामी ती अधिवास करून असतात. परिस्थितीच्या पथावरून प्रवास करताना अनेक गोष्टी बदलतात. पण काही अशा असतात, ज्यांना काळही कासरे लावून मर्यादांच्या कुंपणात नाही कोंडू शकत. काळाने कोरलेल्या कोणत्याही तुकड्यात शोधलं, तरी त्या नावाचा नाद अनाहत निनादत असतो. ‘विठ्ठल’ हे असंच एक नाव. या एका शब्दाभोवती अनेकांच्या आस्था जुळल्यायेत.

किती ऋतू आले अन् गेले, पण विठ्ठल नावाचा ऋतू अजूनही तसाच आहे. किती उन्हाळे सरकले, किती पावसाळे झरले असतील तरी हिरवाई घेऊन बहरतोच आहे. विठ्ठल केवळ दैवत नाही, तर दानवालाही देवत्त्वाच्या वाटेने वळता करणारा विचार आहे. वारी केवळ चार माणसांनी एकत्र येऊन पंढरीच्या वाटेने चालणे नाही. तो मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्गार आहे. सद्विचारांचे पाथेय घेऊन भक्तांची मांदियाळी सहासातशे वर्षांपासून पंढरीच्या वाटेने धावते आहे. दिंडी घेऊन निघालेल्या भक्तांच्या पावलांनी वाटाही मोहरलेपण घेऊन फुलत राहतात. धावत्या पावलांच्या सोबतीने सजीव होतात. सुंदरतेचे साज लेवून सजतात. पंढरीच्या वाटेने धावणाऱ्या या सगळ्यांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस नशिबाने दिलेलं फाटकं जगणंही आपलं मानतो. उसवलेलं आयुष्य सोबत घेऊन; आहे त्यात सुख शोधत राहतो. ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने विठ्ठल भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचलेला असतो.

पंढरपुरात कोणी कशासाठी जावं? हा प्रश्न तसा गौण. कुणाला आयुष्याची प्रयोजने सापडतात. कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आणखी काही. आपण आपल्याला शोधण्यासाठी जावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत, म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत, म्हणून माणूस बनून मिसळून जावं माणसांत. समूहात विसर्जित करून घ्यावं जतन करून ठेवलेलं आपलं वेगळेपण. आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी काय हवं, किती हवं, याच्या परिभाषा करता यायला हव्यात. आपण नेमकं काय शोधतो? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? शोध केवळ सुखांचाच असतो का? माहीत नाही. पण माणूस अवश्य शोधावा तेथून. समाधानही शोधता यायला हवं. त्यासाठी आयुष्याचे कोपरे सुखांनी भरलेले असावेतच असे नाही. अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते त्याच्यासाठी. कोणी म्हणतं हे सुखाचं सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. श्रद्धेचे तीर धरून वाहणारे भक्तीचे प्रवाह सरकत आहेत असेच अनेक वर्षांपासून. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या परिभाषेत. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच आपला विठोबा शोधावा. शेवटी विठ्ठल एक प्रतीक आपणच आपल्याला ओळखण्याचं. नाही का?

प्रत्येकाचा विठोबा वेगळा. आस्तिकांचा तो आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाकारला तर नाही. त्याचं असणं-नसणं तसं गौण. अध्यात्माने अधोरेखित केलेल्या अनुबंधातून त्याच्या असण्याचे अन्वयार्थ आकळतील, पण ऐहिक चौकटीच्या मापात त्याला बसवता येईलच असं नाही. त्याच्या निमित्ताने 'मी'पणाचा परीघ आकळत असेल, मनाला वेढून असलेल्या विकल्पांचा विस्तार सीमांकित होत असेल अन् अविचारांचे तणकट उपटून काढता येत असेल तर त्यात वावगं काय? मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. विठ्ठल आयुष्याला आयाम देणारे प्रतीक म्हणून पाहायला काय हरकत आहे? प्रघातनीतीच्या पलीकडे पाहून अमंगलाचा परिहार करणारे काही गवसत असेल तर ते वेचावे. आपणच आपल्याला वाचावे. सापडली चार अक्षरे तर नव्याने लिहावे. तो कुणाला कुठे अन् कसा गवसेल हे कसे सांगावे? कोणाला तो वारीत भेटतो, तर कुणाला वावरात सापडतो. त्याच्या सावळ्यारंगात आपलं अंतरंग शोधता आलं म्हणजे झालं.

पण कधी कधी परिस्थितीच अशा वळणावर आणून उभी करते की, आपण आपल्यावरचाच काय, पण ज्याच्या असण्याबाबत तिळमात्र संदेह नसतो, त्याच्यावरचा विश्वासही दोलायमान होतो. अंतःकरणात जतन केलेल्या प्रतिमेला तडे जावू लागतात. उत्तरांपेक्षा स्पष्टीकरणे मोठी होऊ लागली की, श्रद्धांचे किनारे धरून वाहणारे विचार प्रवाह बदलून प्रश्नांभोवती प्रदक्षिणा करू लागतात. संदेहाचे भुंगे विचारांना कोरु लागतात. आस्था अनुत्तरीत होऊ लागल्या की, प्रश्नांशिवाय हाती उरतेच काय? म्हणूनच असेल की काय कवी त्यालाच प्रश्न विचारतो, मी तुझी वारी का म्हणून करावी? तुझी ओवरी आनंदाने ओसंडून वाहते आहे. पण माझा ओंजळभर ओटा ओसाड का? सुखांची वसती तुझ्या आसपास अन् आनंदाची अभिधाने तुझ्या आयुष्यात. शेकडो वाटांनी वाहत येणारी सुखं तुझ्यावर तृप्तीचा अभिषेक करतायेत. समाधानाचा एक कवडसा गवसावा म्हणून माझी मात्र अखंड वणवण. शोधूनही आयुष्याचे अन्वयार्थ हाती लागत नाहीत. परिश्रमाला गीता अन् कष्टांना गाथा समजून अभावाताल्या आयुष्याला अंतरीच्या आस्थेने सामोरे जातो आहे. जीवनग्रंथाच्या पानांवर श्रमाचे अध्याय लिहूनही प्रसन्नतेचा पसाभर प्रसादपण हाती न यावा, हे कोणते भोग? प्रामाणिकपणाची परिभाषा कष्टाहून आणखी काही वेगळी असते का? खरंतर वणवण हाच जीवनाचा समानार्थी शब्द झाला आहे. हे प्राक्तनभोग माझ्याच वाट्याला का?

वावरातल्या पिकांचे मळे करपले, तर पुन्हा पेरता येतात. पण आकांक्षांचे मळे करपले, तर आस्थेच्या बिया कुठून शोधून आणाव्या? तुझ्या ओसरीला रांगोळीच्या रंगांनी देखणं केलंय, पण अंतरीच्या आस्थेने ठिपके टाकूनही आयुष्याच्या रेषा का जुळत नाहीत? कशाचीही क्षिती न करता रात्रंदिन धावाधाव करूनही घरात पिलं अन् गोठ्यात वासरं उपाशीपोटी का? युगानुयुगे तुझ्या सवे असणारी तुझी सखी रखुमाई तिकडे सुखी अन् इकडे वादळवाऱ्याशी झटाझोंबी घेत फाटक्या संसाराला माझी सखी टाके टाकतेय; पण आयुष्याची वाकळ काही सांधली जात नाही. गळ्यातल्या गळ्यात तिने किती आवंढे गिळले असतील? किती हुंदके तिने काळजात कोंडून ठेवले असतील? तुला काहीच कसे दिसत नाही? भक्तांच्या हाकेला अनवाणी धावणारा तू. पण माझ्या विनवणीचे विकल आवाज काही तुला ऐकू येत नाहीत की, तुझं काळीज कातळाचं झालं? कधीतरी साद ऐक ना रे माझी! आणखी किती परीक्षा पाहणार आहेस? पुढे प्रश्न. मागे प्रश्न. समोर प्रश्न. केवळ प्रश्न आणि प्रश्नच. प्रश्नांचं मोहळ आयुष्याला वेढा घालून बसलेलं. खरंतर त्यांची उत्तरे नाहीत असं नाही. ती तुझ्याकडेच आहेत. पण तुला परीक्षाच घ्यायची असेल तर...

अंतरी अधिवास करणाऱ्या आस्थेचे अनुबंध तुझ्या नावाशी जुळले आहेत. तो ओलावा ओंजळभर आकांक्षाना घेऊन आभाळ होऊ पाहतोय; पण आसपासचं आसमंत वावटळीच्या वेढ्यात वेढलं गेलंयं. भक्तांच्या वेदनांशी असणारं तुझं नातं कधीच नीट कळलं नाही. तू तिकडे तुझ्या सुखात मश्गूल. आणि इकडे आम्ही वेदनांचे वेद वाचतोय. नव्या जखमा काळजावर रोज चरे ओढत राहतात. जखमांवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित होत नसते. वेदनांच्या वर्तुळात विहार करणे कपाळी कोरलेले भागधेयच असेल, तर तुझा धावा तरी कशाला करावा? तुझ्या वारीच्या वाटेने कोणती सुखे वेचण्यासाठी मी चालावे?

भक्ताच्या मनाचं हे आक्रंदन नसून अंतरीच्या आस्थेने विठ्ठल नामाशी अनुबंधित असलेल्या मनाचं मनोगत आहे. त्यात रागावणं असलं, चिडणं असलं तरी आतून उमलून येणंही आहेच. अभिनिवेशांनी अंतरी अधिवास केला की, अभिव्यक्तीतील आपलेपण हरवतं अन् शब्द केवळ कवायती पुरते उरतात. शब्द सहअनुभूतीचे किनारे धरून वाहताना वेदना टिपतात, तेव्हा लेखांकित होणाऱ्या अक्षरांना नुसते देखणेपण नाही, तर आपलेपणाचा परिसस्पर्श लाभतो. खरंतर ही कविता अंतरी अधिवास करून असलेल्या आस्थेचा शोध आहे. म्हटलं तर एका सरळ रेषेत पुढे सरकणारी. शोधलं तर आशयाच्या अथांग शक्यतांना आपल्यात सामावून घेणारी. हा केवळ शब्दांचा लोभस खेळ नाही, तर प्राक्तनाने मोडलेल्या, पण उमेद न सोडलेल्या मनाचा मेळ आहे. सहज, सोपे शब्द एक अस्वस्थता अंतरी पेरत जातात. त्यात नुसत्या सहानुभूतीच्या शुष्क पसारा नाही, तर अनुभूतीच्या वाटेने येणारा विचार आहे. विठ्ठलास दूषण देण्याचा आव कवितेतील शब्दांतून दिसत असला, तरी आशयाचा भाव मात्र भक्तीचा आहे. निःसीम आपलेपण अंतरी नांदते असल्याशिवाय हक्क सांगता येत नाही आणि हाक देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, हेच खरं. विठ्ठल आणि त्याच्या भक्तांमध्ये असलेलं नातं असंच काहीसं असतं, नाही का?

चिमूटभर स्वप्ने घेऊन जगणं शोधणाऱ्या माणसांच्या आयुष्याला चिकटलेले भोग काही केल्या टळत नाहीत, हेच खरे. परिस्थिती जगण्याच्या स्थितीवर स्वार होते, तेव्हा शक्यतांचे सगळे सूर संपतात. अंधाराच्या सोबतीने घडणाऱ्या प्रवासात आयुष्याचे अन्वयार्थ हरवतात. स्वप्ने परागंदा होतात अन् जगणं समस्यांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतं. हरवलेली उत्तरे शोधत माणूस धावतो आहे, किती वर्षे झाली असतील त्याला. पण उत्तरांचा विकल्प काही हाती लागत नाही. टीचभर पोटाची खळगी अवघं आयुष्य आपल्या आत सामावून घेतं. नियतीने म्हणा किंवा निसर्गाने ललाटी कोरलेले भोग काही केल्या सरत नाहीत.

जगणं एक शोधयात्रा आहे. प्रत्येकाला काहीतरी हवंय आणि ते मिळवण्याची आस अंतरी अनवरत अस्तित्वात आहे. कुणाला सुखाचा शोध घ्यायचा, कुणाला समाधानाची नक्षत्रे वेचून आणायची आहेत, कुणाला पैसा शोधून गाठीला बांधायचा आहे, कुणाला प्रतिष्ठेचे परगणे खुणावत आहेत, कुणाला पदप्राप्ती करून आपलं वेगळं असणं अधोरेखित करायचं आहे. कुणाला आणखी काही. एकुणात इहतली असा कोणताही जीव नाही, ज्याला काही मिळवायचं नाही. काहीतरी असण्याची आस अंतरी घेऊन सगळेच नांदत आहेत. शक्य झालं तर सगळ्यांना सगळंच हवं आहे. पण त्या सावळ्या रंगाच्या मोहात पडलेल्यांना सुखांची कसली आलीये मिजास. त्याचा सहवास हेच त्याचं सुख. पण तेच मृगजळ होऊ पाहत असेल, तर त्यामागे धावावे तरी किती?  
 
अपार कष्ट करून सुखं वेचून आणायची उमेद अंतरी नांदती असूनही केवळ परिस्थितीच्या आघातांनी सगळ्याच आकांक्षांवर पाणी फिरत असेल, तर विकल मनाने हळहळण्याशिवाय हाती उरतेच काय? ‘प्राप्ती' या एका शब्दाभोवती माणसांचे जगणे प्रदक्षिणा करीत असते. प्राप्तीसाठी घडणारा प्रवास दमछाक करणारा, सत्वाचा कस लावणारा, थकवणारा. पूर्णत्व शब्दाची परिभाषाच पर्याप्त नाहीये. हवं असलेलं काहीतरी हातून निसटतंच. कुणाच्या वाट्याला मोहरलेपण येतं, कुणाच्या ओसाडपण. माणूस मात्र पळत राहतो, सुखाचं चांदणं वेचण्यासाठी. पण आसपास ओसाडपणच नांदते असेल, तर त्याला वाचावं तरी कसं? प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, तर पदर पसरून सुखाचं दान मागवं कुठून अन् कसं? प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हाती शून्य उरण्याची वेदना घेऊन ही कविता मनाचे किनारे धरून सरकत राहते.

माणसाला जगण्यासाठी श्वास जेवढे आवश्यक तेवढी श्रद्धाही. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय भक्तीचे अर्थ आकळत नाहीत. विठ्ठल या एका शब्दात महाराष्ट्राच्या भक्तीच्या प्रेरणा सामावल्या आहेत. विठ्ठल केवळ मूर्ती नाही, भक्तीचं निधान आहे. श्रद्धेचं अभिधानही आहे. येथल्या कष्टकरी समूहाचे प्रेरणा पाथेय आहे. आपत्ती येथील शेतकऱ्यांच्या आयुष्याला वर्षानुवर्षे सोबत करीत आहे. परिस्थिती उन्मळून टाकण्याची कोणतीही संधी जाऊ देत नाही. पण याच्या आस्थेची मुळं विठ्ठल नावाच्या मातीत घट्ट रुजली आहेत. संकटांशी दोन हात करत दैवाशी आणि देवाशी तो झगडतो. केवळ माझ्या वाट्यालाच असं का? म्हणून त्याला जाब विचारतो. त्याच्याशी भांडतो. तू तुझ्या सुखात तिकडे मश्गूल असताना, मी कसा तुझ्या वाटेने चालत येऊ? म्हणून त्यालाच बोल लावतो. तुला तर भक्तांचा लळा आहे म्हणतात, मग माझ्याच ललाटी हे अभिलेख का म्हणून प्रश्न विचारतो. आपलेपणाचा अथांग डोह अंतरी असल्याशिवाय आस्था उदित नाही होत आणि आस्था असल्याशिवाय आपलेपणाला अर्थ नसतो. विठ्ठल या आस्थेचंच प्रतिरूप आहे, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: पस्तीस

By // No comments:

अॅडम अॅण्ड इव्ह

चल...
पुन्हा एकदा
परत जाऊ
त्या आदिम अवस्थेकडे
जिथं सृष्टीत फक्त
तू आणि मी...
प्युअर अॅण्ड व्हर्जिन

उतरून टाकू
हा बुरखा
तुझ्या पुरूषी अहंकाराचा,
दंभाचा
अन् माझ्या आत्मभानाचाही

वरकरणी तसेही
कितीही विस्तारलोत आपण
तरी कायमच राहतोय
एक हळवा कोपरा अपूर्ण
तुझ्याशिवाय माझ्यात
अन्
माझ्याशिवाय तुझ्यातही!


विद्या बायस-ठाकूर

तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या अंधारात चाहूल लागते. कुतूहलाचा एक कवडसा डोकावून पाहतो. विसकटलेले, विखुरलेले संदर्भ जागे होतात अन् चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कुशीत विसावलेले अध्याय नव्याने वाचले जातात अन् आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. काळाच्या तुकड्यात अशा किती गोष्टी हरवल्या आणि गवसल्या असतील, ते काळालाच ठावूक. आयुष्याच्या वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले, हरलेले असे कितीतरी ‘तो’ आणि ‘ती’ विस्मृतीच्या अफाट विवरात सामावले असतील. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण नव्याने अंकुरण्याचे अभिलेख नियतीने काही सगळ्यांच्या ललाटी लेखांकित केलेले नसतात.

तो आणि ती एकाच रस्त्यावरून मार्गस्थ झालेले प्रवासी की, पात्राच्या मर्यादांचे तीर धरून धावणारा प्रवाह. की वाहणे सोबत, पण समर्पणाच्या अथांग अर्णवात विसर्जित होऊनही एकरूप न होणारे. की दिशा हरवलेल्या वाटांनी अस्मितेच्या शोधात नुसतेच भिरभिरत राहणारे. खरंतर ‘तो’ आणि ‘ती’ या दोन शब्दांमध्ये शक्यतांचे अनेक आयाम सामावलेले असतात. तिचं ‘ती’ असणं जेवढं सत्य, तेवढंच त्याचं ‘तो’ असणंही. सृष्टीच्या विकासक्रमात अनेक गोष्टी घडलेल्या असतात. काही बिघडलेल्या असतात. काही जुळलेल्या. थोडी आकळलेली, पण बरीच न उलगडलेली गुपिते काळाच्या विवरात विसावलेली असतात. प्रत्येकवेळी ती गवसतातच असं नाही अन् सगळीच सापडायला हवीत असंही नसतं. म्हणून की काय शोध घेण्याची जिज्ञासा पूर्णविराम घेत नाही. सृष्टीचा प्रवास कोणाच्या आज्ञेची परिपत्रके घेवून पुढे पळत नसतो. निसर्गात सातत्य असतं. त्याची सत्ये अबाधित असतात. प्रेरणांचं पाथेय घेऊन प्रवास घडत असतो. त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, तशा प्रत्येकासाठी वेगळ्या असतात, हेही नाकारता नाही येत. जैवसातत्याचा परिपाक कोणीतरी जवळ येणे असतो का? त्यांच्या असण्या-नसण्यातून अनेक शक्यता आकारास येतात. काहीतरी खुणावत असते. तो धांडोळा असतो आपणच आपला घेतलेला.

‘स्त्री’ या एका शब्दाभोवती अर्थाची अनेक वलये प्रदक्षिणा करीत असतात. सर्जनाचा साक्षात्कार असते ती. कळलेल्या अन् नकळलेल्या चौकटींचा शोध असते. म्हणूनच तिला समजून घेताना हातून काहीतरी निसटत असावं का? असेलही. याचा अर्थ असाही नाही की, ‘तिच्या’ असण्याचा अर्थ लागतच नाही. अन् ‘तोही’ फार सुघड, सुगम वगैरे असतो असंही नाही. विज्ञानाने घेतलेला धांडोळा एका बिंदूवर येऊन विसावतो. ही त्याची मर्यादा असते. पण तो काही पूर्णविराम नसतो. शक्यतांची अनेक चिन्हे तेथे अंकित झालेली असतात. अपेक्षांचा एखादा तुकडा लागतोही हाती. निष्कर्षांचा हवाला देवून विश्लेषण करता येते त्याचे, पण विश्लेषणाच्यापलीकडे असणारे विश्व आपल्यात आणखी काही कहाण्या घेऊन परिघाभोवती प्रदक्षिणा करीत असते. त्याभोवती कुतूहलाची वलये फेर धरून विहार करीत असतात.

संपादित ज्ञान त्याच्या आणि तिच्या नात्यातील आदिम बंधाचा वेध घेण्याचा प्रयास करतं. सृष्टीतील सर्जनचे अन्वयार्थ लावू पाहते. इहतली अधिवास करणारा माणूस नावाचा जीव विकसित झाला कसा? त्याच्या जगण्याची प्रयोजने नेमकी काय? परिस्थितीने कोरलेल्या वर्तुळात विहाराचे नेमके अर्थ कोणते? एक ना अनेक किंतु सोबत करीत असतात. अगणित प्रश्नांकित चिन्हे आयुष्यभर भोवती नांदत असतात. त्यांचा लसावी काढणे काही सुगम नसते. तो धांडोळा असतो मनी विलसणाऱ्या विचारांचा अन् वैगुण्याचाही. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतच्या त्याच्या प्रवासास प्रगतीची परिभाषा वगैरे म्हटलं, तर प्रगतीचे पर्याप्त अर्थ हाती लागतीलच असंही नाही. गवसतं त्यापेक्षा अधिक असं काही शेष असतंच.

एकेक करून प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या माणसाच्या जगण्याचा प्रवास कधी सुगम होता? अन् पुढेही फार सुलभ वगैरे असेल असंही नाही. इहतली जीवनयापन करताना प्राप्त परिस्थितीशी झगडतात, तेच जीव कालपटावर नाममुद्रा अंकित करीत असतात. अर्थात जीवनकलह जिवांना काही नवा नाही. सगळ्याच जिवांच्या जगण्याची ती अनिवार्यता आहे. निसर्गदत्त गरजा असतात त्यांच्या. त्या जगण्याशी जुळलेल्या असतात, तेवढ्याच देहधर्माशी निगडीत असतात. किंबहुना शरीराशी अधिक सख्य असतं त्यांचं. ती सहजभावना असते. पण माणसांच्या गरजा केवळ निसर्गाने गुणसूत्रात पेरलेल्या प्रेरणांपुरत्या परिमित नसतात. त्यांना अनेक परिमाणे असतात. ती वैयक्तिक असतात. पण त्याहून अधिक समूहाने पेरलेली असतात. त्याच्यामागे एक परिणत विचार उभा असतो अन् तोच प्रेरणा होतो. पण... खरंतर या ‘पण’मध्ये अनेक शक्यता सामावलेल्या असतात. त्यात परिस्थितीची जाण असते. प्रसंगांचे भान असते. तसे आत्मज्ञानही असते. इतरांना पारखून घेणे असते, तसे इतरांच्या नजरेतून स्वतःला समजून घेणे असते, तसेच अन्यांना समजून देणेही असतेच.

ही कविता असाच एक शोध घेत काळाच्या कुशीत विसावलेल्या क्षणांचे परिशीलन करू पाहते. स्त्री अन् पुरुष नात्यातील तरल अनुबंध शोधू पाहते. निरामय आयुष्य जगण्याचे बिंदू अधोरेखित करू पाहते. काळाचे किनारे धरून घडणारा प्रवास काही योजने पुढे घेऊन आला असला, तरी मागे वळून पाहताना हातून काही तरी निसटल्याचं शल्य शेष राहतेच. त्याचाही वेध घेते. काळाच्या कुशीत विसावलं, ते पुन्हा नव्याने समजून घेते. नात्याभोवती फेर धरून विहरत राहणाऱ्या किंतु-परंतुचे अन्वयार्थ लावू पाहते. चल पुन्हा एकदा परत जाऊ त्या आदिम अवस्थेकडे म्हणत आदिमबंधांचे अनुबंध शोधत आरंभबिंदूवर पोहचू पाहते. अपेक्षा करते, जिथं फक्त तो आणि ती एवढेच विकल्प असतील. कोणत्याही किल्मिषाशिवाय जगणारी नितळ, निर्मळ, निर्व्याज नाती. शुद्ध अन् सात्विक असणं कालातीत आवश्यकता असते. ओंजळभर अहं प्रबळ होतात, तेव्हा सद्सद्विवेकावर अविचारांची धूळ साचत जाते. आयुष्याचे अर्थ शोधतांना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेल्या धुळीचे कण थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात. नितळपण शोधणं काही अवघड नाही. पण काही अहं इतके भक्कम असतात की, त्याचे थर खरवडून काढणे अवघड असते.

तिच्या ‘ती’ असण्याच्या काही मर्यादा असतात. नव्हे त्या परिस्थितीने निर्माण केलेल्या असतात. तसे ‘त्याचेही’ काही परीघ असतात. ते व्यवस्थेने निर्धारित केलेले असतात. आकांक्षांच्या गगनात विहार तर दोघेही करतात, पण भरारी घेणाऱ्या पंखाना प्राप्त होणारा प्रेरणांचा पाठींबा वेगळा असतो. त्याच्या अन् तिच्या आयुष्याची प्रयोजने भिन्न बिंदूंवर उभी असतात. आयुष्याचे अर्थ शोधावे लागतात. जगण्याचे अन्वयार्थ आकळायला लागतात. त्याने तिला अन् तिने त्याला समजून घेण्याचा प्रवास अगणित प्रश्नचिन्हांच्या उत्तरांचा शोध असतो. शक्यतांचे तीर धरून वाहणारा प्रवाह असतो तो. स्त्रीचं अस्तित्व इहतली पुरूषांइतकंच पुरातन असूनही केवळ तिचं देहाने वेगळं असणं पुरुषाला अस्वस्थ करीत राहिलं असावं का? तिच्याठायी असणारी सर्जनशक्ती तिच्या सामर्थ्याचं द्योतक आहे. म्हणूनच तो स्वतःला असुरक्षित समजत आला असावा का? विश्वाचा नियंता, निर्माता कुणी असेल तो असो; पण विश्वाला सर्जनाची सूत्रे देण्याचं अन् आयुष्याची समीकरणे सोडवण्याचं सामर्थ्य तिच्याठायी एकवटल्याने तिच्याभोवती विस्मयाची अनेक वलये विहार करीत असतात.

‘त्याच्या’ आयुष्याचे अर्थ ‘तिच्या’ सहकार्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. तिचं असणं हेच मुळात सर्जनाचे एक कारण असते. तिच्या सर्जनात सामर्थ्य सामावल्याचं प्रत्यंतर आल्याने 'त्याच्या' स्वार्थप्रेरित जगाने तिला विस्मयाच्या वर्तुळात अधिष्ठित केलं असेल का? विश्वाच्या वर्तुळाला समजून घेता येईल तेव्हा येईल, पण सर्जनातून निर्मित सामर्थ्य शब्दाचा अर्थ शोधताना एक नावासमोर पूर्णविराम घ्यावा लागतो ते ‘ती’ असते. पण व्यवस्थेची रचनाच ‘त्याच्या’ पदरी झुकते माप घालणारी असल्याने तिला गृहीत धरण्यात कोणाला कोणताही किंतु वाटत नसावा. जगण्यात कळत नकळत सामावलेले अभिनिवेश अनुबंधांच्या नितळपणाची सांगता करतात. गृहीत धरणे एकदा का मान्य केले की, अस्मितांना अर्थ तरी कितीसा उरतो?

परंपरेच्या पात्रातून वाहणारे प्रवाह पर्याप्त समाधानाच्या परिभाषा असतीलच असंही नसत. आसपास नांदता परिवेश प्रगतीच्या प्रयोजनांचा शोध असायला हवा. परंपरेची वसने परिधान करून मिरवता येतं, स्वतःला सजवून मखरात मंडित करून घेता येतं; पण पूर्णत्वाचा प्रवास घडतोच असं नाही. परिधान केलेली अभिनिवेशाची वसने सहजी उतरत नसतात. तिचं ‘ती’ असणं मान्य करताना व्यवस्थेने घातलेल्या मर्यादांच्या कुंपणाना ओलांडून एक पाऊल नव्या वर्तुळात कोरता येणे खरंच अवघड असतं का? कोणाला अवघड वगैरे वाटत असेलही हे, पण असंभव नक्कीच नाही. पुरूषी अहंकाराचा, दंभाचा परिधान केलेला बुरखा उतरवून नाही का घेता येणार? त्याने तिचं ‘ती’ असणं मान्य करायला कोणता संदेह असावा? खरंतर नितळपणाचे अर्थ विचारातून प्रतीत होतात, कृतीतून आचरणात येतात अन् संवादातून स्थापित करावे लागतात.

त्याने त्याचे पुरुषी संकेत अस्मितेचे विषय म्हणून मिरवलेत. काळाच्या प्रवाहात तीही तिच्या असण्याचे अर्थ शोधत गेली. प्रगतीच्या परगण्याकडे पडलेल्या तिच्या पावलांना आत्मभानाचे आयाम आकळत गेले. भान परिस्थितीचा परिपाक असतो. आयुष्याचे अर्थ शोधणारं असं काही त्यात सामावलेलं असतं. पण भानाला पर्याप्त जाण नसेल, तर ती आत्मवंचनाही असू शकते. तिने तिचे अहं आयुष्याच्या अंतरावर ठेवावेत अन् अंतरी अधिवास करून असणारे आस्थेचे अनुबंध शोधावेत. त्याने अनुबंधांचे अर्थ आकळून घ्यावेत. हाती लागलेलं संचित निरलस विचारांच्या कोंदणात अधिष्ठित करावं. अंतरी अधिवास करणारा अहं विसर्जित करावा अन् दोघांनी मिळून निरामय नात्यांचा शोध घ्यावा. नात्याला अर्थाचे अनेक कंगोरे असावेत. व्यवस्थेच्या चौकटीत सामावताना त्यांनी सुंदरतेची प्रयोजने अधोरेखित करावीत आणि व्यवस्थेने दोघांना एकाच प्रतलावरून वाहताना पाहावे.

त्याच्या किंवा तिच्या मनी विलसणाऱ्या आकांक्षांची क्षेत्रे कितीही विस्तारली, तरी तो तिच्याशिवाय आणि ती त्याच्याशिवाय पूर्णत्वाच्या बिंदूवर पोहचू शकत नाही. प्रगतीच्या परिभाषा आयुष्याच्या पटावर अंकित केल्या, तरी एक हळवा कोपरा अंतर्यामी अधिवास करून कायम रहातोच ना! तो एकटा किंवा ती एकटी असणे पूर्णत्व नाही. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात अन् तिच्याशिवाय त्याच्या जगण्यात काहीतरी न्यून राहते. पूर्णत्वाची परिभाषा बहुदा पर्याप्त नसतेच. तो आणि ती द्वंद्व समास. एकाशिवाय दुसऱ्याला अन् दुसऱ्याशिवाय पहिल्याला अर्थ नाही. दोघांचे असणे अर्थांना अनेक अर्थ देणारे आहे. तसेच प्रमादाच्या पथावर पडलेल्या पावलांनी अनर्थांना आवतन देणारेही. सोबतीने घडणाऱ्या प्रवासाला अर्थपूर्ण करणारे, तसे अविचाराच्या आगळीकने आयुष्यात विसावलेल्या ऋतूंना अर्थहीन करणारेही. हवं असणारं काही आयुष्यात अधिवास करून असावं वाटत असेल, तर अस्तित्वाची प्रयोजने समजून घ्यावी लागतात. प्रेरणांचा प्रवास जाणून घ्यायला लागतो. फक्त कृतीचे कृतक परिमाणे अन् आयुष्याचे अर्थ तेवढे नेमके शोधता यायला हवेत. अर्थांना निरलसपणाचं लेपन करता आलं की, अंतरी अधिवास करणाऱ्या ओंजळभर ओलाव्याने आयुष्याच्या शुष्क डहाळीवरही अंकुर धरतात. यासाठी वाहत येणाऱ्या ओलाव्याच्या उगमाजवळ पोहचता यावं फक्त, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: चौतीस

By // No comments:

डाव संसाराचा

आभाळ कोपल्यावर तू कच खाल्लास
अन् दोर तोडत गेलास संसाराची
मी गणितं घालत होते उद्याची
तुझ्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची

संसाराचा डाव मांडलास तूच
मग का उधळून लावलास?
पाखरांना जेव्हा गरज होती
तेव्हाच तू गळफास घेतलास

संसाराचा पसारा आता
एकटीने कसा आवरू
थेंबाथेंबाने गळणाऱ्या घराला
फुटक्या मनगटाने कसे सावरू?

जन्मदात्या बापाची काठी व्हायचे
तर पळपुट्यासारखे पळून गेलास
रडले तर सगळेच रे!
मला मात्र एकांतात छळून गेलास

समाजाला, व्यवस्थेला तोंड देत
एकटीच मी लढते आहे
पोटच्या पोराला मात्र
लढवय्या म्हणून पाहते आहे

केविलवाणी धडपड माझी
डोळ्यात मात्र आशेचा किरण आहे
माझ्या एकटीच्या लढाईला
तुझ्या मायबापाची प्रेरणा आहे

काजवा होऊन लढत राहीन
मला सूर्याची फिकीर नाही
आभाळाला जाऊन सांग
आता
माझ्या सोबतीला आहे काळी आई


अनिता यलमटे

भविष्याच्या धूसर पटलाआड नेमकं काय दडलेलं असतं, हे काळालाही अवगत असतं की नाही, माहीत नाही. तरीही आशेच्या अस्पष्ट कवडशात काळाच्या तुकड्यांना जीव उगीच शोधत राहतो. उगवलेला आज वेदना पदरी टाकून गेला, निदान उद्याच्या गर्भातून अंकुरणारा उजेडाचा एक कवडसा हाती लागेल, या अपेक्षेने माणसे अंधार उपसत राहतात. सगळ्याच वाटा निबिड अंधाराची सोबत करीत निघालेल्या असताना मन मात्र उजेडाच्या प्रतीक्षेत क्षितिजांचे कोपरे कोरत राहते. जगण्याची आधीच तयार करून घेतलेली आखीव रेखीव सूत्रे नसतात. त्यांचे साचे तयार करून अनुरूप आकृत्या नाही साकारता येत कधी. आयुष्याच्या चित्राला मढवण्यासाठी आयत्या चौकटी कोणाला आंदण मिळाल्या आहेत? सांगणे अवघड आहे, कारण अद्याप कोणीच सुखाची वसने परिधान करून वावरत असल्याचे सांगत नाही. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्याच ललाटी वणवण भटकंतीचे अभिलेख नियतीने कोरलेले नसतात. पदरी सुखाचे दान पडूनही समाधानी राहता येतेच असेही नाही.

हाती लागलेल्या प्रत्येक क्षणांचा उत्सव करता यायला हवा, असं कोणी सांगितलं म्हणून काही जगण्याचं नंदनवन होत नसतं. आनंदाचे चार क्षण वेचता आले, म्हणून काही कोणी सुखांच्या पायघड्या आपल्या वाटेवर घालत नसतात. बहरून येण्यासाठी ऋतूंनी अंगणी विसावण्याएवढा विराम आयुष्याला घेता यायला हवा. पण जगणंच उजाड झालं असेल अन् आयुष्य वैराण झालं असेल, तर कोणत्या क्षितिजांकडे अभ्युदयाच्या अपेक्षेने पाहावे? आयुष्याचे अर्थ जगण्यात सापडतात. पुस्तकातून भेटताना, भाषणातून ऐकताना ते देखणे वगैरे वाटत असले, तरी वास्तव कधी एवढं सुगम असतं का? आयुष्याचे सगळे कोपरे प्रश्नचिन्हांनी गोंदले जातात, तेव्हा जगण्याच्या परिभाषा त्यांचा अंगभूत अर्थ हरवतात अन् डोळ्यातून साठवलेली आकांक्षांची अक्षरे आशय. व्याख्या पाठ करून आयुष्य नाही जगता येत. परिभाषा फक्त शब्द मांडतात, पण असण्या-नसण्याचे अर्थ स्वतःलाच शोधावे लागतात. ती न संपणारी शोधयात्रा असते. वणवण असते, मनात अधिवास करून असणाऱ्या आस्थेच्या बिया उगवून येण्याची.

एक अस्वस्थ तगमग घेऊन ही कविता मनाचे कोपरे कोरत राहते. परिस्थितीच्या आघाताने क्षणात होत्याचे नव्हते होते. उद्ध्वस्त करणारा तो एक पळ काळाच्या कुशीत जावून विसावतो. पण मागे अगणित समस्यांच्या पाऊलखुणा कोरून जातो. आयुष्याच्या वाटेवर कोरल्या गेलेल्या त्याच्या आकृत्या एक वेदना असते. काळजाला कापत जाणारा कातरकंप असतो. भळभळती जखम असते ती, वेदनांचा विसर न पडू देणारी. कोण्यातरी डोळ्यात कधी सुखी संसाराची पाखरे भिरभिर करत राहतात. वाऱ्याच्या हात धरून विहार करतात. थकून डहाळीवर येवून विसावतात. पण परिस्थितीच्या आघाताने झाड वठत जातं अन् मागे उरतात केवळ शुष्क अवशेष. स्वप्नांची पाखरे सैरभैर होतात. मुळं मात्र हरवलेला ओलावा शोधत राहतात. मनाच्या आसमंतावर कमान धरणारी इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो परिस्थितीच्या हताशेचा भयाण अंधार, जीवनाला व्यापून टाकणारा. हरवलेली स्वप्ने अन् विखुरलेलं जगणं घेऊन अंधारवाटेने चालण्याशिवाय अशावेळी हाती उरतेच काय?

ज्याच्या खांद्यावर विश्वासाने विसावा घ्यावा, तोच खांदा सगळे पाश सोडून मुक्तीचा मार्ग निवडतो. बंधनातले गुंते विसरून विखरत राहतो. आभाळ कोपल्यावर मुळं घट्ट धरून जमिनीला बिलगून राहावं, पण तोच कच खातो. संसारातून सुटत जातो. परिस्थितीसमोर गुढगे टेकून शरणागती पत्करतो. अगतिक होत राहतो. विकल्प संपतात त्याच्यापुरते. ती मात्र रोजच्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची गणिते सोडवत राहते. सुखाची सूत्रे अन् समाधानाच्या परिभाषा साकळून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहते. त्याच्या अशा वागण्याचा अर्थ शोधत राहते. पण हाती रितेपणाशिवाय काहीच नाही लागत. संसाराचा डाव मांडून का उधळून लावलास? म्हणून तिचं विकल मन प्रश्न विचारत राहते, त्याच्यासोबत व्यतित केलेल्या आठवणींना.

आकांक्षांच्या चतकोर तुकड्यात वाढवलेल्या झाडाच्या आश्रयाला आलेल्या पाखरांना निवाऱ्याची गरज होती, तेव्हाच झाडाने उन्मळून पडावे आणि काडीकाडी जमा करून बांधलेलं घरटं उधळून जावं. वैराण होण्याइतके आणखी वेदनादायी काय असू शकते? त्याने त्याच्यापुरते उत्तर शोधले. पण संसाराचा पसारा आता एकटीने कसा आवरायचा? थेंबाथेंबाने गळणाऱ्या घराला फुटक्या मनगटाने कसे सावरायचे? त्याच्या अवकाळी जाण्याच्या प्रश्नाहून अधिक जटिल प्रश्न तिच्यासमोर आहे जगण्याचा. हाय खाऊन तो जीवनयात्रा संपवतो. त्याच्यापुरत्या प्रश्नांच्या गुंत्यातून तो मोकळा झालाही असेल; पण त्याच्या पश्चात कुटुंबियांच्या वाट्याला येणाऱ्या रोजच्या मरणयातनांचे काय? अवकाळी मरणातून कोणते प्रश्न कधी संपले आहेत? तात्त्विकदृष्ट्या असं म्हणणं कितीही संयुक्त वगैरे वाटत असलं, तरी वास्तवाच्या वाटा वेगळ्या असतात. त्यांची वळणे प्रत्येकवेळी आकळतीलच असं नाही. समोर येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतातच असेही नाही. सगळंसगळं करूनही पदरी निराशाच येत असेल, तर समाधानच्या तुकड्यांचा शोध कसा, कुठे घ्यावा? आयुष्याचे अर्थ आणि उत्तरे शोधावीत तरी कशी?

टोकाचा पथ निवडताना काहीच विचार जाणाऱ्याच्या मनात येत नसतील का? लेकरंबाळं, सहचारिणी अगदी काही म्हणजे काहीच डोळ्यासमोर दिसत नसेल का? परिवाराप्रती आसक्तीच्या पाशांनी मन जराही बद्ध होत नसेल का? की सगळं सगळं आठवत असेल? जीव गुंतत असेलही आस्थेच्या धाग्यात, पण आसक्तीपेक्षा टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, तेव्हा सगळेच पाश तटातटा तुटतात. जगण्याचे सगळे पीळ सोडून तो सुटतो. जीव तुटतो तो मागे राहणाऱ्यांचा. भोग भोगावे लागतात मागे राहिलेल्यांना. जन्मदात्या बापाची म्हातारपणी काठी व्हायचे, तर पळपुट्यासारखे पळून गेलास, म्हणून विचारत राहते ती प्रश्न त्याच्या आठवणींना. परिस्थितीपासून पलायन ही काही पराक्रमाची परिभाषा नाही होऊ शकत. पण सगळेच पर्याय संपले असतील तर... कोणाचा काळजाचा तुकडा, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ, कोणाचा आणखी काही नात्याचे पाश क्षणात तोडून गेलेला असतो. आठवणींची सय घेऊन विकल डोळे वाहत राहतात सगळ्यांचे. वेदनांचा अथांग डोह गहिरा होत राहतो, पण जिने आपलं सगळं जगणं त्याच्या जगण्याशी जुळवलं, तिचं काय? त्यात फक्त भकास शुष्कपण उरतं. त्याच्या अशा अविचारी वागण्याने तिच्या काळजाला पडणारी घरे दिसत नसतीलच का कोणाला? की दाखवता येत नसतात तिला? उदासवाणा एकांत घेऊन आलेल्या क्षणांना हे कळावे कसे? प्रत्येक पळ छळत राहतो, धग बनून चटके देत राहतो तिला.

समाज नावाच्या व्यवस्थेला विशिष्ट विचारधारा असते का? असेल तर ती सर्वांप्रती सामानुभूतीची असते का? सर्वांप्रती समदर्शी भाव त्यातून प्रतीत होत असतात? ठाम विधान करणे अवघड आहे. त्यांची उत्तरे प्रासंगिक असतील. कदाचित भिन्न असतील. पण एक वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही, व्यवस्था अमूर्त असते. तिला आकारात अधिष्ठित नाही करता येत. आभासाच्या आकृत्या असतात त्या, चेहरा नसतो. समाजाच्या जगण्याचा अचूक लसावी नाही काढता येत. चार चांगले असतील, तर दोन वाईटही असतात गर्दीत. याकडे दुर्लक्ष करून नाही चालत. व्यवस्थेने उभ्या केलेल्या शेकडो किंतु-परंतुना, नजरांमधील हजारो प्रश्नांना सामोरी जात, तोंड देत ती एकटीच लढते. दैवाने दिलेल्या अंधारात हरवलेला आज पदरी घेऊन उद्याचा क्षितिजावर आस्थेचे कवडसे शोधत राहते. परिस्थितीशी दोन हात करायला तो कचरला असेल, पण त्याच्याच अंशाला असा पराभूत न होऊ देण्याचा निर्धार करते. एक लढवय्या म्हणून पाहते ती त्याच्यात. निदान त्याने तरी गलितगात्र होऊन परिस्थितीसमोर गुढगे टेकून संघर्षाची हत्यारे म्यान नयेत. पहाडाएवढे संकटे आणणाऱ्या प्रसंगांना सामोरे जात त्यांच्या नजरेत नजर घालून सांगावं, तू कर कितीही खेळ, मी खेळत राहीन उमेदीचा ओलावा अंतरी कायम ठेवून.

असेलही तिची ही केविलवाणी धडपड. पण डोळ्यातून आशेच्या ज्योती तिने मालवू दिल्या नाहीत. तेवत आहेत त्या दैवाच्या कराल आकृत्यांचा माग काढण्यासाठी. तिच्या लढाईला असतील यशापयशाची अनेक परिमाणे. पण प्रयत्नांना कुठे यशापयशाच्या परिमाणांच्या पट्ट्यात मोजता येतं? स्वयंभू अस्तित्वाला ओळख करून देण्याची आवश्यकता नसते. लढणाऱ्याने उचललेली प्रत्येक पावले योजनांची मुळाक्षरे असतात. त्याचे मायबाप झगडले, दैवाच्या प्रत्येक आघातांशी. परिस्थितीने पुढ्यात उभ्या केलेल्या वादळवाऱ्यासोबत झटत राहिले. तीच विजिगीषू प्रेरणा सोबत घेऊन ती परिस्थितीला आव्हान देते. काळाला करूदेत कितीही आघात. घालू दे रक्ताळणारे घाव. फारतर वाहत्या जखमा घेऊन राहीन उभी जीवनसंगरात, देहातून प्रतिकाराचा शेवटचा थेंब वाहून जात नाही तोपर्यंत. नियतीने केलेल्या आघातांच्या पराक्रमाच्या विजयी गाथा काळाला लिहूदेत. त्याच्या जयजयकाराचे जयघोष उमटू देत आभाळावर. निनादूदेत सगळ्या दिशा त्याच्या विकृत पराक्रमाच्या आनंदाने. पण माझा संघर्षाचा आवाज क्षितिजांचा वेध घेईल. सूर्याच्या तेजाची दाहकता नसेल माझ्या संघर्षाच्या अस्त्रांमध्ये, पण त्याच्याकडूनच घेतलेल्या उर्जस्वल प्रकाशाचे विस्मरण नाही झालं अजून. सूर्य बनून नाही लढता आलं म्हणून काय झालं, काजवा होऊन लढत राहीन. त्याच्या दाहकतेची फिकीर नाही आणि त्याच्या पराक्रमी प्रकाशाची पर्वा.

आभाळाला जाऊन सांग, कोसळ हवं तितकं. पांघर अंधाराची वस्त्रे साऱ्या चराचरावर. पण मनातला कवडसा कसा गिळशील? आधाराचा खांब मोडला असेलही, पण कणा अद्याप सलामत आहे अन् हरवलेली स्वप्ने पेरायला सोबतीला आहे काळ्या आईचा चतकोर तुकडा, जो संसाराच्या चौकटींना देईल नवं कोंदण. नसेलही प्रकाशाचा उत्सव माझ्या अंगणी साजरा होणार, पण हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने लख्ख प्रकाश शोधायचा आहे. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून आयुष्याची रोपटी पुन्हा काळ्या आईच्या कुशीत रुजवायची आहेत. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असल्या, त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनले असेलही. पण उसवलेल्या जगण्याला टाके घालण्याची उमेद अद्याप सोडली नाही. मनगटात आहे अजून ताकद दैवाला आणि देवालाही आव्हान देत उगवून येण्याची.

दैवशरण वृत्तीला त्यागून परिस्थितीच्या आघातांशी दोन हात करीत घर उभं करणारी 'ही' अभागी म्हणून हळव्या मनातला एक कोपरा थरथरतो. अंतर्यामी करुण भाव जागा होतो. परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांच्या पात्रात तिचं असणं अभागीपण असेलही, पण उन्मळून पडलेल्या आयुष्याला उभं करताना आघातांवर घाव घालून नव्याने रुजवण्याची जिद्द न सोडणारी रणरागिणी आहे ती. प्राप्त परिस्थिती स्वीकारून उन्मळून टाकणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना सामोरे जाण्याची जिद्द येथील प्रत्येक मातेचा, भगिनीचा जगण्याचा पैलू आहे. अबला म्हणून व्यवस्था तिला अधोरेखित करीत राहिली असेलही; पण प्रसंगी तीच दुर्गा होते, काली होते, हे कसे विसरता येईल? आयुष्याचे अर्थ लावतांना घडलेल्या प्रमादाच्या परिमार्जनाचा पर्याय असते ती. कोमल असेल, नाजूक असेल ती. पण प्रसंगी वज्रालाही आव्हान देण्याइतकी कठोर होऊ शकते. प्रेमाने, ममतेने, वात्सल्याने ओथंबलेले हृदय तिची ताकद नसून, खरं बळ परिस्थितीला वाकवणाऱ्या तिच्या अक्षुण्ण मनगटात असतं. देव अन् दैवही अशावेळी तिच्यासमोर खुजे वाटायला लागतात.

जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांना नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतील, असेही नाही. नाही होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात ते थकतात, हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन विखरत जातात अन् संपवून घेतात. एका प्रदक्षिणेला पूर्णविराम मिळतो, पण दुर्दैवाचे अगणित फेरे जन्माला घालून. संपणाऱ्यांप्रती हळहळ व्यक्त करणारे विकल शब्द काही दिवस वातावरणात विहार करतात. नियतीच्या क्रूर आघातातून जीवनाची अवकाळी सांगता झाल्याने हळहळ व्यक्त होते. वेदनांची ठसठस कालौपघात कमी होत जाऊन स्वभावानुरूप विस्मरणात जाते. नव्हे विसरावंच लागतं, कारण संघर्ष केल्याविन जीवनयात्रेची सफल सांगता कुणालाच करता येत नसते. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. मनाची समजूत घालत मुकाटपणे चालावं लागतं, नियतीने पुढ्यात आणून पेरलेल्या मार्गावरून. आजचा दिन जगणं मातीमोल करून गेला; पण निदान येणारा उद्या तरी आयुष्यात सफलतेचे रंग भरणारा असेल, या अपेक्षेने.

प्रश्न कालही होते. आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मात्र त्यांचं रूप पालटलं आहे. आवश्यकता आहे, परिघाबाहेरची उत्तरे शोधण्याची. वेदनेच्या वाटेने निघालेली पावले आपल्या चौकटीत सामावून घेण्याची. उदात्त विचारांना कृतिरूप देण्याची. जगण्याचं वर्तुळ आणखी व्यापक करण्याची. कारण विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: तेहतीस

By // No comments:

झऱ्याजवळच होते राहत


झऱ्याजवळच होते राहत
पण घडे भरून
घेतलेच नाहीत
नदी तर वहात
होती शेजारूनच
काठाकाठानेच
राहिले हिंडत

पाऊस कोसळायचा
घरांभोवती
धुवांधार
आंत आंत
कोरडीच रहात गेले
कोरडीच

फुलवले फुलांचे
ताटवे सभोवती
एकही फूल नाही
माळू शकले केसांत

दवबिंदूंना राहिले गोंजारीत
पण म्हणावी अशी
भिजलेच नाहीं
भिजलेच नाहीं

साऱ्या ऋतूंनी
आपलं मानलं
माझ्याभोवती
फेर धरला सतत
मी मात्र एकाकीच
होत गेले
एकाकीच...
एकाकीच...!


प्रा. डॉ. सौ. रामकली पावस्कर

आयुष्य असा एक शब्द ज्याचा अर्थ शोधत निष्कर्षाप्रत पोहचण्यास आयुष्य अपुरे पडते. पण याचा अर्थ असा नाही की, त्याचे अर्थ शोधण्याचा प्रयास कोणी केला नाही. सृष्टीत सर्वत्र कुतूहल पेरलेलं आहे. ते वाचायचं. वेचायचं. त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी मनाच्या मातीत आकांक्षेचे अंकुर रुजवता यायला हवेत. तेवढा ओलावा अंतरी जपता यावा. समाधानाचा सांगावा घेऊन येणाऱ्या वाटा शोधता याव्यात. सुखांच्या चांदण्या मनाच्या आसमंतात पेरता आल्या की, प्रकाशाचे कवडसे साद घालू लागतात. आयुष्याला साफल्याचा गंध लाभावा, पर्याप्त समाधान अंगणी नांदते राहावे, ही स्वाभाविक कांक्षा असते. आयुष्याकडे पाहण्याच्या प्रत्येकाच्या काही धारणा असतात. काही विचार असतात. काही श्रद्धा असतात. काही गणिते, काही सूत्रे असतात. ते घेऊन उत्तरे शोधावी लागतात. शोधाला पर्यायी विकल्प नसतो. आहे ते अन् आहे तेवढंच आपलं म्हणून चालत राहावं. उपसत राहावं स्वतःच स्वतःला. शोधत राहावं प्रत्येकवेळी नव्याने आपणच आपल्याला. कुणी वणवण म्हणेलही याला. ही भ्रमंतीच जगण्याची श्रीमंती असते. हा शोधच आयुष्य असतं नाही का? जो कधी पुरा होत नाही. काही थोडं हाती लागावं. पण पुढच्याच पावलावर आणखी दुसऱ्या विभ्रमांनी खुणावत राहावं. शेवटी सगळे सुखाच्या शोधातच तर भ्रमंती करत असतात. समाधानाचे तुकडे वेचून आणण्याची आस अंतर्यामी घेऊन पळतात. ओंजळभर ओलाव्यात अंकुरत राहतात. समाधानाच्या कळ्यां साकळत जगणं सजवत राहतात. म्हणूनच की काय संत तुकाराम महाराज ‘सुख पाहता जवापाडे...’ म्हणाले असतील का? नेमकं काय असेल, असं म्हणताना त्यांच्या मनात? आयुष्यावर लोभावीन प्रीती करावी, असं काहीसं सांगायचं असेल का त्यांना? असेलही! तसाही माणूस लोभाशिवाय वेगळा असतो का?

आयुष्याच्या अनेकांनी अनेक परिभाषा केल्या. सांगितल्या. लिहिल्या. विवेचन केलं. पण त्यातील नेमकी कोणती परिपूर्ण असेल? की अद्याप तशी तयार झाली नाहीच. असेल तर ती संपूर्ण असेल का? समजा पूर्ण असती, तर माणसाला अस्वस्थ वणवण करायची आवश्यकता असती का? म्हणतात ना, पूर्णत्वाच्यापलीकडे उभे नश्वरतेचे कडे. कदाचित ही अपूर्णताच आयुष्याचे अर्थ शोधायला प्रेरित करते. अंतर्यामी चैतन्य नांदते ठेवते. तसंही आयुष्य काही सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. तसं असतं तर सगळेच आनंदाच्या झोक्यांवर झुलताना दिसले असते. कुठे अपेक्षा आहे, तर कुठे उपेक्षा. कुठे वंचना आहे. कुठे मनोभंग, तर कुठे तेजोभंग आहे. कुठे केवळ सैरभैर धावणं आहे. कुठे प्रभाव, तर कुठे अभावाचाच प्रभाव. किती खेळ खेळतं आयुष्य ओंजळभर भावनांसोबत. आयुष्य कुणाला परीक्षा वाटते. कोणाला आनंदतीर्थ. कोणाला सुखांचा शोध. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावं, हा वैयक्तिक निवडीचा भाग. अर्थात, असं वाटण्यात वावगं काहीच नाही. कोणाला काय वाटते, म्हणून अयुष्याचे अर्थ सुगम होतातच असंही नाही.

दुपारच्या निवांत वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली कुठलंस पुस्तक वाचत विसावलो होतो. दूर कुठेतरी ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणं सुरु आहे. त्याचे बोल ऐकू येतायेत. ते ऐकून वाचनावरून लक्ष विचलित झालं अन् त्यातील शब्दांवर नकळत मन रेंगाळत राहिलं. खरंतर याआधी हे गाणं ऐकलं नाही, असं नाही. खूपवेळा ऐकलं असेल. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की, शब्दांमध्ये असणारा आशय शोधण्यापेक्षा मनातील प्रतिमांचे अर्थ आपण त्यात शोधू लागतो. शब्दांना त्यांचा स्वतःचा अर्थ असला, स्वतःचं अवकाश असलं, तरी त्यास दूर सारून मनातल्या प्रतिमांची फुलपाखरे सुरांभोवती पिंगा घालायला लागतात, शब्दांभोवती उगीचच फेर धरून विहरायला लागतात.

या गाण्यातील शब्दांचा आशय, अर्थ कोणाला काय अपेक्षित असेल, तो असो. पण त्यातल्या ‘ओझे’ शब्दावर उगीचच रेंगाळत राहिलो, मनातल्या अर्थाचं अवकाश शोधत. तसंही माणसाचा स्वभाव आपण काही करण्यापेक्षा, शक्य झाल्यास स्वाभाविकपणे एखादे काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा असतो. देता आले तर कुणाच्यातरी खांद्यावर ओझे देण्याचा असतो. तसं पाहता कुठलेही ओझे काही कोणी स्वच्छेने स्वीकारीत नसतो. कारणवश ते दत्तक दिले जाते किंवा परिस्थितीवश आपले म्हणून स्वीकारावे लागते. अर्थात हा सगळा परिस्थितीचा प्रासंगिक परिपाक असतो. ओझं शब्दात लादण्याचाच भाग अधिक असतो, नाही का?  मग ते स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं. तसंही माणसं आयुष्यभर लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरत असतात. ती कधी आप्तस्वकीयांनी, कधी स्नेह्यांनी आपलेपणाने हाती दिलेली असतात. कधी व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना परिस्थितीने पुढ्यात आणून टाकलेली. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारलेली. ती टाळता येत नाहीत आणि त्यापासून दूर पळताही येत नाही. कुठली ना कुठली ओझी घेऊन आयुष्य सरकत असते पुढे, वाटेवरच्या वळणाला वळसा घालून. कुडीत श्वास असेपर्यंत ओझ्यांना घेऊन माणूस वावरत असतो. हा प्रवास त्याच्यापुरती एक शोधयात्रा असतो. आपलं असं काही शोधत तो चालत राहतो. क्रमसंगत मार्गाने पुढे सरकत राहतो. तशी ओझीसुद्धा रंग, रूप बदलत जातात. त्यांना प्रासंगिक परिमाणे लाभत असतात. नवे आयाम मिळत असतात. आपापली वर्तुळे सांभाळत माणसं आयुष्याच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार या अर्थाने मोजले जात नसले तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. इच्छा असो, वा नसो हे ओझं ओढावं लागतं. घर नावाची चौकट उभी राहते. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले पर्यायच आणखी काही अनपेक्षित ओझी आणत असतात. एका ओझ्याने निरोप घेतला की, दुसरे असतेच उभे प्रतीक्षेत. भविष्याच्या धूसर पटावरून अपेक्षांची आणखी काही ओझी आपल्या पावलांनी चालत येतात. मोठी आणि वजनदार होत जातात. जीवनाच्या जडणघडणीसाठी समाजाकडून प्रमाणित करून घेतलेल्या प्रतिष्ठेची वलये भोवती तयार होतात. हे चक्र क्रमशः चालत राहते. मनी वसतीला उतरलेलं सगळं मिळवायचं म्हणून धावाधाव करण्यास परिस्थिती बाध्य करीत असते.

बऱ्याचदा ‘तुझं आहे तुजपाशी....’ अशी अवस्था होते. सगळ्यांसाठी सगळं करावं, तर स्वतःसाठी काही शेष राहतच नाही. आसपास सजवत राहायचं, पण स्वतःला मनाच्या आरशात बघायचं राहूनच जातं. इतरांसाठी समाधानाच्या परिभाषा रेखांकित करताना स्वतःला अधोरेखित करणारी रेषा पुसट होत जाते. हे सगळं कुणासाठी आणि का करायचं? बरं केलंही काही, तर केवळ आपणच का? बाकीच्यांचे त्यांच्या, इतरांच्या आयुष्याप्रती काही म्हणजे काहीच उत्तरदायित्व नसते का? असं काहीसं वाटू लागतं. आस्थेची पाखरे मनाच्या आसमंतात विहार करायला लागतात. संदेहाचे भोवरे वाढू लागतात, तसे विचार किंतु-परंतुच्या अवांछित आवर्तात गरगरत राहतात. शोधलीच काही उत्तरे, तरी ती डहाळीवरून सुटलेल्या पानासारखी सैरभैर भिरभिरत राहतात. विचारलं स्वतःच स्वतःला, तरी त्याचं उत्तर काही हाती लागत नाही.

इतरांच्या जगण्यात रंग भरताना आयुष्यातलं इंद्रधनुष्य रंग हरवून बसतं. हरवण्यात आनंद वगैरे असतो म्हणणं कितीही उदात्त, उन्नत वगैरे वाटत असलं, तरी समर्पणाच्या परिभाषा केवळ उपदेशात सुंदर दिसतात. आचरणात आणताना त्यांच्या मर्यादा आकळतात, तेव्हा आपल्या सीमांकित असण्याचे अर्थ नव्याने आकळू लागतात. स्वतःच स्वतःपासून निखळत जाण्याच्या वेदना घेऊन ही कविता वाहत राहते, एकाकीपणाला सोबत करीत. आसपासच्या गलक्यात आपला आवाज विरघळून जावा, एक अक्षरही कुणाला ऐकू येवू नये, यासारखी ठसठस कोणती नसते. एक वाहती वेदना सोबतीला घेऊन मनाचे कंगोरे कोरत ही कविता सरकत राहते. समुद्रात पाणी तर अथांग असावं, पण पिण्यालायक थेंबही नसावा. यासारखं वेदनादायी काही असू शकत नाही. नदीतून ओंजळभर पाणी घेऊन तिलाच अर्ध्य म्हणून दान द्यावे. हाती उरलेल्या चार थेंबांना तीर्थ मानून विसर्जित होण्यात धन्यता मानावी. विसर्जनात सर्जनाची स्वप्ने दिसावी अगदी तसे.

‘स्त्री’मनातला सनातन सल घेऊन येते ही कविता. कोणीतरी केवळ ‘ती’ आहे म्हणून परार्थात परमार्थ शोधणे तिचं प्राक्तन असतं का? नियतीने तिच्या ललाटी कोरलेले अभिलेख असतात का हे? वेदनांना कुंपणे घालून इतरांच्या आयुष्याची वर्तुळे सजवण्यासाठी आखून दिलेल्या परिघाभोवती प्रदक्षिणा घालत राहणं तिचं भागधेय असतं का? कदाचित! ती आई असेल, बहीण असेल, सहचारिणी असेल किंवा आणखी कोणती नाती तिच्या असण्याने आयुष्यात आली असतील. कदाचित ती प्रियतमाही असेल. कोणीही असली, तरी तिच्या असण्याला वेढून असलेल्या वर्तुळांना विसरून तिचा प्रवास घडणे असंभव. खरंतर ही सगळीच नाती नितांत सुंदर. त्यांचे विणलेले गोफही देखणे. पण प्रत्येक धाग्यात एक अस्फूट वेदना गुंफलेली असते. आप्तांचं आयुष्य सजवताना, स्वकीयांसाठी सुखांचा शोध घेता घेता ती स्वतःचं असणंच विसरते. त्यांच्या सुखात आपल्या समाधानाचे अर्थ शोधत राहते.    
 
‘ति’च्या जगण्याची क्षितिजे समजून घेताना आयुष्याच्या पटावर पसरत जाणाऱ्या हताशेला ही कविता शब्दांकित करते. एक उसवलेपण मांडत जाते. खरंतर सुखांची परिभाषा बनून झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याजवळच राहणं घडत असलं, तरी समाधानाचा स्पर्श लाभलेले चार थेंब ओंजळीत जमा करता येतीलच असं नाही. प्रारब्धावर पलटवार करण्याचे कितीही प्रयास केले, तरी परिस्थिती परिवर्तनाच्या प्रयत्नांवर कधी प्रघातनीती प्रहार करते, कधी नियती खोडा घालते. संकेतांची कुंपणे पार करता आली की, आयुष्याच्या वाटा शोधता येतात. पण परिस्थितीने बांधलेल्या भिंती पार करण्याइतपत हाती काही नसलं, तर प्रतीक्षेशिवाय अन् प्रार्थनेशिवाय आणखी उरतेच काय? आसपासच्या परगण्याच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरणाऱ्या नदीचा सहवास प्रासादिक असला. संपन्नतेचे दान पदरी घालणारा असला, सुंदरतेची परिभाषा घेऊन तो वाहत असेलही, पण केवळ काठ धरून सरकणे प्राक्तनात असेल, तर कोणत्या किनाऱ्यांनी प्रतीक्षा करावी? नदीच्या पात्रात विसावलेल्या पाण्याच्या अथांगपणाचा एकवेळ थांग घेता येईलही, पण अंतरंगाचा तळ शोधावा कसा? ज्याच्या गर्भात केवळ अन् केवळ असंख्य वणवे दडले आहेत. त्या ज्वालामुखीचे उद्रेक समजून घ्यावेत कसे? किनारे धरून घडणारा प्रवास पायाखालच्या वाटांशी सख्य साधणारा असला, तरी मुक्कामाचं ठिकाण समीप असेलच असे सांगता नाही येत.

अंतर्यामी भावनांचा कल्लोळ उभा राहतो. कल्लोळात असंख्य वादळे सामावलेली असतात. वादळाच्या गर्भात फक्त विखरणं असतं. सांधणं भावनांचा हात धरून येतं. भावनांचं ओथंबून आलेलं आभाळ अनेकदा भरून येतं, रितंही होतं; पण भिजायचं राहूनच जातं ते जातंच. आसपासचा ओलावा जपता जपता अंतर्यामी साठवलेली ओल आटत जाते. कोसळणाऱ्या धुवांधार पावसाचा हात धरून आलेला प्रवाह ओलावा घेऊन वाहत राहिला असेलही, पण त्याला मनाच्या मातीला काही भिजवता नाही आलं. खडकावर पडणाऱ्या पाण्याच्या प्राक्तनात वाहणं असतं, रुजणं नसतं. एक शुष्कपण घेऊन नांदणे असते ते. आस्थेचा ओलावा शोधणारी मुळे ओलाव्याच्या ओढीने सरकत राहतात. पण कोरडेपणाचा शाप घेऊन देहावर ओढलेल्या अगणित भेगांना सांभाळत पडलेली माती चिंब भिजण्याच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसली असेल, तर झाडांनी बहरावे कसे? अनेकांच्या आयुष्याला गंधाळलेपण यावं म्हणून फुलांचे ताटवे फुलवले, तरी पाकळीवरही आपली मालकी नसावी, यापेक्षा वंचनेचे आणखी कोणते अर्थ असू शकतात?

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परिसरावर मोत्यांची पखरण करीत पसरलेल्या दवबिंदूंना गोंजारत राहावं, पण स्पर्श करायला हात पुढे करण्याच्या आधीच त्यांनी निखळून पडावं. सुखंही अशीच. स्वतःसाठी चार थेंब वेचावेत, पण हाती लागण्याआधीच त्यांनी विसर्जनाच्या वाटेने विसावा शोधावा. आपलेपणाची चादर पांघरून वेढून घेणारा ओलावा निसटत राहतो. काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत राहतो. ऋतू पाठशिवणीचा खेळ खेळत राहतात. कूस बदलून नव्या वळणावर विसावतात. पण त्यांच्या बहराचे अर्थ काही आकळत नाहीत. रसरंगगंधाचे किती सोहळे सोबत घेऊन आलेले असतात ते; पण  त्यांचा स्पर्श काही घडत नाही. त्यांच्या बहराने भोवती फेर धरून पिंगा घालत राहावे. त्यात समाधानाचे तुकडे वेचत राहावेत, पण हाती काही लागू नये. एकाकीपण तेवढे मूक सोबत करीत राहावे. निखळून पडावेत माळेत आस्थेने गुंफलेले एकेक मणी. घरंगळत राहावं त्यांनी, तसं आयुष्यही कधी ओवलेल्या सूत्रातून सुटते. देठातून निखळलेल्या पानाला सैरभैर होऊन वाऱ्यासोबत धावण्याशिवाय विकल्प उरतोच कुठे?

आयुष्याला अनेक ज्ञात-अज्ञात अर्थांची वलये वेढून असतात. त्याचे अर्थ अवगत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ते शोधण्यासाठी मर्यादांची कुंपणे पार करून पायाखाली पडलेल्या वाटांनी मार्गस्थ व्हावं लागतं. चालत राहावं लागतं रस्त्यांचा शोध घेत. कधी मळलेल्या मार्गाची सोबत करीत, कधी एकाकी. माणूस चालतो आहे आपलं असं काही शोधत, जन्माला आल्यापासून. चालणं कुणाला चुकलं आहे का? चालणाऱ्यात विचारवंत होते. बुद्धिमंत होते. तत्त्ववेत्ते होते. संतमहंत होते. कोणी धांडोळा घेतला नाही आयुष्याचा? सगळ्यांनी तपासून पाहिलं आपणच आपल्याला. गवसलं का त्यांना त्याचं मर्म? आकळले का अर्थ त्यांना? असतील अथवा नसतीलही, माहीत नाही. प्रत्येकाची अनुभूती वेगळी. जशी अनुभूती, तशी अभिव्यक्ती. आयुष्य आसक्ती असते. एक असोसी असते. अर्थ तेवढे निराळे. गवसलं कुणाला काही या प्रवासात. त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलाय, आपापल्या अनुभूतीचे अध्याय हाती घेऊन. सोडवली काहींनी आयुष्याची समीकरणे, कोणी मांडली सूत्रे यशाची. म्हणून सगळ्यांनाच ते आकळेलच असंही नाही. आषाढी-कार्तिकीला वारकरी विठ्ठल भेटीची आस अंतर्यामी घेवून अनवाणी धावतात. मूर्ती म्हणून विठ्ठल एक असला, तरी प्रत्येकासाठी तो वेगळा. ज्याची जशी श्रद्धा, तसा तो त्यांना दिसतो. कुणाला काय दिसावे, कोणाला काय गवसावे, हा त्यावेळेचा साक्षात्कार असतो. आयुष्यही असेच असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: बत्तीस

By // No comments:

आरसे दिपवून टाकतात डोळे

परीक्षानळी बदलल्याने वा
कागदावरचं सूत्र मागेपुढे फिरवल्याने
रिझल्ट बदलत नसतो रासायनिक समीकरणाचा
हे पक्क ठाऊक असूनसुद्धा
आरसे चमकवले जातात विशिष्ट वेळाने
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर
अन् दिपून जातात काचबिंदू झालेले
गारगोटीगत डोळे

नितळ पाण्यात दिसावा तळ
अथवा झिरझिरीत कपड्यात
दिसावेत नटीचे योग्य उंचवटे
एवढं स्पष्ट उत्तर दिसत असूनसुद्धा
गणित अधिक किचकट केलं जातंय
दिवसेंदिवस शेतीचं

लाखो हेक्टरवर पसरलेला
हा करोडो जीवाचा कारभार
हजारो वर्षापासून जगतोय
आपल्या मूळ अस्तित्वासह
हे दुर्लक्षून दिली जातायत त्यांच्या हातात
हायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश नावाची वाणं
त्यांनी कसा घालावा ताळमेळ
या ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या शेणखताचा
फुगत चाललेल्या ढेरीगत वाढणाऱ्या
औषध खताच्या किमती
उठताहेत शेतकऱ्याच्या जिवावर
अन् त्यातील विषारी घटक पिकावर

धर्मभेद अन् प्रांतभेदाचं काळाकुट्ट गोंदण मिरवणाऱ्या
या देशाच्या भाळावर आता भरला जातोय
वर्गभेदाचा टिपिकल मळवट कुशलतेने
जाणते-अजाणतेपणाने शांत बसलेले असताना
मला विचारायचंय कलावंत, विचारवंतांना
त्यांच्या विचारांची दिशा

मूठभर हितसंबंधी गटाचं पडतंय प्रत्येक पाऊल
ही दरी वाढण्यासाठी
अन् गळ्यापर्यंत गडलेल्यांना
अधिक खोल गाडण्यासाठी

शेळ्या, कोंबड्या, मांजरं, म्हशी, बैल, म्हातारी, कर्ती,
कच्या-बच्याच्या एकत्रित कुटुंबापेक्षा
२+१ ची पॉलिश फॅमिली
किती इम्पोर्डेड झालीय या डिजिटल इंडियात

हा शंभर मजल्याचा टॉवर
ही नामू मांगाची झोपडी
तो पाचशे करोडचा उद्योग
तो गंगू कैकड्याचा तळ
ते इंटरनॅशनल मार्केटिंग
ती रुपयाला कप दूध विकत
आख्खी सकाळ विकणारी मथुरामाय
ते कपड्याचे, ज्वेलरीचे ब्रँड
तो सूती जडाभरडा पटका
लक्झरी गाड्यांची लॉंचिंग स्पर्धा
आठवडा बाजारात करडाचा होणारा सौदा
हे दिपवून टाकणारे वैभव
हा काळवंडून जाणारा वर्तमान
ही दरी, हा डोंगर वाढवतंय कोण?
समस्त विचारवंतांनो,
तुम्हालाच कळू शकतं या प्रश्नाचं गांभीर्य!


ईश्वरचंद्र हलगरे


प्रश्न कालही होते, तसे आजही आहेत. त्यांचा चेहरा तेवढा बदलला आहे. तसाही तो बदलतच असतो. मुखवटे प्रिय वाटायला लागले की, चेहऱ्याची तशीही फारशी नवलाई राहत नाही. कालच्या प्रश्नांची धार वेगळी होती. आजच्या प्रश्नाचे पाणी वेगळे आहे, एवढेच. प्रश्न तर कायम आहेतच. कदाचित आजचे प्रश्न टोकदार झाले असल्यामुळे अधिक बोचणारे ठरतात. काल माणसासमोर प्रगतीचे कोणते पाऊल प्रथम उचलावे, हा प्रश्न होता. आज अधोगतीपासून अंतरावर ठेवावे कसे, हा प्रश्न आहे. विसंगती घेऊन वहाणारे विचार सुसंगत मार्गाने किनारे गाठतील कसे, ही विवंचना आहे. विद्वेषाचे वणवे भडकलेले असताना सुरक्षित राहावे कसे, त्यांना थांबवावे कसे? हा प्रश्न आहे. जगाचे अन् जगण्याचे प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या साक्षीने अधिक जटिल होत आहेत. कधीकाळी खूप मोठ्ठे वाटणारे जग आज हातात सामावण्याएवढे लहान झाले आहे. स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर ते दिसते. संगणकाच्या पडद्यावर ते आलंय. पण मनावर त्याच्या सुसंगत प्रतिमा काही आकारास येत नाहीयेत. माणसांच्या मनात माणूसपण पेरावं कसं? हा खरा प्रश्न आहे.

प्रश्न आतले आहेत, तसे बाहेरचेही आहेत. त्यांच्याशी संघर्षरत राहावे लागतेच. पण तरीही एक प्रश्न उरतोच, सुरवात नेमकी करावी कोठून अन् कशी? अपर्याप्तता, अस्थिरता संयत, संथ जगण्याला मिळालेला अभिशाप असतो. अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन तो व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत राहतो. वेदनांची चिरंजीव सोबत काही टळत नाही. वांझ ओझी निमूटपणे वाहणे नियतीने लिहिलेले अभिलेख ठरत असतील, तर प्राक्तनाला दोष देऊन विचलित आयुष्यात कोणते बदल घडून येणार आहेत? काही ओझी सहजी फेकता येत नाहीत, हेच खरे. असे असले तरी अंतरी अधिवास करून असणारे आस्थेचे धागे सहजी सुटत नसतात.

परिवर्तनाला पर्याय नसतो, हे मान्य! आयुष्यात वसती करून असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून प्रगतीचे पथ नाही आखता येत हेही खरेच. काळाचे हात धरून चालत आलेल्या आभासी सुखांनी हजार स्वप्ने मनावर गोंदवली. विकल्पांच्या व्याख्या तयार करून पूर्तीसाठी पर्याय दिले गेले. आकांक्षांचा रुपेरी वर्ख लावून आयुष्याला  सजवले. साचे तयार करून सुखाच्या व्याख्या त्यात बसवल्या, पण तळापर्यंत काही पोहचता आलं नाही त्यांना. अभावाचाच प्रभाव असणाऱ्या आयुष्यात अभ्युदयाची स्वप्ने पाहत ओंजळभर सुख चतकोर अंगणी नांदते ठेवणाऱ्या वाटांचा शोध घेत वणवण करणाऱ्या पावलांना त्या काही गवसल्या नाहीत.

प्रशासकीय प्रमाद आणि राजकीय खेळांच्या हितसंबंधांनी होणाऱ्या शोषणातून सामान्यांच्या जगण्याला अधिक केविलवाणेपण येत असल्याने त्यांचे संघर्ष अधिक क्लेशदायी होत आहेत. व्यवस्थेतील साचलेपण वर्तनविपर्यासाच्या कहाण्या होतात, तेव्हा अस्मिताविहीन जगण्याचे ताण अधिक गुंतागुंतीचे होतात. भूमिहीन, बेरोजगार, बेघर, बेदखल समूहाच्या वेदना या कवितेतून दुःखाचे कढ घेऊन वाहत राहतात. परिवर्तनाला प्रगतीचे पंख लाभले; पण सामान्य माणसाची पत आणि त्याच्या जगण्याचा पोत काही प्रगतीच्या वार्ता करणाऱ्या जगाला कळलाच नाही. स्वप्ने सोबत घेऊन आलेल्या पावलांनी ओंजळभर परगणे समृद्ध झाले. पण क्षितिजांना कवेत घेणारा विशाल पट दुष्काळी आभाळासारखा रिताच राहिला. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे अनुबंध परिस्थितीच्या आघाताने तुटत आहेत. आस्थेचे प्रवाह आटत आहेत. परिवर्तनाचा हात धरून आलेल्या प्रगतीच्या परिभाषा सुखांचे निर्देशांक दाखवणाऱ्या आलेखाचे शीर्षबिंदू झाल्या, पण सामान्यांच्या मनात सजलेल्या समाधानाच्या व्याख्या काही होऊ शकल्या नाहीत. ग्लोबलच्या बेगडी वेस्टनात लोकल हरवत आहे. हरवलेपणाची सल घेऊन ही कविता एक अस्वस्थपण मनात पेरत जाते.

काळाचे संदर्भ काही असोत. त्यांच्या असण्या-नसण्याचे अर्थ तपासून पाहावे लागतात. समाधानाच्या मृगजळी व्याख्या समृद्धीची गंगा दारी आणत नसतात. समर्थपण समजून घेण्यासाठी व्यवस्थेतील विसंगतीची संगती लावता यायला हवी. कवी ही विसंगती नेमक्या शब्दांत अधोरेखित करतो. विचारांच्या साक्षीने जीवनाच्या व्याख्या करणाऱ्यांना प्रश्न विचारतो. बेगडी झगमगाटात वास्तव झाकोळले जात असेल, फसव्या प्रगतीच्या प्रखर प्रकाशझोतात वैगुण्ये दिसणार नाहीत याची नेटकी व्यवस्था केली जात असेल, तर पसरलेल्या उजेडाला आपलेपणाची किनार लाभेलच कशी? परीक्षानळीतील द्रव्य बदलून प्रयोग करता येतात, पण प्रयोगांच्या नावाने नळी बदलून नवे काही हाती येण्याची शक्यता शून्याइतकी सत्य असते. कागदावर कोरलेली विकासाची सूत्रे मागेपुढे फिरवल्याने समीकरणांच्या निकालात काही फरक पडत नसतो; पण दृष्टिभ्रम मात्र पद्धतशीरपणे पसरवता येतो. हे ठाऊक असूनसुद्धा स्वार्थाला परार्थाची लेबले लावून दिपवून टाकता येते. अर्थात, स्वप्नेही दुर्मीळ असलेल्या डोळ्यांना त्यांचंही अप्रूप वाटत असतं.

नितळ पाण्याच्या तळाशी विसावलेली वाळू, दगड सुस्पष्ट दिसावेत इतकं ठसठशीत चित्र समोर असताना संदर्भांना उगीच महात्म्याची पुटे चढवून उत्तरांच्या व्याख्या अधिक जटिल केल्या जातात. उत्तर दिसत असूनसुद्धा हेतुपूर्वक शेतीमातीचं गणित अधिक किचकट केलं जातंय. विकासाचे आराखडे आखायचे. आलेखांच्या चढत्या रेषा प्रगतीच्या रंगांनी रंगवायच्या. प्रगतीचे सोपान उभे करून आसपासचे परगणे सुजलाम सुफलाम करीत असल्याचे आश्वस्त केलं जातं. पण पुढे काय? लाखो हेक्टरवर पसरलेला करोडो जिवांचा पसारा हजारो वर्षापासून आपल्या मूळ अस्तित्वासह जगतोय. या वाटचालीत त्याने आयुष्याचे काही अर्थ शोधले, संकल्पित सुखांच्या काही व्याख्या तयार केल्या, समाधानाची काही सामायिक परिमाणे आखली. शेतीमातीचे मनोगते ज्ञात असणाऱ्यांना आतल्या आवाजाला प्रतिसाद देणे शिकवावे नाही लागत, पण बाहेरचे आवाज मोठे करून तेच आणि तेवढे वास्तव असल्याचे मनावर अंकित केले जाते, तेव्हा बहिरेपणालाही बरकत येते. प्रतिसादाचे शास्त्रीय पाठ पढवले जातात. प्राप्त परिस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून हायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश वाणं आकर्षक जाहिरातींच्या वेस्टनात वेढून हाती सुपूर्द केली जातायेत. मनात संदेह उदित होऊ नयेत म्हणून झगमग प्रकाशात दिसणाऱ्या सुखांचे गारुड घालून आभासी काळजी घेण्यात कोणतेही न्यून राहू दिले जात नाही.

क्रांती वगैरे सारंसारं खरं. पण क्रांतीच्या उदरात सौख्य सामावले असेल अन् तळापर्यंत तिच्या पावलांचा वावर असेल, तर त्यात संदेह असण्याचे कारण नाही. कोणी सामाजिक क्रांतीचे योगदान अधोरेखित करते, कोणी हरितक्रांतीच्या पावलांनी चालत आलेल्या बदलांना मुखरित करतात. असे करू नये असे नाही. यांचे योगदान नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. पण विज्ञानतंत्रज्ञानाचे पंख लावून आलेल्या ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या खतात शेतीचं गणित शोधणाऱ्यांनी नवी सूत्रे घेऊन आलेली समीकरणे सोडवायची कशी? परंपरेने दिलेल्या शहाणपणाचा पराभव आणि प्रगतीच्या परिभाषा घेऊन आलेल्या बदलांचा ताळमेळ घालायचा कसा? परंपरेने दिलेल्या सूत्रांवर शेतीचं अर्थशास्त्र जुळवणाऱ्या शेतकऱ्याला कशी पेलवेल यांची आकाशगामी झेप? सुखांच्या चांदण्यांनी हसणारी क्षितिजे कवेत घेण्यासाठी भरारी घेणारे पंख कोठून दत्तक आणावेत? जमिनीच्या चतकोर तुकड्याला आकांक्षांचे गगन मानणाऱ्याचे पंख कापण्याचे प्रयोग होत असतील, मातीशी सख्य साधणारी मुळंच उखडून फेकली जात असतील तर? त्याच्या आयुष्याच्या अर्थशास्त्रातून अर्थच हरवत असतील, तर जगण्याची अर्थपूर्ण संगती लावायची कशी?

समतेच्या सूत्रांचा उद्घोष करायचा. परंपरेचे किनारे धरून वाहत आलेल्या संस्कारांचा जयघोष करायचा. दीर्घ सांस्कृतिक वारसा असल्याच्या वार्ता वारंवार करीत राहायच्या. साहिष्णूपणाचे गोडवे गायचे. हे दृश्य एकीकडे, तर दुसऱ्या बाजूला दुभंगलेपण आहे ते आहेच. प्रभूची लेकरे सारी म्हणीत प्रार्थनांचे सामुहिक सूर छेडत राहायचे. समूहाची सोबत करीत छेडलेल्या सुरांचे अर्थ सापडतातच असे नाही. तो केवळ सोबतीने केलेला सोपस्कार होत असेल, तर आशयाला कोणते अर्थ राहतात? प्रार्थनांच्या निनादणाऱ्या आवाजात आयुष्याचे सूर सापडण्याऐवजी स्वरांचा साज सुटत असेल, तर जगण्याचे गाणे व्हावे कसे? आपल्या परंपराविषयी आस्था असण्यात गैर काही. त्यांचा रास्त अभिमान असण्यात काहीही वावगे नाही. पण केवळ आम्हीच श्रेष्ठ असल्याचा आग्रह किती संयुक्तिक असतो? आपणच महान वगैरे असल्याचे बेगडी अभिनिवेश घेऊन एखादा परगणा नांदतो, तेव्हा अस्वस्थपणाशिवाय हाती काय लागते? प्रत्येकाला आपल्या आणि केवळ आपल्या वर्तुळांपेक्षा अधिक काहीही नको असते, तेव्हा एकात्मता वगैरे विषय भाषणापुरते उरतात. अभिनिवेशांना आपलेपण समजण्याचा प्रमाद घडत असेल, तर ‘विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’, हे शब्द फक्त शाळेत म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेपुरते उरतात.

एखाद्या गोष्टीचा वाजवी अभिमान असणे एक गोष्ट अन् निरपेक्ष भावनेने तो आचरणात आणणे दुसरी. पहिली इतकी सोपी अन् दुसरीइतकी अवघड कोणतीही नाही. भेदाच्या भिंतींची उंची वाढत असेल अन् ललाटी वर्गभेदाचा मळवट भरून रंगांना वैविध्याची लेबले लावली जात असतील, तर याला वंचनेशिवाय आणखी कोणत्या शब्दांत लिहिता येईल? विखंडीत मानसिकता घेऊन व्यर्थ वल्गना करणाऱ्यांपेक्षा विचारवंतांचे मौन अधिक क्लेशदायक असते. विचारवंतांच्या विचारांनी विश्वाला वर्तनाच्या दिशा कळतात. कळणे आणि वळणे यात असणारे अंतर पार करावे लागते. आखून दिलेल्या वाटेने चालणे सुलभ असते. अज्ञात परगण्यांचा शोध घेण्यासाठी रस्ते शोधावे लागतात. म्हणूनच कवी जाणते-अजाणतेपणाने शांत बसलेल्या विचारी माणसांना विचारतात, तुमच्या विचारांचे प्रवाह नेमके कोणते उतार धरून वाहतात? प्रगतीला परिभाषेच्या मखरात मंडित करून आखलेल्या विचारांच्या कोरीव चौकटी घेऊन मूठभर हितसंबंधी गटांचे पाऊल अंतराय निर्माण करण्यासाठी पडत असेल अन् गळ्यापर्यंत गडलेल्यांना अधिक खोल गाडण्यासाठी असेल, तर अशावेळी विचारांच्या साक्षीने विश्वाच्या कल्याणाच्या वार्ता करणाऱ्यांनी स्वस्थ राहणे कितपत संयुक्तिक असते?

एकीकडे झगमग पाहून डोळे दिपतात, तर दुसरीकडे तगमग पाहून ओलावतात. देखाव्याच्या आकर्षकपणात दुःखे दुर्लक्षित होणे, आपणच आपल्याशी केलेली प्रतारणा ठरते. झगमगाटात सगळंच सुंदर दिसतं असल्याचा भ्रम वाहतो आहे. वेगाचे पंख घेऊन सगळेच विहार करत आहेत. याहून अधिक वेग घेऊन धावायची व्यवस्था होते आहे. शेतीमाती, बैलबारदाना शब्दांचे अर्थ कोशापुरते उरलेत. सुखांच्या शोधात भटकणारी माणसे चकचकीत घरात येऊन विसावलीत. सुखांच्या चौकटी पांघरून बसलेल्या घराचं घरपण मागेच कुठेतरी राहीलं. उरले आहेत केवळ सांगाडे. त्यांना आकार आहे; पण आपलेपण घेऊन वाहणारा ओलावा कधीच आटला आहे. घराचं घरपण नांदत्या गोकुळात असायचं, हे गोकुळच विखरत आहे. सर्वसुविधांनीयुक्त घरे उभी राहिलीत. पैशाने सुखे विकत आणली, पण समाधान उसनवार आणता नाही येत. टू बीएचकेची पॉलिश फॅमिली आयात केली, पण समाधान काही कुठे उत्पादित करता येत नाही. ते अंतरंगात असते. अंतरंगातले रंगच हरवले असतील तर...

आभाळाशी गुज करणारे टॉवर तोऱ्यात उभे राहत आहेत. त्याच्या पायाशी अंग आक्रसून बसलेली नामू मांगाची झोपडी प्रगतीच्या परिभाषेत नाही बसत. तिचं असणं व्यंग वाटू लागते, आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या उंचीला. बाधा बनून बसली आहे ती. तिच्या अस्तित्वाला विसर्जित करण्याचे प्रयास इमाल्यांच्या सौंदर्याच्या परिभाषेत रास्त ठरतात. करोडो रुपये टाकून उभ्या केलेल्या उद्योगाला गंगू कैकड्याचा तळ कसा सोसवेल? शेकडो वस्तूंचा संभार अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या सुपरशॉप्स, मॉलच्या कल्चरमध्ये अॅग्रीकल्चर नाही सामावत. टॅग टाकून गोंदलेल्या किमती स्कॅन करणाऱ्या झगमग व्यवहाराला रुपयाला कपभर दूध विकण्यासाठी  सगळी सकाळ वणवण करणाऱ्या मथुरामायच्या मनातले काहूर कळेल कसे? तिची तगमग समजेलच कशी? ब्रँडेड कपड्यांचा, ज्वेलरीचा तोरा मिरवणाऱ्यांना फाटक्या कपड्यात वावरणाऱ्या विकल आकृत्या दिसत नसतात. डोळ्यांवर चढलेली ब्रँडसची चमक आसपासची लक्तरे नाही दिसू देत. आभूषणे परिधान करून नितळ अंगकांती अन् कमनीय बांधा मिरवणाऱ्या आखीव सौंदर्याच्या उन्मादाला जडाभरडा पटका पेलवणं अशक्य. लक्झरी गाड्यांच्या विक्रीचे उच्चांक करणाऱ्यांना काळजाचा तुकडा बनून संभाळलेल्या करडाचा बाजारात होणाऱ्या सौद्यातील घालमेल कशी आकळेल?

मती गुंग करून टाकणारे, डोळे दिपवून टाकणारे वैभव, त्याची आसमंतात पसरलेली आभा, हे सुखाचं चित्र एकीकडे. दुसरीकडे आयुष्य करपवून टाकणारं जगणं. क्षणक्षणाने हातातून निसटणारा वर्तमान... ही दरी, हा डोंगर वाढवतंय कोण? खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कसा वागेल, हे सांगावे कसे? जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून वावरताना नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना भाग: एकतीस

By // No comments:

शब्दांनीच निषेध केलाय मुली

शब्दांनीच निषेध केलाय मुली...
काय लिहू तुझ्यावर?
कळ्यांच्या किंकाळीसाठी,
अजून तरी नाही सापडत शब्द
चिवचिव गाणं गावं तर,
कोणत्या सुरात गाऊ?
कोणतं रोपट लावू
तुझ्या कबरीवर?

उजाड दिसताहेत धर्मस्थळे
मी फकीर...
माझ्या कटोऱ्यात आसवांचे तळे

पुरुषत्त्वाची शिसारी येतेय
मेणबत्त्या पेटवून स्वतःसकट जाळावं इंद्रियांना
आणि
माणुसकीच्या नावाने फुकट करावे चांगभलं

चल अजान होते आहे...
येतो दुवा करुन
आसिफा...
इन्नालिलाही व इन्नाराजवून...

आज तुझ्याविषयी लिहिलं
माझ्या मुलीवर असं
कुणीच लिहू नये कधीच, कोठेच!


- साहिल शेख

आयुष्य एकरेषीय कधीच नसते. त्याचे अर्थ अवगत झाले की, जगण्याची सूत्रे सापडतात. मर्यादांची कुंपणे त्याला वेढून असली तरी सद्विचारांचे साज चढवून ते सजवता येतं. समाजमान्य संकेतांची वर्तुळे आकांक्षांचा परीघ सीमित करीत असले, तरी वर्तनव्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत, म्हणून त्यावर मान्यतेची मोहर अंकित करायला लागते. नीतिसंकेतांच्या चौकटीत अधिष्ठित केलेल्या गोष्टी आखून दिलेल्या मर्यादांच्या वर्तुळातून वजा होतात, तेव्हा विवंचना वाढवतात. वर्तनव्यवहार संदेहाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहणे वर्तनविपर्यास असतो. माणूस परिस्थितीचा निर्माता असतो की, परिस्थिती माणसाला घडवते? सांगणं अवघड आहे. पण परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, एवढं मात्र नक्की.

काळच असा आहे की श्रद्धा, विश्वासाने बांधलेली मने अन् त्यांना सांधणारी स्नेहाची सूत्रे सैलावत आहेत. आयुष्याच्या बेरजा चुकत आहेत. जगण्याची समीकरणे अवघड होत आहेत. आयुष्याचे अर्थ शोधत निघालेली माणसे अडनीड वाटांकडे वळती होत आहेत. सुखांच्या व्याख्या स्वतःच्या परिघाइतक्याच सीमित झाल्या आहेत. उन्हाचे चटके झेलत नदीचे काठ कोरडे व्हावेत, तसा अंतर्यामी नांदणारा ओलावा आटत आहे. आला दिवस वणवा माथ्यावर घेऊन रखडत चालला आहे. स्नेहाचे किनारे आक्रसत आहेत. ऋतूंचे रंग उडत आहेत. संवेदनांची झाडे वठत आहेत. अवकाळी करपणं प्राक्तन झालं आहे. आकांक्षांची पाखरे सैरभैर झाली आहेत. वाऱ्याच्या हात धरून वाहणारा परिमल परगणे सोडून परागंदा होतो आहे. आयुष्याच्या सूत्रात आस्थेने ओवलेले एकेक मणी निसटून घरंगळत आहेत. जगण्याला असा कोणता शाप लागला आहे? माहीत नाही. पण जगण्याचा गुंता दिवसागणिक वाढतो आहे.

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. येथे विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा मतलब पाहून बदलत असते. माणूस असा का वागतो? या प्रश्नांचे उत्तर अद्याप तयार झाले नाही. कदाचित पुढे जावून ते होईल याचीही खात्री नाही. संस्कारांच्या व्याख्येत तो प्रगत परिणत वगैरे असला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत प्राणीच आहे. त्याच्यातले माणूसपण नीती, नियम, संकेतांनी बद्ध केलेलं असलं, तरी त्याच्यातलं जनावर काही त्याला आदिम प्रेरणांचा विसर पडू देत नाही. माणूस म्हणून कितीही प्रगत असला, तरी त्याच्यातला पशू स्वस्थ बसत नाही. याचा अर्थ अवनत जगण्याचं सरसकटीकरण करता येतं असं नाही. प्रमाद म्हणून एकवेळ त्यांच्याकडे पाहता येईलही; पण प्रमादाचा परामर्श पर्याप्त विचारांनी घेण्याइतके सुज्ञपण विचारांत असायला लागते. विचारांना अभिनिवेशाची लेबले लावून महात्म्याच्या परिभाषा करण्याचा प्रयास होतो, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास दोलायमान व्हायला लागतो. अंधार अधिक गडद होऊ लागतो. प्रांजळपणाचा परिमल घेऊन वाहणारा विचार अस्वस्थ होतो. हे अस्वस्थपण घेऊन कवी अंतर्यामी उदित होणाऱ्या आशंकांची उत्तरे शोधत राहतो.

‘शब्दांनीच निषेध केलाय मुली’ म्हणण्याशिवाय सामान्य माणूस वेगळं करूही काय शकतो? संवेदना सगळ्या बाजूंनी तासल्या जातात, तेव्हा बोथट महात्म्याशिवाय उरतेच काय आणखी शिल्लक? आयुष्यात आगंतुकपणे आलेली अगतिकता माणूस म्हणून आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहते. सगळे विकल्प संपतात, तेव्हा हताशेशिवाय हाती काहीही शेष राहत नाही. हतबुद्धपण घेऊन येणारे कवीचे शब्द संवेदनांचे किनारे कोरत राहतात. आपणच आपल्याला खरवडत राहतात. समाजाचे व्यवहार नीतिसंमत मार्गाने चालतात, तेव्हा संदेहाला फारसा अर्थ नसतो. सत्प्रेरीत विचारांना आयुष्याचे प्रयोजन समजणाऱ्यांनी आसपास उभी केलेली नैतिकतेची लहानमोठी बेटे त्यांची उत्तरे असतात. पण मूल्यांना वळसा घालून प्रवास घडतो, तेव्हा उत्तरे काळाच्या पडद्याआड दडतात. त्याच्या विक्राळ आकृत्या तेवढ्या डोळ्यांसमोर फेर धरतात. अंधाराला चिरत चालत येतात अन् परत परत प्रश्न विचारतात, असं का घडतंय?

कोण्या मानिनीची होणारी मानखंडना माणसांनी निर्मिलेल्या मूल्यप्रणीत विचारांचा जय असू शकत नाही. माणूस एकवेळ हरला तरी चालेल, पण माणुसकी पराभूत होणं न भरून येणारं नुकसान असतं. माणूस विचारांनी वर्तला, तर माणुसकी शब्दाला अर्थाचे अनेक आयाम लाभतात. अविचारांनी वागला तर आशय हरवतात. मनात अधिवास करून असणारे विकार चांगुलपणाचं विसर्जन करतात. संस्कारांच्या कोंदणात सामावलेलं सहजपण संपवतात. ज्या प्रदेशात मानिनीच्या सामर्थ्याच्या गोष्टी अधोरेखित केल्या जातात, मातृत्वाचे सोहळे साजरे होतात, वात्सल्याचा गौरव केला जातो, पराक्रमाच्या कहाण्या सांगून सजवल्या जातात, महानतेची परिमाणे देऊन मखरात बसवले जाते, तेथे मनोभंग करणारी घटना घडते, तेव्हा पराभव संस्कृतीचं अटळ भागधेय होते. केवळ मादी म्हणून वासनांकित नजरेने तिच्याकडे बघितले जाते, तेव्हा महात्म्याचे सगळे अर्थ संपलेले असतात.

नऊ-दहा वर्षाच्या मुलीचं वाऱ्यासोबत भिरभिरायचं, झुळझुळ पाण्यासोबत वहायचं, पक्षांसोबत उडायचं, फुलपाखरासोबत बागडायचं वय. जगाच्या कुटिल कारस्थानांपासून कोसो दूर असणारं तिचं निर्व्याज जग अन् त्यातलं स्वप्नवत नितळ जगणं. पण त्या सुंदर स्वप्नांना कराल काळाची नजर लागते. आक्रीत वाट्याला येतं. आघाताने अवघं आयुष्यच क्षतविक्षत होतं. उत्क्रांतीच्या वाटेवरून चालत आलेल्या; पण पशूपासून माणूस न बनलेल्या विषारी नजरा ती केवळ मादी म्हणून अत्याचार करत असतील, तर त्याला माणुसकीच्या कोणत्या तुकड्यात मोजणार आहोत? पशूंच्या जगात मर्यादांचे उल्लंघन नसते. त्यांच्या आयुष्यात अनुनयाला अस्तित्व असलं, तरी अत्याचाराला जागा नसते. माणूस प्रगतीच्या, मूल्यांच्या, नैतिकतेच्या वार्ता वारंवार करतो. हीच असते का प्रगतीच्या वाटेने चालत आलेल्या पावलांची परिभाषा?

निरागस जिवावर घडलेल्या अत्याचाराने व्यथित झालेला कवी काय लिहू तुझ्यावर म्हणतो, तेव्हा माणुसकीच्या सगळ्या परिभाषा परास्त झालेल्या असतात. कोवळ्या कायेवर आघात होताना उठलेल्या तिच्या किंकाळीसाठी कोणते शब्द वापरावे? कळ्यांच्या उमलत्या स्वप्नांचा होणारा चुराडा मांडायला नाहीच सापडत शब्द. आयुष्याचे सगळेच सूर सुटले असतील, ताल तुटले असतील तर चिवचिव गाणं गावं कसं? हतबुद्ध मनाने कोणत्या परगण्यातून सूर शोधून आणावेत? आवाजच गलितगात्र झाला असेल, तर शब्दांना स्वरांचा साज चढेलच कसा? कोणत्या सुरात गाऊ तुझ्यासाठी? विचारणारा कवीचा प्रश्न मनात वसती करून असलेल्या संवेदनांना कोरत राहतो.

काळही क्षणभर थिजला असेल का तिच्या देहाच्या चिंध्या होताना? विकृती पाहून त्यानेही हंबरडा फोडला असेल का? कोमल मनाचे तुकडे होताना कोणत्या दिशा गहिवरून आल्या असतील? देह संपतो, पण मागे उरणाऱ्या आठवणींची रोपटी मनाच्या मातीतून कशी उखडून फेकता येतील? माणूस साऱ्या सुखांच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगणारे सगळेच धर्म का पराभूत होत असतील, विकारांनी विचलित झालेल्या परगण्यात? मांगल्याची आराधना करणारी धर्मस्थळे अविचारांच्या वावटळीत ध्वस्त होत जातात. ती नूर हरवून बसतात, तेव्हा सौंदर्याची परिमाणे संपलेली असतात. उजाडपणाचे शाप ललाटी गोंदवून घडणारी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण त्यांचं प्राक्तन बनतं.

मी फकीर माझ्या कटोऱ्यात साचलेल्या आसवांच्या तळ्याशिवाय तुला द्यायला काही नाही म्हणताना कवीच्या मनाची अगतिकता सद्विचारांच्या पराभवाचं शल्य बनून प्रकटते. काळजाला लागलेली धग वेदना घेऊन वाहत राहते वणव्यासारखी, वारा नेईल तिकडे. माणसाच्या अंतर्यामी नांदणाऱ्या संवेदनाच पराभूत झाल्या असतील, तर कुठल्या क्षितिजांकडे सत्प्रेरीत विचारांचे दान मागावे? पुरुष म्हणून परंपरांनी मान्यता दिलेलं पुरुषत्त्व मिळालं, ही काही स्वतःची कमाई नसते. पुरुष म्हणून नियतीने काही गोष्टी पदरी घातल्या असतील, तर त्यात कसला आलाय पराक्रम? पण त्याच पुरुषत्वाच्या परिभाषा एखाद्या असहाय जिवाच्या आयुष्याची वेदना होतात, तेव्हा पुरुषपणाचा टेंभा मिरवण्यात कोणतं सौख्य सामावलेलं असतं? मेणबत्त्या पेटवून घटनांचा निषेध करता येतो, पण विरोध म्हणजे अविचारांना मिळणारा विराम नसतो. मुक्तीच्या मार्गावरून प्रवास घडावा, म्हणून प्रार्थनाही केल्या जातात. पण प्रार्थनांच्या प्रकाशात पावलापुरती वाट सापडेलच, याची शाश्वती देता येते का? प्रकाशच परागंदा झाला असेल, आयुष्यात अंधारच नाचत असेल, तर कोणत्या प्रार्थना फळास येतील?

मनाच्या मातीआड दडलेला क्रोध प्रश्न विचारात राहतो, स्वतःसकट जाळावं का इंद्रियांना आणि माणुसकीच्या नावाने फुकट करावं का चांगभलं? कवितेतून वाहणारी वेदना उद्विग्नता घेऊन पसरत जाते विकल मनाच्या प्रतलावरून. अंतर्यामी वसतीला आलेली असहायता माणुसकीच्या पराभवाच्या खुणा शोधत राहते. कुठूनतरी अजान होत असल्याचे आवाज कानी येतात. तेवढाच अंधारात एक कवडसा दिसतो आहे. त्याचा हात धरून निघालो, तर सापडतील काही उत्तरे आपणच केलेल्या आपल्या पराभवाची. मर्यादांचे परीघ घेऊन आलेल्या माणसाला प्रार्थनांशिवाय आणखी दुसरे काय करता येण्यासारखे आहे? प्रार्थनांनी जगाचे व्यवहार बदलतील की नाही, माहीत नाही. पसायदानाचे अर्थ आकळले की, चुकलेल्या पावलांना अन् भरकटलेल्या विचारांना आपलेपणाचा ओलावा लाभतो. पण संवेदनांनीच जगण्यातून काढता पाय घेतला असेल तर? आसिफा तुझ्यासाठी दुवा करुन येतो, म्हणून कवी नियंत्याच्या पदरी निवारा शोधतो. या दुवा सफल होऊन मुक्तीचे मार्ग दाखवतील, ही आस मनात अधिवास करून असते.

अभागी जिवासाठी लिहणं घडल्याची खंत कवीच्या मनात अस्वस्थपण पेरत राहते. हे लिहिण्यात काही सुखांचा शोध नव्हता. आपणच आपल्यापासून उखडत चालल्याची वेदना अजूनही तशीच वाहते आहे त्याच्या विचारातून. एक निरागस जीव अविचारांच्या वणव्यात भस्मसात झाला. उमलण्याआधीच कळी कुरतडली गेली. मातीच्या कुशीत माती होऊन कोवळा देह विसर्जित झाला. पण माणुसकीचाही पराभव झाला. माणूस म्हणून जगण्यावर अनेक प्रश्नचिन्हे अंकित झाली. हळहळ व्यक्त करण्याशिवाय काही करू शकत नाही, ही माझी अगतिकता. असं कवी म्हणतो, तेव्हा ‘पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा’ म्हणतात यावर विश्वास ठेवावा लागतो. भविष्यात माझ्या किंवा कोणाच्या मुलीवर असं कुणीच लिहू नये कधीच, कोठेच, म्हणून विश्वाचे व्यवहार नियंत्रित करणाऱ्या शक्तीकडे पदर पसरून मागण्याशिवाय सामान्य वकुब असणारा माणूस काय करू शकतो?

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, माणसाची प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्यासाठी एकीकडे त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. त्याचे विसकटलेले रंग अजूनही माणसांना बदलता आलेले नाहीत. जगणे उसवत आहे. सामान्य माणसांनी अशा जगण्याला नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे, हे प्राक्तन होऊ पाहत आहे. नियतीने नशिबी लादलेले भोग घेऊन माणसे अस्वस्थ वणवण करीत आहेत. जग कसे आहे, कसे असावे, याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत. सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे, असंख्य प्रश्नांच्या आवर्तात गरगर फिरणारे.

कलहाने फाटलेले आणि संघर्षाने विटलेले जग सोबत घेऊन माणूस किती काळ सुखाच्या शोधात भटकणार आहे? आपलेपणाचा ओलावा आटलेलं, ओळख हरवलेल्या चेहऱ्याचं जगणं आम्ही पुढच्या पिढ्यांच्या हाती देणार आहोत का? माणूस म्हणून प्रत्येकाला अस्तित्व असणारं जगणं देण्यासाठी काहीच न करणारं जग देणार आहोत का? आरंभ, स्थिती, लय क्रमाने जिवांची जीवनयात्रा सुरु असते. देहासह नांदणारे चैतन्य एक दिवस संपते. शिल्लक काहीही उरत नाही. उरल्याच तर स्मृती. पण एखाद्याच्या जाण्याने अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. अंतर्यामी अनामिक अस्वस्थता दाटून येते. ओळखीचे कोणी असेल तर माणसे हळहळतातच; पण अशीही काही माणसे असतात, ज्यांना आयुष्यात आपण कधीही पाहिले नसते. ना त्यांचा देश ठाऊक असतो, ना त्यांचे नाव-गाव ठावूक असते. त्यांचे अनपेक्षितपणे जाणे समोर येते आणि विचलित होतो. ज्याच्याजवळ वेदनांनी गहिवरणारं मन अन् सहवेदना बनून प्रकटणारी भावना आहे, डोळ्यांमध्ये आसवांचे दोन थेंब आहेत अशी माणसे अस्वस्थ होतात, हे अस्वस्थपण माणसातील माणूसपण शिल्लक असल्याचे द्योतक असते. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••