Jagatikikaran | जागतिकीकरण

By
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ म्हणतात. तसाच डिसेंबर महिना नेहमीप्रमाणे आम्हा शिक्षकांसाठी इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्षातला अभासक्रम पूर्ण करून सराव परीक्षांच्या पुढील नियोजनात संपतो. याही वर्षातील दहावीच्या वर्गांमधला जवळपास सर्वच विषयांचा अभ्यास अंतिम टप्प्यावर पोहचलेला. वर्गात इतिहास विषयाच्या पुस्तकातील ‘जागतिकीकरण’ या शेवटच्या पाठाचे गेल्या दोनतीन तासिकांपासून अध्यापन सुरु होते. तो अपूर्ण राहिलेला पाठ पुढे शिकवणं सुरु होतं. वर्गात मुलं एकाग्रचित्ताने एकतायेत, पाठातील आशय समजून घेत आहेत. माझे अध्यापनाचे सूर वरच्या पट्टीत लागलेले. मुलं समजून घेत आहेत म्हटल्यावर अधिकचं बोलणंही चाललं आहे. (जागतिकीकरणाचा हाही एक परिणाम) जागतिकीकरणाचे फायदे, तोटे वगैरे विशद करून मुलांना सांगतोय. तासिका संपल्याची घंटा वाजली. बाकीचा राहिलेला भाग पुढच्या तासिकेला बघू, म्हणून वर्गातून निघतोय, तेवढ्यात एक विद्यार्थिनी उभं राहून बोलली, “सर, थोडं थांबतात का? मला काही प्रश्न विचारायचेयेत.” थांबलो थोडा.

पुढच्या तासिकेचे शिक्षक त्या वर्गावर आले म्हणाले, “सर, शिकवत असाल, तर तुम्हीच घ्या हा तास. तास ऑफ आहे. मला दिला आहे. वाटल्यास मी तुमच्या पुढच्या वर्गावर जातो. चालू द्या तुमचं शिकवणं.” “ठीक आहे सर, मलाही अध्यापनासाठी एवीतेवी पुढची तासिका नाही, तुम्ही जा, मी शिकवतो या वर्गावर.” म्हणून त्यांना सांगीतले. ते शिक्षकदालनाकडे परत निघाले. आमचं बोलणं सुरु असताना वर्गातील मुलं एव्हाना दबक्या आवाजात आपापसात बोलू लागली होती. वर्गाकडे एकदा पहिले. वर्ग पुन्हा शांत. चुळबूळ, बडबड थांबली. ज्या मुलीने मला थांबवून प्रश्न विचारला होता; तिला म्हणालो, “हा मॅडम, बोला काय विचारायचं तुम्हाला?” “सर, जागतिकीकरण चांगलं की वाईट.” ती म्हणाली. आतामात्र मी विचारात पडलो. नेमकं काय म्हणायचंय तुला, म्हणून विचारलं. ती म्हणाली, “सर, जागतिकीकरणाच्या दोन्ही बाजू तुम्ही सांगतायेत. पुस्तकातही ते लिहिलंय; पण मला नक्की समजत नाही, या जागतिकीकरणाचा फायदा नेमका कोणाला? म्हणून विचारतेय.”

क्षणभर विचार केला, मग म्हणालो, "ते चांगलं की वाईट, ही बाब व्यक्तीसापेक्ष आहे. जर या जागतिकीकरणाला माणसाचा चेहरा असेल तर माझ्यामते, ते चांगलं; पण यामुळे माझा चेहरा हरवत असेल, माझी ओळख मीच विसरत असेल, तर ते चांगलं कसं असेल? आता तूच मला सांग, जर तुझ्या सभोवताली अशी चेहरा हरवलेली माणसं असतील, तू त्यांना पाहिलं असशील, जर त्यांच्या जगण्यापर्यंत जागतिकीकरणाच्या संपन्न वाटा पोहचत नसतील, तर ते जागतिकीकरण कसं काय नव्यायुगाची नवस्वप्ने सामान्यांच्या जीवनात रुजवणारं असेल?" असं बरंच काहीकाही मुलांशी बोलता बोलता तोही तास संपला. माझ्या तेवढ्या बोलण्याने मुलाचं बऱ्यापैकी समाधान झालं असावं; पण माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर कुठं अजून पूर्ण झालं! मीच मला विचारत गेलो, शोधत गेलो.

वर्षामागून वर्षे सरतात. काळाची पालखी आपल्याच नादात, तालात पुढे चालत असते. पुढे जाताना, जगताना व्यवस्थेत आपल्या असण्याचे, नसण्याचे व्यवस्थेनेच निर्माण केलेले प्रश्नही अटळपणे बदलतातच ना! या बदलत जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरात जर सामान्य माणूस त्याच्या चेहऱ्यासह अस्तित्वात असला, तर ते बदल नक्कीच सुखद असतात. आज असं परिवर्तन सर्वच क्षेत्रात घडताना दिसत आहे का? काळ चागला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. सगळीकडे अनिश्चिततेचे मळभ पसरलंय. परिस्थितीच्या, परिवर्तनाच्या रेट्यात गावं बदलली, पण गावाचं गावपण हरवलं आहे. गावातली माणसंही बदलली, त्यांच्या जगण्याचे संदर्भही बदलले. माणसं स्वार्थाला परमार्थ समजू लागली. जो तो स्वतःभोवती स्वार्थाचं कुंपण तयार करून त्यात सुरक्षित ठेवू लागला आहे. स्वार्थपरायणतेत सामाजिक हित हरवलंय. स्वतःच्या सुखापलीकडे कुणाला काही दिसत नसल्याने, ती सुखं मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं गेलं. गावांचा चेहरा बदलून तो विरूप होऊ लागला. निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीने नवे परगणे उभे केले. गावातलं ‘राज’ गेलं त्याला ‘कारण’ जुळलं अन् राजकारणाचे नवे फड रंगू लागले आहेत. या रंगात ग्रामविकास हा शब्द फक्त सामासिक शब्द म्हणून उरला. या रंगात रंगण्याची ज्याची मानसिकता नव्हती, वर्तुळात ज्यांना ठाव नव्हता; त्यांनी शहराच्या वाटा निवडून जवळ केल्या. तिकडे गावं ओस पडू लागली, इकडे शहरं बकालपण घेऊन वाढू लागली. माणसं हताशपण सोबत घेऊन जगण्यासाठी ठाव शोधू लागली आहेत.

खरंतर संघर्ष जीवनाचा स्थायीभाव आहे. विश्वात जे संघर्ष करतात तेच टिकतात, हे सत्यही आहे. एकेकाळी इहतलावर अधिराज्य असणारे डायनोसॉरसारखे महाकायप्राणी संघर्षरत न राहिल्याने आपले अस्तित्व विसर्जित करून आज फक्त स्मृतिरूपाने शेष राहिलेत. माणूस मात्र टिकला आहे, कारण त्याची संघर्षयात्रा थांबलेली नाही. अजून तो थकलेलाही नाही. येणारा उद्याचा सूर्योदय माझ्या जीवनवाटांना प्रकाशित करणारा असेल, समस्यांची उकल करणारा असेल. या आशावादावर तो समस्यांशी धडका देतो आहे. मनी वसणाऱ्या सुखांचा शोध घेत आहे. जीवनकलहात संघर्षरत राहूनही जीवनातील समस्यांचा गुंता ज्यांना सोडवता आला नाही, त्या अभाग्यानी अंत हाच संघर्ष समजून आपलं अस्तित्वच विसर्जित केलं. हताशेतून इहलोकीची यात्रा संपवणारी ही माणसं अवकाळी मरण पत्करत होती. त्यांचं अवकाळी जाणं थांबावं म्हणून शासनाने मदतीची पॅकेजेस दिली; पण या मदतीने मरणाचे दोर काही सैल झाले नाहीत. ना पुढचे प्रश्न संपले. बिनचेहऱ्यांचं जगणं सोबतीला असणारे चेहरे कायमचेच काळाच्या पडद्याआड सरकले.

लाखालाखांचे मासिक वेतन घेणारे मंदीच्या एका फटक्याने उधळून लावले, तेथे सामान्यांकडे बघतोय तरी कोण? जगण्याचीही स्पर्धा झाली आहे अन् मरण्याचीही स्पर्धा लागलीय जणू. जीवनात शिकण्यापासून नोकरीपर्यंत फक्त स्पर्धा उरल्या. स्पर्धेत संघर्ष अटळ ठरला आहे. संघर्षात जो अडला तो संपला. असं भीषण वास्तव समोर दिसतंय. मीही गावातच शिकलो. वाढलो. घडलो. शेतीचा पिढीजात व्यवसायही पाहिला. समस्या तेव्हाही होत्या. आपत्ती तेव्हाही होत्या. माणसं तेव्हाही हताश व्हायची, निराश व्हायची. पण जीवनाला कंटाळून पूर्णविराम घेत नव्हती. परिस्थितीशी धडका देत उभी राहत होती. ते उभे राहावेत म्हणून माणसं त्यांना हात देत होती. साथ देत होती. मरणाशी सामना करून त्याला परतवून लावत होती. सांप्रतकाळी एवढ्या सुविधा, एवढी साधने हाती असतानाही; अनपेक्षित वेदनांचं, समस्येच्या भळभळणाऱ्या जखमांचं, अवकाळी मरणाचं, मरणयातनांचं जग का प्रबल होत जावं?

कधी नव्हे इतका पैसा आज माणसांकडे आला; मात्र मनं दरिद्री झाली आहेत. इमारतींची उंची आम्ही वाढवली; पण माणसं उंची हरवून बसली. अगदी दूर, दूर चंद्रावर पोहचली, मंगळावर वसतीसाठी राहण्याचं बुकिंग सुरु झालं. यानं शनिपर्यंत पोहोचल्याच्या वार्ता आपण करतो; पण आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो, हेही माहीत नसावं का? पूर्वी गावं लहान होती, पण माणसं मनानं मोठी होती. वर्तमानकाळी घडून येणाऱ्या बदलांनी मोठेपणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. जागतिकीकरणाने समृद्धी आली. खिश्यात पैसा खुळखुळतोय. त्याचा स्पर्श, त्याचा आवाज सुखद वाटतोय. नोटा जमा करण्याचा छंद आम्हाला लागलाय; परंतु त्या नोटांवरील प्रतिमेतून दिसणाऱ्या मोहनदास गांधी नावाच्या विरक्त महात्म्याचे विचार जमा करून थोडं तरी त्याप्रमाणे वागण्याचा छंद आम्ही साऱ्यांनी का नाही लावून घेतला?

कायद्याचं ज्ञान झालं; पण जगण्याचं भान आम्हाला किती आलं? कायदा मोडण्यासाठीच असतो, असं समजून आमचं वागणं घडत आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना साध्या साध्या नियमांचेही पालन करण्याचे सौजन्य आम्ही दाखवू नये का? लहानसहान गोष्टीत एवढी बेफिकीर मानसिकता असेल तर इतर बाबतीत न बोललेलंच बरं. समाजात जगताना श्रीमंतानी श्रीमंतीत जगावं, गरिबांनी दारिद्र्यात सुख मानावं का? जागतिकीकरणाने मूठभरांचे दारिद्र्य संपवलं असेल, कणभरांच्या वाट्याला समृद्धी आणली असेल, पण मणभर माणसं परिस्थितीच्या आवर्तात भोळवंडून निघतायेत, त्याचं काय? देशातल्या धनिकांची संख्या वाढल्याचं वर्तमानपत्रातून वाचतो. त्या नामावलीत अशी किती नावं नव्यानं जुळतात? आपला देश महासत्ता बनण्याच्या आपण वार्ता करतो; पण या महासत्तेच्या पथावर उपासमार, दारिद्र्य, बेरोजगारी, भ्रष्ट्राचारासारखी किती व्यवधानं उभी आहेत. त्यांना पार कसं करायचं, याचं समर्पक उत्तर जागतिकीकरणाच्या परिवर्तनांत आहे का? असेल तर, कधी यात बदल होईल? जागतिकीकरणाच्या झगमगाटात संधी दिसत असतीलही; पण समस्यांची बाजू नेहमी अंधाराकडेच का असावी?

एकीकडे प्रचंड सामर्थ्य, पण पलीकडील दुसरीबाजू सांगते, अजूनही बरंच काही करायचं शिल्लक राहिलं आहे. भारत खूप बदलला असं बरेच जण सांगतात, बोलतात, ते खरंही आहे; पण सगळाच भारत बदलला का? या प्रश्नाचं उत्तर अजूनतरी नकारार्थीच द्यावं लागतं. गावागावापर्यंत रस्ते पोहचले, वाहने पोहचली. चार पदरी, आठ पदरी काळेशार, गुळगुळीत द्रुतगती महामार्गही तयार झाले. त्यावरून महागड्या गाड्या वाऱ्याशी स्पर्धा करीत सुसाट धावू लागल्या आहेत. या गतीलाच आम्ही प्रगतीचा वेग समजायचा का? टीव्ही, संगणकाने संप्रेषणाचे संदर्भ बदलले. सर्वसामान्यांच्या हाती भ्रमणध्वनी आले. मॅसेज, इमेलने संवाद वाढला, पण त्यातून सुसंवाद, सुखसंवाद घडला का?

मंदिरातील आरत्या, महाआरत्या, अभिषेक टीव्हीच्या पडद्यावरून घरबसल्या दिसू लागले. कोणातरी महान विभूतींची आध्यात्मिकता वाहिन्यांवरून भक्तिरंग घेऊन वाहताना दिसू लागली. प्रवचनांच्या, सत्संगांच्या कार्यक्रमाना गर्दी ओसंडून वाहते आहे. पण विचारवंतांच्या व्याख्यानांचे मंडप ओस पडत आहेत. माणसं मन:शांतीचे मार्ग शोधू लागले. मंदिरे तेव्हाही होती, आजही आहेत; मग त्यात दर्शन घेणाऱ्यांच्या रांगा एवढ्या का वाढल्या आहेत? पैसा आला समृद्धीही आली. मनाचं स्वास्थ्यमात्र दिवसेंदिवस दूर चाललं आहे. जीवनाची गती वाढली; पण गुंताही वाढत चालला आहे. हा गुंता वाढतोय, तशी माणसं कोणतातरी आधार शोधातायेत. ज्यांना मिळाला ते सावरतायेत. जे निसटले ते व्यसनांच्या दलदलीत रुतातायेत. मार्ग, महामार्गास लागून  बियरबार नावाची एक नवी संस्कृती पावसाळ्यात जागोजागी उगवणाऱ्या भूछत्रांप्रमाणे उगवलेली दिसते आहे. कोजागिरीची रात्र चांदण्यावरचे संकट ठरते आहे. एकतीस डिसेंबरला संस्कृतीचे सीमोल्लंघन घडते आहे. व्यसनांना बेगडी प्रतिष्ठा मिळते आहे.

जीवघेणी स्पर्धा मूठभरांसाठी सुखाचा मार्ग दाखवतेय. धावण्याची इच्छा असो, नसो त्या मार्गावरून धावताना अनेकांची मने रक्तबंबाळ होत आहेत. सक्षम पर्याय हाती नसणारे, या स्पर्धेत मुळासकट उखडण्याच्या बिंदूवर उभे आहेत. माझ्या बालपणाच्या गावातील सुतार नेट, लोहाराचा भाता, कुंभाराचा आवा आता गावात दिसतोय कुठे? असले तरी फक्त धुगधुगी टिकवत नावापुरतं त्यांचं अस्तित्व शिल्लक आहे. गावातील सुतारनेटवरील गप्पांचे फड हरवलेत. गावात ट्रॅक्टर आले. बैलगाडीची लाकडी चाकं बदलून लोखंडी चाकं लागली, नव्हे सगळी बैलगाडीच लोखंडापासून तयार झाली आहे. ज्यांच्याकडे परंपरागत ज्ञान होते; पण व्यवसायात टिकण्यासाठी अद्ययावत साधने, संपत्ती नव्हती, ते या परिवर्तनाच्या आवर्तात सापडले अन् गरगरत पाचोळ्यासारखे दूर फेकले गेले. नशीब नेईल तिकडे जगण्याच्या ओढीने वाहत राहिले.

स्पर्धेत टिकू न शकल्याने गलितगात्र झालेले गावातले सुतार, लोहार, कुंभार पोटासाठी मिळतील त्या दिशाना चालते झाले. फ्रीज, फिल्टर, मिनरल पाण्याच्या जमान्यात मडक्यातलं शीतल पाणीही संपलं आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे लोखंडाचा देह धारण करून आधुनिक झाली. ट्रॅक्टर आल्याने त्यांची गरज फार उरली नाही. माणसांना दाहीदिशा विस्थापित करणारं जागतिकीकरण आपण चागलं तरी कसं म्हणावं? श्रमाचं मोल लाऊन शक्य तितकं प्रामाणिकपणे जगणाऱ्यांचं जग बदलून डोक्यातील मेंदू विकणाऱ्यांचं हे जग झालं आहे. जर असे असेल तर किती मेंदू जागतिकीकरणाने समृद्ध वगैरे झाले? झाले असतील, तर त्यातील व्यवस्थेत टिकले किती? हाही एक जागतिक प्रश्नच आहे. मूठभर बुद्धिमंत महिला, पुरुष आज बहुराष्ट्रीय कंपन्या, बँकांमुळे व्यवस्थेच्या शीर्षस्थानी पोहचले आहेत. सर्वसामान्यांमधील हे अपवाद आहेत. राहिलेल्या बाकीच्यांचं काय? हा प्रश्न जागतिकीकरणाच्या मंचावर तसा अनुत्तरितच.

खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, तसे रस्ते, वीज, वाहतूक, बँकिंग आदि क्षेत्रात खाजगीकरण आले. देशातील हजारो एकर जमिनी सेझच्या वाट्याला गेल्या. परकीय भांडवलाला गुंतवणुकीची संधीही मिळाली असेल; पण त्यांनी येथील गुंतवणूक काही, चला, आपण सगळे मिळून जीवनाच्या विविध क्षेत्रात मागे राहिलेल्या भारताचा विकास घडवून आणू या! अशा उदात्त हेतूने झाली नाही. त्यांच्या नजरेसमोर नफा हेच उद्दिष्ट असणार ना! कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून उभ्या राहणाऱ्या शीतपेयांच्या कंपन्या त्यांना लागणारं पाणी काही त्यांच्या देशातून नाही आणत. पाऊस असो, नसो त्याच्या विक्रीवर पाण्याच्या तुटवड्याचा परिणाम का होत नसावा? या प्रश्नाचं उत्तर मिळणं खरंच अवघड आहे. मोठ्या शहरातील मोठ्या लोकांसाठी दिवसातील चोवीस तास पाण्याची हमी, तर दुसरीकडे डोक्यावर दोनतीन हंडे घेऊन अनवाणी पायांनी उन्हातान्हात वणवण भटकंती. जागतिकीकरणाचा हा कोणता न्याय आहे? विकासाच्या नावाखाली गरीब देशातील नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडली जात आहे.

धनिकांकडील धन साठवलेल्या अन् गोठवलेल्या धनाला वाढवत चालले आहे. धनसंपादनाच्या गळेकापू स्पर्धेत लहानसहान उद्योग पालापाचोळ्याप्रमाणे दूर फेकले जात आहेत. व्यवस्थेच्या शिखरावर असणारे आणि पायथ्याशी असणारे, अशी विभागणी होत आहे. त्यांच्यातील सामाजिक दरी रुंदावत चालली आहे. या विषमतेत दूरदुर्गम भाग, तेथील समस्या, तेथला आदिम समूह, त्याचं सुविधांपासून वंचित, उपेक्षित जगणं जागतिकीकरणाने लक्षात किती घेतले आहे? भुकेने तडफडणारा आदिवासी, पदपथावर जीवन व्यतित करणारे अनिकेत, भुकेने विकल झालेली गरीब माणसं, कुपोषणाने तगमग करीत जगाचा निरोप घेणारी बालके, आत्महत्या करणारे शेतकरी, ही परिस्थितीशरण अगतिकता अजूनही संपायला तयार नाही. तर दुसरीकडे चैन विलासात, सणसमारोहात होणारा लाखांलाखांच्या आकड्यातला खर्च. आपल्या स्नेहीजनांना लाखात, कोटीत भेट देणारे कुबेरपुत्र. हे सारं पाहताना एकीकडे झगमग दिसते, तर दुसरीकडे मात्र तगमग. ही तगमग आम्ही खरंच पाहतो आहोत का? की आपण आत्मकेंद्री होत चाललो आहोत. काहींना असेही वाटत असेल, की देशात इतकंही काही सगळंच वाईट वगैरे नाहीये. विकास तर झाला आहे. त्याचे परिणाम व्यवस्थेतून वावरताना जाणवतायेत. जागतिकीकरणानंतर देश प्रचंड बदलला आहे. खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वीकारानंतर स्वसामर्थ्याने त्याची विकासाभिमुख वाटचाल सुरु आहे. काल ज्या छोट्या मोठ्या वस्तूसाठी माणसं रांगा लावून उभी असायची, त्या वस्तू त्याला आज सहज मिळतायेत. हे खरंही आहे; पण त्याच बदललेल्या देशात अशीही माणसं आहेतच ना, ज्यांच्यापर्यंत हे सारं अजून पोहोचायचं राहिलं आहे. त्यांच्यापर्यंत ते कधी पोहचेल?

पु.ल.म्हणाले होते, ‘दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमचे डोळे भरून येत असतील, तर ते भरून आलेले तुमचे डोळे म्हणजे संस्कृती.’ खरंतर आजही आमचे डोळे भरून येतात; पण त्यातून ओघळणाऱ्या पाण्याचे संदर्भ बदलले आहेत. त्यांनाही जागतिकीकरणाचं परिमाण लाभलं आहे. या बदललेल्या भावनांमध्ये सर्वसामान्य माणूस त्या मापाचा होऊन मावायचा आहे, की त्याला त्या मापाचा करवून जागतिकीकरणाच्या साच्यात घट्ट बसवायचा आहे, हे आज नक्की नाही सांगता येणार. बदल घडतील, ते टाळता येणार नाहीत. मग जर का बदल घडणारच असतील अन् जग बदलत असेल, तर त्या बदलांना, जागतिकीकरणाला माणुसकीचा, सर्वसामान्यांचा चेहरा देऊनही ते घडवता येतील. पण तरीही एक मुद्दा उरतोच; अशा बदलातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचाराने वर्तणारं आणि स्वतःचा चेहरा असणारं जागतिकीकरण आकारास आणता येईल का?

1 comment: