Monday, 13 January 2014

Zep | झेप

नवअस्मितेच्या नव्यापर्वाचा उद्घोष करीत भारताच्या जीएसएलव्ही डी ५ अग्निबाणाने नववर्षाच्या प्रारंभीच अवकाशात यशस्वी झेप घेतली अन् त्यासोबत २०१४ हे वर्ष भारताच्या प्रगत उपग्रह प्रक्षेपणाच्या स्वप्नपूर्तीचे सुंदर क्षण सोबत घेऊन भारतभूमीवर अवतीर्ण झालं. स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून आकाशात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी मागील वीस वर्षापासून प्रयत्नरत असणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नातून साध्य झालेली, भारतीय अवकाशभरारीची अस्मिता विश्वाच्या नभांगणात स्वयंतेजाने दीप्तिमान झाली. कोणाही भारतीयांच्या चित्तवृत्ती अभिमानाने पुलकित करणारी, ही यशोगाथा भारताच्या अवकाशभरारीच्या इतिहासात सुवर्णांकित अक्षरांनी लेखांकित झाली. जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वप्रयत्नांनी स्वतःचा इतिहास निर्माण करणाऱ्या या देशाने स्वअस्मिता संपादनासाठी परकीय सत्ताधिशांशी केलेल्या संघर्षाचे फलित स्वातंत्र्य संपादन होते; पण नुसतं स्वातंत्र्य मिळवून देश घडत नाही अथवा उभाही राहत नाही. तो परिश्रमाने योजनापूर्वक घडवावा लागतो. त्यासाठी योजनांची मुळाक्षरे लिहावी लागतात, गिरवावी लागतात. देश घडणीची ही मुळाक्षरे देशवासियांचा मानबिंदू, अभिमानबिंदू बनतात; तेव्हा ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ हे स्वप्न केवळ साने गुरुजींचेच स्वप्न नाही राहत. ते साऱ्यांचेच स्वप्न बनते. अशी स्वप्ने भारताच्या संपन्न, सक्षम रूपाशी एकजीव होत इच्छा, आकांक्षा बनून जेव्हा मनात एकवटतात, तेव्हा ते साऱ्या भारतीयांच्या जगण्याचे श्वास होतात.

आम्हाला स्वातंत्र्य संपादन करून सदुसष्ट वर्षे झाली. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात सदुसष्ट वर्षाचा काळ खूप वाटत असला, तरी राष्ट्राच्या उभारणीत एवढा कालखंड फार मोठा असतो, असे नाही. हा कालावधी लक्षात घेता भारतीय शास्त्रज्ञांनी जीसॅट.१४ उपग्रह क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून आकाशात प्रक्षेपित करणं, ही फार मोठी उपलब्धी आहे. हा उपग्रह अवकाशात झेपावला, तेव्हा अवकाशात केवळ हा उपग्रहच नाही झेपावला; तर त्यासोबत भारतीयांच्या इच्छा, आकांक्षाही आकाशी झेपावल्या. देशाच्या इतिहासाचं थोडंसं अवलोकन केलं आणि त्याची मागील काही पाने उलटून पाहिली, तर स्वातंत्र्य संपादनानंतरच्या काही वर्षात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतः संपादित केलेलं असं कितीसं सामर्थ्य होतं आमच्याकडे?

तीनचार हजार वर्षाचा भूतकाळ झालेला संपन्न वारसा वगळला, तर जगाला आमच्या सामर्थ्याची प्रचीती यावी, असं काय होतं आमच्याकडे? सुरवातीचा तो खडतर वाटचालीचा काळखंड पाहिला, तर सतत परकीय मदतीसाठी आशाळभूतपणे पाहण्याचं प्राक्तन नियतीने या देशाच्या ललाटी लिहिले होते. काही पाश्च्यात्त्य विद्वान तर भाकिते व्यक्त करत होते, या देशाच्या जन्मताच शकलं होणं अटळ आहे. प्रचंड मतभिन्नता, मतप्रवाह असणारा हा देश विश्वगोलातील नकाशात त्याच्या स्वतःच्या एकसंघ नावाने आणि अस्तित्वाने भविष्यात ओळखलातरी जाईल का? पण या साऱ्या विद्वानांना तोडघशी पाडण्याचं सामर्थ्य या देशात आहे. देशाची ही सुप्तशक्ती ढोबळ निष्कर्ष काढून मते व्यक्त करणाऱ्या विद्वानांच्या विचारांना समजलीच नाही. अनेक तुकड्यांमध्ये त्यांना दिसणारा हा देश अशा तुकड्या-तुकड्यांनी सांधून एकजीव, एकरूप झालेल्या वस्त्राचं सुंदर विणकाम आहे अन् या वस्त्राचे आडवे-उभे धागे एकात्मतेने, प्रेमाने, परस्पर सहकार्याने विणलेले आहेत. हे त्यांच्या लक्षात आलेच नसेल, की त्यांनी हे लक्षात घेतलेच नसेल? ज्या देशाची विविधता हीच त्याची ओळख आहे, तो देश पूर्वग्रहांनी तयार झालेल्या मनांना समजेल कसा. या खंडतुल्य देशाच्या जीवनाचा, जगण्याचा लसावि काढण्याचा प्रयत्न करणे हेच एक अवघड काम आहे.

देश उभारणं, घडवणं त्या देशाला लाभलेल्या द्रष्ट्या नेतृत्त्वांच्या हाती असतं. आम्हां भारतीयांना हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारे असे उत्तुंग नेतृत्व मिळाले. त्या धुरंधर नेतृत्त्वांच्या ध्येयनिष्ठा, त्याग आणि समर्पणातून देश घडत गेला. लोकांच्या तंत्राने चालणारी व्यवस्था या साऱ्या धुरिणांनी नुसती उभीच केली नाही, तर सक्षमही केली. त्या व्यवस्थेच्या मार्गाने देश चालत गेला. चालता-चालता अस्मिता शोधत गेला. हाती लागलेल्या त्या स्वजाणिवांचा उत्कट आविष्कार म्हणजे, आज उभा असलेला आपला देश. जगास ललामभूत वाटावेत, असे आदर्श या देशाच्या सांस्कृतिक संचितातून प्रकटलेत. या पाथेयातून संपादित सामर्थ्याने देश नजीकच्या काळात विश्वातील सक्षम सत्ता बनून प्रकटेल, हा विचारवंतांचा आशावाद काही निरर्थक नाही. विश्वात सर्वाधिक संखेने युवक आज आपल्या देशात आहेत. या देशाला विकसित राष्ट्र म्हणून उदयाचली आणण्याचं काम यापुढे देशाची तरुणाईच करणार आहे.

चेडू जमिनीवर जितक्या जोराने आदळावा तितक्या वेगाने उसळी घेऊन तो वर येतो. नव्वदच्या दशकात भारताला स्वतःच्या अवकाश क्षमता वास्तवात आणण्यासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञानाची आवशकता होती. तेव्हा अमेरिकेच्या कृपेने रशियावर दमनतंत्राचा वापर करीत या तंत्रज्ञांनापासून भारताला वंचित ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले. या आधीही भारतीयांची प्रगती अवरुद्ध करू पाहणाऱ्या राष्ट्रांच्या कृपाप्रसादाने संगणकाचे तंत्रज्ञान नाकारले गेले. पण जेव्हा-जेव्हा नाकारण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा या देशाच्या मातीतून प्रकटलेलं सत्व आणि स्वत्व घेऊन जगणारी शास्त्रज्ञांची ध्येयवेडी मांदियाळी स्वअस्मितांचा जागर करीत; परिस्थितीशी दोन हात करीत उभी राहिली आहे. ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा या भूमंडळी कोण आहे’ म्हणत आम्ही आमच्याच प्रयत्नांनी सामर्थ्यसंपन्न झालो.

भारताच्या अण्वस्त्रसंपन्न, अवकाशयुगसंपन्न तंत्रज्ञानाला उभं करणाऱ्या शास्त्रज्ञांनी भारताला केवळ या तंत्रज्ञानात सक्षमच नाही, तर संपन्न केले. स्वातंत्र्य संपादनाच्या वेळी आमच्याकडे असे सामर्थ्य किती होते, काय होते? साधा फोन घ्यायचा म्हटला तर दोन दोन वर्षे प्रतीक्षा यादी, मोटारसायकल, स्कूटर घेणं ही तर चैनच वाटायची. जगात जेव्हा मोटारींची आधुनिक मॉडेल रस्त्यावरून सुसाट वेगाने धावत होती, तेव्हा आम्ही प्रगत देशांनी इतिहास जमा केलेल्या मॉडेलच्या मोटारींना भारताच्या रस्त्यावरून धावताना कुतूहलाने पाहत होतो. धावणाऱ्या या मोटारी केवळ धनिकांसाठीच आहेत, ही गोष्ट आपल्या कुवतीपलीकडची आहे, म्हणून त्याचं ते रुपडं डोळ्यात साठवून ठेवत होतो. आज भारतीय रस्त्यावरचं चित्र पाहिलं तर बीएमडब्लू, मर्सिडिज, ऑडी या केवळ स्वप्न वाटणाऱ्या महागड्या गाड्या भरधाव धावताना सहज दिसतील. देशातील सुमारे ऐंशी कोटी लोकांकडे मोबाईल आहेत. सिमकार्ड घेऊन त्यांना सुरु करण्यासाठी आता फक्त काही तासांचीच प्रतीक्षा करावी लागते. चकचकीत मॉल्स, सुपर मार्केट खरेदीसाठी लोकांना आकर्षित करीत आहेत. पूर्वी दुकानदाराने जो किराणा दिला असेल तो वेळेवर मिळाला, हेच आपलं नशीब समजून घरी यायचा. त्यातील वस्तूंमध्ये काही दोष असेल, तर दुकानदार ते परत घेईल का, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड गोष्ट होती. आजमात्र मॉल्स, सुपर मार्केटमधून केलेल्या खरेदी वस्तूबाबत मनात काही संभ्रम असल्यास, ती वस्तू कशी, केव्हा, कोणत्या अटींवर परत घेतली जाईल, हे बिलाच्या पाठीमागेच लिहिले दिसेल.

हे सारं आज मी पाहतो, तेव्हा मला माझं बालपण आठवतं. आमचे आजी-आजोबा सांगायचेत दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी माणसं दिवसभर राबराब राबून परदेशातून आयात केलेले धान्य आपणासही मिळावं, या अपेक्षेने उपाशीपोटी दुकानांवर रांगा लावायची. माझ्या गावात पहिल्यांदा लाईट आली, तेव्हा जणू काही आकाशातून तारे जमिनीवर उतरून आल्याचे वाटले होते. त्या लाईट्सच्या प्रकाशवर्षावात चिंब-चिंब भिजण्यात किती आनंद वाटायचा. गावात पहिल्यांदा आलेला टीव्ही, तोही ब्लॅक अॅण्ड व्हाईट- पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला. शेवटी टीव्ही घरातून उचलून अंगणात आणून काही दिवस सुरु केला जायचा. जेवढावेळ कार्यक्रम सुरु असायचे तेवढावेळ माणसं तो पाहत असत. आज दोन-तीनशे प्रसारण वाहिन्यानी जगाचे सारे रंग घरातल्या खोलीत भरले आहेत. एलइडी, एलसीडी, प्लाझ्मा, स्मार्ट टीव्ही घरातील भिंतीवर लागलेले दिसतात. कदाचित आजच्या पिढीसाठी या बाबी फारशा महत्त्वाच्या नसतीलही. पण हे वास्तव प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, कितीतरी प्रयत्न करावे लागले. भारताने हे सामर्थ्य एका दिवसात प्राप्त नाही केले. ते मिळविण्यासाठी जी कठोर तपश्चर्या, जे परिश्रम केले, त्याचे हे फलित आहे.

अवजड उपग्रह अवकाशात पाठवण्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी भारताने सुरवातीस जे सहा-सात प्रयत्न केले त्यात यशापेक्षा अपयशच अधिक होते. पण समस्यांना शरण न जाणं, हा जेव्हा राष्ट्राचा, राष्ट्रातील लोकांचा स्वभाव बनतो; तेव्हा नाकारले जाण्याचे शल्य अमोघ धैर्य बनून प्रकटते. त्याच धैर्याचा परिपाक म्हणजे एकोणाविससे ब्याऐंशी किलो वजनाच्या जीसॅट१४ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण होय. आमच्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी, तंत्रज्ञांनी स्वबळावर हे यश संपादन केले. भविष्यात हे यश आणखी परिणत होत जाईल. कोणीही भारतीय नि:संदेहपणे हे सांगेल. मागच्याच वर्षी आमचे ‘मंगळयान’ मंगळाच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करीत झेपावले. त्याहीआधी ‘चंद्रयानाने’ चंद्राच्या अज्ञात पैलूंना स्पर्श केला. त्याअगोदर एकाचवेळी अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात यश मिळवलं आहे.

भारतीय ‘सुपर कॉम्प्यूटरने’ तंत्रज्ञानातही आम्ही मागे नाहीत, याची जाणीव विश्वाला करून दिली. अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल ही क्षेपणास्त्रे आपल्या अण्वस्त्र सज्जतेची प्रतीके बनून उभी राहिली आहेत. अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांच्या नामावलीत भारताचे नाव लेखांकित झाले. हे सारं मिळवताना अजूनही आमचे पाय जमिनीवर घट्ट रुजले आहेत. मातीशी इमान राखणारी आम्ही सारी भारतीय माणसं स्नेहपूर्ण नाती जोडण्यावर विश्वास ठेवतो. कुणा परक्या मातीतील मोती वेचण्यासाठी स्वतःहून कधीच ही पावलं वळली नाहीत, वळणारही नाहीत; कारण या देशाच्या संस्कारातून सदैव स्नेह, सन्मान, सहिष्णुता, सामंजस्य, अहिंसा या परिणत जीवनमूल्यांची शिकवण शिकवली गेली आहे. जीवन संपन्न करणाऱ्या मूल्यांचा शोध शेकडो वर्षापूर्वीच या देशाच्या मातीने घेतला आहे. संस्काराने संपन्न ही भूमी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारांना प्रमाण मानत आली आहे. अशा विचाराने वर्तणाऱ्या देशाचे सारे शोध मानव्याच्या प्रतिष्ठापनेसाठी, परित्राणासाठी, मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची, तत्त्वज्ञाची, विचारवंताची आवश्यकता नसते.

No comments:

Post a Comment