Guruji | गुरुजी...

By
गुरुजी तुम्ही सुद्धा!

आठ आणि नऊ मार्चच्या वर्तमानपत्रात बातम्या- शिक्षकांनीच मांडला जुगाराचा डाव. तरुण शिक्षिकेने पळविले नववीत शिकणाऱ्या प्रियकराला. चौऱ्याण्णव टक्के शिक्षक टीईटी परीक्षा नापास. उत्तरपत्रिका मासकॉपी केल्यामुळे सील. अर्थात या बातम्यांचा एकमेकांशी संबंध काय? असा प्रश्न आपल्या मनात उदित होणं तसं स्वाभाविक. उगीच काहीतरी बादरायण संबंध जोडला जातोय, असं आपल्यापैकी काहींना वाटण्याची शक्यता आहे. तसं म्हटलं तर संबंध आहे, म्हटलं तर नाहीही. कारण या सगळया बातम्यांमध्ये एक घटक कॉमन आहे, तो म्हणजे ‘शिक्षक.’ आता तुम्ही म्हणाल, मग काय झालं एवढं यात, माणसं शिक्षक असत नाहीत का? नाही, तसं काही नाही! पण बातम्यांचे विषय वाचल्यानंतर, त्यातील आशय नीट समजल्यावर एक कळते की, समाज अशा बातम्या वाचून काय म्हणत असेल? शिक्षकांविषयी, शिक्षकपेशाविषयी कोणता विचार करीत असेल? याचं उत्तर मिळणं बातम्यातील आशयावरून अवघड आहे, असं नाही. ‘गुरुजी तुम्ही सुद्धा...!’ अशी भावना समाजाच्या अंतर्यामी निर्माण होत असेल का? कदाचित हो! कदाचित नाहीही!

सांगायचा मुद्दा हा की, तीन चार दिवसापूर्वी आम्ही काही शिक्षक शिक्षकदालनात ऑफ तासिकेला थोडे विसावलो होतो. त्या दिवसाचे वर्तमानपत्र हाती घेऊन संबंधित बातमी वाचीत एक शिक्षक आपलं मत व्यक्त करीत म्हणाले- खरंतर बातमी त्यांनी आधीच वाचली होती. “सर, आतापर्यंत मुलांमुलींमधील वाटणाऱ्या स्वाभाविक आकर्षणाने निर्माण होणाऱ्या गुंत्यांची, प्रश्नांची उत्तरे आपण शोधीत होतो. त्यांना चारित्र्य, प्रतिष्ठा, मान, सन्मान वगैरे मूल्यांच्याबाबत उपदेशांचे डोस देऊन घडवीत होतो. आता तर कहरच झाला हो! शिक्षिकाच मुलास- जो तिचा विद्यार्थी आहे, त्यास सोबत घेऊन पलायन करायला लागली.” त्यांचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आत दुसरे एक शिक्षक बोलते झाले, “अहो सर, तेही स्वाभाविक आकर्षणच आहे ना हो!” “हो, स्वाभाविकच आहे; पण निदान त्यांच्या वयाचा, त्यांच्यातील नात्याचा, आपल्या व्यवसायाचा विचार तरी करायचा की नाही, या बयेने? या कृतीने निर्माण होणाऱ्या प्रश्नांची, होणाऱ्या परिणामांची तमा बाळगायची की नाही? उठले. निघाले. आणि पळाले. अहो, हा शुद्ध अविचार आणि नैतिक अधःपतनाचा कळस झाला!” पहिले शिक्षक मनातील राग व्यवस्थेवर काढू लागले. चर्चेला विषय मिळाला. शिक्षक दालनात बसलेले सगळेच शिक्षक आपापल्या आकलनानुसार शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, समाज, नैतिकता; असे काहीसे विषय घेऊन प्रबोधनात्मक विचार मांडू लागले. 

एक शिक्षक- जे एवढ्या वेळेपर्यंत सुरु असलेली चर्चा ऐकत होते; ते म्हणाले, “अहो, आपल्या ज्ञानाची टक्केवारी जेमतेम पाचसहा टक्के असल्यावर, नैतिकता शंभर टक्के कशी असेल?” अर्थात त्यांचे विधान टीईटीच्या निकालाच्या बातमीचा संदर्भ घेऊन असल्याने, त्यातही त्या निकालावर कदाचित त्यांचा राग असावा. कदाचित आणखी काही कारणे, प्रयोजनेही असू शकतील. “टीईटीच्या निकालांवर  शिक्षकाची नैतिक गुणवत्ता कशी काय मोजता सर तुम्ही?” म्हणून काही प्रश्नांचे बाण एकदम चहूबाजूने त्यांच्या अंगावर यायला लागले. बिचारे, त्यांचा सामना करता करता पुरते घायाळ! “गुण आणि गुणवत्ता कशी काय सिद्ध कराल? गुणांसाठी प्रश्नांच्या पट्ट्या तुम्ही लावाल; पण कमी गुण असणारे माणसं गुणवान नाहीत काहो, सर!” एका शिक्षकांनी सरळसरळ त्यांनाच प्रश्न विचारला. मत मतांतरांचा गलबला आता चांगलाच वाढत चाललेला. प्रत्येकाची मते वेगळी, प्रश्न वेगळे, विचार वेगळे, विचारधारा वेगळी. एकेक मते चर्चेत समोर येत होती. त्यावरील क्रिया प्रतिक्रियांनी माहोल चांगलाच रंगत चालला होता. पण एकाबाबतीत ही सारी शिक्षक मंडळी चर्चेच्या शेवटी एकमत झाली, ती म्हणजे वैयक्तिक स्वार्थापायी काही ठिकाणी शिक्षणव्यवस्था प्रश्नचिन्हांच्या संगतीत आणि अविचारांच्या पंगतीत बसली आहे.

वर्तमानपत्रातून अशा बातम्या एकामागे एक येणं आणि त्या बातम्यांचा केंद्रबिंदू शिक्षण, शिक्षक असणं हा योगायोग की, चर्चेतील म्हणण्याप्रमाणे खरंच शिक्षकांच्या नैतिकतेचा टक्का घसरतोय? शिक्षकाच्या नैतिकतेचा टक्का घसरतो आहे, असं म्हणणं ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग झाला. क्षणभर गृहीत धरूया, तो घसरला असेलही; पण समाजात सगळचं काही वाईट घडत आहे, असे नाही. या बातम्या येणं अपघात समजू या! पण हेही सत्य आहे की, अपघात म्हणून सगळेच प्रश्न काही सुटत नसतात. परिसरात वाळवी वाढली तर तिचा योग्यवेळी बंदोबस्त करावा लागतो. नाहीतर तिच्या अस्तित्वाने सुंदर परिसरही जीर्ण होऊन कुचकामी ठरतो. नंतर ना त्याचं मोल, ना अस्तित्व. शेवटी सगळे प्रश्न अस्तित्वासाठीच तर असतात. माणूस असो, वा वस्तू त्यांचं अस्तित्व जाणीवपूर्वक टिकवावं लागतं. जगण्याला नैतिकतेचे अधिष्ठान देऊन विवेकशील विचारांनी जीवनाचं प्रांगण समृद्ध करावं लागतं. यासाठी विचारांची गंगा विवेकाच्या पात्रातून प्रवाहित ठेवावी लागते. समर्पणशील विचारांची गंगा शिक्षण नावाच्या शिखरावरून उगम पावते. विचार बनून वाहणाऱ्या प्रवाहाला विधायक दिशेने वळते करावे लागते. प्रवाहासोबत काही स्वप्ने पेरायला लागतात. प्रवाहाने प्रथम पात्राशिवाय वाहावे, वाहता-वाहता त्याचे त्याने पात्र तयार करावे आणि पात्रालाच सरितेचे पावित्र्य यावे, म्हणून प्रवाह वाहते ठेवायला लागतात. विवेकशील विचारांचे सिंचन करीत आजूबाजूच्या आसमंताला समृद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न घडणे अपेक्षित असते. 

राजकारणी, राजकारण यांच्याबाबत नकारात्मक विचारांचे सूर लोकमनातून ऐकायला येत असतात. या विचारधारेत शिक्षण नावाच्या एका प्रवाहाचा संगम होत चालला आहे. सचिंत भावनेतून समाजाने यावर बोलणे, खरंतर चिंतनीय बाब आहे. जे दिले जाते. ज्याच्यातून घडवले जाते. जे कधीच पूर्ण होत नाही आणि संपतही नाही, ते म्हणजे शिक्षण. म्हणूनच अद्यापही आपला समाज शिक्षक आणि शिक्षणाविषयी आस्था बाळगून आहे. जगाचं जर काही बरं-वाईट व्हायचं असेल, तर ते समाजाने अंगिकारलेल्या विचारातूनच होईल. म्हणूनच विधायक विचारांचे बीज शिक्षणातून रुजवता येईल, या अपेक्षेवर समाजाचा ठाम विश्वास आहे. शिक्षक सतशील विचारांचे संवर्धन करणारा समाजातील महत्वाचा घटक आहे. म्हणून इतरांपेक्षा त्याच्यावरील जबाबदारीही अधिक आहे. या श्रद्धेतून, भावनेतून समाज शिक्षक आणि शिक्षणक्षेत्राकडे पाहतो.

सांप्रतकाळी समाजव्यवस्थेतील बरीच क्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात आहेत. ती एक वेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे अशी अपेक्षा समाज व्यक्त करीत असेल, तर त्यात वावगं असं काय आहे? ज्या संस्कृतीत मातृ-पितृ देवोभव नंतर गुरूलाच देवतास्वरूपात पाहिले जाते. ज्या देशात ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो, त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास आहे. गुरूच्या कृपाशीर्वादाने जीवन सफल झाल्याच्या, जीवन घडल्याच्या कहाण्या ज्या देशातील माणसे लहानपणापासून ऐकत, वाचत, लिहित, शिकत आले तेथील काही माणसं नैतिकपातळीवर अधःपतन का करून घेत असतील? यामागची कारणं नेमकी काय असतील? नैतिक अधःपतन ही तशी व्यक्तीनिष्ठ संज्ञा. समाजातील चार माणसं वाईट असली, वाईट वागली; म्हणून सगळा समाजच काही तसा होत नाही. तरीही समाजात चुकणाऱ्या माणसांकडे आणि चुकणाऱ्या शिक्षकाकडे वेगळ्या विचाराने पाहिले जाते. एक डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचा जीव जातो. एक इंजिनियर चुकल्यास पन्नास-शंभर माणसं जीवास मुकतील; पण एक शिक्षक चुकला तर सगळीच्या सगळी पिढी बरबाद होते, असं म्हणतात. यात तथ्यही आहे. माणसांच्या समाजात पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही. मोठा हो! चांगला माणूस बन! असे म्हणीत समाजातील जेष्ठांचा आशीर्वादाचा हात डोक्यावर विसवतो. अवगुणी हो! चोर, लुटारू हो! म्हणून नाही. कारण समाजाला आपल्यासाठी आदर्श नागरिकच हवे असतात. म्हणूनच आदर्शांची घडण करणारे हातही तेवढेच आदर्श असावे लागतात. अशा हातांना साथ देताना समाज कधीही मागे सरत नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा काही माणसांकडे चिरकाल टिकत नाही. पण प्रयासाने मिळवलेलं चारित्र्य स्वतःहून कधीच सरत नाही. मग जी गोष्ट उरत नाही तिचा मोह टाळून, जे कधी सरत नाही त्याच्यासाठी आपण का झुरत नाहीत?

माणूस कोणताही असू द्या, मोहाचा फक्त एक क्षण- जो त्याला आकर्षित करीत असतो, विचार करण्यापासून परावृत्त करीत असतो, तोच टाळता आला तर...! मोहाचा तो क्षण टाळणारा जीवनसंगरात दिग्विजयी ठरतो. विश्वातील सारे जयपराजय त्याच्यासमोर क्षूद्र ठरतात. पण नेमकं हेच न करता आल्याने माणसं स्वविनाशाची गाथा लेखांकित करणाऱ्या वाटेने चालतात. आज देश परिवर्तनाच्या पथावरून विकासाकडे प्रचंड वेगाने वाटचाल करतो आहे. माणसांच्या पारंपरिक जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. सुखाच्या दिशेने ते प्रवाहित होत आहेत. वेगवेगळ्या मार्गांनी वाहत येणाऱ्या समृद्धीने, साधेपणाने जगण्यातील बऱ्याच गोष्टी बदलून टाकल्या. मी आणि माझं सुख या गोष्टी जीवनात तत्त्वांपेक्षा महत्वाच्या ठरू लागल्या आहेत. कधीकाळी समाजात पैशापेक्षा चारित्र्याने माणूस ओळखला जायचा. संपन्न चारित्र्य पैशापेक्षा मोठे समजले जायचे. अशी चारित्र्यसंपन्न माणसे समाजासाठी मूल्यसंवर्धनाचे वस्तुपाठ असत. आता पैसाच मोठा झाला असल्याने माणूस छोटा झाला आहे. वर्गात तासाला शिकवताना पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे शिकविणे भौगोलिक सत्य असेल; पण पृथ्वी पैशाभोवती फिरते आहे, हे आर्थिक सत्य आहे. 

‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारे। उदास विचारें वेच करी॥’ हा संत तुकाराम महाराजांचा विचार वर्गात शिकवण्यापुरताच उरला आहे. शिकविण्यासाठी मूल्ये एक आणि वागताना दुसरीच, असा वर्तनविपर्यास का होत चालला आहे? ज्यांची चरित्रे वाचून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, असे चरित्राचे महामेरू आपल्या आसपास कितीसे आहेत? ज्यांच्या पायाला मनःपूर्वक स्पर्श करावा, असे पाय किती शिल्लक राहिले आहेत? अशा आदरणीय पावलांचा शोध घ्यावा, तर तीही मातीने माखली आहेत. मातीशी अस्तित्वाची घट्ट नाळ असणारी आपली मुळं खिळखिळी होत चालली आहेत. मग ‘मातीशी इमान राखणं’ हा वाक्प्रचार परीक्षेतील एक गुण मिळवण्यापुरता उरला असेल तर करावे काय?

भूक लागलेली असताना खाणे ही प्रकृती आहे. स्वतःकडील अर्ध्या भाकारीतून चतकोर कोण्या उपाशी जीवाला देणे संकृती आहे; स्वतःकडील भाकरी आबाधित राखून, इतरांकडील ओढून घेणं ही विकृती आहे. हे विकृतीचे तण वेळीच उपटून काढणे आवश्यक आहे. माणसांनी भौतिक सुखसुविधा मिळवू नयेत, असे नाही. ते जरूर मिळवायचे; पण नीतिसंमत मार्गावरून. खरं जीवन त्यागात आहे, भोगात नाही. पैसा गरजेकरिता असावा, बेराजेकरिता नसावा. माणसं आपल्या गरजा बेराजांशी जोडायला लागतात, तेव्हा माणसांपेक्षा पैसा खूपच मोठा वाटायला लागतो.

शाळा, शिक्षक, शिक्षण, व्यवस्थेने निर्माण केलेली सुंदर जीवनकाव्ये आहेत. या कवितांनी जगण्याला संपन्नता येत असते; पण कवितेत व्यवहार आला की, तिचा आत्मा हरवतो. जेव्हा आत्मा स्वार्थाच्या चौकटीत गहाण ठेवला जातो, तेव्हा माणसं लहान-सहान कामांना महान समजायला लागतात. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाचे मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी शिक्षणाची पंचतारांकित संकुले उभी राहिली आहेत. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही झाली आहे. वेगवेगळ्या सम्राटांच्या नामावलीत शिक्षणसम्राट उपाधीनेमंडित काही नव्या सम्राटांचा वर्ग अस्तित्वात येऊन स्थानापन्न झाला आहे. या सम्राटांच्या अधिपत्याखाली गुणवत्ता, विद्वत्ता मांडलिक झाली. हे मांडलिक व्यक्तीपूजेच्या आरत्या, पोवाडे गायला लागले आहेत. गुणवत्ता, विद्वत्ता सम्राटांच्या बटिक झाल्या. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. पण नव्या संस्थानिकांचा वर्ग आणि त्यांची संस्थाने उदयाचली येऊ लागली आहेत. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली आहेत. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली. तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली. जगाचा इतिहास ध्येयनिष्ठ वेड्यांची ध्यासकथा आहे, असे म्हणतात. आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. कोणतेतरी वेड धारण केल्याशिवाय इतिहास घडत नाही. ते काही वाहत्या उताराचे पाणी नाही. तो योजकतेने परिश्रमपूर्वक घडवावा लागतो. पण सारंच बिघडले असेल तर कोणत्या क्षितिजाला इमानी सूर्याचे दान मागावे.

शिक्षणासाठी चांगल्या गुरूच्या शोधात वणवण भटकणारे एकलव्य पूर्वीच होते, असे नाही. ते आजही आहेत. उत्तम शिष्य घडविणारे आचार्य जसे काल होते, तसे आजही आहेत; पण तेही व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले आहेत. एकलव्याला निदान प्रतिमेत गुरु दिसले. त्याबळावर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आजच्या एकलव्यांनी अशा गुरूची प्रतिमा उभी करून विद्यासंपादन करण्याचा प्रयास केला तर त्याच्या पदरी निराशाच येईल. कारण प्रतिमेतील भक्तीभावच संपला आहे. उरला आहे फक्त आकार आणि या आकाराने काही साकार होणं तसं अवघडच आहे. व्यवस्थेतील त्यातल्या त्यात शिक्षकाच्या प्रामाणिकपणाबाबतीत बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आजही सकारात्मक असतात. शिक्षक इतका कधीच वाईट नसतो, असेही म्हटले जाते.

चंद्रावरच्या डागांमुळे चांदणे काही काळवंडून जात नाही. कापूर जळून मागे सुगंधाशिवाय काही उरत नाही. सहाणेवर घासून चंदन झिजतो; त्याचं अस्तित्व गंध बनून मागे उरते. संस्कारांचा गंध मागे ठेऊन झिजणारी अनेक चंदनाची झाडे आजही आपल्या आसपास असतील. कदाचित ती आपल्याला दिसत नसतील ऐवढेच. देशाचा इतिहास अशा अनेक झिजणाऱ्या नावांनी गंधित झाला आहे. जी माणसं पेशाने शिक्षक होती; पण त्यांचा पिंड समाजशिक्षकाचा होता. समाज नेहमी अशा शिक्षकांची कदर करातो, हेही तितकेच खरे आहे. चंद्रसूर्यालाही ग्रहणाने ग्रासले जाते; पण त्यावरचा अंधार संपून प्रकाशाने जमीन न्हाऊन निघतेच ना! नियम असतात तसे नियमांना अपवादही असतात. काहींबाबत नीतिसंमत मार्गाने वर्तन घडले नसेल, म्हणून नीतिमत्ताच संपण्याच्या मार्गावर आहे, असे विधान करणे आततायीपणाचे ठरेल. जगाचे व्यवहार सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा, या दोनच रंगात विभागता येत नाहीत. या दोन्ही रंगांच्या मिश्रणाने जो एक ग्रे रंग तयार होतो, तोच जीवनाचा खरा रंग आहे. या रंगातून जगण्याचे अनेक रंग तयार करता येतात. त्यात अंतरंगाचा आणखी एक रंग ओतला की, ते अनेक रंगानी उमलून येतं.

विद्यार्थ्यांना शिकविण्यातून जीवनाचे पाठ देण्याऐवजी, संसाराचे पाट लावण्याचा प्रमाद कोणा लावण्यवतीकडून भावनेच्या, आवेगाच्या भरात घडत असेल तर तो तिच्या वयाचा, तिच्या अनियंत्रित भावनांचा दोष आहे. दोष आहे तिच्यापुरत्या मोहरलेल्या मोहाच्या त्या क्षणांचा- जे तिला टाळताच आले नाहीत. प्रेम ही कितीही उन्नत, उदात्त भावना असली तरी ती संस्कृतीच्या, संस्कारांच्या कोंदणातच सुंदर दिसते. विवेकाच्या चौकटींचं उल्लंघन तिच्याकडून घडणं, हे तिचं अपयश आहे. पण तिने स्वीकारलेल्या शिक्षकी पेशाचेही आहे, असं म्हणणे कितीसे संयुक्तिक आहे? आजूबाजूला दिसणाऱ्या चंगळवादाने प्रलोभनाला विकारांच्या वाटेने वळते केले आहे. सुखांची प्राप्ती हे जीवनाचे प्राप्तव्य ठरले आहे. भौतिक गरजांच्या पूर्तीसाठी माझ्याकडे अधिक पैसा असावा. आणि तो खटपट न करता झटपट मिळवता यावा, या हव्यासातून कुणी जुगाराचा डाव मांडला आणि तो व्यावसायिक जीवनावरच उलटला. मासकॉपी हा विकार तसा काही आपल्या अनुभवात नवा नाही. या आधीही अशा वार्ता अधूनमधून आपल्या कानी असायच्या. पण तो जडण्याची कारणेही तितकीच जुनी आहेत. शाळांची गुणवत्ता, प्रतिष्ठा जेव्हा निकालाच्या मोजपट्ट्यांमध्ये मोजली जाते, तेव्हा आपली उंची वाढविण्यासाठी अविचारांचे मुखवटे चेहऱ्यावर चढविले जातात. हे मुखवटे चढवून गुणवत्तेच्या, प्रतिष्ठेच्या बेगडी चमचमाटात आसपासचा अंधार विस्मृतीत जातो. असा अंधार हद्दपार करण्यासाठी करावे लागणारे प्रामाणिक कष्ट विस्मरणात जातात. अविवेकी विचारातून नवा खेळ सुरु होतो आणि या खेळात अनेक जीव जायबंदी होतात.

शिक्षकाकडील ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या बळावर त्याने निर्माण केलेले नवे आयाम समाजकेंद्रित असतील, तर पिढ्या घडतात. घडलेल्या पिढ्या देशाचे, समाजाचे संचित असतात. आज आपल्या देशाला डॉलर, पौंड, युरोपेक्षा संस्कार संवर्धनाची अवश्यकता अधिक आहे. ते घडविण्याचे काम करणाऱ्या समर्पणशील, समाजपरायण गुरुजींची गरज अधिक आहे, असे वाटण्याइतके परिस्थितीत परिवर्तन घडले आहे. समर्पणशील गुरुजी तयार करण्यासाठी व्यवस्थेला काही निकषांचा विचार करावा लागतो, त्यांचा अवलंब करावा लागतो, हेही सत्य आहे. परीक्षेतील गुणांच्या मोजपट्ट्यांनी शिक्षकाचे ज्ञान फार तर मोजता येईल; पण अध्यापन त्यापलीकडील कौशल्य आहे. अध्यापकाने संपादित केलेल्या ज्ञानाचा अध्यापनासाठी केलेला उपयोग प्रगल्भ अध्यापनाची अनिवार्यता आहे. ज्ञानाशिवाय विज्ञान शक्य नाही. विज्ञानाशिवाय अज्ञान दूर होणार नाही. चौऱ्याण्णव टक्के गुरुजी टीईटी परीक्षेत नापास झाले असतीलही, म्हणून ते सगळेच अज्ञानी आहेत, त्यांच्याकडे गुणवत्ताच नाही, हे म्हणणे थोडे घाईचे नाही का होणार? जर दोष द्यायचाच असेल, तर तो त्यांना घडविणाऱ्यांनाही थोडा का असेना द्यावा लागेल की नाही. परिस्थिती इतकी कधीच वाईट नसते, जितकी आपण समजत असतो किंवा तसा समज करून घेतलेला असतो. आजूबाजूला अंधारच असेल म्हणून तो काही कायम नसतो. त्याला पार करीत क्षितिजावर येणारा उद्याच्या सूर्य आशेची काही किरणे सोबत घेऊन येतो. त्याच्या प्रकाशात अंधारलेल्या वाटा उजळून निघतात. उजळलेल्या वाटांनी अपेक्षांचे, आशेचे नवे परगणे शोधण्यासाठी परिवर्तनशील पाऊले आस्थेने चालतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यात असतो, आशेचा आणखी एक नवा सूर्य.

या सर्व बातम्यांबाबत चर्चेतील सगळ्यांनी आपापल्या विचारांच्या परिघात मते मांडली. ती सर्वच एकांगी होती, अर्धवट होती, विशिष्ट विचारधारांनी प्रेरित होती किंवा परिपूर्ण होती, असेही नाही. मतमतांतरे जरूर होती. कारण मत प्रदर्शित करणारे शेवटी समाजाचे, समाजातील कोणत्यातरी विचारांचे आणि विचारधारांचे प्रतिनिधित्व करतात. समाजाच्या अपेक्षाच त्यांचे विचार बनून प्रकटल्या, तर त्यात वावगं काहीच नाही. समाजाची मतेही अशीच आहेत किंवा असायला हवीत, असेही काही नाही. परिपक्व विचारांचा समाज निर्माण होण्यासाठी स्वतःचं मत असणं आवश्यक असते. मतमतांतरांनी घडणाऱ्या मंथनाने विचार तयार होतो. विचारांनी विवेक घडतो आणि विवेकी समाज समृद्ध देश घडवतो, हे तेवढेच सत्य आहे. जेवढे चर्चेतील प्रत्येकाचे मत. 

2 comments:

  1. great sir!!!
    we are looking forward to you turning a full time writer after retirement!!!

    ReplyDelete
  2. माहीत नाही; पण निवृत्तीनंतरही तुम्हा विद्यार्थ्यांचा स्नेह मात्र पूर्णवेळ मिळत राहावा, हीच अपेक्षा आहे.

    ReplyDelete