Sampark | संपर्क

By
एक-दीड महिन्यापासून सुरु असलेली निवडणुकांची धामधूम बारा तारखेला शेवटची फेरी होऊन एकदाची थांबली. अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएमच्या कंट्रोल युनिटच्या पेटाऱ्यांमध्ये झाले बंदिस्त एकदाचे. पण त्या आधी एक्झिट पोलचे अंदाजांचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर खेळू लागले आहेत. सोळा तारखेला कळेल सत्ता कोणाच्या गळ्यात माळ घालते ते. तोपर्यंत आकड्यांचे खेळ राहतील सुरु. होत राहतील त्यावर भाष्य. काही मानतील अंदाजाचे आकडे खरे. काही पेटाऱ्यात काय आहे, याची प्रतीक्षा करतील. गेल्या काही दिवसापासून फक्त आणि फक्त निवडणूक विषयाभोवती देश पिंगा घालत आहे. मीडियानेही निवडणूक विषय केंद्रस्थानी ठेऊन वार्तांकने केली. सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत साऱ्यांचेच लक्ष निवडणुकांकडे केंद्रित झाले होते. देशातील, देशाबाहेरील सगळ्यांचीच नजर तिकडे वळलेली अन् वेध निवडणूक निकालांचे. पण सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न; सरकार कोणतेही येवो, आमच्यासाठी त्याची धोरणे काय असतील? त्याने आमचे जगणे सुसह्य होणार आहे का?

प्रचाराची चरमसीमा गाठलेली. शो, रोड शो, सभा वगैरेंनी सारे वातावरण दणाणून गेलेले. प्रचारकी थाटापासून तर प्रचार सभेतील थाटामाटापर्यंत आणि गाव-वस्तीच्या वाटा आडवाटापासून वळणवाटांपर्यंत चाललेली धावपळ. लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक रस्ते शोधले गेले. त्यांचा कल्पकतेने वापर केला. स्वनातीत गतीचे वरदान लाभलेल्या सोशलमीडियाचा प्रचाराचे माध्यम म्हणून प्रचंड वापर झाला. दुसरीकडे दहापंधरा कोटी नवमतदारांच्या मतांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्या मनीमानसी विलसत राहणाऱ्या तंत्राचा वापर करून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, हे मनांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. आपापले परगणे तयार करून संपर्क वाढवीत ठेवण्याचा प्रयत्न होत राहिला.

लोकशाही शासनप्रणालीत निवडणुकांमधील प्रचार अनिवार्यता असतो. सांप्रतकाळी त्याचा थाट आणि घाट सगळंच बदलेले आहे. विज्ञानतंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचं अवघं रूपच पालटलेले आहे. देशात याआधीही निवडणुका झाल्या आहेत. त्यांचा प्रचारही झाला आहे. प्रचाराला आज व्यापक रूप मिळालं आहे. त्यापाठीमागे विज्ञानाच्या किमयेतून निर्मित वाटांचे योगदान मोठे आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, थ्रीडी सभांनी विज्ञानप्रणीत जगाचं सामर्थ्य केवढं मोठं आहे याची प्रचीती जवळजवळ साऱ्यांनाच ‘याचि देहा याचि डोळा’ दिली. माणसाने कुतूहल, जिज्ञासाबुद्धीतून इहलोकीचा प्रवास सुखावह करण्यासाठी ज्ञानतंत्रज्ञानाची निर्मिती करून प्रत्यक्ष देवालाही क्षणभर विस्मयचकित करणारे शोध लावले. शोधनिर्मित साधनांनी जग पूर्वीपेक्षा सहज, सुगम, सुसह्य केलं आहे. हे संपर्कसाधन निवडणुकीत प्रचार, प्रसार करणाऱ्यांसाठी सोबत करीत राहिले.

संपर्कासाठी फार काळ प्रतीक्षा करण्याचा काळ कधीच इतिहास जमा झाला आहे. पूर्वी एक साधा निरोप पाठवायचा असला तरी वाट पाहण्याशिवाय माणसाच्या हाती काहीच नसायचे. दूरवर निरोप पाठविणे एक दिव्य वाटायचे. आज जगाच्या कोणत्याही टोकाशी क्षणात संपर्क होतो आहे. संपर्कसाधनांनी विश्वातील प्रदेशांचे हजारो किलोमीटरचे अंतर काही सेकंदावर आणले आहे. सारं जग हातात सामावण्याएवढं लहान झालं आहे. संपर्कक्रांतीने विश्व जवळ आले. पण माणसं जवळ आली आहेत का? आपल्या गोतावळ्यासाठी, त्यांच्या भेटीगाठीसाठी वाट पाहणारे, त्यांच्या येण्याचा सांगावा आला असेल, तर त्याच्या रस्त्याकडे घरातील साऱ्यांचे डोळे लागलेले असायचे. आज यातील काही शिल्लक असेल, नसेल; पण माणसांच्या अंतर्यामी वसणाऱ्या भावनांचा पदर तसाच आहे. तो ओलावा अजूनही टिकून आहे.

निवडणुकांनी बहुतांची अंतरे कमी करीत बहुतेकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. कधी नव्हे इतका मतदानाचा टक्का वाढविला. सामान्य माणसांना आपल्या असामान्य मतांचं मोल प्रकर्षाने जाणवले. त्यांची पावले मतदानकेंद्राकडे वळली. मतांच्या वाढलेल्या टक्केवारीची आणखीही काही कारणं असतील. पण निवडणूक आयोगापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत साऱ्यांनीच मतांचं मोल अनमोल असल्याचं अधोरेखित करून मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं. मीडियाने मतांचं महत्त्व पटवून देताना जनसागराला एकत्र करण्याचं काम केलं. तरुणाईला आपल्या पहिल्यावहिल्या मतदानाची नवलाई जाणवायला लागली. प्रचार, प्रसार माध्यमांनी आपलं एक मत देशात परिवर्तन घडवू शकते, भविष्य आकारू शकते, म्हणून महत्त्व पटवून दिले. कधी काळी ५०-५५ टक्क्यांपेक्षा जास्त न होणारे मतदान ७०-८० टक्क्यांचे गड सर करू लागले. ही बाब लोकशाहीच्यादृष्टीने नक्कीच आनंदपर्यवसायी आहे. यामागे सातत्याने होणारा प्रचार आणि प्रसार हे एक महत्त्वाचे कारण आहे.

आम्ही लहान असतानाचा काळ आठवतोय. तेव्हा निवडणूक प्रचारासाठी गाव, वाड्या, वस्त्यांवर ‘ताई माई, अक्का...’ करीत रस्त्यावरील धूळ उडवीत कोणत्यातरी पक्षाच्या प्रचारासाठी गाड्या यायच्या. स्पीकरचा आवाज साऱ्या गावभर फिरत राहायचा. गाड्यांमागे पोरांचं लाटांबर गाडी गावाबाहेर जायीपर्यंत फिरत राहायचे. प्रचाराची पत्रके, मिळालेले एखाद-दोन झेंडे दिवसभर मुलांच्या हातात फडकत रहायचे. पक्षाचे चिन्ह असलेला बिल्ला घेण्यासाठी मुलांची किती धडपड चालायची. ज्याला मिळाला तो स्वतःला काहीतरी वेगळा समजायचा. आपल्या फाटक्या सदऱ्यावर लावून दिवसभर मिरवत राहायचा. साऱ्यांना अभिमानाने दाखवायचा. जणू काही अनमोल ठेवा फक्त आपल्याच हाती लागला आहे अशा अविर्भावात. पक्ष, पक्षाचा उमेदवार, मत, मतदान यांच्याशी त्याला काही देणं घेणं नसायचं. चिन्हाचा बिल्ला मिळाला की मोठी लढाई जिंकल्याच्या अविर्भावात गावभर फिरत राहायचा. बऱ्याचदा वेगवेगळ्या पक्षांचे बिल्ले एकाच सदऱ्यावर एकाचवेळी विराजमान झालेले असायचे. दोन-तीन वेगवेगळे बिल्ले सदऱ्यावर लागले असतील त्याची छाती अभिमानाने वगैरे फुलून यायची. खरंतर त्या वयात निवडणूक काय असते, हेही माहीत नसायचे. तर पक्ष, पक्षाचा उमेदवार, मतदान यांचा विचार करतोय कोण. आज वाटते केवढी ही निरागसता. एकाचवेळी सर्व पक्षांना आपल्या अंगावरील फाटक्या सदऱ्यावर मिरवणारी पोरं. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता नव्हती का?

आजमात्र परिस्थिती पालटली आहे. प्रचाराच्या मर्यादांचे कधीही उल्लंघन न करणारा तो काळ. प्रचारात मर्यादा ओलांडल्या गेल्या तरी फारसे कळण्याचा तो काळ नव्हताच. कारण आजच्यासारखी चोवीस तास वार्ता सांगणारी चॅनल्स नव्हती. आज आरोप, प्रत्यारोप, वाद, वितंडवाद, बेताल विधाने यांनी शिष्टसंमत संकेतांचे, मर्यादांचे सीमोल्लंघन होत चालले आहे. प्रचार करताना प्रतिस्पर्ध्यावर मनाला वेदना देणाऱ्या शब्दांचा प्रयोग न करण्याचा काळ इतिहासजमा होत चालला आहे. एकीकडे प्रगतीचे शिखरे संपादित करीत आहोत. देशाच्या इतिहास, भूगोलाला गौरवान्वित करण्याचा हा काळ असावा. वारसा जतन करण्याची, त्याला संपन्न करण्याची वार्ता करणारा असावा. पण एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ का यावी?

देशाच्या संस्कृतीचा उन्नत वारसा सांगण्यासारखा असूनही; तो न सांगता वैयक्तिक टीका का व्हाव्यात? की अमाचाकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. आम्ही संयम विसरत चाललो आहोत का? ज्या देशाला संस्कारांचा संपन्न वारसा आहे. त्या देशात मूल्यांचा प्रवास प्रचंड वेगाने अवनतीकडे होत आहे काय? ही घसरण देशाचं भाग्य परिवर्तन करणारी खचितच नाही. सत्ता, संपत्ती फारकाळ एकाठायी वास्तव्य करीत नसते, असे म्हणतात. त्यांना चंचलतेचा शाप असतो. त्यात परिवर्तन होणं नियतीचा खेळ असेल, तर या खेळाचे नियम समजून तेवढ्याच खिलाडूवृत्तीने तो आम्ही का खेळत नाहीत? काळ बदलतो तशा अपेक्षाही बदलतात. मूल्यही काळसुसंगत गरज म्हणून बदलावे लागतात. त्या बदलांमध्ये विकार नसतात. विकास असतो. हा विकासपथ सांप्रतकाळी आम्हाला दिसत नसावा का?

यावर्षाच्या निवडणुकांच्या प्रचारतंत्राने उबग आणल्याचे बरेच जण म्हणतात. अर्थात हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक अनुभव. प्रचाराचा उबग आलेले माझे एक स्नेही म्हणाले, “सर, या निवडणुकांमध्ये प्रचाराचं जरा अतीच होतंय नाही का? टीव्ही लावा तेच. वर्तमानपत्र उघडा तेथेही तेच. चर्चा ऐका तेव्हाही तेच. सोशल मीडिया पाहा तेथेही तसेच. शेतात काम करताना विषय निवडणुका, गावात पारावर गप्पा करीत बसलेल्यांच्या चर्चेतही निवडणुकाच. अहो, देशात दुसरे आणखी काही प्रश्न, दुसऱ्या काही समस्या नाहीतच का? की संपल्या साऱ्या एकदाच?” त्यांचं बोलणं ऐकून शांतपणे त्यांना म्हणालो, “तुमचं म्हणणं ठीक आहे. लोकशाहीत लोक निवडणुकांव्यतिरिक्त आणखी कोणत्या चर्चा करतील? देशाने लोकांच्या तंत्राने चालणारी शासनप्रणाली स्वीकारली असेल, तर लोकांपर्यंत पोहचावेच लागेल ना! आणि प्रचाराचं म्हणाल, तर तो कधी नसतो. कालही होता, आजही आहे. फक्त प्रचाराचे रूप पालटले आहे. पूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, आज सोशल मीडियाच्या भिंती रंगवल्या जात आहेत, ऐवढेच. तेव्हा आपल्याकडे टीव्ही तरी होता का? काही धनिकांकडे, शहरवासियांकडे असलातरी त्यावरील चॅनल्स संख्या किती होती? अहो, काळ बदलला तसं आपणही बदलायला नको का?”

माझं म्हणणं त्यांना समर्थनीय वाटले नसावे. ते पुन्हा म्हणाले, “पण प्रचारात असे एकमेकाचे गळे नव्हते धरले जात. असा चिखल नव्हते उडवत एकमेकावर.” तुमचं म्हणणं एकदम मान्य, आज असे होतही असेल कुठे, पण सगळंच वाईट घडतंय असं कुठं आहे. तेव्हाही असं घडलं नसेल, असं नाही. संपर्क माध्यमे वेगवान नसल्याने कदाचित तेव्हा आपणास कळले नसेल. आज माध्यमे प्रचंड वेगवान असल्याने घटना तात्काळ कळतात इतकंच.” माझ्या बोलण्याने त्यांचं समाधान झालं नसावं. म्हणाले,” “घटना घडतातच ना! हे घडू नये म्हणून काही करता येणार नाही का? थोडासा संयमाचा बांध आपण घालू नये का?” असंच बरंच काही-काही बोलत राहिले. अजूनही सांगत राहिले असते असंच काहीतरी. पण माझाच संयम ढळत चालला होता. माझा स्वभाव फारकाळ एकाच विषयात गुंतून त्याची टरफले सोलीत राहावा, त्याचा भुसा काढीत राहावा असा नसल्याने तो तेवढ्यावर संपवून त्यांचा निरोप घेतला. माझ्या कामाकडे वळता झालो. पण न कळत मनात त्यांचा तोच प्रश्न शंका म्हणून उभा राहिला. खरंच आम्ही समाजसंमत सभ्येतेच्या मर्यादांच उल्लंघन तर करीत नाही ना? 

0 comments:

Post a Comment