Anakhi Ek Nikal | आणखी एक निकाल

By
नुकतेच बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधी-नंतर जेईई, सीईटी परीक्षांचेही निकाल एकदाचे घोषित झाले. नेहमीप्रमाणे गुणवत्तेची शिखरे पूजली गेली. त्यांच्या गुणवत्तेचा (की गुणांचा) गौरव झाला. परीक्षेत उच्चगुण संपादित करणाऱ्या गुणवंतांना संबंधिताकडून गौरवान्वित केले गेले. त्यांच्या गुणवत्तेत योगदान (?) असणाऱ्यांचेही खास अभिनंदन केले गेले. कौतुकाच्या वर्षावात सारे चिंब भिजले. कौतुक ज्वर हळूहळू ओसरत गेला. तो ओसरल्यावर परीक्षेतील यशवंतांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एक जाणीव प्रकर्षाने अधिक गडद होत गेली, पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर काय असावं, म्हणून साऱ्यांच्या चेहऱ्यावर एक भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह अंकित झालेलं. काय करावं? कुठं जावं? कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा? असे एक ना अनेक प्रश्न. प्रश्नांच्या गुंत्यात सापडलेल्यांसाठी नेहमीप्रमाणे मदतीला काही तज्ज्ञ सल्ले, काही तज्ज्ञांचे सल्ले, काही व्याख्याने, काही सेमिनार्स बापरे! आजूबाजूला सारं कसं विचारांचं मोहळ उठलेलं. विचारांच्या मेघांनी आभाळ दाटलेलं.

सगळं जीवनचक्र भविष्याभोवती गरागर फिरतंय. ते तसं फिरायलाही हवं, कारण आजच्या प्रयत्नातून पुढच्या प्रवासाची दिशा ठरत असते. पुढे जाऊन आपल्या जीवनात येणाऱ्या आनंदप्राप्तीसाठीच सारी धडपड चालेली असते. आनंदयात्रिक बनण्यासाठी आधी आनंदाचं झाड आपल्या अंगणात लावावं लागतं. आनंदी मन हीच विद्यमानकाळाची आवश्यकता आहे. पण यातील किती आनंदाची झाडं बहरतात, फुलतात? आनंदाची ही रोपटी दहावी बारावी परीक्षेतील निकालांच्या वावटळीत उन्मळून पडतात. त्यांच्या असह्य दाहकतेत करपून तरी जातात. तसं पाहता जीवनातील आनंद, दुखाःची निर्मिती घडायला आपणच जबाबदार असतो. त्या-त्या वेळी घेतलेले बरेवाईट निर्णय आपल्या वाट्यास काय यावं, हे ठरवत असतात. यासाठी आपण कोणालातरी उगीच जबाबदार धरत असतो. अर्थात सगळ्याच ठिकाणी असे घडत नाही. काही ठिकाणी असे घडतही असेल. पण निर्णय घेण्याची जबाबदारी कोणीतरी पार पाडत असेल, तर त्यामुळे होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांचे उत्तरदायित्व त्याचेच असते, हेही नाकारता येत नाही.

काही दिवसापूर्वी माझा एक माजी विद्यार्थी शाळेत आला. शाळेत त्याचे काहीतरी काम असावे. समोरच दिसला म्हणून विचारले, “काय रे! सध्या काय करतोय? यावर्षी तू बारावीला होतास ना! निकालाचं काय?” माझं बोलणं ऐकून विचलित न होता शांतपणे म्हणाला, “त्याचे बारा वाजले सर!” मुळातच त्याचा स्वभाव सहजपणे वागण्याचा असल्याने फार काही मोठे अघटित घडलेच नाही, अशा अविर्भावात तो बोलला. मलामात्र वाटत होते, हातून काहीतरी निसटल्याची खंत याच्या मनात असावी. तसे चेहऱ्यावर जाणवू न देता म्हणाला, “आहेच यापुढे आपली आषाढी, कार्तिकीची वारी. होईल पुढे सारेकाही ठीक. वर्ष हातचं जातंय, बस्स! आणि दुसरं काही वेगळे घडण्याची शक्यता नव्हतीच. कारण आम्हाला सोबत-संगतच तशी होती. सारेच जीव जिवाची मुंबई करणारे असल्यावर ये तो होनाही था! झालं..... जे नुकसान व्हायचं होतं ते. घडलेल्या चुकांचं निराकरण मलाच करावं लागेल. दुसरं कोण करणार आहे? वाटलं थोडं वाईट; पण आता त्याला काही इलाज नाही. झालं ते घडून गेलं. अर्थात या वाईट वाटण्यात सहानुभूती वगैरे काही नव्हतं. होती फक्त अनुभूती. पण एक खरंय सर, शाळेत शिकलेलं आज आठवतेय, अनुभव हाच मोठा गुरु असतो. शिकलो अनुभवातून काय शिकायचे ते!” त्याला आणखीही बरंच काही बोलायचं असावं. मला पुढच्या तासिकेला वर्गावर जायचे असल्याने त्याला धीराचे (की उपदेशाचे!) चार शब्द ऐकवले. पुन्हा कधीतरी निवांतपणे येऊन भेट, म्हणून त्याच्याशी बोललो. आणि वर्गाकडे निघालो.

माझा हा विद्यार्थी कुशाग्र, असाधारण वगैरे बुद्धिमत्ता असणारा, उच्च गुणसंपादन करणारा कधीच नव्हता. जसे बरेच जण असतात ना! त्या बऱ्याच जणातला एक. अंगापिंडाने बऱ्यापैकी. सरासरी उंची असलेला. नाकीडोळी नीटस. शाळेच्या गणवेशातही नीटनेटके राहता येते, हे त्याच्याकडे पाहून वाटावे असा. सतत प्रसन्नचित्त. साऱ्यांना आपलासा वाटणारा. पुस्तकातील पाठांमधून शिकवलेल्या परोपकार या मूल्याला आपलं कर्तव्य मानणारा. मदतीसाठी प्रसंगी धावून जाणारा, परोपकारी गंपू. कौटुंबिक पार्श्वभूमी उत्तम. मुलावर हो, मुलावरच (त्याच्या प्रगतिपुस्तकातील गुणांवर नाही) प्रेम करणारे प्रेमळ आईबाबा. आनंदी कुटुंब. जीवनाकडे सकारात्मक, सहज नजरेने बघणारे समजूतदार पालक. परीक्षेत निकालाचा गणपती बाप्पा मोरया! झाला. होऊ दे. बचेंगे तो और भी लढेंगे, या विचाराने मुलासोबत उभे राहणारे. पोरगं नापास होऊनही त्यांच्यामुळेच आनंदाने, उमेदीने उभे आहे. चुकांची जाणीव त्याला झाली. तो सल मनात होताच; पण उभं राहण्याची जिद्द, उमेद त्याहून मोठी होती. कारण चुका घडलेल्या असतानाही आईबाबा पाठीशी उभे होते. केवढा मोठा आधार त्याच्यासोबत होता. असे आधार सर्वांनाच मिळत नसतात, हे त्या अभाग्यांच दुर्दैव.

हा मुलगा दहावीच्या वर्गात माझ्याकडे होता. सहज म्हणून भेटायला त्याचे आईबाबा शाळेत आले. म्हणाले, “सर, मुलाच्या गुणवत्तेकडे लक्ष असू द्या! पोरगं घडवा. त्याला परीक्षेत जास्त गुण नाही मिळाले तरी चालतील; पण माणूस म्हणून जगताना त्याची गुणवत्ता कमी पडायला नको.” त्यांचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आम्हांला भेटायला येणाऱ्या पालकांकडून नेहमीच मुलांच्या गुणांची चौकशी ऐकायची सवय. यांचं बोलणं जरा वेगळच वाटलं आणि मनापासून आवडलंही. सकारात्मक विचार घेऊन भेटणारी, जगणारी अशीही माणसे असतात, यावर विश्वास ठेवायला बाध्य करणारे. पण अशा विचारांना घेऊन वावरणारी माणसांची जमात हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. जो-तो गुणसंख्येच्या स्पर्धेत धावतो आहे. धावण्याच्या स्पर्धा कशासाठी याचे भान किती जणांना आहे. कुणास ठाऊक? फार थोड्यांना असेल, तर बाकीच्यांचं काय?

स्पर्धा शब्द आपल्या विचारात आणि मनात एकदाचा रुजल्यावर त्याचे पर्यवसान ‘इगोत’ होते. त्याची टोके धारदार होतात, टोकदार होतात. टोकदार काट्यांच्या टोचण्याने जखमा झालेली रक्तबंबाळ मने सावरायची कशी? हा प्रश्न वाटतो तितका सहज नाही. सोपा तर त्याहून नाही. आपल्या अंतर्यामी समाधान साठलेले असेल तर अस्वस्थ उसासे उभे राहतीलच कसे? आपल्या आकांक्षाना पूर्ण करण्यासाठी स्वप्नेही मोठी पहावी लागतात. पूर्ततेसाठी आपल्याकडे क्षमताही असाव्या लागतात. वास्तवाचे भानही आपणास असावे लागते. रनिंग ट्रॅकवरून धावणाऱ्या प्रत्येकीला पी. टी. उषा नाही होता येत. मैदानावर क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण काही सचिन नाही होऊ शकत. प्रत्येकाला डॉ. अब्दुल कलाम नाही होता येत. पण प्रत्येकाला माणूस निश्चित बनता येते. माणूस म्हणून जगण्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग करायची आवश्यकता नाही. फक्त आपला इगो कमी करून मायेचा झरा वाहता ठेवला तरी पुरे आहे. बऱ्याचदा हे घडणे अवघड असते. पाल्यांकडून आपल्या अपेक्षांची पूर्ती घडणं बापाला आवडतेच. पण त्यांच्यातील इगोला त्याने मिळविलेले कमी गुण का नाही आवडत? ‘ये दिल मांगे मोअर’ अशीच त्यांची स्थिती असते.

परीक्षेच्या निकालांनंतर यशस्वीतांना डॉक्टर, इंजिनियर बनण्याची घाई झालेली असते. किमान तशी इच्छा तरी असते. सारे धावतील तिकडेच हेही धावतील. काही वेगळे करावे ही मानसिकताच नाही. मग हेच करायचे म्हणून घेतल्या जातात हाती लहानमोठ्या गोण्या. राहतात कुठल्यातरी शिक्षणसंकुलातील रांगेत उभे. जणूकाही येथेच आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य जन्माला येणार आहे. अन्यत्र कुठेच तसे असण्याची शक्यता नसल्यासारखे. गोण्याभरण्याइतके प्रवाह त्यांच्याकडे वाहत असतील तर ठीक. नाहीतर स्नेह्यांकडे उसनवारीची भिक्षांदेही आहेच. तेही शक्य नसल्यास घरदार, जमीनजुमला पणाला लागतो. आज अंधारात आहे त्या उद्याच्या भविष्यासाठी जुगार खेळला जातो. यात जिंकणारे किती आणि हरणारे किती? या प्रश्नाचं उत्तर मिळणे अवघडच.

बोर्डाच्या परीक्षेत उच्च गुणसंपादन करणाऱ्यांतील बऱ्याच जणांचे पुढे काय होते, ते नेमके कुठे असतात, यांचा मागमूसही नंतर कुठे दिसत नाही. शिकणाऱ्यातील किती डॉक्टर, इंजिनियर उच्चगुणवत्ता संपादन करून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करतात? सन्माननीय अपवाद सोडलेतर सारेच परिघाभोवती गरागरा फिरतात. परिघाच्या वर्तुळालाच आपलं विश्व समजतात. कितीजण आपल्या व्यवसायातील खूप उंचीचे कौशल्ये संपादित करतात? हा एक यक्षप्रश्न आहे. आपल्याकडे केवळ काहीच व्यवसायांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अद्यापही आपला समाज अन्य पर्यायाकडे प्रतिष्ठित भावनेने पाहत नाही. विज्ञानशाखा निवडलीस ना, मग ठीक आहे! आहे काहीतरी भविष्य. वाणिज्य ठीक आहे, करशील काहीतरी पोटापुरतं. पण कलाशाखा अरे, भिकेचे डोहाळे लागलेत काय तुला? काय मरायला घेतो कलाशाखा. नुसता अंधार. उजेडाचा एकतरी कवडसा तिकडे दिसतो का? ही आमची मानसिकता. कोणत्या युगात आपण वावरतोय? प्रतिष्ठेच्या बेगडी कल्पना कशासाठी हव्यात? पाश्चत्य राष्ट्रांत मानवविद्या शाखांना मिळणारी प्रतिष्ठा आपल्याकडे कशी आणणार आहोत आपण?

आपल्याकडे राजकारण आणि शिक्षण या विषयांवर खूप चर्चा होते. मत व्यक्त करणारा शिकलेला असला काय, नसला काय. कोणीही आपले मत प्रदर्शित करतो. जणू त्याचं मत म्हणजे परिस्थितीचे सखोल चिंतन असते. शिक्षणात काही रामच राहिला नसल्याचं त्यांचं म्हणणं असतं. सीमित अर्थाने हे खरं असेलही. ज्या देशाची विद्यापीठे श्रेयनामावलीत पहिल्या शे-दीडशेमध्येही नसतील, त्या देशात शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होतीलच. पण प्रश्न एवढेच आहेत कुठे. महाराष्ट्रात इंजिनियरींग अभ्यासक्रमाच्या सुमारे पंचवीस-तीस हजार जागा रिक्त राहत असतील आणि डी.टी.एड, बी.एड.ला कोणी विचारायला तयार नसेल, तर दोष नेमका कुणाचा? प्रवेश घ्यायलाच कोणी तयार नसेल, तर या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा काय असेल, हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही.

परीक्षांच्या निकालांनंतर प्रत्येकजण अपेक्षित वाटांनी आपलं भागधेय शोधण्यासाठी चालता होतो. पण साऱ्यांनाच वाटा सापडतील असे नाही. काहींना त्यांची भाग्यतीर्थे मिळतीलही. नसतील मिळणार म्हणून हताश, निराश होण्यात अर्थ नाही. एखादे अपयश म्हणजे संधीचा शेवट नसतो. अपयश हा चुकलेला रस्ता असू शकतो; त्याचा शेवट नसतो. मला भेटलेल्या या विद्यार्थ्याने कळत-नकळत हेच तत्व अंगिकारले. अपयश त्याच्या वाट्याला आले. ती वेदना त्याच्या मनात आहेच. पण मनात आशाही आहे आणि खात्रीही आहे परिस्थिती असते तशीच कायम राहत नाही. पाठीमागे समजूतदार पालक उभे असल्याने अपयशाला सामोरे जाणं त्याला अवघड गेलं नाही.

आपली मुले आपलं अस्तित्व आहेत याची जाणीव पालकांना आहे. पण परीक्षेत मिळवलेले गुण हीच खरी संपत्ती समजून ते त्यांचं मोल करायला लागतात. आपली मुलं अनमोल संपदा आहे. तिचं मोल गुणांच्या टक्केवारीत कसं होईल? समाजात वावरताना माणूस म्हणून आपल्याकडे किती गुणवत्ता आहे, हेच पाहिले जाते. तुला किती गुण मिळाले, असं दैनंदिन व्यवहारात विवक्षित वेळ निघून गेल्यानंतर कोणीच कोणाला विचारत नाही. मिळवलेले गुण समाजाला दिसावेत म्हणून काही आपण परीक्षेचे गुणपत्रक गळ्यात घालून फिरत नाहीत. परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेत, त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. त्यावर आपले उद्याचे भविष्य ठरते हेही सीमित अर्थाने खरंय. पण भविष्य ठरविणारा तो काही एकमेव घटक नाही. आपल्या अपत्यांच्या गुणवत्तेचं मोल करताना पालकांनी थोडं भूतकाळात डोकावून पाहावं. आपणच आपणाला प्रश्न विचारून पाहावा, आपण लहान असताना आपल्या मुलांइतकेच स्मार्ट होतो का? यांच्याइतका चुणचुणीतपणा आपल्याकडे तेव्हा होता का?

0 comments:

Post a Comment