Sahvedana | सहवेदना

By
जीवन सगळ्यांच्या वाटेला येते; पण जगणं किती जणांचं घडतं? हे म्हणणं कदाचित काहींना चुकीचे वाटेल किंवा कोणाला मूर्खपणा वाटेल. काहीही वाटले, तरी वास्तव थोडेच बदलणार आहे. जीवनाचा अर्थ कोणाला कळला आहे? एखाद्याला कळला असेल, तर तसेच त्याचे जगणे घडते का? काही म्हणतील, जीवनाला असा काही ठरवून दिलेला एकच एक अर्थ असतो का? समजा असला, तरी किती जणांना त्याचे सर्वंकष आकलन झालेलं असतं? या प्रश्नाचं सर्वसमावेशक, सर्वमान्य उत्तर देता येईल असं वाटत नाही, कारण याआधीही प्रज्ञावंतानी, बुद्धिमंतानी, तत्ववेत्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते शोधतांना मतमतांतराचा बऱ्यापैकी गोंधळ करून ठेवला आहे. तरीही एखाद्या माणसाला जगण्यातच खरा अर्थ सामावला आहे, असे वाटत असेल तर तसं वाटण्यात वावगं काहीही नाही.

इहलोकी प्रसन्नचित्त वृत्तीने जगण्यात माणसाच्या असण्या-नसण्याचे सगळे अर्थ सामावले असतील, तर सर्वबाजूंनी आनंदाची पखरण करणारं प्रसन्न, प्रमुदित जगणं किती जणांच्या वाट्याला येत असतं? ठामपणे विधान करणं अवघड आहे. देहात श्वास असेपर्यंत जगणं सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. नसेल फारच सुंदर, देखणं, रमणीय वगैरे, तर निदान ते समाधानाचं असावं म्हणून आकांक्षांच्या आसमंतात अधिवास करणाऱ्या स्वप्नांचा शोध घेत धावाधाव करायला लागते. सुखसंपादनासाठी धडपड साऱ्यांचीच असली, तरी ते मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायास-प्रयासांचे संदर्भ प्रत्येकाचे वेगळे असतात. काहींच्या वाटेवर प्रसन्नता पायघड्या घालून उभी असते, तर काहींच्या वाटेवर परिस्थितीचा दाहक वणवा पेटलेला असतो. सुखांची अनवरत बरसात ज्यांच्या जीवनात घडते, अशी नशीबवान माणसे संख्येने फार थोडी असतात. बहुसंख्यांच्या जगण्यात दैनंदिन प्रश्न, कटकटी वसतीला आलेल्या असतात.

ऋतू यावेत, जीवनात त्यांनी रंग भरावेत, आयुष्य समृद्ध करावे अशी अपेक्षा असते. ऋतूंचे सोहळे मनःपटलावर रुजत जातात. त्यांचे अर्थ नव्याने उमगत जातात. त्यांना सामोरे जातांना माणसे आपल्या मनातले रंग त्यातून शोधत राहतात. पण जीवनाच्या कॅनव्हासवरील चित्रात मनाजोगते रंग भरण्याचं प्राक्तन नियतीने साऱ्यांच्या ललाटी लेखांकित केलेलं नसतं. सुखदुःखाच्या ऊनसावलीचा खेळ अनवरत सुरु असतो. कधी सुखाचं इंद्रधनुष्य मनाच्या आसमंतात उमलून येतं. कधी आकस्मिक आपत्तींच्या आवर्तात सापडून माणसाचं जगणं गरगरत राहतं. वावटळीतील पाचोळ्यासारखे दूरदूर कुठेतरी भिरकावलं जातं. सुखांचा वर्षाव संपतो. जीवनाचा ऋतू कूस बदलतो. परिस्थितीचा वणवा दाहक पावलांनी चालत दारी येतो. त्याचे चटके सोशीत बदलणाऱ्या ऋतूची प्रतीक्षा करीत माणसे उभी राहतात. एखाद्या निष्पर्ण वृक्षासारखे, अंकुरण्याची वाट पाहत. पण हिरवाई लेऊन सजून येण्यासाठी आतून येणारा ओलावा सोबतीला असावा लागतो. तोच आटला असेल, तर पालवीने फुलण्याचे स्वप्न पाहावे तरी कसे? माणसाचे जीवन अनेक संकटांनी, समस्यांनी, व्याधींनी, काळजीने काळवंडलेले असते. प्रासंगिक आपत्ती कोणाला टाळताही येत नाहीत. त्यांचा स्वीकार करीत जीवनाची वाट चालावीच लागते. पण जगण्याच्या वाटेवरून चालताना स्वप्नांची सोबत असेल, तर परिस्थितीशी संघर्षरत राहण्यासाठी बळ येते.

जीवनात येणारा प्रत्येक दिवस मोहक गंधाने माखलेला असावा. रात्री स्वप्नांनी सजलेल्या असाव्यात. क्षणनक्षण चैतन्याचा वर्षाव करणारे असावेत, अशा अपेक्षा मनात वसतीला असतात. म्हणून साऱ्यांच्याच आयष्यात सुखं काही आपल्या पावलांनी चालून येत नसतात. म्हणूनच की काय संत तुकाराम महाराजांनी ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे’ असे म्हटले असावे. माणसं सुखाच्या कणभर सहवासासाठी, मणभर कष्टाचं ओझं वाहत असतात. पण बऱ्याचदा हे कणभर सुखही नियती म्हणा, दैव म्हणा किंवा आणखी काही म्हणा वाट्यास येऊ देत नाही. असंख्य व्यवधाने, प्रश्न समोर उभे राहतात. त्यांच्याशी दोन हात करीत हवं असणारं काही मिळवण्यासाठी माणूस आभासी मृगजळामागे पळत राहतो. आज उमललेली वेलीवरची फुले कोमेजतील; पण उद्या त्यांची जागा दुसऱ्या नव्या कळ्या घेतील. कळ्यांची फुले होतील. त्यांच्या गंधाने आसपासचे आसमंत प्रसन्न परिमल घेऊन फुलून येईल. उद्याचा प्रसन्न प्रकाश माझ्या अंगणी येईल. हा आशावाद मनात असतो. म्हणूनच की काय जगण्याची उमेद आस्थेचा ओलावा शोधत मातीला घट्ट धरून ठेवते.

काही दिवसापूर्वीचा एक प्रसंग आठवतो. मधल्यासुटीत आम्ही सगळे शिक्षक चहा घेण्यासाठी एकत्र आलो होतो. हातातील चहाच्या कपासोबत सुरु असलेल्या इकडच्या-तिकडच्या गप्पा चहाची रंगत वाढवत होत्या. गप्पांच्या फडाला चांगला रंग चढलेला. दरम्यान आमचे एक सहकारी शिक्षक आणि त्यांच्या बाजूने कुणीतरी एक मध्यमवयीन महिला आमच्या दिशेने चालत आले. अनोळखी चेहऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष गेले; पण तेवढ्यापुरते, कारण नेहमीच कोणीतरी पालक, काही कामानिमित्त शिक्षकांना भेटायला शाळेत येतच असतात. म्हणून सुरवातीला कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्या महिलेच्या चेहऱ्यावर जगण्याच्या संघर्षाची सारी चिंता एकवटून साठलेली. कदाचित त्यांच्या मनात असंख्य प्रश्नाचं काहूर उठलेलं असावं. डोळ्यात याचना साकोळून गोळा झालेली. त्यांच्याकडे पाहतांना समस्यांशी संघर्ष करता-करता झालेली दमछाक स्पष्ट दिसत होती. देहात त्राण जणू जेमतेमच उरले आहे, अशी स्थिती. त्यांच्याकडील काही कागद हाती घेत शिक्षकाने मुख्याध्यापकांचा निरोप सांगितला. ‘या बाईंची मुलगी कुठल्याशा दुर्धर व्याधीने ग्रस्त आहे. उपचाराचा खर्च खूपच मोठा आहे. आपण आपल्यापरीने यथासंभव मदत करावी.’

उपचारासाठी मुलगी ज्या रुग्णालयात होती, तेथील डॉक्टरांनी त्यांच्या मदतीकरिता लिहिलेलं आवाहन करणारं पत्र आणि तदानुषंगिक कागदपत्रे त्या बाईनी दाखवण्यासाठी समोर धरले. त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून हातातील चहाचा कप हातातच राहिला. मनात एक अनामिक अस्वस्थ कालवाकालव सुरु झाली. तेवढ्यात कुणीतरी चहाचा कप भरून त्यांच्या हाती देत म्हणाले, “ताई, आधी हा चहा घ्या आणि मग सांगा, तुम्हाला काय सांगायचे आहे ते.” अपराधी मनाने आणि थरथरत्या हाताने त्यांनी चहा घेतला. मुलीच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाचे, औषधांचे काही कागदपत्रे त्यांनी पिशवीतून सोबत आणले होते, ते काही शिक्षकांना दाखवले. आतापर्यंत स्वैरपणे सुरु असलेल्या आमच्या गप्पा, चकाट्या थांबल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न एकवटून त्यांचे विणले जाणारे जाळे स्पष्ट दिसायला लागले. गप्पांची जागा प्रश्न आणि प्रश्नांची जागा सल्ल्याने घेतली. आपापल्या माहितीप्रमाणे काहीजण त्यांना उपाय सूचवू लागले. काहींनी मदत कशी, कुठून मिळवता येईल, याचे मार्ग सांगायला सुरवात केली.

या साऱ्या बोलण्याने गोंधळलेल्या, त्या माउलीच्या मनात काय कालवाकालव सुरु असेल, कोण जाणे? पण मनात उठलेले विचारांचे वादळ तिला अस्वस्थ करीत होते. सैरभैर करीत होते. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळ्यांमध्ये आसवांची दाटी झालेली. त्यांना तेथे सामावणे अशक्य झाल्याने, पापण्यांच्या कडा ओलावल्या. दवाखान्यात जीवन-मरणाच्या उंबऱ्यावर उभ्या असणाऱ्या लेकीसाठी अंतःकरण तीळतीळ तुटत होते. आतापर्यंत होती नव्हती, ती सारी जमापुंजी मुलीच्या उपचाराच्या खर्चासाठी पणाला लागलेली. गरिबाघरी असून असून, असे काय अन् किती असणार आहे. गळ्यातील सोन्याचं सौभाग्यलेणंही लेकीच्या उपचारासाठी विकलेलं.

मुलीचे वडील एक साधे कामगार. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्यातरी कंपनीत तुटपुंज्या वेतनावर राबराब राबणारे. शक्य होती तेथून काही थोडी मदत त्यांनी जमवली; पण तरीही उपचार महागडा असल्याने सगळे मार्ग संपले. तरीही मुलीच्या जगण्याची आशा मनात कायम होती, म्हणूनच आज याचक बनण्याची वेळ नियतीने या परिवारावर आणलेली. कुणासमोर हात पसरताना वाईट वाटत असल्याचे, त्यांच्या बोलण्यावरून कळत होते. परिस्थितीने या परिवाराला विकलांग बनविले. पण ‘आई’ नावाच्या मनात आस कायम होती. पदर पसरेन, भिक मागेन; पण पोरीच्या जीवासाठी अखेरपर्यंत लढेन, ही जिद्द विचारात आणि कृतीत जिवंत होती.

परिस्थितीशी लढणारे परिवारातील सगळे हरले होते. सारे उपाय जवळपास थांबले होते; पण आई हरायला तयार नव्हती. मनातील हताश विचारांना झिडकारून, उन्मळून टाकणाऱ्या संकटांच्या वादळवाऱ्याशी दोन हात करीत ती एकाकी उभी होती. पतीच्या प्रेमासाठी सावित्रीने कलेल्या संघर्षाची, प्रयत्नांची कथा सर्वश्रुत आहे. त्या सावित्रीचं, तिच्या त्यागाचं आम्हाला प्रचंड कौतुकही वाटतं; पण उंबऱ्यावर उभ्या असणाऱ्या यमदूताला थांबवून ठेवण्याकरिता मातेने मुलीसाठी सुरु केलेल्या या संघर्षात भलेतर सावित्रीच्या गोष्टीतील संदर्भ नसतील, त्या गोष्टीचं असणारं संघर्षमूल्य नसेल; पण मूल डोळ्यादेखत हातचे सुटू नये, म्हणून केलेला संघर्ष पुराणातील सावित्रीच्या संघर्षाहून कणभरही कमी नाही. आशेचा एक धूसर किरण अद्यापही तिच्या अंतर्यामी उभा होता. त्याला जागवत, त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात, पावलापुरती वाट शोधीत ती चालली होती; मनात हजार प्रश्नाचं घोंगावणारं वादळ आणि शंकांचं काहूर सोबतीला घेऊन.

शिक्षकांच्या चेहऱ्यावर खिन्न भाव गडद होत चाललेले. मनातील संवेदना  सहवेदना बनून जाग्या झाल्या. यांच्यासाठी काही करता येईल का, म्हणून एक अनामिक अस्वस्थता मनात उभी राहिली. न कळत हात खिश्याकडे गेला. काही पैसे काढून त्यांच्या हाती ठेवले. लागलीच एक कागद समोर करीत, त्यावर नाव लिहिण्यासाठी त्या सांगू लागल्या. त्यांना नम्रपणे नकार देत म्हणालो, “ताई, आम्ही काही तुमच्यावर उपकार वगैरे करीत नाही. आज तुमची परिस्थिती अशी, म्हणून तुम्ही येथवर चालत आलात. नसता कधी ही सारी माणसं तुमच्याशी बोलली असती.” प्रत्येकाने आपापल्या वकुबाप्रमाणे शक्य असेल तेवढी आर्थिक मदत त्यांना केली. आज पहिल्यांदा कोणावरतरी आपण उपकार करतोय, या भावनेचा मनात थोडाही लवलेश नव्हता. कुणाच्यातरी काळजाचा तुकड्याला जोडण्यासाठी, हे सत्पात्री दान घडत होतं. त्या परत निघाल्या. शिक्षकांनी आवर्जून पुन्हा एकदा शासनाच्या विविध आरोग्य योजना, लोकनेत्यांची मदत आणि मदतीच्या अन्य काही मार्गांची आठवण त्यांना करून दिली.

माणसांच्या जीवनाच्या सारीपाटावरील सोंगट्या कोण, कशा हलवतो, काय माहीत; पण जीवनाच्या सारीपाटावरील सुरु असणाऱ्या खेळात नियतीचे पडलेले दान सोबत घेऊन; वाट्यास आलेल्या चौकटींना ओलांडताना अनेकांची दमछाक होते. माणूस नियतीच्या हातचे कळसूत्री बाहुले असते. म्हणूनच ‘पराधिन आहे पुत्र जगी मानवाचा’, असे म्हटले असेल. इहलोकी जगताना स्वतःचे असे काय आहे माणसाच्या हाती की, ज्यायोगे माणूसपणाचा वगैरे व्यर्थ अभिमान आपण बाळगावा? नियतीच्या छोट्याशा धक्क्याने उन्मळून पडणारे जीवन अशावेळी किती क्षुल्लक आणि क्षुद्र वाटते. या क्षुद्रपणातसुद्धा मनासारखं काहीतरी घडण्याची एक अनामिक आस असते. नाना काळजींनी काळवंडलेल्या जगण्यात मंतरलेल्या मोहक क्षणांची सोबत घडण्यासाठी दुःखाची अनेक कुंपणे ओलांडावी लागतात, तेव्हा कुठे पलीकडील पारिजातकाचा प्रसन्न परिमल हाती लागत असतो. मनवृक्षाची पाने हिरवीगार राखण्यासाठी सर्जनाचा ओलावा शोधावा लागतो, तेव्हा कुठे जगण्याला विलक्षण चैतन्याचा मोहर येतो. या मोहरलेल्या फुलांच्या गंधाने परिसरात पसरलेली मातीही गंधित होते.

प्रत्येकाला आपल्या वाट्यास आलेली दुःखे खूप मोठी वगैरे वाटत असतात; पण नजरेचा थोडा कोन बदलून दूरवर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहिले तर कळते, नियतीने निदान किमान सुख माझ्या ओटीत; ओंजळभर का असेना ओतले आहे. अशावेळी भाग्य शब्दाचा अर्थ कळायला लागतो. पण दुर्दैवाने भाग्य शब्दाचा अर्थ जो-तो आपापल्यापरीने सोयिस्करपणे घेत असतो. आपापल्या भाग्यरेषा आखून माणसे कुंपणातलं सुख शोधत राहतात; पण त्यापलीकडे असणारे दुःख दुर्लक्षित करतात. स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं; दुःख विसरण्यात माणूसपण सामावलेलं नसतं. इतरांच्या वेदनांनी मनावर आघात होताना गलबलून आलेलं अंतःकरण, हीच माणसांची खरी श्रीमंती असते. गाठीला असणारा पैसा बरंच काही असला, तरी तो सारंच काही नसतो. माणूसच विश्वातील सगळं काही आहे, याची जाणीव अंतर्यामी असणे म्हणूनच आवश्यक असते. माणूसपणाचं विशाल आकाश संकटांच्या, आघातांच्या मळभाला सामावणारं असेल, तर मायेचा ओलावाही तेथूनच पाझरणार असतो. फक्त तो सामावण्याएवढं व्यापकपण विचारांच्या नभात उतरून यायला हवं.

व्याधी, संकटे, समस्या नियतीने माणसाच्या जीवनात का म्हणून दिल्या असतील? दिल्यातर निदान गरिबाघरी देऊ नयेत, असे वाटायला लागते. पण हा निव्वळ स्वप्नरम्यतावाद झाला, कारण निसर्ग अतिशय कठोर असतो. त्याच्याकडे हा राव आहे आणि हा रंक, असा भेदभाव नसतोच. त्याच्यासाठी सगळेच माणूस म्हणून सारखे असतात. विद्यमान जगात पैशाची कमतरता मुळीच नाही. पण पैसा कुठे कसा साठवला जाईल आणि गोठवला जाईल, कोणास ठाऊक. जगात अशीही अनेक माणसे आहेत, ज्यांच्याकडे पैसा असल्याने, कोणत्याही समस्या त्यांच्यासमोर उभं राहायला घाबरतात. अशा निवांत जगण्यात हाती असणारा पैसा उधळण्यासाठी कोणतेतरी निमित्त शोधले जातात अन् निमित्ताला कारण ठरणारे सोहळे साजरे होताना रंगतात. मुक्तहस्ते पैसा उधळला जातो. तर दुसऱ्या बाजूने पै-पै जमा करण्यासाठी मारणांकित कष्ट उपसूनही हातातोंडाची गाठ पडणं अवघड होत असतं. संपत्तीचं समान संयोजन घडावे, अशी अपेक्षा माणसाने कायमच केली आहे; पण भांडवललक्षी विचाराने पैसा ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडेच येण्यासाठी अनेक मार्ग निर्माण केले. एकीकडे संपत्तीचं सवंग प्रदर्शन, तर दुसरीकडे दमडीही हाती नाही; म्हणून रोजचं जिवंतपणी मरण सोबतीला घेऊन आला दिवस ढकलीत जगणं घडतं.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे भौगोलिक सत्य आहे. पण आज ती पैशाभोवती फिरतेय, हे आर्थिक सत्य आहे. आपल्या लोकशाहीने समानतेच्या संधी उपलब्ध करून दिल्यावरही एवढ्या वर्षात बहुसंख्य माणसं किमानपातळीवरही आर्थिकदृष्ट्या समान का होऊ शकले नसतील? याचं उत्तर या आर्थिक सत्यात सामावले आहे. कदाचित काहींचं म्हणणं पडेल, आहे त्यात आमचा काय दोष? आम्ही काही तुम्ही कमवू नका, आनंदाने जगू नका, असे सांगितले नाही कोणाला! अर्थात, कोणावरही दोषारोपण करण्याचा हेतू नाहीये. पण व्यवस्थेतील परिस्थितीत विसंगती आहे, या वास्तवाला विसरून कसे चालेल. शासनाने कल्याणकारी राज्य भूमिका अंगिकारली असेल, तर कल्याणजनक चित्रे आमच्या समाजव्यवस्थेत किती दिसतात? याचा अर्थ आतापर्यंत काहीच घडले नाही, असंही नाही. शासनाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, हक्क आदी शेकडोने योजना आहेत, सुविधाही आहेत तरीही त्यांची माहिती सामान्यांना पुरेशी का नसते?

मुलीच्या उपचारासाठी या महिलेला पदर पसरून लोकांचे उंबरे का झिजवावे लागत आहेत? कदाचित तिच्या अन् परिवाराच्या अशिक्षितपणामुळे शासनयोजनांची माहिती नसेल झाली किंवा तसं कोणी सूचवलं नसेल काही. सगळंकाही असूनही नसेल घडलं, त्यांच्या अज्ञानामुळे किंवा असतील अन्य काही कारणं. आमच्यातील एका शिक्षकाने त्या महिलेस विचारले, “दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी शासनाने दिलेलं पिवळंकार्ड आहे का तुमच्याकडे?” नाही म्हणून सांगतांना ते मिळवण्यासाठी होणारी दमछाक कदाचित त्यांना आठवली असेल किंवा आणखी काही असेल; त्या म्हणाल्या, “सरकार खरंच गरिबांचं असतं काय भाऊ?” मग सरकार असतं तरी कुणाचं? ते देशातील श्रीमंतांचं आहे, तेवढंच किंवा काकणभर अधिक गरिबांचं असणं लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा असतं. आपण दोष कुणाला देणार आहोत? कोणी कसे जगावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी प्रत्येकाच्या जगण्याला येथे प्रतिष्ठा असावी, सन्मान असावा आणि तो साऱ्यांनाच असावा; एखादा अगदी कफल्लक असला तरीसुद्धा. सगळ्यांना समान सन्मान देऊ पाहणाऱ्या विचाराने सगळेच वर्तायला लागले, तर समाजातील सगळ्याच नाहीत; पण काही समस्या तरी संपतील.

सांप्रतकाळी समाजात कनवाळूपणा राहिला नाही, असेही नाही. कनवाळू मने काहीच करीत नाहीत, असेसुद्धा नाही. पण त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अनेक मर्यादा येतात. साऱ्यांनी सगळंच नाही; पण निदान आपापल्यापरीने सामाजिकतेचे किमान भान राखीत, व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याकरिता खारीचा वाटा उचलीत; मदतीचा एक हात पुढे करून वंचितांची, उपेक्षितांची सोबत करायला काय हरकत असावी? साजरे होणारे देहाचे उत्तान सोहळे माणसांची गरज नाही. तो वर्तन विपर्यास आहे. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत गरजांची पूर्ती होणे, ही सार्वकालिक अपेक्षा आहे. जीवनाच्या सन्मानासाठी अंतर्यामी संवेदना उमलून यायला लागतात. माणसांची सार्वकालिक गरज सहवेदना आहे. अशा जाग्या झालेल्या सहवेदना संवेदनांचे स्पंदन बनून साकारतील, तेव्हाच सर्वसामान्यांच्या जगण्याला समाजात सन्मान मिळेल, नाही का?

0 comments:

Post a Comment