गुण आणि गुणवत्ता: भाग एक
दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले. नवी उंची गाठणारे निकालांचे आकडे पाहणाऱ्या, ऐकणाऱ्याना सुखद अनुभव देऊन गेले. परीक्षार्थींच्या पदरी गुणांचे भरभरून दान पडले. रित्या ओंजळीतून आनंद ओसंडून वाहू लागला. वर्षभराच्या सायास-प्रयासांना यशाची फळे आली. अनेकांचे टांगणीला लागलेले श्वास मोकळे झाले. घेतलेल्या कष्टांचे चीज झाले म्हणून मुलं, त्यांचे पालक, शिक्षक, शाळा, शिक्षणव्यवस्था सगळेच सुखावले. सत्काराचे, कौतुकाचे, गुणगौरवाचे सोहळे पार पडले. मीडियातून सुहास्य वदनाच्या छबी चित्रांकित झाल्या. त्यादिवासाचा सूर्य मावळला तसा कौतुकाचा आलेला बहरही ओसरला. रात्रीच्या कुशीत माणसे निद्राधीन झाली. दुसऱ्या दिवसाचे दैनंदिन व्यवहार पोटपाण्याच्या दिशेने वळते झाले. निकालाच्या दिवसाच्या साक्षीने पार पडलेले कौतुकाचे सोहळे अनेकांच्या अंतर्यामी ऊर्जा ठेऊन गेले. खरंतर कोणतीही गोष्ट चिरकाल टिकणारी नसते. साजऱ्या झालेल्या आनंदाच्या उत्सवानंतर सोबतच येणारे आणि प्रकर्षाने प्रकटणारे वास्तवही अशावेळी दुर्लक्षित करून चालत नाही. कोणत्याही परीक्षांच्या निकालानंतरचे वास्तवही असेच काही प्रश्न सोबत घेऊन उभे राहते. शंका, संदेह, चिंता, चिंतनाच्या वाटेने चालत येऊन अनेक प्रश्न समोर दत्त म्हणून उभे राहतात. या निकालांनीही काही प्रश्नाचे प्रदेश नव्याने निर्माण केले. अशाच अनेक प्रश्नांपैकी विचारला जाणारा एक प्रश्न होता, ‘गुण मिळालेत, गुणवत्तेचे काय?’ निकालाचा वाढलेला टक्का पाहून गुण आणि गुणवत्ता यांची तुलना झाली, तेव्हा या यशाचे विश्लेषण होऊ लागले. यावर्षाचा मोठ्याप्रमाणावर लागलेला निकाल पाहून अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या. हा निकाल केवळ गुणांची उंची वाढवणारा असून गुणवत्ता मात्र पायथ्याशीच उभी आहे. गुण आणि गुणवत्ता भिन्न परगणे असून, त्यांची तुलना करून पाहणे यानिमित्ताने संयुक्तिक ठरेल, असे विचार प्रश्न विचारणाऱ्यापैकी अनेकांच्या मनात निर्माण झाले. गुणवत्तेबाबत असमाधान असल्याचे सूचित करू पाहणारे हे प्रश्नकर्ते निकालाच्या उंचीबाबत समाधानी दिसत असले, तरी त्यांच्या मनात किंतु होताच.
राज्याचा दहावीचा निकाल ९१.६० टक्के इतका लागणे हा शिक्षणव्यवस्थेसाठी, शिक्षणप्रक्रियेसाठी आनंदयोग असेलही; पण कधीही एवढ्याप्रमाणात निकाल पाहण्याची सवय नसणारी आमची समाज नावाची व्यवस्था प्रश्न विचारू लागली, उंचीचे नवे शिखर गाठणारा हा निकाल गुणवत्ता म्हणायची की, गुण संपादनाच्या मार्गांचा परिपाक म्हणायचा? म्हणणारे काही म्हणोत, समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला कृष्णधवल अशा दोन बाजू असतात. हे विसरून कसे चालेल! बोर्डाकडून गुणांची खैरात होत्येय, त्या गुणांच्या दानातून फळास आलेली ही पुण्याई आहे, असा काहींचा सूर लागला. एवढे गुण कसे मिळू शकतात, हा प्रश्न विचारतानाच ९० ते ९९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी अन् त्यांना घडवणारे तत्सम घटक प्रज्ञावान असले पाहिजेत. त्यांच्या प्रयत्नांचं हे फलित असेल, तर यांचे हे गुणवैभव गुणवत्तेचे मानबिंदू मानायचे का? वगैरे प्रश्न शंका बनून उत्तरांच्या शोधात भटकत राहिले. त्यांना उत्तरे मिळतील किंवा न मिळतील हा पुढचा प्रश्न, पण व्यवस्थेत विश्वासाच्या जागी संदेह अधिष्ठित झाला एवढे मात्र नक्की. असे प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्थेवर अविश्वास आहे, असेही काही म्हणतील. पण हेही सत्य आहे की, कधीकाळी शाळेत ऐंशी-पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच स्कॉलर असत. सांप्रत नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्याच सुमारे अठ्ठेचाळीस हजारापेक्षा अधिक आहे. जर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे एवढे विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत असतील तर ते सगळे हुशारच असले पाहिजेत किंवा परीक्षेतील गुणसंपादनाचे कौशल्ये अवगत असल्याने परीक्षातंत्रावर हुकुमत गाजवून आपले लक्ष त्यांनी प्राप्त केले असावे. हे सगळे गुणवान आहेत, असे मान्य केले तर हीच मुले जेव्हा पुढील शिक्षण घेतात तेव्हा नेमके कुठे जातात? त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे अस्तित्व किती उरते? हे बऱ्याच जणांच्या बाबत कळतही नाही. ही गुणवंतांची मांदियाळी या भूमंडळी गुणांच्या वर्धिष्णू आलेखासह नांदताना का दिसत नसावी?
प्रश्न परीक्षेतील गुणांचा असला, तरी त्यासोबत गुणवत्ताही गृहीत धरलेली असते. गुणवान किती? या प्रश्नाला अर्थाचे अनेक पदर असू शकतात. आपण गुण आणि गुणवत्तेची सांगड कशी घालत असतो, यावर ते ठरत असते. या एवढ्या ‘गुण’वानांमधील ‘गुणवत्ता’धारक किती, हा प्रश्न संशोधनाचा विषय असल्यासारखा वाटतो. केवळ गुणांचा डोलारा उभा करून स्वप्नांचे महाल सजत नसतात. ते उभे करण्यासाठी अंगभूत गुणवत्ताच असायला लागते. परीक्षा देऊन गुण मिळवता येतात; पण गुणवत्ता अशा कोणत्याही औपचारिक परीक्षा देऊन मिळवता येत नाही. ती आतूनच उमलून यावी लागते. गुणांचे यश तात्कालिक असते, पण गुणवत्तेचे वैभव दीर्घकाळ टिकणारे असते. गुण विसरले जातत. गुणवत्ता अनेकांच्या अंतर्यामी आपला अधिवास करून असते. म्हणूनच कदाचित समाज अशा ‘गुण’वानांकडून गुणवत्तेची अपेक्षा करीत असतो. आणि समाजाने अशी अपेक्षा करण्यांत काही अप्रस्तुतही नाही.
गुणवत्तेचे मोजमाप करताना यशस्वी डॉक्टर, सफल इंजिनियर अशी परिमाणे कुचकामी ठरतात. ‘यशस्वी माणूस’ हेच मोजमाप यासाठी लावले जाते. शिकून मिळालेली पदवीपत्रे, गुणपत्रे समाजात वावरताना आपण काही गळ्यात घालून फिरत नसतो. मात्र परीक्षेत मिळवलेल्या गुणांतून विचारपूर्वक घडवलेली आणि घडलेली प्रतिमा अन् यातून आकारास आलेलं व्यक्तिमत्व आपल्या सोबत घेऊन समाजात वावरत असतो. जबाबदार माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारी गुणसंपदाच माणूसपणाची खरी गुणवत्ता असते. म्हणूनच समाजाचा एक घटक म्हणून जगताना समाजपरायण विचारांनी वर्तणारे सामाजिक आस्थेचे विषय होतात. उदंड यश मिळवून स्वार्थपरायण मानसिकतेने जगणारे समाजास प्रिय कसे होतील? अर्थात काही म्हणतील, समाजास प्रिय असणाऱ्या गोष्टी करण्यात आम्ही आमच्या आनंदाला का म्हणून तिलांजली द्यावी? आमचंही काही वैयक्तिक जीवन आहे की नाही. जीवन आहे म्हणून जगण्याचे सोहळेही आहेत, ते साजरे का करू नयेत? असं करण्यास कोणाची काहीच हरकत नसते. ते जरूर साजरे करावेत. प्रसंगी त्यांचे उत्सव व्हावेत; पण त्यालाही सामाजिकतेची एक ठसठशीत रुपेरी किनार असायला नको का? सामान्य माणसाकडून सगळंच काही समर्पित भावनेने घडत नाही. तसे सर्वथा संभवतही नाही. पण समर्पणपरिघाच्या प्रारंभबिंदूवर तरी या गुणवानांनी पोहचायला नको का?
परीक्षेच्या गुणपत्रकातील गुणांच्या दर्शनाने अनेकांच्या स्वप्नपूर्तीचे क्षण समिप आले असतील. त्यांची पूर्ती होणे कदाचित नजरेच्या टप्प्यात आले असेल. तसेही गुणांची नव्वदी पार करणाऱ्यांसाठी समाजव्यवस्था नेहमीच फ्रेंडली असल्याचे दिसते. शिक्षणाच्या रुपेरी मार्गाकडे जाणाऱ्या वाटा सगळ्याबाजूने या गुणवानांना अनुकूल असतात. पण गुणांच्या स्पर्धेत टिकू न शकणारे आणि जेमतेम या संज्ञेस जे स्पर्श करते झाले, त्यांचे काय? या प्रश्नाचे कोणते समर्पक उत्तर आपल्या व्यवस्थेकडे आहे? त्यांचे काय? हा प्रश्न तरीही शिल्लक उरतोच. कदाचित यातील बरेच जण परिस्थितीशी समायोजन करीत आपापला छोटासा परगणा तयार करतीलही. त्या परगण्यात परिस्थिती निर्मित झगमगाट नसेल. बऱ्याच गोष्टींचा अभाव असेल, समस्या असतील. पण परिस्थितीच्या वादळ-वाऱ्याशी दोन हात करीत, पाय रोवून खंबीरपणे उभे राहून आपले यश साजरे करतात. त्याचे व्यवस्थेत किती कौतुक घडते? प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्यांचे हे गुणच गुणवत्तेचे गमक आहे, असे समाज मानायला सहजी तयार असतो का? हुशार मुलांच्या पालकांना आयआयटीची स्वप्ने मुलांपेक्षा हल्ली जरा जास्तच येतात. त्या दिशेने जाणारा मार्ग निर्माण करण्यासाठी जीवाचा किती आटापिटा चाललेला असतो, हे पाहून करपलेले बालपण काय असते, याची व्याख्या करायची आवश्यकता नाही. काठावरील यश मिळवणाऱ्याना आपले पथ शोधताना भले आयआयटीची स्वप्ने नसतील येत. आयटीआय हाच यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असेल; पण यांचीही समाजाला गरज असते. सगळेच डॉक्टर्स, इंजिनियर्स बनून समाजाचं व्यवहारचक्र चालेलच कसे? समाजाची अशीच काही आवश्यक प्रासंगिक कामे आपल्या हस्तलाघवाने लीलया पार पाडणारे गुणवान नाहीत का?
निकालाच्या दिवशी बहुतेक सगळ्याच शाळांमध्ये गुणवंतांच्या सत्काराचे कार्यक्रम प्रतिवर्षी पार पडत असतात. आम्हीही ते करीत असतो. नव्वदपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अशा साठ-पासष्ट ‘गुण’वान मुलांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. तसा तो सगळ्याच शाळा आपापल्या कल्पकतेने आयोजित करीत असतात. अर्थात असे गुणवंत घडवतांना शाळा, शिक्षक, पालक, शिक्षणव्यवस्था अशा सर्वच स्तरावरून केलेले कष्ट, गुणवत्ताधारक व्हावेत म्हणून घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करता येत नाही. म्हणून कोणी असा आनंद साजरा करत असेल, तर त्यात अप्रस्तुत वगैरे वाटण्यासारखे काही नाही. (यानिमित्ताने का असेना, आम्हा शिक्षकांनाही मिरवून घेता येते अन् आमची शाळा गुणवंत विद्यार्थी कसे घडविते हेही समाजास अभिमानाने सांगता येते ना!) या गुणगौरव कार्यक्रमाला मुलं त्यांच्या पालकांसह शाळेत येतात. मुलांचं कौतुक करताना आम्हालाही शिक्षण या एकाच बिंदूभोवती वर्षभर फिरणाऱ्या घटकांनी केलेल्या कष्टाचे, श्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान असते.
तरीही मुलांचे अभिनंदन करताना सारखे जाणवते की, बऱ्याच जणांच्या मनात एक खंत असतेच. अजून दोन-तीन टक्के जास्तीचे गुण हवे होते, ते मिळाले असते तर...! वगैरे वगैरे. काही अपवाद वगळल्यास गुणांची नव्वदी पार करणारेही हल्ली संतुष्ट आहेत, असे दिसत नाही. ‘अरे, एवढे गुण तुम्हाला मिळालेत, हे काय कमी आहेत!’ म्हणून सांगावं तर यांचं उत्तर ‘सर, स्पर्धेचा काळ आहे. त्यात टिकायला हवे ना! आणि नुसते टिकून काय उपयोग पुढेही जायचे ना!’ ‘आमच्याकाळी नव्वदी पार करणारा औषधालाही सापडत नव्हता. तरीही आम्ही उभे आहोतच की!’ असे सांगून गुणवत्ता गुणांपेक्षा मोठी असते, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण... ‘हो, ते सगळं खरंय! तुमचा काळ वेगळा होता. तेव्हा स्पर्धा एवढी तीव्र होतीच कुठे?’ अशी समर्थने मुलं तर करतातच, पण त्यांचे पालकही जे- कधीतरी अशाच पिढीतून घडले, ज्या पिढीत गुणांचे सोपान चढण्यापेक्षा गुणवत्तेची शिखरे संपादित करा, असेच शिकवले जायचे आणि तेव्हा परीक्षेचा निकाल पास की नापास एवढेच विचारायचेत. आता किती टक्के मिळाले, हा प्रश्न असतो. नव्वदपेक्षा कमी गुण असणे म्हणजे जणू काही अपराध झाला आहे. कमी गुण असणाऱ्यांसाठी हे जग जसे काहीच करू शकत नाही. या भावनेतून पालक आपल्या मुलाने, मुलीने आपणास जे वाटते ते आणि तसेच करावे, असे बोलून दाखवतात. हे त्यांना वाटते की, त्यांच्या महत्वाकांक्षाना, माहीत नाही. पण त्यांना असेच वाटते की, स्पर्धा खूप मोठी आहे आणि स्पर्धेत आपल्या मुलांनी काहीही करून टिकूनच राहायला हवे. स्पर्धा कधी नसते. माणूस आदिम अवस्थेत जगत असतानाही ती होतीच. तेव्हा भलेही गुणांची स्पर्धा नसेल, पण जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्पर्धा होतीच. स्पर्धेत तो धावला म्हणूनच तर इहतलावर टिकून राहिला ना! स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेलच. ती टाळता येणार नाही. पण दुर्दैवाने ती निकोप राहिली नाही. सगळ्यांना दुसऱ्याला मागे टाकून पुढे जायचे आहे. अशा स्पर्धेत परीक्षेतील गुणांचं घोडं खूप मोठं झालंय आणि जीवनातील गुणवत्तेचं घोडं लंगडतंय.
(क्रमशः)

Khupach chhan ahe sir!! :)
ReplyDeleteगुणांपेक्षा गुणवत्ताच महत्वाची आहे

ReplyDelete