गंधकोषी: भाग दोन
‘पौगंडावस्था वादळी अवस्था असते’, असा एक प्रश्न बीएड, डीएडचा अभ्यास करताना शैक्षणिक मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत हमखास असायचा. तो येणारच म्हणून कितीतरी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षक या प्रश्नाच्या उत्तराचे शब्दनशब्द पाठ करून घ्यायचे. यातील बरेच जण उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नाचं उत्तर लिहून उत्तम गुण मिळवीत उत्तीर्ण झाले असतील. त्यातले काही शिक्षक झाले असतील. पण यातील कितीजण जे शिकले आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत लिहलं, ते शिकवतांना प्रयोगात आणू शकतात? सांगणे अवघड आहे. अशा वयातील मुलांना सांभाळताना शिक्षकाचं सारं कौशल्य पणास लागतं. त्याच्याकडे असलेल्या, नसलेल्या ज्ञानाचा कस लागतो. पण हेही वास्तव अधोरेखित करावयास हवे, यातील किती शिक्षक मुलांच्या वर्तनात परिवर्तन घडवण्याकरिता स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रज्ञेने निर्णय घेण्यास समर्थ आहेत? कधीकाळी ‘छडी लागे छम छम...’ म्हणणारा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दंडित करायलाच हवं, असं समजणारा समाजच जेव्हा शिक्षणव्यवस्था, शाळा, शिक्षक उदासीन होत चालले आहेत असे म्हणतो, तेव्हा मनासमोर एक प्रश्न उभा राहतो, या साऱ्या घडामोडीत समाजाचे, पालकांचे प्रासंगिक वर्तन किंवा ते व्यक्तीशः काहीच जबाबदार नसतात का? दिवसभरातून मुलं शाळेत किती तास व्यतीत करतात? मोजून पाच-साडेपाच तास. घरी व्यतित होणारा त्यांचा वेळ किती तासांचा असतो? या वेळेत आपली मुलं काय करतात, याचं अवलोकन किती पालकांकडून घडतं? बरं आपण मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचं उत्तरदायित्त्व मान्य केले, तरी एक प्रश्न उरतोच, शिक्षकांना त्यांच्यातील वर्तन परिवर्तनासाठी अधिकारवाणीने एखादा प्रयोग करून पाहण्याचं स्वातंत्र्य व्यवस्थेत आहेच किती?
काळ बदलला तशा जगण्याच्या पद्धती आणि प्रयोजनेही बदलली आहेत. शिक्षणव्यवस्थाही यास अपवाद नाही. नव्या शैक्षणिक धोरणांनी कुणालाच नापास करायचं नाही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सोबतच मूल शिकत असतांना मागे राहत असेल, तर त्याला प्रवाहात आणताना त्याचा कोणत्याही प्रकारे मनोभंग, तेजोभंग होईल असं काहीच घडता कामा नाही, ही सार्वत्रिक अपेक्षा. खरंतर अपेक्षांच्या अवास्तव ओझ्यामुळे शिक्षकच आज गोंधळलेला आहे. मुलांना काही बोलावं तर काही करता काही व्हायचं याची मनात भीती. न बोलावं तर शिस्तीचे प्रश्न तोंड वासून समोर उभे. काय उपाय शोधावे या विवंचनेत तो गरागरा फिरतो आहे. शासन, शालेय प्रशासन, व्यवस्थापन, पालक, समाज अशा बहुआयामी अपेक्षांच्या वर्तुळात तो स्वतःला शोधतोय. पण हेही मान्य की, मुलांना प्रताडीत करणे, त्यांचा मनोभंग घडणे, तेजोभंग करणे अशा गोष्टी सर्वथा अयोग्यच. असं काही करायची वेळच येऊ नये. विद्यार्थी घडवायचा तर शिक्षकाचा नैतिक वचक मुलांवर असला पाहिजे. तो प्रस्थापित करायचा असेल तर त्याच्या अध्यापनकार्यात असं काही असायला हवं, जे मुलांना आपलं वाटेल. ते असलं तर मुलांबाबत निर्माण होणारे शिस्तीचे बरेच प्रश्न सुटतात. मुलांवर असा नैतिक वचक असणारे शिक्षक समाजात किती संख्येने आहेत, हे सांगणे अवघड आहे. मुलांचं उज्ज्वल भविष्य लेखांकित करण्यासाठी प्रामाणिक प्रयास करणाऱ्यांची व्यवस्थेत काही कमी नाही. पण सांप्रत सगळ्याच बाजूने समाजात स्वार्थपरायण व्यवहार शिरला आहे, तसाच शिक्षणव्यवस्थेतही येऊन तो विसावला आहे. जेथे व्यवहार येतो तेथे डिव्होशन वगैरे शब्द आपलं अर्थाचं अवकाश हरवून बसतात. व्यवस्थेत टिकण्यासाठी येथे जो-तो आपापले सुरक्षित परगणे शोधून त्यांना सांभाळण्यात व्यग्र आहे. ज्यांना परिघाबाहेर जाऊन काही करायची आंतरिक उर्मी आहे; त्यांच्यासोबत चालणाऱ्या पावलांचा अभाव आहे. समाजात गुणवंतांची काही कमी नाही; पण गुणवत्ता ओळखणाऱ्यांची वाणवा असेल आणि सुमार वकुबाची माणसं गुणवत्तेहून श्रेष्ठ ठरत असतील, तर निष्क्रिय कर्मयोगास कर्मकांडाचे रुप येणार, हेही वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही.
पालक, समाज यांचं मुलांच्या जडणघडणीतील योगदान नाकारावे कसे? पालक जसा असतो, समाज जसा दिसतो तसे संस्कार मुलांच्या मनांत रुजत जातात. पालक उपजीविकेच्या वाटांनी दिवसभर बाहेर. मुलं क्लास, कॉलेज, शाळा अशा काही अन्य कारणांनी वाऱ्यावर. सायंकाळी अंधारताना घराचा रस्ता जवळ करायचा. परतले की घरातील आपापल्या कोपऱ्यांना सांभाळून सगळ्यांनी सुटेसुटे बसायचे. आईच्यासमोर टीव्हीवरील सिरियल्स, बाबांचं ऑफिसमधील काम, मुलाचा लॅपटॉपवर सुरु असणारा सुखसंवाद, मुलीच्या हाती स्मार्टफोन विसावलेला. साऱ्यांचीच डोकी वेगवेगळ्या दिशांना आणि तोंडे विज्ञाननिर्मित साधनांत. मनातल्या संवादाला प्रकटायची संधीच नाही. सगळेच स्वतःच्या कोशात गुरफटलेले. कोशातून बाहेर पडण्यासाठी कोणत्यातरी निमित्ताने प्रासंगिक हॉटेलिंग, शॉपिंग घडून परिवार सदस्यांना पारिवारिक सहवासाचं पुण्यसंपादन खात्यावर जमा झाल्याचं आत्मीय समाधान मिळते. असा तात्कालिक कर्मयोग आचरून बाजारातील महागड्या वस्तू मुलांच्या हाती टेकवल्या की, आईबापाला आपण जबाबदार पालक असल्याचं समाधान. मुलांना मित्र-मैत्रिणींमध्ये मिरवण्याचा क्षणिक अभिमान. पण हरवलेल्या संवादाचं काय? मुलांची मने उमलती फुले आहेत. अशी उमलती मने प्रश्न घेऊन बावरलेल्या चेहऱ्याने समोर उभे राहतात, त्यांना काही सांगायचं आहे, मनात लपलेलं काहीतरी विचारायचं आहे; याची जाणीव किती पालकांना असते? किती पालक पारंपरिकतेच्या चौकटींना ओलांडून मुलांना संवादाचं मुक्त आकाश उपलब्ध करून देतात? किती पालक त्यांच्याशी सहज संवाद साधतात? मुलांच्या वाढत्या वयाचेही काही प्रश्न असू शकतात. शोधूनही न सुटणारी काही जीवनकोडी असतात. त्यांची समाधानकारक उत्तरे त्यांना हवी असतात. पण अशा चौकटींबाहेरील प्रश्नांबाबत निषेधाची एक भक्कम आणि अभेद्य चौकट अज्ञानातून आपल्या भोवती माणसांनी उभी केलेली असते. ज्यांच्याविषयी बोलणंसुद्धा संस्कारांचा तेजोभंग ठरतो. अशा काही प्रश्नांविषयी घरांत वार्ता करणंसुद्धा निषिद्धच मानलं गेलं आहे. मुलांची चहूकडून वैचारिक कोंडी होत असेल, तर अशावेळी मनात उदित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ती शोधतील कुठून?
वयाच्या पंधरा-सोळा या सीमेवर उभ्या असणाऱ्या मुलामुलींचं वयच असं अडनिड की, देहात प्रश्नाचं एक घोंगावणारं वादळ शिरलेलं असतं. कृतीत गोंधळाचा धुरळा उठलेला असतो. विचारांच्या आकाशात अविचाराचे मळभ दाटून येतात, अशावेळी प्रयत्न करूनही घरात न मिळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे साहजिकच बाहेर मित्रांमध्ये शोधली जाणार हे नक्की. बरं त्यांच्याकडेही असणारी उत्तरे अशाच अर्धवट ज्ञानवर आधारित आणि कुठूनतरी शोधलेली. या वयात शारीरिक, मानसिक बदल घडवण्याचं काम निसर्ग करीत असतो. त्याला समजून घेणं मुलांना अवघड असतं. येथे पालक, शिक्षक, समाज मुलांचे मित्र का होऊ शकत नाही? मैत्रीचे धागे मुलांच्या हाती सापडत नसतील, तर मनातील वादळांची उत्तरे कोणाच्यातरी सहवासात शोधली जातीलच. प्रासंगिक सहवासातून कोणालातरी कोणीतरी आपलंस वाटायला लागतं. आपल्यासाठी कोणीतरी जीव टाकतो आहे. हा विचारच अशावेळी थ्रिलिंग वाटायला लागतो. यातून नकळत्या वयात एकमेकांच्या संपर्कात आल्याने पुढील अनार्थाच्या गाथा लेखांकित होतात. एखाद्याचा सहवास सतत हवाहवासा वाटू लागतो. उमलत्या वयातील प्रेमाचा अपरिपक्व वसंत बहरायला लागतो. पण अवेळी बहरणारा हा ऋतू जसा येतो तसाच कोमेजून जातो, तेव्हा होणारा आघात पुढील अनेक समस्यांचे माहेरघर होतो. नाजूक वळणावरील प्रवासाची अवघड वळणं घेत धावणारं टीनएजर्सचं भाबडं वय. या वयात मनाचं सांगणं एक असतं, तर बुद्धी दुसरंच काही सांगत असते. वैचारिक द्वंद्वाच्या अडकित्त्यात अडकणारी मुलंमुली स्वतःच एक अवघड प्रश्न होतात. अशा प्रश्नांची उत्तरे योग्यवेळी न शोधल्याने अवघड गणितासारखी कठीण होत जातात.
समोरील प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. सगळ्याच गोष्टी काही सहज हाती नाही लागत. मनात एक अनामिक दडपण असतं. पण कुणीतरी मनापासून आवडतही असतं. यातून नकळत्या वयातील भावनांचं तुफान उसळून येतं, अविचारातून वागणं घडत जातं आणि त्यातूनच मुलींना चिडवणं, फळ्यावर-बाकावर, प्रसाधनगृहात नावं लिहणं घडतं. मुलींचा आयटम, माल, कंडा, डाव म्हणून मित्रांमध्ये उल्लेख होत राहतो. भाषा ताल, तोल आणि तंत्र सोडायला लागते. वर्गात गॉसिपिंग सुरु होतं. तो किंवा ती येताना दिसला-दिसली की, त्याच्या-तिच्या नावाने मोठ्याने हाका मारणं, तो-ती येतांना दिसले की, मित्र-मैत्रीणीचं एकमेकांना खुणावणं, वर्गात शिकवणं सुरु असताना एकमेकांकडे किंवा एकट्याने चोरटा कटाक्ष टाकणं, प्रार्थनेच्यावेळी ती-तो समोर दिसतील अशा जागी रांगेत उभं राहणं आवडायला लागतं. शाळेचं गॅदरिंग, शिबिरे, सहली यांच्यासाठी वसंतऋतूचं आगमन असतं. टाईमपासमधील दगडूचे संवाद आतून आवडायला लागतात. फँड्रीमधील जब्याचं शालूच्या एका झलकसाठी झुरणी लागणं आपलंच वाटायला लागतं. अशावेळी सुंदर दिसणारं स्वप्नवत जग आणि वास्तवातील जग यांचा संबंध समजावून सांगणार कोणीतरी सोबत असावं लागतं. पण हे सांगणार कोण? आईबापाला रोजच्या धावपळीत बोलायलाच वेळ नाही, शिक्षक मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करण्यात अपयशी होत असल्याने, त्यांचा सहवास टाळणेच मुलं पसंत करतात. समाजात स्वतःहून असं काही समजावून सांगण्याची इच्छाच उरली नाही. कुटुंबे विभक्तपणाचे तुकडे घेऊन वेगळी होत आहेत. बेगडी सुखाच्या हव्यासापायी घरं लहान झालेली असल्याने आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी अशी नावं धारण करून नजरेचे पहारे बनणारे आप्त लक्ष द्यायला आहेत कोठे? छोटे कुटुंब कदाचित सुखी असेलही; पण विभक्त कुटुंबांनी बऱ्याच गोष्टींचं विभक्तीकरण केलं आहे.
अर्थात याचा अर्थ असा नाही की, याआधी समाजात असं काहीच घडत नव्हतं. मुलंमुली प्रेमवगैरे काही काही करीतच नव्हती. त्यांना जीवनाविषयी काही माहिती मिळत नव्हती. पौगंडावस्थेतील वयात येत नव्हती. असे काहीही नाही. सगळ्याकाळी सगळंकाही असतं. तेव्हाही ते होतं; पण त्याहून मोठं होतं, समाजाचं मॉरल पोलिसिंग. एक वचक असायचा याचा मुलांवर. हल्ली तेच संपल्यात जमा आहे. कॉलेजात बाईकवर डबलसीट स्वार होऊन सुसाट वेगाने धावणाऱ्या जोड्यांकडे बघा, त्यांच्या बाईकवर एकमेकांसोबत बसण्यात एक इंचाचेही अंतर नसते. चेहऱ्यावर रुमाल लपेटून अंगचटीला येत कुठेतरी जाणारे तो-ती पाहून समाजात वावरणारी उमलती मनेही तसेच काही पुढे जाऊन करायचे ठरवत असतील, तर दोष कशाला आणि कुणाला द्यायचा? मूलभूत अधिकारांचं स्वातंत्र्य घटनादत्त असलं, तरी स्वैराचाराचं वर्तन नसणं संस्कारदत्त अपेक्षा असते, तिचं काय? असे काही चित्रे समोर दिसली म्हणून ते काही समाजाच्या जगण्याचं सार्वत्रिक चित्र नसतं, हे मान्य. पण अशावेळी समाजाची भूमिका निर्णायक असणे आवश्यक ठरते. संस्कारांचे प्रवाह सैल होताना संयमाचे बांध घालून त्यांना नियंत्रित करणारी व्यवस्था समाजाने प्रयत्नपूर्वक निर्माण करायला लागते. जीवनाचे आभाळ सगळ्याबाजूने अंधारून आले आहे. प्रकाशाचा कवडसा निबिड अंधारातील धुक्यात अडला आहे. अविचारांच्या आवर्तात उमलत्या फुलांच्या गंधकोशी अडकत चालल्या आहेत. अग्रेसिव्हनेस वाढत चालला आहे. शाळेत टगेगिरी करणे, मारामाऱ्या करणं, कुणाला तरी इंप्रेस करण्यासाठी हिरोगिरी करणं प्रतिष्ठेचे वाटायला लागले आहे. मुलांचं वागणं बेताल होत आहे. मनावर अविचारांची काजळी दाटत चालली आहे. समाजात विवेकाची दिवाळी साजरी करायची असेल तर संस्कारांची, साद्विचारांची छोटी-छोटी रोपे त्या मनोभूमीत रुजवावी लागतील. प्रत्येक रोपट्याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी कधी समाज, कधी पालक तर कधी शिक्षकांना कुशल माळ्याची नजर कमावून वाढणाऱ्या झाडांचे जतन, संवर्धन करावे लागेल, कारण प्रत्येक फुलाचा तोंडावळा वेगवेगळा आहे.
या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तिचा निचरा होण्यासाठी जागाच परीक्षांना अवास्तव महत्त्व असणाऱ्या काळात पालकांनी आणि शिक्षणव्यवस्थेने शिल्लकच राहू दिली नाही. साऱ्यांनाच पुढे पळायची घाई झाली आहे. शंभर वर्षातले जगणे दहा वर्षात जगून घ्यायचे आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांनी संपृक्त जगणे संपन्न वाटायला लागले आहे. असे जगणे प्रतिष्ठेचे झाल्याने विज्ञाननिर्मित उपकरणांनी ड्रॉइंगहॉल, स्टडीरूम सजले. टीव्हीच्या आभासी जगात सुखाचे रंग दिसायला लागले. तेथून दिसणारे क्षणिक रंग जीवनाचे खरे रंग वाटायला लागले आहेत. मुलांचं हुंदडणं, खेळणं संपलं. जगण्याचे मोकळे श्वास शाळा, क्लासमध्ये कोंडले गेले आहेत. पुस्तकी ज्ञान म्हणजेच शिक्षण मानणारी मुलं पुस्तकातलं जग मस्तकात न उतरवता गुणांच्या स्पर्धेत अडले. शिक्षणाचा आणि जीवनाचा संबंध उरलाच नाही. सद्विचारापासून जीवन लांबच्या क्षितिजावर उभे आहे. त्या क्षितिजापर्यंत नेण्यासाठी आणि त्यांच्यातील उर्जेला विधायक विचारांच्या मार्गावर वळते करण्यात आईबाप, समाज, शाळा, शिक्षक, शिक्षण अपयशी ठरले असतील तर दोष द्यावा कुणाला? मुलांना, त्यांच्या बेपर्वा वागण्याला, काळाच्या बदलत्या संदर्भांना की, त्याच्या वळत्या झालेल्या प्रवाहांना? याचं उत्तर ज्याचं-त्यानं शोधावं हेच बरे नाही का?
(पूर्ण)
Agadi chaan sir.
ReplyDeleteNeha Kalantri
धन्यवाद!
DeleteMast aahe sir!
ReplyDeletePranali chaudhari
धन्यवाद!
DeleteNice thoughts sir.
ReplyDeleteyour's student- piyush chaudhari
धन्यवाद!
Delete