Parighavarachya Pradakshina | परिघावरच्या प्रदक्षिणा

By
माणूस मूलतः परिवर्तनप्रिय असल्याने त्याला परिवर्तनाइतके अन्य काही प्रिय असू शकेल असे वाटत नाही. त्याने परिस्थितीजन्य बदल स्वीकारले नसते, तर विकासाच्या आजच्या बिंदूवर तो पोहचला असता का, हाही एक प्रश्नच आहे. परिस्थिती परिवर्तनीय असते. परिवर्तन स्वीकारणारे प्रगतीच्या पुढच्या वळणावर पोहचतात. नाकारणारे प्राक्तनाला दोष देण्याशिवाय काही करू शकत नाहीत. परिवर्तनाची साधने अनेक असली तरी, बदलांची एक वाट शिक्षणाकडून जाते हेही खरेच. शिक्षण व्यक्तित्वविकसनाचे, वैचारिक जडणघडणीचे साधन असल्याचे म्हटले जाते. यात काही अतिशयोक्ती नाही. शिक्षण माणसाच्या जीवनात परिवर्तनाची नवी पाहट आणण्याचे विश्वसनीय साधन असल्याबाबत विचारवंतानी, बुद्धिमंतांनी एकमुखाने निर्वाळा दिला आहे. आपल्या देशाची शिक्षणव्यवस्था कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असल्याचे कुठेतरी वाचून, ऐकून आपल्याला माहीत असतं. वैभवाच्या लाटा येतात आणि जातात. त्यांचे तात्कालिक, दूरगामी परिणाम समाजजीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होत असतात. मानव समूहाच्या हजारो वर्षाच्या वाटचालीत विश्वात अनेक अनुकूल-प्रतिकूल गोष्टी घडत आल्या आहेत. आपल्याकडेही घडल्या आहेत. तशा त्या सगळीकडेच घडत असतात. त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय पडसाद जगण्यावर उमटत असतात. आपणही त्यास अपवाद कसे असू शकतो. बदलांच्या विधायक पावलांनी चालत परिवर्तन दारी येते. परिवर्तनशील विचारातून समाज घडतो, हेही तेवढेच वास्तव. म्हणूनच विचारांच्या जडण-घडणीचे श्रेय शिक्षणाला अधिक दिले जाते. ते देऊ नये असे नाही. एखाद्या देश-प्रदेशात जे काही सकारात्मक बदल वर्तनप्रवाहात घडतात, त्यापाठीमागे शिक्षणातून घडणाऱ्या संस्कारातून मनात अंकुरित झालेला विचार केंद्रस्थानी असतो, एवढे नक्की.

असे असेल तर मग कधीकधी त्याला कालोपघात अवरुद्धता का येत असावी? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर समाजालाच तपासून पाहावे लागते. कधीकाळी आपल्याकडे नालंदा, तक्षशीला, विक्रमशीलासारख्या विद्यापीठांनी निर्मिलेली संपन्न शैक्षणिक परंपरा असल्याचं आपणास इतिहासाच्या परिशीलनातून कळते. या विद्यापीठांची गुणवत्ता वादातीत असल्याचं सांगितलं जातं. विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुविधांच्या विद्यमान जगात आज अनेक साधने समाजाच्या हाती सहज उपलब्ध असताना आणि तुलनेने परिस्थितीची कितीतरी अधिक अनुकुलता असताना शैक्षणिकगुणवत्तेबाबत सामान्यांच्या मनात संदेह का असेल? प्रगतीच्या पथावरून चालताना परिस्थितीची प्रश्नचिन्हे का उदित होत असतील? याची उत्तरे कदाचित संधी आणि समानतेत दडली असतील का? याचा अर्थ पूर्वी आपल्याकडे संधींची सार्वत्रिक समानता होती असेही नाही. एक मात्र नक्की समानता आहे, तेथे संधी असण्याची शक्यता अधिक असते. आरक्षणातून संधी जरूर मिळते; पण संधी म्हणजे काही परिपूर्ण समानता नाही होऊ शकत. समानतेला, संधीला गुणवत्तेचा मोहर येणे आवश्यक असते. संधीच्या वाटेने चालत शिक्षणाच्या प्रांगणात येणारी किती मुले व्यवस्थेतून सक्षम, परिणत, प्रगल्भ वगैरे होऊन आलेली असतात? ठामपणे सांगणे अवघड आहे. येतात त्यातील बरेच जण अत्यंत सामान्य कुटुंबातून, सुमार वातावरणातून येऊन व्यवस्थेच्या परीघावर उभी राहतात. अभ्युदयाच्या प्रवासास प्रचंड वेगाने निघालेल्या जगाच्या परिघावरच प्रदक्षिणा करीत राहतात. प्रगतीच्या पंखांवर स्वार होऊन गगन भराऱ्या घेणाऱ्या येथील व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी कसरत करीत राहतात. त्यातील होतात काही यशस्वी, काही खचतात. खचलेले हताश होतात. हताशांचे शैक्षणिक मागासलेपण कायम ठेवणारी शिक्षणपद्धती समानतेच्या सीमा धूसर करते.

जो-तो आपापल्या वकुबानुसार शाळा शोधतो. आर्थिक वकुबासमोर बऱ्याच बाबी दुय्यम ठरतात, हे वास्तव आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या अपत्यांनी भरमसाठ शुल्क आकारून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिकावे. आणि ज्यांच्या हाती कष्टाशिवाय पर्याप्त असे काहीच नाही, त्यांच्या ललाटी मात्र मोफत शिक्षणाच्या शाळा. मोफत असले म्हणून ते गुणवत्तापूर्ण असेल, असे ठामपणे सांगता येईलच असेही नाही. गुणवत्ता शब्द तसा सापेक्षच. अर्थाचे अनेक निसरडे पदर असणारा, म्हणून बऱ्याचदा सोयीचा अर्थ घेऊन मोकळे होण्याचा विकल्प प्रत्येकाच्या हाती असतोच. अर्थात, आपल्या शिक्षणव्यवस्थेचे हे काही सार्वत्रिक चित्र नाही. सकारात्मक विचारांची लहानलहान बेटे दूरदूर वसतीला असली तरी ती आहेत आणि आकांक्षांच्या आकाशाकडे पाहत आस्थेच्या भूमीत पाय घट्ट रोवून डौलाने उभी आहेत. समस्यांमधून पर्याप्त संधी निर्माण करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा आपल्याकडे नाहीतच असे नाही. त्या आहेत आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयासांवर विश्वास असणारेही आहेत.

उच्चभ्रू सामाजिक मानसिकतेला प्रमाण मानणाऱ्या शाळांमध्ये सामान्यांसाठी काही जागा आरक्षित करून दिल्या म्हणजे गुणवत्ता तळाकडील समूहाकडे सरकत जाईल, असे समजणे भाबडा आदर्शवाद नाही का? चकचकीत पर्यावरणात विसावल्यावर सर्वसाधारण सामाजिक वकुब असणारे किती जीव समरस होत असतील? सांगणे अवघड आहे. समानता, संधी नाकारल्या जातात, तेव्हा उपेक्षिलेली माणसं परिस्थिती परिवर्तनासाठी विचारांची आयुधे हाती धारण करून संघर्षाच्या प्रांगणात उतरतात. संघर्ष माणसांना काही नवा नाही. संघर्षाचे नाते समानतेशी असते. त्याला देश-प्रदेशाच्या सीमा नसतात. सुविधा आणि संधीची समानता यातील द्वंद्व सार्वकालिक आणि सार्वत्रिक गोष्ट आहे. सुविधांची उपलब्धता माणसांची स्वाभाविक गरज असते. त्यातूनच अस्मितांचा जागर घडत असतो. अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. ते शिक्षणातील आरक्षणासाठी नव्हते, तर आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी होते. त्यांनी कृष्णवर्णीयांना हावर्ड विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले नाही, तर जगणं समानतेच्या दर्जावर उभे राहावे, त्याचा दर्जा उच्च असावा यासाठी केले.

शैक्षणिकगुणवत्ता काही एका दिवसात उभी राहत नाही. प्रयत्नपूर्वक जतन, संवर्धन करून ती उभी करावी लागते. सुविधांची पर्याप्तता, अनुकूल शैक्षणिक पर्यावरण असेल, तर परीक्षा नावाच्या व्यवस्थेत विद्यार्थी लीलया विहार करतो. पण आमच्या गुणवत्तेच्या निकषात प्रतिवर्षी १५-२० टक्क्यांच्या नशिबी शैक्षणिक विजनवास ठरलेला. अर्थात, यामागे केवळ एकच एक कारण नाही. या विजनवासाच्या वाटा आपल्या वर्तनातून शोधाव्या लागतात. तशा आपल्या सामाजिक, आर्थिकजीवनातूनसुद्धा पाहाव्या लागतात. आपल्या काही शाळांचे भौतिक, शैक्षणिक पर्यावरण पाहिले तर या शाळांना शाळा का म्हणावे, असा प्रश्न पडावा ही परिस्थिती. जेथील शाळांना प्राथमिक सुविधा मिळाव्यात म्हणून सतत डोके आपटावे लागत असेल, तेथे डोके काम कसे करेल? शाळेत किमान सुविधाही मिळू शकत नसतील, तर शैक्षणिक प्रगती घडेल कशी? सुविधांशिवाय गुणवत्ता संवर्धनाची स्वप्ने पहावीत तरी कशी? पाश्चात्त्य राष्ट्रातील व्हर्च्युअल, डिजिटल क्लासरूमचे गोडवे गायचे आणि येथे ते नाहीत म्हणून गळा काढायचा. तो नाही म्हणून मिळवण्यासाठी स्वतःला वगळून साऱ्यांना कळत कसं नाही, म्हणून तत्वज्ञान शिकवावे, ही मानसिकता. जपानसारखं छोटंसं राष्ट्र प्रगतीच्या फिनिक्स झेपा घेऊ शकले, कारण तेथील समाजाची राखेतून पुन्हा उभं राहण्याची अंतर्यामी असणारी उमेद. अशी उमेद असणारी माणसे आपल्याकडे संख्येने किती असतील?

शैक्षणिक सुविधा थोड्याफार उपलब्ध आहेत, तेथील शिक्षणाची प्रगती आणि परिस्थिती कीव करावीशी. एकेका वर्गात ऐंशी-नव्वद मुलं कोंडवाड्यातील गुरांसारखे कोंबलेले आणि मास्तर त्यांना आवरून आवरून आंबलेले. धड श्वास घेता येत नसेल, तर शिक्षणाची आस असेल कशी? आपल्याकडील शैक्षणिक गुणवत्ता नेहमी प्रश्नांच्या पंगतीत आणि संदेहाच्या संगतीत वसते. काहींना आपण काय आणि कशासाठी शिकतो आहोत, हेच कळत नाही. काहींना धड वाचता येत नाही. गणिताचे आकडे पाहून बऱ्याच जणांच्या पोटात आकडे येतात. तेथे शैक्षणिकगुणवत्तेचे अंकन करणारे आकडे वास्तवस्पर्शी असल्याचे मान्य करावे कसे? शिकण्यासाठी शाळेत प्रवेशित होतात त्यातल्या कित्येकांची दांडी दहावीपर्यंत गुल होते. जून महिन्यात शैक्षणिक प्रवेशाचे उत्सव साजरे करून पटावरील आकडे वाढत्या तापमानाच्या पाऱ्याप्रमाणे वर-वर चढत जातात. मुलं शाळाबाह्य राहिले नसल्याचा निर्वाळा दिला जातो. जमा झालेले आकडे तपासून पाहण्याची वेळ येते. पटपडताळणी हलक्या पावलांनी चालत दारी येते आणि प्रवेशोत्सवात जमा झालेले आकडे परत गोठणबिंदूकडे सरकतात. एकीकडे सुविधांनी सजलेले इमले, तर दुसरीकडे डोक्यावर धड छप्पर नसलेल्या शाळा. अशा वातावरणात शैक्षणिक समानतेची बीजे रुजतीलच कशी? गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर उत्तर-दक्षिण ध्रुवांइतके आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार आणि गरीब अधिक गरीब. गरीब त्यांची सेवा करणार. पैसा असणारे डॉक्टर, इंजिनियर होतील. शिक्षणासाठी पैसा नाही, म्हणून कोणत्यातरी भटक्यांच्या पालावरील हुशार मुलगी बापाने ठरवलेल्या मुलाच्या गळ्यात वरमाला टाकून दुसऱ्या पालावर तीन दगडांची चूल पेटवून भाकऱ्या थापत बसणार. केवळ संधी मिळू शकली नाही म्हणून हे जीवन वाट्याला येणे आपल्या व्यवस्थेतील दुर्दैव नाही का?

शिक्षणातील आवश्यक सुविधा देणाऱ्या संस्था आपल्याकडे नाहीत, असे नाही. पण त्यांची संख्या आहे तरी किती? आणि आहेत त्या संस्थांमध्ये सर्वसामान्यांची किती मुलं शिक्षण घेतात? आय.आय.टी., आय.आय.एम. येथील शैक्षणिक गुणवत्ता वादातीत आहे. दर्जेदार आहेत म्हणून येथील एकूण प्रवेशित विद्यार्थ्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून, परिसरातून किती मुलं पोहचतात? साधनांची पर्याप्तता, पूरक शैक्षणिक सुविधांची विपुलता आणि पैसा दिमतीला असणाऱ्यांचे हे परगणे होत चालले आहेत. या संस्थांमध्ये गुणवत्ता याच निकषाने प्रवेश मिळत असल्याने येथील प्रवेशाचे स्वप्न मुलंच नाही, तर मुलांचे आईबापच अधिक पाहत असतात. ज्यांच्याकडे पैसा, सुविधा आहेत ते या वर्तुळाच्या परिघ पार करून स्वप्नांच्या गाभाऱ्यात प्रवेशण्यासाठी क्लास नावाच्या समांतर व्यवस्थेच्या दाराशी लहान-मोठ्या गोण्या घेऊन उभे असतात. धनिक बाळांसाठी ही पूरक अभ्यासाची नंदनवने आहेत. पण सर्वसामान्यांचे काय, त्यांचे हात तेथे पोहचू शकतात का? याचा विचार करायला आपल्या व्यवस्थेकडे अवधी आहे तरी कुठे. एकीकडे शिक्षण महागडे होत असल्याची तक्रार करायची आणि गोण्या घेऊन रांगेत उभे राहायचे. ही आपल्या वर्तनाची तऱ्हा. गुणवत्ता पाहिली जाते, तेथे गोणीसंस्कृती रुजू शकत नाही हे खरेच. पण ज्यांच्या हाती साधनांची सहजता आहे. सुविधांची विपुलता आहे, ते अशा गोष्टींकडे लक्ष देतीलच कसे? आपल्याला अडचणीच्या ठरणाऱ्या विषयांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून स्वार्थ साधण्याची माणसाला घाई झालेली असते. अर्थात, माणसाचा स्वभाव पाहता त्याचं असं वागणंही स्वाभाविकच. गुणवत्तेच्या वाटेवर वाकुल्या दाखवत व्यवधाने बनून उभ्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तपासून पाहण्याची आवश्यकताच वाटत नसेल, तर समस्यामुक्तीचे विकल्प हाती लागतीलच कसे?

प्रतिष्ठाप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाचे कारखाने अविरत सुरु राहावेत म्हणून लाखा-लाखाची उड्डाणे करायची. लाख येण्यासाठी लाखमोलाचे गुणनिकष सोयीस्करपणे अपेक्षित दिशेने वळते करायचे. प्रवेशासाठी आवश्यक गुणांची अट शक्य तितक्या सौम्य पातळीवर आणून प्रवेशसंख्या वाढवता येते; पण दर्जाचे, गुणवत्तेचे काय? कुठेतरी वाचनात आले की, काही वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये कोणत्याही शिक्षणाला प्रवेशासाठी A रेटिंग आवश्यक होते. तरीही प्रवेशासाठी संख्या वाढणे काही थांबेना, म्हणून A+ अशी रेटिंग पद्धत अंमलात आणली गेली. कारण गुणवत्ता वाढली. आपल्याकडे मात्र शिक्षणाचे कारखाने सुरळीत चालावेत म्हणून आपला प्रवास अवगामी दिशेने. गती-प्रगतीला अवरुद्ध करू शकणारे निर्णय दूरगामी परिणामांची पर्वा न करता घेतले जात असतील, तर शैक्षणिकगुणवत्तेच्या वर्धिष्णू विकासाची अपेक्षा करावी कशी? विकाससन्मुख तरुणाई देशाचं भविष्य असतं. देशाच्या विकासाचं भविष्य लेखांकित करणारे हात सक्षम झाल्याशिवाय प्रगतीची स्वप्ने साकार होत नसतात. तरुणाई पर्याप्त सुविधांपासून दूर राहणे, हे प्रगतीचे लक्षण खचितच नाही. सामान्य स्तरावर सुविधा सहज उपलब्ध होणं स्वप्नपूर्तीची प्रथम पायरी असते. काही मोठ्या शहरात शैक्षणिकसुविधा सहज उपलब्ध होतात, हे मान्य. पण मेट्रोसिटी म्हणजे काही खरा भारत नाही.

कोणत्याही देशाचे भविष्य शिक्षणविषयक संकल्पनांच्या अनुषंगाने बहरत असते. आपल्याकडे शिक्षणातून अशी किती इनोव्हेशन्स पुढे येतात? नवनवीन संकल्पनांचा अभाव, ही आपली समस्या आहे की काय, असे वाटायला लागले आहे. आपला शिकलेला डॉक्टर दवाखाना उघडून चार भिंतीत स्वतःचं जग उभं करून सुखी राहील; पण थोडी रिस्क पत्करून नवी औषधे शोधणार नाही. कंपनीने पाठविलेल्या सॅम्पल औषधांचा उपयोग, म्हणजे इनोव्हेशन नाही. येथील अध्यापक परंपरेने चालत आलेले ज्ञान पुढच्या पिढ्यांकडे प्रामाणिकपणे पोहचवण्याचे काम करेल, मात्र संशोधन करायचे असले की, अनेक समस्या तो उभ्या करेल किंवा उभ्या राहिल्या म्हणून संशोधनाची वाट नाकारून कार्यरत राहील. काहीतरी नवे प्रयोग करण्यासाठी आपल्याकडे परिस्थिती किती अनुकूल, किती सुरक्षित असते? हाही एक शोधाचा, संशोधनाचा विषय व्हावा अशी स्थिती असते. लागलीच थोडी अनुकुलता हाती, तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळते किती? काम करताना काही मर्यादा येतात. त्या येतीलच. या मर्यादांना उत्तरे शोधण्याची मानसिकता रुजणे आवश्यक आहे. जगातील अग्रमानांकित विद्यापीठांच्या नामावलीत किती विद्यापीठे भारतीय आहेत? या परिस्थितीला आपल्या शिक्षणाची प्रगती समजावी काय?

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि त्यांची गुणवत्ता तेथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशात दिसते. जगाच्या वर्तनव्यवहारांवर प्रभाव पाडू शकली अशी किती नावे अलीकडील काळात आपल्याकडे सापडतात? आपण याची कारणे ‘ब्रेनड्रेन’मध्ये शोधून आपली पुरेशी नसलेली गुणवत्ता सिद्ध करण्याचा लटका प्रयत्न करतो. ‘ब्रेनड्रेन’ची चिंता जरूर असावी; पण ‘ब्रेनगेन’साठी चिंतनही करावे लागते. परकीय देशातील किती विद्यार्थी शिकून उपजीविकेसाठी भारतात येऊन राहिल्याचे आपणास स्मरते. आपला कोणी सिलिकॉन व्हॅलीत गेला की, त्याचं प्रचंड कौतुक. त्याच्या परदेशवारीची वर्तमानपत्रात जाहिरात. त्याच्या तेथे जाण्याचा घरच्यांना प्रचंड, सार्थ वगैरे अभिमान. पण तो मेळघाट व्हॅलीत का जात नाही, म्हणून कोणी साधा प्रश्नही विचारत नाही. परिस्थितीपासून पलायन करू पाहणाऱ्या विचारांना थांबवायचे असेल, तर आपल्या अंगभूत सामर्थ्यातून उत्क्रांत झालेल्या पाश्चात्त्य राष्ट्रातील विद्यापीठांसारखी विद्यापीठे येथे उभी राहणे आवश्यक आहे. कधीकाळी आपल्याकडील नालंदा, तक्षशीला विद्यापीठांना जी उपक्रमशीलता दाखवता आली, ती आता का दिसत नसावी? याचा अर्थ असाही नाही की, आपल्याकडे काहीच घडत नाही. घडते पण ठसठशीतपणे समोर येईल असे अपवादानेच. साऱ्यांनाच दुरून डोंगर साजरे असल्याचा आनंद असेल, तर आणखी काय घडणार आहे.

आपल्याकडे एकेकाळी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शिक्षणतपस्वी, शिक्षणमहर्षी म्हणवून घेण्यात आनंद वाटायचा. या बिरुदावाल्यांमध्ये त्यांना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता असल्याचे वाटायचे. सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची गंगा अनवरत प्रवाहित ठेवण्यात धन्यता मानणारी अशी नामवंत कुळं आणि असा काळ फार मागे जाऊन शोधावा नाही लागत. आपल्या इतिहासाची दहा-वीस पाने मागे उलटवून शोधून पाहिली तरी अशी नावे सहज आपल्या हाती लागतील. पण काळ बदलला, तसा त्याचा महिमाही. शिक्षणाची कुले जाऊन संकुले उभी राहिली. त्यांची साम्राज्ये झाली. ते सांभाळणारे सम्राट निर्माण झाले. त्यांच्या साम्राज्याला विस्ताराची स्वप्ने पडत असतात. विस्तारलेल्या साम्राज्यातून आर्थिक, राजकीय, सामाजिक हितसंबंध संपादन करणे साध्य बनते, तेव्हा गुणवत्ताविकास त्यानंतरची गोष्ट ठरते.

काही दिवसापूर्वी वाचनात आले की, अमेरिकेत शिक्षणाचा प्रसार योग्य दिशेने व्हावा म्हणून ‘लँडग्रँट’ विद्यापीठे सुरु केली गेली. त्यांना स्वायत्ततेबरोबर प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तताही दिली गेली. ती उभी रहावीत यासाठी पैशाऐवजी कायमचे अनुदान म्हणून हजारो एकर जमिनी त्यांना दिल्या. संशोधनासोबत समाजात ज्ञान पोहचवण्याची जबाबदारीही त्यांनाच दिली. या विद्यापीठांनी कृषी, औद्योगिक समाजाचा पाया घातला. ज्ञानाबरोबर श्रमालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली. आपला देश कृषिप्रधान असूनही आपल्याकडे असा प्रयोग झाल्याचे निदर्शनास का येत नसावे? तुर्कस्तानातील इस्तंबूल- आशिया आणि युरोप खंडाना जोडणारा हा भूप्रदेश. या दोन खंडांचे संगमस्थान, येथील जमिनीचे भाव आकाशाला गवसणी घालणारे. सौंदर्याची परिसीमा असणाऱ्या या प्रदेशातील जमिनी कोणताही आर्थिक फायदा डोळ्यासमोर न ठेवता येथील सरकारने शैक्षणिक संस्थांसाठी राखीव ठेवल्याचे वाचनात आले. सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने आर्थिक मोह टाळून कोट्यवधी डॉलर्स किमतीच्या या जमिनी पिढ्या घडविण्यासाठी वापरल्या. येथे शिक्षणाशिवाय अन्य काहीही उभे राहू नये, याची व्यवस्था केली. भारतात अशा जमिनी असत्या तर चित्र काय दिसले असते? आपण कोणता विचार केला असता?

सेनेगल हा आफ्रिका खंडातील छोटासा देश. आपल्या एकूण आर्थिक खर्चाच्या बरीच जास्त रक्कम शिक्षणावर खर्च करतो. येथे संरक्षण, गृह, परराष्ट्र, वित्तमंत्री होण्याऐवजी शिक्षणमंत्री होण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ चाललेली असते. शिक्षण खाते आपल्याकडे असावे, म्हणून आपल्या देशात किती नेत्यांकडे उत्साह दिसतो? अरबराष्ट्रांमधील मधला अस्थिर, अंधारवाटेचा काळ जाऊन आज बगदाद, कैरो विद्यापीठे पुन्हा वैभवाच्या शिखरावर उभी राहू पाहत आहेत. आपल्याकडे गुणवत्तेचा वारसा आहे. आपण त्याचा उपयोग गौरवीकरणासाठी आवर्जून करतो, तो आमचा मानबिंदू असल्याचे अभिमानाने सांगतो; पण त्याला उर्जितावस्था येण्यासाठी काय करतो? या प्रश्नांचे उत्तर आपल्या सार्वजनिक मानसिकतेच्या आहे त्याच वर्तुळात पुन्हा-पुन्हा शोधायला लागते.

सिंगापूरचे पंतप्रधान ली कुवान यांना सिंगापूरच्या नेत्रदीपक प्रगतीचे गमक काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यांचे उत्तर होते, शिक्षण. ज्या देशाचा प्रमुख प्रगतीचे साधन म्हणून शिक्षणाला निर्विवाद महत्त्व देत असेल आणि शिक्षण परिवर्तनाचे साधन मानत असेल, तर प्रगतीसाठी त्या देशाला कोणाकडे पाहण्याची आवश्यकता उरतेच किती? आपल्याकडे आणि त्यांच्याकडे दिसणाऱ्या विचारात फरक हाच आहे. शिक्षणाला बाजार न समजता जगण्याचा समृद्ध व्यवहार समजले जात असेल, तर प्रगती हात जोडून त्यांच्या अंगणी उभी राहील, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची गरज आहे काय? शिक्षणाला जगण्याची स्पंदने समजणाऱ्या राष्ट्रांमध्ये शिक्षणक्षेत्र बाहेरील राजकारणापासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये असणारे राजकारण कोणती पातळी गाठते? राजकारण काही वाईट नसते; पण त्याला मर्यादांचा परीघ असावा. शिक्षणाचे प्रांगण तरी त्यापासून अलिप्त असायला काय हरकत असावी? खरंतर राजकारणाशिवाय कोणत्याही क्षेत्रात आपले पानही हलत नाही, हेपण वास्तवच.

नव्या संकल्पनांनी साकारलेल्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनातून संपादित ज्ञानानेच राष्ट्रे प्रगतीच्या शिखरांवर पोहचतात. महासत्ता म्हणून घडतात आणि वाढतातही. नव्या संकल्पनांचे सर्जन व्हायचे असेल, तर त्या संपादन करण्याइतका आत्मविश्वास आपल्याकडे असावा लागतो. आत्मविश्वास असणारे आत्मनिर्भर होतात. आत्मनिर्भर आत्मसन्मान नव्या क्षितिजांचा शोध घेण्यास उद्युक्त करीत असतो. मेरीटॉक्रॅसी असेल तर समान संधीचा विचार दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. प्रगतीच्या परिघापासून परिस्थितीवश दूर असणाऱ्यांचा विचार करतांना डेमोक्रॅसी समानतेच्या वाटेने संधी उपलब्ध करून देत असते. सुज्ञ विचारांनी वर्तणारा समाज जाणीवपूर्वक उभा करावा लागतो. उभा केलेला समाज उद्दिष्टांच्या दिशेने चालता करावा लागतो. चालती पावले उद्दिष्टांच्या विशिष्ट दिशेने वळती करावी लागतात. विवक्षित वाटांनी वळलेल्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरावी लागतात. स्वप्ने सोबत घेऊन जगणाऱ्यांच्या मनात आभाळ कोरावे लागते. कोरलेल्या आभाळाच्या तुकड्यावर आकांक्षा गोंदाव्या लागतात. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने धावणारं वेड विचारांत रुजावावं लागतं. वेडाला परिवर्तनाचा ध्यास असावा लागतो. ध्यासप्रेरित समाज परिवर्तनप्रिय असावा आणि परिवर्तनप्रिय समाज अध्ययनशील असावा लागतो. अध्ययनशील समाज गुणवत्तेला प्रमाण मानून वर्तणारा असावा लागतो. आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मसन्मान या गुणवैभवाच्या पाथेयावर गुणवत्ता आकारास येते. गुणवत्तेला घडवण्याची कौशल्ये शिक्षण देत असतं. चीनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशियस म्हणतो, ‘जर आपल्यासमोर एक वर्षाचा विचार असेल, तर धान्य पेरा. दहावर्षाचा विचार असेल, तर झाडे लावा आणि आपण आयुष्यभराचा विचार करीत असाल, तर माणसं शिक्षित करा.’ आपल्यासमोरचे उद्दिष्ट कोणते, हे ज्या समाजाला समजते, तो समाज मोठा असतोच; पण समाजाचे मोठेपण जाणीवपूर्वक जपणारी संवेदनशील माणसे त्याहून खूप मोठी असतात. त्यांच्या उंचीचा हेवा एव्हरेस्टलाही वाटत असतो. आपण काय व्हायचे आहे, आपल्या समाजाला नेमके कोठे न्यायचे आहे, हे शेवटी आपणालाच ठरवावे लागते, नाही का!

6 comments:

  1. परखड .... परंतु तेव्हढेच वास्तव.... स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षातील भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या प्रवासाचं एव्हढ वास्तव दर्शन क्वचितच मांडले गेले असावे ..... विचारांच्या जुळणाऱ्या धाग्यातून संत तुकारामांच्या शब्दात एव्हढेच विदित करतो ..... माझिया जातीचा मज भेटो कोणी .....

    ReplyDelete
    Replies
    1. संजयजी, मनःपूर्वक आभार!

      Delete
  2. सर आमची शिक्षण व्यवस्था आज कोलमडली आहे.भ्रष्ट राजकारणी,नेते व काही भ्रष्ट शिक्षण सम्राटांनी तीचं बाजारीकरण केलं आहे.सर आपलं मत स्पष्ट व परखड आहे,पण महत्वाचे म्हणजे हेच सत्य आहे.व हेच समाजमत आहे.

    ReplyDelete
  3. सर परिवर्तनाची बिजे जर शिक्षणात रोवलेली असतील तर लहान मुलांच्या कोवळ्या मनावर धार्मिक शिक्षणात परिवर्तन न आणता त्यांच्यात
    परस्पर विरोधी धर्माचा द्वेष का शिकवला जात असेल ?
    याचे उत्तर तर गूढ आहेच !!!!!!!!

    ReplyDelete
  4. अप्रतिम सर
    @प्रतिक बर्गे

    ReplyDelete