Aani Aapan Sagalech | आणि आपण सगळेच

By
“सर, समाजाचा संयम सुटत चालला आहे, असे नाही का वाटत तुम्हांला?” चर्चेत सहभागी होत माझा एक सहकारी बोलता झाला. त्याच्या बोलण्यावर आमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेची पळभरही प्रतीक्षा न करता तसाच पुढे व्यक्त होऊ लागला. मनात साठवून ठेवलेलं काही कुणाकडे सांगायचंच असेल कदाचित त्याला. व्यक्त होण्यासाठी यानिमित्ताने योगायोगाने हाती एक धागा सापडला. त्यास पुढे वाढवत तो बोलू लागला, “समाजातील दैनंदिन व्यवहारांचे प्रवाह आत्मकेंद्रित मानसिकतेकडे वाहत आहेत, असे नाही का तुम्हां लोकांना वाटत? सहज, साधेपणाने जगण्याची आणि आपण सुखाने जगताना इतरांविषयी आस्थापूर्वक विचार करण्याची कुणाला गरज नाही, असंच सगळ्यांना वाटतंय की काय कोण जाणे, माहीत नाही; पण माणसांचं असंच वागणं असेल, तर मला नाही वाटत माणसांच्या जगण्याला फारकाळ संयमाच्या सीमांमध्ये सावरून ठेवता येईल.” एका दमात जेवढं सांगणं शक्य होतं, ते सांगून गडी थोडा थांबला. चेहऱ्यावर प्रश्नांचे भलेमोठे चिन्ह तसेच. वर्तमानातील काही घटनांचा प्रत्यय आल्याने असेल कदाचित, किंवा आणखी काही कारणे असतील; मनातील विचार त्याने शब्दांच्या वाटेने वाहू दिले. माणसाच्या मनात असणाऱ्या बऱ्यावाईट विचारांचा कोलाहल काही सहज थांबत नसतो. फारतर काही अवधीपुरता तो अवरुद्ध करून ठेवता येतो. पण कायमचा संपवता येईलच असे नाही. पण एक असते की, कोणास काही सांगायचे ते सांगून झाल्यावर मनात असणारी अस्वस्थता निदान काही अंशी तरी कमी होते. त्याचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो. त्यावर आता आम्ही काय आणि कसे व्यक्त होतो, म्हणून समोरचे एकेक चेहरे उत्सुकतेने निरखित राहिला काही वेळ तसाच, निःशब्दपणे. कदाचित त्याच्या मनात घर करून असलेल्या प्रश्नांची उत्तरे, आम्हां लोकांच्या चेहऱ्यावरच्या बदलत जाणाऱ्या रेषांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करीत असेल.

अर्थात, या सगळ्यास निमित्त ठरले आम्हां मित्रांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चेचे. समाजाच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या मानसिकतेविषयी आम्ही आपापसात बोलत होतो. विषय होता दाना मांझीचा. पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी जाणाऱ्या ओडिशामधील कालाहांडी जिल्ह्यात राहणारे दाना मांझी आणि त्यांची दहा-अकरा वर्षाची लेक यांच्याविषयी बातमी मीडियात आली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने आपल्या सामाजिक वर्तनाचे भीषण वास्तव समोर उभे केले. ज्यांच्याकडे माणूस नावाचं मन होते, ते हे सगळं पाहून, वाचून, ऐकून हळहळले. काहींनी हे चालायचंच, अशी मनाची समजूत करून घेतली. काहींनी या देशाचं हे प्राक्तन आहे आणि ते बदलणे अवघड आहे, असे समजून दुर्लक्ष केले. काही व्यथित झाले आणि आमच्यासारखी सामान्य माणसे अशावेळी काहीही करू शकत नाहीत, म्हणून हताशपणे मनातला सल व्यक्त करीत राहिले.

‘समाज’ शब्दाची परिभाषा विद्वतजणांनी कधीच करून ठेवली आहे. कदाचित ती सर्वसमावेशक असेल किंवा नसेलही. पण तिला नैतिकतेच्या कोंदणात अधिष्ठित करण्याचे प्रयत्न संवेदनशील मने सातत्याने करत आली आहेत. अशा प्रयत्नांचे यशापयश किती, सांगणे अवघड आहे. पण माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आपले आकाश हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. समूहमनाच्या ठायी असणाऱ्या नानाविध भाव-भावनांचे पदर शोधणाऱ्या विचारांचा सहजस्फूर्त उद्गार समाज असतो. या उद्गारांना स्वतःचा सूर असतो. सहज प्रेरणेने आणि निर्व्याज भावनेने जगणाऱ्या समाजाला स्वतःचा अंगभूत आवाज असतो. त्याला ताल आणि लय सापडली की, जीवनगाणी सहज जुळून येतात. माणसातील माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. म्हणूनच समूहातील सदस्यांमध्ये सहजरीत्या घडणारा सुसंवाद कोणत्याही प्रदेशावर वसती करून असणाऱ्या कुठल्याही समाजाची अनिवार्य आवश्यकता असतो. सहिष्णुता समाजाच्या जगण्याचं विभक्त न करता येणारं वास्तव आहे. स्नेह, सौहार्द, सौजन्य नांदत असतं, तो समाज संयमाच्या सीमांमध्ये सहज विहार करीत असतो. समूहात साधेपणाने संचार करण्याचा माणसाला विसर पडला की, त्याच्या जगण्यात उच्छृंखलपणा येतो.

माणूस समाजशील असल्याचे आपण ऐकत आलो आहोत आणि हे काही अवास्तव नाही. समाजाचा घटक म्हणून माणूस समाजशीलतेचे सारे आयाम प्रयत्नपूर्वक सांभाळण्याचा प्रयास करीत असतो. इहलोकी घडलेल्या वास्तव्याच्या शेकडो वर्षाच्या विचारमंथनातून आणि चिंतनातून माणसाने वर्तनाचे व्यवहार नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टी शोधल्या, निर्मिल्या आणि स्वीकारल्या, त्या सगळ्यांचे संचित अंगीकारलेले संस्कार आहेत. समाज नावाची व्यवस्था अविचलपणे उभी राहावी, म्हणून त्याने स्वतःचं जगणं स्वतःच नियंत्रणाच्या कक्षेत आणून सजवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे अभिनिवेश सोबत घेऊन समूहात वावरणाऱ्यांच्या विचारांत संयम कायम राहावा, म्हणून सभोवती नियमांच्या काही चौकटी आखल्या. जगणं सन्मानाने घडावं म्हणून व्यवस्था उभी केली. व्यवस्थेच्या हाती नियंत्रणाचे सुकाणू सोपवताना स्वातंत्र्याला स्वैराचारापासून संरक्षित करण्यासाठी मर्यादांचे बांध घातले. माणसाच्या मनात ‘स्व’तंत्राने जगण्याची कितीही ओढ असली, तरी ती दुर्लक्षित करून सर्वसंमत मार्गाने, आखीव वाटेने चालणेच अधिक श्रेयस्कर समजले गेले. संयमित जगण्याला सार्वत्रिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. अशा वागण्याला संस्कार म्हणून सांभाळले गेले. जीवशास्त्राच्या परिभाषेत माणूस केवळ प्राणीच. त्याच्यातील प्राणी नियंत्रणाच्या शृंखलांनी मर्यादित केला. मनात उन्नतीची आस कायम राहावी, म्हणून संस्कारांच्या पणत्या हाती देत आस्थेचे कवडसे जागवले. जागलेल्या मनाला विधायक विचारांकडे वळते करून मनुष्यत्वाची परिभाषा लेखांकित केली. मनात अधिवास करून असणाऱ्या विकल्पांचे एकेक पदर विलग करून विचारांत मूल्ये कोरली आणि रुजवली.

समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या गेल्या. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. कालोपघात त्यांना चिरंजीवित्व प्राप्त होतं. हे केले की तू चांगला आहेस; ते केलं की वाईट आहेस, असं सांगणं नियंत्रणाचा भाग झाला. आई-वडील, थोरा-मोठ्यांचा आणि समजणे स्वीकारलेल्या विधायक विचारांचा अनादर घडू नये, म्हणून नेणत्या वयापासूनच मूल्यांच्या बिया मनोभूमीत रुजवून जतन, संवर्धन केलं. समूहात वावरणाऱ्यांचे वागणे सर्वसंमत मार्गाने घडत राहावे, म्हणून विचारांत काही नीतीसंकेत कोरून घेतले. प्रासंगिक गरज म्हणून त्यांना अपेक्षित आकार देऊन सजवले. आखलेल्या चौकटीत विहार करायला कोणी राजी नसेल, तर त्यास पाप-पुण्य, धर्म-अधर्म वगैरे सारख्या गोष्टींची भीती दाखवून सत्प्रेरीत मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत राहिला. कधीकाळी समाजात वावरणाऱ्या माणसांचे सबंध सीमित आकांक्षांच्या आवाक्यात असल्याने अशा गोष्टी सहज घडून जात. नीती जगण्याचे सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याचे मान्य करणारी माणसे दिलेल्या शब्दांना आणि घेतलेल्या वचनांना जागायची. माणसापेक्षा मूल्य महत्त्वाची मानण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रघात मनात असणारे अविचारांचे विकल्प विसरायला लावायचा. देव-धर्म, पाप-पुण्य, धर्म-अधर्म यांच्या भीतीपोटी का असेना, सामान्य माणूस आपलं जगणं समाजमान्य संकेतांच्या आखीव चौकटीत सजवण्याचा प्रयत्न करीत राहायचा. अर्थात आता असे काही होत नाही, असे नाही. अशा गोष्टींना प्रमाण मानून आपले आचरण जाणीवपूर्वक शुद्ध राखण्यासाठी धडपडणाऱ्यांची समाजात आजही काही कमी नाही. आचरणामागे असणारे आस्थेचे आणि आस्था नसेल तर भीतीचे असणारे आधीचे संदर्भ आज बरेच बदलले आहेत. इंद्रियगम्य नसणाऱ्या अशा गोष्टी बऱ्याचअंशी स्वतःपुरत्या सीमित झाल्या आहेत.

काळाने कूस बदलली, तसे परिस्थितीचे परीघ विस्तारले. त्यांना सुखाचा परीस शोधण्याची आस लागली. कालसुसंगत म्हणा किंवा आणखी काही, माणसाच्या जगण्याच्या दिशा बदलल्या. बदलेल्या दिशांची सोबत करीत चालत आलेली आकांक्षांची पाऊले उंबऱ्यापर्यंत पोहचली. वसतीला आलेल्या आकांक्षांनी मनात मुक्तपणाची ओढ जागवली. मुक्तीच्या मार्गाने मनात येऊन विसावलेल्या स्वप्नांनी विचारांची वर्तुळे विस्तारत नेली. कधीकाळी समाजपरायण जगण्याला आपलं विश्व समजणारे विचार बदलाच्या वाटेने नव्या परगण्यांच्या दिशेने निघाले. नव्या दिशांनी साकोळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत आहेत, तसा मनात अधिवास करून असणारा स्वार्थ अधिक प्रबळ होत आहे. जगण्यातील व्यापकपणाची क्षितिजे संकुचित होतायेत. स्वार्थाचा परीघ विस्तारत जावून संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. उच्छृंखलपणाचे वारे वाहत आहेत. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं आहे. साऱ्यांना स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस लागली आहे. मी नावाच्या संकुचित परिघाभोवती मन घिरट्या घालू लागलंय. उथळपणाला सभ्यतेची वसने चढवून वास्तव झाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणतेही विधिनिषेध न सांभाळता मन सैरभैर होऊन उधळत आहे. साऱ्यांनी आपापल्या जगण्याची परिभाषा आपणास हव्या असणाऱ्या शब्दांनी लेखांकित करून घेतली आहे. पूर्वी समाज नावाचं स्वखुशीने स्वीकारलेलं बंधन तरी सोबत असायचं. कळत-नकळतही आपणाकडून वाईट कृती घडू नये, सार्वजनिक विचारांत अप्रतिष्ठा होऊ नये, याची काळजी घेतली जायची. गाव काय म्हणेल, याची चिंता वाहत रावही वचकून असायचे. माणसे अन्योन्यभावाने समाजशरण जगणं सहजपणे स्वीकारायचे. याचा अर्थ तेव्हा समाजात सगळंकाही सुरळीत सुरु असायचं असाही नाही. पण समाजाने आखून दिलेल्या नीतिसंकेतांचा माणसांच्या जगण्यात एक वचक असायचा. मग तो वैयक्तिक असो अथवा सार्वजनिक.

गावातले सण-उत्सव वैगैरे सारख्या गोष्टी मर्यादांच्या चौकटीत साजरे होणं सहजपणे घडायचं. सर्व मिळून काही गोष्टी करायच्या, याविषयी सगळ्यांचं किमान काहीतरी समान मत असायचं. जात, धर्म, श्रद्धा आदी गोष्टी सोबत असल्या आणि त्यांचे पीळ सहज सुटणारे नसले, तरी नियंत्रणाचे कासरे लावून त्यांना उधळण्यापासून थांबवण्याइतके अधिकार काहींकडे असायचे. कुटुंबापासून गावापर्यंत अपेक्षांची काही समान सूत्रे जगण्यात सहजपणे सामावलेली असायची. त्यांना संस्कारांच्या धाग्यांमध्ये गुंफले जायचे. अनेकांनी ठरवलेल्या आणि आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका अदा करतांना कोण्या एकाला कमीपणा वाटत नसायचा. जीवनाच्या वाटेवर सुख-दुःखे यायची, जायची. कधी अनपेक्षित आघात घडायचे. अशावेळी कोणाला फार मोठ्याप्रमाणात काही करता नाही आले, तरी माणसे माणसांना सोबत करीत रहायची. ढासळत्या क्षणी, निसरड्या वाटांवर निदान धीराचा हात द्यायची. समाजातील समान आणि किमान अपेक्षांचे वास्तव समजून घेण्याची मानसिकता सांप्रत क्षीण होत असल्याचे कोणीतरी बोलतो. अर्थात, असं म्हणण्यात अवास्तव काही नाहीये. आपला आसपास रोजच नव्याने दुभंगताना दिसतोय. विसंगतीला विचारांची लेबले चिटकवली जात आहेत. स्वार्थपरायण विचार मनात अधिवास करून असल्याने विचारांवर अविवेकाची काजळी वाढत चालली आहे. अविवेकीपणा माणसाची नवी ओळख होऊ पाहत आहे. साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगण्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. आपल्या असण्याला वैयक्तिक आकांक्षांनी मढवले जाते, तेव्हा सहजस्फूर्त जगण्याला संकुचितपणाचा शाप दग्ध करीत राहतो. वैयक्तिक सुखांसाठी कलह सुरु होऊन सार्वजनिक सौहार्दाची सहजप्रेरणा संपवतो.

सण-उत्सव माणसांच्या जगण्याचे सहजस्फूर्त आविष्कार आहेत, पण सध्या तेही नकोसे होत आहेत. साजरे करतांना त्यांनाही सुरक्षेचे कवच परिधान करावे लागते आहे. एकाचा सण दुसऱ्यासाठी अडचणीचा आणि दुसऱ्याचा तिसऱ्यासाठी समस्येचा ठरायला लागतो, तेव्हा समाजात प्रत्ययास येणारे सौहार्दाचे संस्कार निरोप घेऊन निघतात. सणवाराच्या निमित्ताने धर्म, जाती, पंथ आदि गोष्टी शक्तीप्रदर्शनाचे विषय वाटायला लागतात, तेव्हा मनात असणारा स्नेह विसर्जित झालेला असतो. मिरवणुकांनी रस्ते सजण्याऐवजी समस्येचा विषय बनून वाहत राहतात. रस्त्यावरून सुरु असणारा सामुहिक उन्माद ओसंडून वाहताना सणवारातील सदहेतूला संदेहाच्या चौकटींमध्ये स्थापित करतो. विवाहसमारोहासारखा वैयक्तिक समारंभही रस्त्यावर आणून वाहतुकीची कोंडी करण्यात कोणास काही वाटत नाही. समाजात जगण्यासाठी सभ्यतेच्या निकषांवर आधारित काही नियम अंगीकारलेले असतात याचे भान कुणाला राहिले नसावे, असे वाटायला लागले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा रोजच घडणारा विचका आपला सार्वजनिक चेहरा कसा आहे, याचे सार्वकालिक उदाहरण म्हणून कोणत्याही रस्त्यावर थांबलो तरी सहज दिसेल. आपल्या सार्वजनिक वर्तनाचे ते ओंगळ प्रदर्शन असते. सिग्नलवर पोलीस उभा असला की, सुतासारखं सरळ चालायचं आणि नसला की सिग्नल ओलांडून पळायचं, हा आपला पराक्रम. सार्वजनिक परिसरातील माणसांचा वावर तर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहतो. अशा ठिकाणी असणारी अस्वच्छता आपली सामुहिक प्रतिमा कशी आहे, याचे उत्तर आहे. त्यासाठी फार खोलात शिरून समाजशास्त्राचा अभ्यास करायची आवश्यकता नाही.

एकीकडे विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित जगाने केलेल्या प्रगतीच्या वार्ता करायच्या. त्यानी गाठलेल्या उंचीची पारायणे करून कौतुक करायचे. ते करू नये असे नाही; पण या जगात आपण नेमके कोठे उभे आहोत, याची थोडीतरी जाणीव अंतर्यामी असायला नको का? प्रगतीच्या पावलांचे ठसे रेखीव आकृत्या कोरीत कसे पुढे चालले आहेत, याचे गुणगान करायचे आणि मन अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या परिघाभोवती अजूनही फिरत असेल, तर प्रगतीचे पोवाडे म्हणायचेच का? भूतकाळातील प्रगतीचे गोडवे गावून समोरील प्रश्न निकाली निघत नसतात. देशाच्या काही हजार वर्षाच्या संपन्न इतिहासाच्या आरत्या करायच्या आणि वर्तमानात नवा इतिहास घडवायचा आहे, याचे सोयिस्कर विस्मरण करीत राहायचे, हा सामाजिक वर्तनातील दांभिकपणा नाही का? समूहमनाच्या संवेदना सांभाळण्याऐवजी ‘स्व’तंत्राने जगायचे, ‘स्व’ गोंजारणाऱ्या तंत्रांचे समर्थन करीत राहायचे. अशा वागण्याला संस्कारांच्या नेमक्या कोणत्या चौकटीत स्थापित करता येईल? जो समाज दांभिक जगण्याला सरसावतो, तो अधिक संकुचित होत असतो. समाज जितका संकुचित तितका कट्टर होत जातो. संकुचित मानसिकता माणसातील माणूसपण विसरायला बाध्य करते. समाजातील सध्याचे वर्तनव्यवहार पाहताना कट्टर मानसिकता अधिक प्रबल होतेय, असे नाही का वाटत? समाजाची अनिवार्य ओळख म्हणून नेहमीच अधोरेखित होणारी सहनशीलता विकल प्राक्तन ललाटी गोंदवून विस्मरणाच्या वाटेने निघाली आहे. सोशिकता संयमाच्या सीमा सोडून वाहू पाहते आहे.

विषमतेच्या विस्तारत जाणाऱ्या भिंती समाजाला नेमक्या कोणत्या परगण्यात नेऊन उभ्या करणार आहेत, कोणास माहीत. सौहार्दाला, सहिष्णुतेला, समतेला संकुचित स्वार्थापायी मूठमाती देणं जगण्याचा नितळ व्यवहार नसतो. सतत पुढे सरकणाऱ्या काळाची परिभाषा परिवर्तनीय असणे आवश्यक असले, तरी त्याला आस्थेचे आयाम असल्याशिवाय समाजात स्वास्थ्य निर्माण होणे अवघड असते. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत आहेत? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असताना माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत आहेत? जगण्याच्या धावत्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. समाज समजून घ्यावा लागतो. समजून घेण्यासाठी आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे पदर पुसून काढावे लागतात. माणसांच्या जगण्याच्या विशाल कालपटाचे आवश्यकतेनुसार लहानमोठे तुकडे करून अभ्यासावे लागतात. अभ्यासासाठी काळाचे काही तुकडे करणे स्वाभाविकच; पण वैयक्तिक लाभासाठी त्याच्या ठिकऱ्या करून हवे ते शोधण्याचं वेडेपण कशासाठी हवं? समोर असणाऱ्या अनेक तुकड्यांमधून आपल्याला सोयीचे तेवढे तुकडे उचलायचे, त्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक वगैरे महत्त्व असल्याचे दाखवायचे. वेचलेल्या तुकड्यांचा तपशील शोधून इतिहास करायचा उद्योग माणूस करीत आला आहे. हाती असणाऱ्या इतिहासातून अपेक्षित ते आणि हवे तसे अन्वयार्थ शोधून सोयिस्कर अर्थ लावणे घडत असेल, तर विकासाच्या वाटा धूसर होतीलच.

समाजाचं वास्तव झपाट्याने बदलत आहे. काही बदल टाळता येत नाहीत, हे मान्य. ते राजकीय असोत की आर्थिक, सांस्कृतिक; त्यांना मर्यादांची सीमा असावीच लागते. माणसाचे बंधमुक्त जगणे सीमित अर्थाने आवश्यकच; पण सर्वबाजूंनी बंदिस्त जगणं कसे समर्थनीय असेल? जागतिकीकरण, संगणक, मोबाईल, माहितीचे मायाजाल जगाच्या सीमा आणखी लहान करीत आहे; पण त्यामुळे संवादाचे सेतू उभे राहण्याऐवजी संकुचितपणाच्या भक्कम भिंती बांधल्या जातायेत. आत्मकेंद्रित अभिमान वाढतो आहे. येथेही समान विचारांचे अनुसरण करणाऱ्यांचे कळप तयार होतात. ते दुसऱ्या कळपाच्या भूमिकांना तपासून पाहतात, नाहीतर नाकारतात. आणि दुसरे पहिल्यांच्या भूमिका झिडकारतात. यात मजा अशी की, यातल्या प्रत्येकाला आपणच समाजशील, प्रयोगशील, प्रगत वगैरे असल्याचे प्रत्यंतर येत असते. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांना समानस्तरावर आणून उभे केले आहे. विज्ञानतंत्रज्ञानात कोणताही आपपर भाव नसतो. पण वापरणाऱ्यांच्या विचारांमध्ये तो नसेल कशावरून? बऱ्याचदा अभिनिवेशाने वागणारे एकतर समर्थनाच्या तुताऱ्या फुंकतात किंवा विरोधाचे नगारे बडवत असतात. माध्यमांमध्ये सहज संचार करणे सर्वांसाठी सुलभ असले, तरी समाजात सगळ्यांचा वकुब तेवढा असतो का? नाहीच, कारण अद्यापही ज्या समाजाची रचना विषमतामूलक पायावर उभी असेल, तेथे समानता स्थापित करणे सहज, सुगम कधीच नसते. म्हणूनच समाजात समानता किती आली आहे, या प्रश्नाचं उत्तर सहज हाती लागणं अवघड असतं. जग स्वार्थपरायण व्यवहाराच्या गतीवर आरूढ होऊन धावत आहे. प्रगतीवर स्वार होऊन धावणाऱ्यांना चालणाऱ्यांच्या पावलांशी जुळवून घेण्याशी काही देणेघेणे नाही. आपल्यापुरते प्रगतीचे रंग ते उधळत राहतात. परिघाबाहेर असणारे आपल्या जगण्याचे विसकटलेले रंग शोधत राहतात.

सत्ता, संपत्ती, साधने हाती असणारे अभावाच्या परिस्थितीशी किती अवगत असतात? सांगणे अवघड आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले, तर किती जणांना अभावग्रस्तांच्या जगण्याशी देणेघेणे असते? मूठभरांकडे असणारी सक्षमता सार्वत्रिक प्रगतीचे परिमाण कसे होऊ शकते? आसपास दुभंगलेला असताना आणि माणसाचं जगणं सगळीकडून उसवत असताना समानतेचे उद्घोष करून समता प्रस्थापित होत नसते. समस्या बनून समोर आलेल्या प्रश्नांची सर्वसमावेशक उत्तरे हाती येत नसतात. साऱ्यांना एका धाग्यात बांधण्यासाठी काही समान सूत्रे शोधावी लागतात. समाजाच्या बदलत्या वर्तनप्रवाहात दिसणारं वास्तव विस्तवासारखं दाहक होत आहे. बदलणारा भवताल भयाण वाटतोय. सामान्यांची रोजची ससेहोलपट थांबायचं नाव काही घेत नाहीये. माणसाचं जगणं सार्वकालिक संघर्ष आहे. तो टाळून पुढे सरकणे असंभव असते. पण संघर्षाला किमान काही सीमा असायला नको का? माणसं तणावाची लहानमोठी ओझी दिमतीला घेऊन वावरत आहेत. त्यांच्या चालत्या वाटा आणखी अवघड होत आहेत. पुस्तकांमधून समतेचे पाठ शिकवायचे आणि वास्तवात मात्र विषमतेचे कणे ताठ ठेवायचे. अशा वागण्याला समतेच्या कोणत्या परिमाणात मोजायचे? समाजात रुजलेली मूल्ये परिस्थितीच्या आघाताने सपाट होत आहेत, त्यांचे काय? दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा, अवहेलना काहींच्या जगण्याची परिस्थितीशरण अगतिकता होत असेल, तर अशा अगतिकांचे जगणे कोणतेही नवे आयाम उभे करू शकत नाही. जगण्याचा रोजचा कलहच तीव्र असेल, तर सामाजिक परिवर्तनाचे वारे त्यांच्या परगण्यातून वाहतीलच कसे?

विसंगतींनी दुभंगलेले आणि विषमतेने भंगलेले जग आपल्या आसपास नांदते आहे. याचे भान किती जणांच्या अंतर्यामी अस्वस्थता निर्माण करीत असेल? प्रेत्येकजण आपणास दिसणाऱ्या मृगजळी सुखाच्या तुकड्याची संगती लावतांना सोयिस्कर अर्थ काढून घेतोय. फायद्याचे अर्थ काढून झाल्यावर, हे चालायचंच असे म्हणून नामानिराळे होत आहेत. विसंगत पर्यावरणात आपण स्वतःला किती काळासाठी सुरक्षित ठेऊ शकतो? एखाद्या विपरीत घटनेवरची तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून निषेधाचे सूर वाढवत कमाल उंचीवर न्यायचे. समाजात विषमता सोबत घेऊन माणूस नांदू शकत नाही, म्हणून समतेचे सेतू उभारण्याची स्वप्ने सजवायची. सामाजिक दुरितांच्या विरोधात एल्गाराचे ध्वज उंच धरायचे आणि विरोधाची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून वसतीला आलेला क्रोध काळाच्या ओघात शमला की, सारे विसरायचे. त्यावर विस्मरणाची धूळ साचली की, आपल्या सुखांच्या शोधात रममाण व्हायचे, ही काही माणूस म्हणून जगण्याची सुयोग्य रीत नव्हे. माणसाचं जगणं अनेक क्रियाप्रतिक्रियांची सुसंगत साखळी आहे. तिची प्रत्येक कडी सौहार्दाच्या बंधनांनी बांधलेली अन् सद्विचारांच्या धाग्यांनी सांधलेली असते. समाजातून स्नेह ओसरत अवनतीकडे सरकत जाणे माणसांच्या जगण्याच्या वाटा अवघड करीत राहतो. आजचे वंचित, उपेक्षित, अन्यायग्रस्त उद्याचे क्रांतिकारक असतात. जगात घडलेल्या क्रांतींच्या मागे असणाऱ्या प्रेरणांचे थोडे डोळस अवलोकन केले, तरी हे सहज लक्षात येते; पण स्वार्थाचा उन्माद वाढत जावून समाज जेव्हा डोळ्यांवर अविचारांची झापडं बांधतो, तेव्हा अंधाराशिवाय आणखी कशाची सोबत घडणार आहे?

संस्कृती आचरणात आणण्यात आहे, सांगण्यात नाही. ती माणसाचं सार्वकालिक संचित असते. तिची अचूक उत्तरे शोधावी लागतात. उपलब्ध असणारे विकल्प तपासून पाहावे लागतात. हाती लागलेल्या निष्कर्षांवर आधारित व्याख्या करायला लागतात. सामान्यांच्या अपेक्षातून मुखरित होणाऱ्या सर्वमान्य परिभाषा शोधाव्या लागतात. नसतील तर तयार कराव्या लागतात. माणसाच्या जगण्याला प्राणीपातळीवरून वर उचलते ती संस्कृती. आपल्या सामाजिक उत्थापनासाठी माणसाला हजारो वर्षाचा प्रवास घडला आहे. उन्नयनाचा त्याचा प्रवास कधीच सहजसाध्य नव्हता. अनेक अडनीड वळणांनी वळत तो संस्कृतीच्या अंगणात पोहचला. हाती लागलेलं अंगण तो सजवत आला. त्यात संस्कारांची रांगोळी रेखित राहिला. आकांक्षांच्या अनेक बिंदूंना घेऊन आकार देत राहिला. जुळलेल्या रेषा विसकटू नयेत म्हणून प्रत्येक रेषा पुन्हापुन्हा कोरीत राहिला नव्याने. अपेक्षांचे कुंचले हाती घेऊन मनात साकारलेले रंग त्यात भरत राहिला. अनेक सायास-प्रयासांनी साकारलेल्या चित्राच्या संवर्धनासाठी विचार करू लागला. ते विसकटून जावू नये म्हणून त्याला मर्यादांच्या चौकटी घातल्या. सुरक्षेसाठी बंधनांची आवश्यकता असते. स्वीकारलेली काही बंधने संस्कृतीचं संचित असते. टिकाऊ असेल ते स्वीकारणे आणि टाकाऊ असेल ते अव्हेरणे, म्हणजे परिस्थितीचे सम्यक आकलन असते. स्वतःला जाणणे असते, तसे दुसऱ्याला समजून घेणेही असते. यासाठी माझ्या मीपणाची ओळख प्रथमतः माणसाला घडणे गरजेचे असते. माझ्यातील ‘मी’ची व्याप्ती कमी करणे म्हणूनच आवश्यक असते. मी व्यवहाराचा केंद्रबिंदू होतो, तेव्हा संस्कृती संकुचितपणाची वसने परिधान करून वावरते. अशावेळी स्वतःचा चेहरा कितीही सुंदर असला आणि समाजाचा चेहरा काळवंडलेला असेल, तर वैयक्तिक सुंदरतेचे मोल शून्य असते, नाही का?
***

13 comments:

  1. सुरेख स्पष्टीकरण आहे ,सर। जे मी या परिस्थिती चे निरीक्षण केले आहे, मला वाटतं आपण धर्माने कोणीही असू, पण आचरणात मात्र बोधित्व असणे आजच्या काळात गरजेचं झालं आहे।धम्माला धर्म म्हणून न बघता जीवनजगण्याचा मार्ग म्हणून पहिले पाहिजे।अष्टांगाचा स्वीकार आणि अंतरात्म्यात एकरूप होणे हे प्रत्येक प्रश्नाच उत्तर आहे।पाहू, जमेल का नाही असे।

    ReplyDelete
  2. सुरेख स्पष्टीकरण आहे ,सर। जे मी या परिस्थिती चे निरीक्षण केले आहे, मला वाटतं आपण धर्माने कोणीही असू, पण आचरणात मात्र बोधित्व असणे आजच्या काळात गरजेचं झालं आहे।धम्माला धर्म म्हणून न बघता जीवनजगण्याचा मार्ग म्हणून पहिले पाहिजे।अष्टांगाचा स्वीकार आणि अंतरात्म्यात एकरूप होणे हे प्रत्येक प्रश्नाच उत्तर आहे।पाहू, जमेल का नाही असे।

    ReplyDelete
  3. रमाकांत, आभार!

    ReplyDelete
  4. आधुनिकतेचा ध्यास धरलेल्या परंतु भरकटत चाललेल्या समाजमनाचे वास्तव चित्रण.फारच छान सर.

    ReplyDelete
  5. माणूस प्रचंड आत्मकेंद्री झाला आहे .... त्यामुळे तो स्वत:च्या अस्तित्वालाच सर्वस्व मानतो ... अस्तित्वाच्या लढाईत मात्र तो माणूसपण विसरून पशुवत जीवन जगण्यात धन्यता मानू लागला आहे याचं प्रत्यंतर पावलोपावली जाणवते दुर्दैव इतकेच यात सुशिक्षितांचीच संख्या लक्षणीय आहे ..... सर अप्रतिम आणि पुन्हा एकदा संतुलित लेखन

    ReplyDelete
    Replies
    1. सर खूप छान आणि वास्तव वर्णन.आज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित प्रवृत्ती समाजात वाढत आहे आणि माणूसपण गारठत चाललंय....

      Delete
    2. सर खूप छान आणि वास्तव वर्णन.आज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित प्रवृत्ती समाजात वाढत आहे आणि माणूसपण गारठत चाललंय....

      Delete
    3. प्रवीण, आभार!

      Delete
  6. सध्याच्या समाजस्थितीचे वास्तवपूर्ण विश्लेषण. तुम्ही फेसबुकवर का नाही टाकत?

    ReplyDelete
    Replies
    1. मुकुंदजी, मनःपूर्वक आभार!
      सरजी, संपूर्ण लेख फेसबुकवर नाही देत; पण ज्या दिवशी लेख ब्लॉगवर पोस्ट होतो त्याच दिवशी संबंधित पोस्टचा सारांश लिंकसह फेसबुक पेजवर दिलेला असतो.

      आपणासारखा वाचनस्नेही मित्र या निमित्ताने मला मिळाला. माझी श्रीमंती आणखी वाढली. हा स्नेह निरंतर राहो, हीच अपेक्षा.

      Delete