Manachi Manogate | मनाची मनोगते

By
मी:

तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडाशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर आतापर्यंत अशा किती गोष्टी हरवल्या आणि गवसल्या असतील, ते इतिहासाच्या पानात विसावलेल्या काळाच्या तुकड्यांनाच माहीत. आयुष्याच्या वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले आणि हरलेले, असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण सगळ्यांच्या ललाटी पुन्हा प्रकाशण्याचे प्राक्तन नियतीने लेखांकित केलेलं नसतं.

तो आणि ती एकाच रस्त्यावरून मार्गस्थ झालेले प्रवासी की, पात्राच्या मर्यादांचे तीर धरून समांतर धावणारा प्रवाह. वाहणे सोबत, पण समर्पणाच्या अथांग दर्यात विसर्जित होऊन एकरूप न होणारे. की प्रवाहात पडल्याने काही काळ सोबत करीत निघालेले, पण उसळत्या लाटेच्या दुर्दैवी आघाताने विलग होऊन अनामिक दिशेने ढकलले गेलेले. वाहणे होते, पण सामावणे नव्हते. की वावटळीत दिशा हरवून बसलेल्या गवताच्या पात्यासारखे, नुसतेच भिरभिरत राहणारे. यांच्या असण्या-नसण्याला कुणी काही म्हटले, तरी काळाच्या मनातील गणिते काही वेगळीच असतात. तो त्याच्या मर्जीने जीवनाच्या सारीपटावर सोंगट्या सरकवीत असतो.

तो आणि ती तुमच्या माझ्यापेक्षा काही कोणी वेगळे नव्हते आणि अलौकिक तर नव्हतेच नव्हते. चारचौघांसारखे आणि चारचौघातले एक. पण शोधले तर चारचौघांपासून वेगळेही. हे वेगळेपणही शोधलंच तर निराळे आणि नाहीच शोधलं, तर सामान्यांसारखे. असं असूनही यांचं चारचौघांपासून वेगळं असणं हीच त्यांच्या वेगळेपणाची ओळख. काय वेगळं होतं यांच्यात? आता वेगळंच करायचं प्रवाहापासून, तर तो आणि ती किंवा ती आणि तो जोडी कुठल्याही क्रमसंगतीने जुळवली तरी उत्तर एकच. मग यांना वेगळं करण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न साहजिकच मनात येईल. यांच्या असण्याला निर्देशित करणाऱ्या अक्षरांच्या कानामात्रावेलांटीला स्वतंत्र आकार म्हणून वेगळं म्हणायचं, बाकी वेगवेगळ्या कोनात शोधूनही वेगळं काही हाती लागणं अवघडच. पण हे वेगळेपणही पुन्हा एकाच अक्षावर आणून उभं करणारं. खरंतर दोघांनाही वेगवेगळ्या वाटांनी येऊन एकाच वळणावर आणून जुळवणारं होतं.

यांचं सोबतीने जुळणं ठरवून निवडलेला प्रवास होता, निव्वळ योगायोग होता, की नियतीने नियत केलेला मार्ग होता, की निसर्गाने त्याच्या नियमांचे अनुमान काढण्यासाठी केलेल्या प्रयोगाची पात्रे होती ही. नक्की काय ते सांगणे अवघड. म्हणून प्रत्येकाने आपल्या आस्थेने अर्थाच्या आशयांना समजून घेणे अधिक संयुक्तिक. पण यापैकी नक्कीच काहीतरी होतं. या काहीतरी शब्दात बरंच काही सामावलेलं. सरळ रेषेत बघण्याची सवय असणाऱ्या नजरेला हे दिसणं जरा अवघड. सरळसरळ सांगायचं, तर तो आणि ती एकमेकांना एकमेकांसाठी घडवलं आहे, असं समजण्याचा प्रमाद करीत होते. अनेक जण करतात, यांनीही केला. पण घडणाऱ्या प्रमादाला देखणेपणाची रुपेरी किनार होती. यांच्या वर्तनात संकेतांच्या चौकटींना ध्वस्त करू पाहणारे प्रश्न होते; पण विचारांत विचलित करणारा संदेह नव्हता. यांच्या नजरेला जगण्याचं नितळपण लाभलं होतं; पण पाहणाऱ्यांच्या नजरांना ते मिळालं नव्हतं. जिथे कुतूहलाची उद्गारचिन्हे अंकित व्हावीत, तिथे संदेहाची प्रश्नचिन्हे संशयाचा गढूळलेला अंधार निर्माण करीत होती.

अडीच अक्षरांची सोबत करीत प्रकटणारा एक आशयघन शब्द- प्रेम. अर्थाचे किती पदर, संदर्भांच्या किती कोमल कळ्या, आशयाच्या उमललेल्या किती पाकळ्या, आकलनाचे किती बिंदू, जगण्याचे किती अर्थ या एका शब्दांत सामावलेले आहेत. संदर्भांच्या पाकळ्या ज्याला उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. कारण असं वेड मुळात रक्तातच असायला लागतं. एकदाका ते धमन्यांतून वाहू लागले की, थांबायला अवधी असतोच कुठे. हा प्रवास मेंदूपासून मनाकडे घडत नाही. याचा प्रारंभ मनातून होतो आणि शेवट मनातच. म्हणूनच कदाचित भावनांच्या आवेगात अवरुद्ध झालेल्या मनाने घेतलेल्या निर्णयांना चुकण्याचा शाप असावा. मनातल्या मनात समीप राहण्याचं प्रत्यंतर प्रेमात पडलेल्यांना येत असावे. पडणे कदाचित अपघात असू शकतो. कुणाच्या मते गफलत असू शकते. काहींच्यासाठी समस्या किंवा फार थोड्यांच्या मते सुखांचं अंगणभर पसरलेलं चांदणं असू शकतं. काहींना हे सगळं अविचार वगैरे वाटेल, कोणाला आणखी काय काय. पण प्रेम परगण्यात विहार करणाऱ्यांना एवढा विचार करायला उसंत असतेच कुठे आणि असली तरी समजून घेण्याएवढे शहाणपण उरलेलं असतंच कुठे.

तर, तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहत होते. वाऱ्यासोबत गाणी गात होते. पावसात भिजत होते. फुलांसोबत खेळत होते. पाखरांसोबत उडत होते. फुलपाखरांच्या पंखात रंग भरत होते. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणांच्या वर्षावात नाहत होते. चंद्राच्या प्रकाशात मनातलं गुज कथन करीत होते. चांदण्यांच्या सोबत बोलत होते. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित होते. स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत होते. उगवणारा दिवस आनंदाची पखरण करायचा. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करायच्या. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार कधी मनात उगीचच काहूर उठवायचा. संधिप्रकाशाचा हात धरून मावळतीच्या क्षितिजावर रंगांनी केलेली उधळण मनात आस्थेचे हवेहवेसे रंग भरायची. मनात दाटून आलेल्या अनामिक अस्वस्थतेने कधी कातरवेळा कातरकंप करायच्या. हो, हे सगळं वेडं असल्याशिवाय घडत नाही. म्हणून ते वेडेच होते. तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी साकोळून ठेवलं, काहीच आठवत नाही. नेमका प्रारंभ कुठून आणि कुणाकडून झाला, शोधूनही उत्तरे हाती लागली नाहीत. मग घडलंच कसं हे सगळं? असा कुठला चुकार क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा. अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी. असे कोणते बोल होते, जे एकच गीत गात होते. असा कोणता नाद होता, जो एकच तराणा छेडीत होता. नाहीच सांगत येणार. पण कुठल्यातरी गाफील क्षणी हे घडले आणि त्यांचे प्रत्येकक्षण आसुसलेपण घेऊन प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहिले.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेम परगण्यात विहार करायला कसली आलीयेत वयाच्या मर्यादेची वर्तुळे. उमलतं वयचं वादळविजांचं. या स्वप्नाळू वयाच्या आसपास दोघेही. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत होते. तसं हे वय झोपाळ्यावाचून झुलायचे. दोघेही झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. आभाळ त्यांना खुणावत होतं. वारा धीर देत होता. मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या संदर्भांचा शोध घेता घेता मनंच कधी चोरली गेली, कळलंच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल. मनात विसावलेल्या वेगळ्या वाटेने वळणं त्यांनी निवडलं. धावले तिकडे. रमले. जगाच्या गतिप्रगतीच्या पाऊलखुणांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत राहिले. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधू लागले.

तो- देखणेपण नियतीकडून घेऊन आलेला. किंचित उजळ वर्ण. वर्णाला साजेसा देह. रेखीव चेहरा. चेहऱ्यावर प्रसन्नतेची पाखरे सतत किलबिलत राहणारी. सरळ दिशेने चालत येऊन चेहऱ्यावर विसावलेल्या नाकाने देखणेपणाला अधिक कोरीव केलेलं. डोळ्यांच्या डोहात अथांगपण सामावलेलं. उंची आणि पिळदार देह देखणेपणाची गणिते आधीच करून सोबतीने आलेले. देखणेपणाला सहजसुंदर बोलण्याची मिळालेली देणगी समोरच्याच्या मनावर गारुड करणारी. शब्दांच्या लाघवाने मंत्रमुग्ध होणारी मने मोहात पडावी असं वागणं. कदाचित काहींना नियतीच देखणेपणाचा साज चढवून इहलोकी पाठवत असावी.

ती- या दोघांमध्ये रंगरुपाने डावा कोण आणि उजवा कोण याची तुलना करण्याचा मोह व्हावा असे. त्याच्याशी तुलना करताना गौरकांती विशेषण कदाचित तिच्याबाबत वापरता आले नसते, पण तिच्या सावळेपणातही एक आशयघन अर्थ दडलेला. नितळ अंगकांती तिच्या सौंदर्याचे परिमाण परिभाषित करायला पुरेशी होती. वाऱ्याच्या संगतीने खेळणारे काळेभोर केस. टपोऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये खच्चून भरलेलं खट्याळपण. धनुष्यालाही हेवा वाटावा अशा भुवया निसर्गानेच कोरून ठेवलेल्या. पापण्यांच्या पंखात दडलेली डोळ्यांची पाखरे सतत काहीतरी वेचत असायची. कोणीतरी कोरून रचलेल्या कण्यांसारखी शुभ्र दंतपंक्ती. चाफेकळीने लाजून चूर व्हावे असे नाक. उमलत्या वयातही अवखळपणाचा झरा झुळझुळ वाहत होता. संमोहनाच्या क्षितिजावर नेऊन भटकंती करायला लावणारं, मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य. सुंदरतेची सारी परिमाणे परत पारखायला लावणारं. देहाच्या आकृतीला कमनीय बांध्याचा लाभलेला थाट आणि या सगळ्या सरंजामासह जगण्यात सामावलेला बेधडकपणा. समोरच्या प्रसंगाला थेट भिडायचं धाडस. स्व-तंत्राने वर्तने. प्रसंगी काहीसं बेफिकीर असणं आणि तसंच जगणंही. कोण काय म्हणेल, म्हणून कधी काळजी न करण्याएवढा बिनधास्तपणाही.

मुग्ध वयाच्या वाटेने सोबत करीत निघाले दोघेही. मुक्कामाचे ठिकाण माहीत नसून चालत राहिले. आमंत्रण देणाऱ्या चोरट्या कटाक्षांपासून झालेला प्रारंभ आव्हानापर्यंत आणि तेथून आणाभाकांपर्यंत पोहचला कधी दोघांना कळलेच नाही. कधी कळत, कधी नकळत, कधी ठरवून घडणाऱ्या या प्रवासाचा शेवट काय असेल, त्यांनातरी कुठे माहीत होतं. आस्थेचे रेशीम गोफ विणले जात होते. अनामिक हुरहूर, आस, तगमग, ओढ शब्दांना असणारे अर्थ अंगभूत आशय घेऊन कोशात बंद होते. पण नवा आशय, नवे अर्थ दिमतीला घेत यांच्या जीवनकोशात अलगद येऊन सामावले कसे, ते कळले नाही. समजून घ्यायची निसर्गाने संधी दिली. सावध करण्यासाठी वारंवार दस्तक देऊनसुद्धा त्याकडे पाहणे जमलेच नाही. समजून घ्यायची आवश्यकताच वाटली नाही. संकल्पनांच्या पटावर आपला आशियाना उभा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांकडे इतर गोष्टी समजून घ्यायला तसाही अवधी असतोच कुठे. दबक्या पावलांनी चालत आलेल्या आस्थेने आपला अधिवास दोघांच्या अंतरी शोधला.
 
तो:

‘मनाची मनोगते मेंदूला बहुदा कळत नसावीत. कळली तरी वळत नसावीत आणि वळायचा प्रयत्न केला, तरी मन त्याला दाद देईलच असं नाही, हेच खरं.’ कुणीतरी असं काहीतरी सांगायचं, तेव्हा कुतूहल वाटायचं या सगळ्या शब्दांचं. मला तरी कुठे ठाऊक होतं, असं काही माझ्या जगण्याचा अनिवार्य भाग होईल एक दिवस म्हणून. समाज नावाच्या प्रवाहाचे तीर धरून वाहणारा अनेकातला मीही एक, चारचौघांसारखा. माझं वागणं माणसांहून आणखी काय वेगळं असणार आहे. गुंता माणसांच्या जगण्याच्या वाटेवरील अनिवार्य आवश्यकता असावी बहुतेक. तसंही प्रत्येकाचे गुंतेही वेगळेच की. नावे वेगळी आणि समस्याही निराळ्या. तसेही जटिल गुंत्यात गुरफटणे कोणाला आवडेल? पण काही गुंतेच इतके गोड असतात की, ठरवूनही त्यांचा मोह टाळता येत नाही.

व्यवस्थेच्या अफाट पसाऱ्यात नजरेत भरण्याएवढ्या अस्तित्वाच्या ठळक खुणा शोधूनही न सापडणारा मी एक. पण कसा कोण जाणे, या बिंदूवर येऊन विसावलो. नजरेला नजर भिडली. विसावलेल्या क्षितिजावर एक बिंदू कोरला गेला. त्याच्या असंख्य शक्यतामधून एक रेघ ओढली गेली. कळत असेल किंवा नकळत असेल, काही म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. पण फरक पडायला प्रारंभ झाला, जेव्हा ही रेघ नजरेत सामावण्याएवढी ठळक होत गेली. मोहाच्या मधुर ओढीने वाढत गेली. गुंत्याचे बहुपेडी गोफ विणले जात होते. विणलेल्या धाग्यांचा शोध घेऊनही हाती भले मोठे शून्यच लागत होते. देहात उसळणाऱ्या लाटा किनारा कवेत घेऊ पाहत होत्या. कोणत्यातरी चुकार क्षणाने पारध केली. घाव थेट काळजावर आणि भळभळणारी जखम तीव्रकोमल संवेदना घेऊन वाहत राहिली, स्वतःचा किनारा शोधत, समोर दिसणाऱ्या अथांग दर्यात विलीन होण्यासाठी. उसळता दर्या आपलासा वाटू लागला. त्याच्या नाचणाऱ्या लाटा आमंत्रित करीत होत्या. त्याची गाज सुरांचे साज लेऊन सजू लागली.

घरपरिवार, स्नेहीसवंगडी आदि नात्यांचे तीर धरून प्रघात नीतीच्या परिघात वाहणारा प्रवाह अनपेक्षित वळण घेऊन गवसलेल्या उताराच्या दिशेने वळता झाला. दूरच्या क्षितिजावर दिसणाऱ्या अथांगपणाचे आकर्षण वाटू लागले. खरं सांगू, तिच्या अभिमंत्रित पाशात मन कधी कैद झालं कळलंच नाही. तिचा अटकर बांधा संवेदनांना खुणावू लागला. शब्द कोमल सुरावटी वाटू लागल्या. तिचं क्षणभर दिसणंही मोरपीस बनून देहावरून फिरू लागलं. तिलाही याची जाणीव असेल का, म्हणून उगीचच स्वतःच स्वतःला हजार प्रश्न विचारू लागलो आणि उत्तरेही स्वतःच देऊ लागलो. तिच्या एका कटाक्षासाठी मन झुरणी लागायचं. नजरेचा ओझरता स्पर्शही किती आनंददायी वाटायचा. सवंगडी सोबत असूनही त्यांच्या सोबत नसणारा मी तिचा कधी झालो, माहीत नाही. देहाने त्यांच्यासोबत असायचो, पण मनाने तिच्याभोवती भ्रमरासारखा भटकायचो. मित्रांना हे सगळं दिसत नव्हतं, असं नाही. याची जाणीव झाल्यावर उगीचच विकतचं दुखणं घेऊ नको, म्हणून सावध करण्याचे का कमी प्रयत्न त्यांनी करून पाहिले. पण इशारा समजून घेण्याएवढे जागेपण असायला लागते ना विचारांत. ते तर कधीच हरवले होते, माझ्या ओंजळभर जगण्यातून. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. निमित्त शोधत राहिलो तिला पाहण्याचे, भेटण्याचे. भिरभिरणारी नजर तिलाच तर वेचत असायची.

अवखळ झऱ्यासारखी वाहत राहायची तीही. वाऱ्याच्या शीतल झुळकेसारखी अलगद यायची आणि हळूच पसार व्हायची. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाताना पावलं उगीचच मंदावयाची. डोळे शोधत राहायचे इकडेतिकडे तिला. तिला हे कळत नव्हतं का? नाही, सगळंच तिला ठाऊक होतं. तिनेच तर या वाटेवर चालायला निमित्त दिलं होतं. परीक्षा शब्दाचा अर्थ तिला चांगला ठाऊक होता. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर माझ्या सहनशीलतेचा ती मुद्दामहून अंत पाहत होती. तिचे विभ्रम मनात अनेक प्रश्न चिन्हांकित करीत होते. तिच्या गल्लीतून जाण्यासाठी नसलेली निमित्ते शोधली जात. कुठलंही कारण तिथे रेंगाळायला पुरेसे असायचे. तिच्या नजरेचा ओझरता स्पर्शही किती सुखद वाटायचा. मैत्रिणींसोबत बोलण्याचा बहाणा करून ती बघायची, तेव्हा मन किती सैरभैर व्हायचे. देहावर उमललेला मोहर मनाचं आसमंत गंधित करायचा. कधी मी दिसलो की, उगीचच दाराआडून बघायची. हे मला दिसत नव्हतं, असं नाही; पण मी तुझ्याकडे पाहिलेच नसल्याचे दाखवतांना किती कसरत व्हायची माझी. मला कळत होतं, तसं तिलाही. काहीतरी अनामिक, पण मनातून हवं असणारं घडत होतं. पण एकमेकांपर्यंत पोहचायची वाट सहजी हाती लागत नव्हती. मनात अवकाळी वसंत बहरून आला. प्रेमाची अगणित सुमने उत्फुल्लतेची वसने परिधान करून मनाच्या डाहळ्यांवर झुलत होती. वारा सांगावा घेऊन वाहत होता. पानाआड दडलेल्या कोकिळेचे कूजन ओथंबलेपण घेऊन साद घालीत होते. प्रतिसादाचा प्रतिध्वनी परिसराच्या परिघावरून उगीचच प्रदक्षिणा करीत होता. वारा झुरणी लागल्यासारखा वेडावून धावत होता.

उगवणारा सूर्य उमेदीच्या किरणांची पखरण करीत होता. हिवाळ्याच्या बोचऱ्या थंडीत भेटीची ऊब शोधली जायची. गवताच्या पात्यांवरून ओघळणारे दवबिंदू हाती पकडून ठेवण्याचा वेडा मोह टाळता येत नव्हता. पावसाची रिमझिम मनाचं आसमंत चिंब भिजवून सचैल स्नान घडवीत असे. माती तृप्ततेचा गंध सोबत घेऊन परिसर गंधित करीत होती. श्रावणातला ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ प्रेमाच्या वाटांना घनगर्द करीत होता. तरारल्या पिकांचा गंध गुजगोष्टी करू लागला. पौर्णिमेचे चांदणे देहावरून पखरण करीत होतं. शुष्क उन्हाळाही आठवणींच्या झळा घेऊन येत होता.

सांजसकाळ जगण्याचे नवे अर्थ शोधत राहिलो. मनात वाढणारं प्रेमाचं रोपटं ऋतूंसोबत बहरत राहिलं, आकाशाशी हितगुज करीत मिलनाची स्वप्ने पाहत. सृष्टीच्या सर्जनाच्या सोहळ्यात मी डुंबत राहिलो, पण पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधून पहावं असं कधी वाटलं नाही. कारण समोर दिसणाऱ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आमच्या सहवासात दडली असल्याचे वाटत होते. प्रश्न आणि त्यांची उत्तरे आमच्यापुरती हाती होती; पण नियती आपल्या हाती सूत्रे घेऊन नवे खेळ खेळत होती, याचं भान कधी राहिलेच नाही. राहीलच कसे, मनाने विचारांवर कधीच अंमल प्रस्थापित केला होता. आम्हांला विचारांचं सरलपण लाभलं होतं; पण व्यवस्थेला सरळ कधी चालता येतं नाही, हे सत्य आम्ही सोयीस्करपणे विसरलो होतो. परिणाम व्हायचा, तो झालाच.

ती:

का, कधी, कसे, कशासाठी या सगळ्या प्रश्नचिन्हांची उत्तरे मी उगीचच शोधत राहिली. शोधण्यासाठी मनाची माती खोल खोल खोदत राहिले. पण एवढे करूनही उत्तरांचा एक तरी विकल्प माझ्या हाती लागला का? नाही, कारण विकल्प असतात आणि त्यांना पडताळून पाहावे लागते, याचेही भान जागे असायला लागते ना! आम्ही मनाने जागे होतोच कुठे. का केले मी हे असं? अशी कोणती अनामिक आस मला त्याच्याकडे ओढून नेत होती? तो दिसावा म्हणून मन उगीच का झुरणी लागतं होतं? आसपास एवढी सगळी माणसे असतांनाही याच्यातच असं काय होतं की, मी त्याच्याकडे ओढत गेली? मनापासून की मनाविरुद्ध?

सुरवात कदाचित अपघात असेल. पण चूक तर माझीही होती. प्रमाद घडायचा होता. घडला. त्याचे बरेवाईट परिणाम घडणारच होते. या सगळ्या प्रकाराची अंधुकशीही जाणीव मनाला नसावी का. काय म्हणावे माझ्या अशा वागण्याला? परिणामांना सामोरे जाण्याची तयारी का केली नसेल मी? आज मन उगीच खंतावत आहे. स्वतःवर चिडत आहे. पण आता चिडून काय उपयोग. मनाला हजार वेळा बजावत होते. नाहीच या रस्त्याने धावायचे म्हणून संकल्प करीत होते. निर्धार करूनही त्याच्याकडे वेड्यागत धावत होते मी. हो, मीच केवळ मीच कारण याला, म्हणून त्रास करून घेत होते. तो आवडला मला, बस्स! का? याचं उत्तर माझ्याकडे तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. बहुदा त्याच्याकडेही. पण काहीतरी खासच असेलना त्याच्यात, म्हणून मनाला मोहिनी पडली. कुणीतरी गारुड केल्यागत त्याचीच मूर्ती मनाच्या कातळावर कोरीत राहिली. आकार देणाऱ्या अनेक आघातांनी आखलेल्या या आकृतीच्या रेषा थोडीच मिटता येणार होत्या. नको मिटू देत! नकोच मिटायला. मला याच आखीव आकारात आयुष्याच्या आस्थेचे अनुबंध शोधायचे होते. जगण्याचे ऋतू सांभाळून त्यांचे सोहळे साजरे करायचे होते.

तुला कदाचित नसेलही याची वार्ता. तसं आपण रोजच एकमेकांना दिसायचो. पण त्या दिसण्यात, पाहण्यात सहजपण होतं. वाढत्या वयाच्या वाटेने देहाला चैतन्याची पालवी फुटली. डाहळ्या शहारून आल्या. अंकुरणारी पालवी स्वप्नांचे रंग घेऊन सजू लागली. सजण्याचा सोहळा साजरा होत होता. स्नेहाचे साकव त्यावर कधी घातले गेलेत, समजलेच नाही. आपणच आखलेल्या पथावरून धावताना धापा टाकत राहिली. मृगजळाच्या शोधात वणवण करीत राहिली. आपलेपणाचा ओलावा शोधत राहिली. मातीत मुळं खोलखोल रुजावी, तसं तुझं असणं माझ्या मनात, देहात रुजत गेलं. आस्थेचा ओलावा शोधत मुळं मातीला घट्ट बिलगावी तसं. तुला हे सगळं कळलं, तेव्हा तू किती खुलून आला होतास अन् मी किती मोहरले! पहिल्या चोरट्या स्पर्शाने देहातून वीज सळसळून धावली. तुझ्या थरथरत्या स्पर्शाने केलेली किमया मनातून कधीच मिटवता आली नाही. आज इतक्या वर्षानंतरही मी हे सगळं का विसरू शकत नसेल?

तुझ्या सहवासासाठी आसुसलेली मी... आणि तू... तू नेहमीच अंतर राखून राहिलास. खरंतर तुझ्या गात्रांची थरथर मला जाणवत नव्हती, असे नाही. तुझ्या मनाची स्पंदने टिपण्याइतकी मी संवेदनशील नक्कीच होते. संमोहन शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता का? की तुलाच तो अधिक समजला होता? बंधनांच्या चौकटी पार करून बाहेर पडण्याइतपत मी धाडसी होते का? की विचार करायचं विसरले होते? की मनाची मनोगते माझ्या भाववेड्या मनाला कळत नव्हती, म्हणून अविचाराने कृती घडत होत्या? माझ्या अशा वागण्याचा तेव्हा तू कोणता अर्थ लावलास, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आज तू याला काय समजतो? तुलाच माहीत. पण मनांच्या मनोगतांचा प्रवास जर सोबतीने घडत होता, तर मी मला एकटीला का म्हणून अपराधी मानावं? मनाच्या मातीतून उगवलेल्या रोपट्यांना मर्यादांच्या कुंपणाने बंदिस्त करू पाहत होता. आपल्याभोवती रेषा ओढून तू जाणवणाऱ्या; पण न दिसणाऱ्या चौकटी आखून घेतल्या आणि त्यांना ओलांडण्यासाठी कधी बाहेर पडणारे एक पाऊल उचलले नाहीस. ही तुझ्या संस्कारांची आणि माझ्या मर्यादांची सीमा असेल कदाचित.

तू भेटत राहिलास. तुलाही ते आवडायचेच की. माझ्यासाठी तुला कासावीस होतांना पाहिले नाही, असे तुला वाटते का? तसं असेल तर तो तुझा गोडगैरसमज. या सगळ्यासाठी मी जितकी जबादार असल्याचे दिसते, तेवढंच तुझंही असणं नाही का? तू भेटत राहिलास. कधी मी हट्टाने भेटण्यासाठी तुला बाध्य करीत राहिली. तुझ्या खऱ्याखोट्या नकाराने भांडत राहिली. तुझ्या लटक्या रागाने त्रागा करीत राहिली. तरीही तू शांतच. कसं जमलं तुला हे सगळं? तुझी घालमेल दाखवत नसला, तरी जाणवत होतीच. तुझ्या स्पर्शाची भाषा मला कळत होती. पण मन मानायला तयार होतेच कुठे? वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यावर झुलणाऱ्या माझ्या केशसंभारात तू हरवत होतास. शेजारी लगटून बसताना कोसळण्याच्या कड्यावर उभा राहून सावरत होतास स्वतःला. हिरवाई घेऊन पळणाऱ्या पाउलवाटेने चालताना कायकाय विचार करीत होतास. शेतात भराला आलेल्या पिकांचा गंध वेडावलेपण देहात उतरवत होता. क्षितिजावर कमान धरणाऱ्या इंद्रधनुष्यातल्या रंगाना जगण्यात सामावू पाहत होतास. रात्रीच्या अंधारात हसणाऱ्या चांदण्यांच्या ठिपक्यांना जोडत तू स्वप्नांच्या चौकटी आखत होतास. जुळणाऱ्या आकारात मनातल्या संकल्पित आकृत्या साकारत होतास. अन् मी वेडावल्यागत तुझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून आकाशाशी हितगुज करीत होती. गाणाऱ्या पक्षांना माझ्या मनीचे गुज कथन करीत होती.

तुझ्या सहवासाची कोणतीच संधी सोडायला मी तयार नव्हते. नुसत्या डोळ्यांवर नाही... मनावर नाही... तर विचारांवरसुद्धा तुझ्या प्रेमाची पट्टी ठरवून घट्ट बांधून घेतली आणि तुझं तरी याहून काय वेगळं होतं रे! तुझ्याशिवाय मला काहीही बघायचं नव्हतं. मला तुझ्याशिवाय काहीच दिसत नव्हतं मान्य, पण तू... तुला तरी दुसरे काही दिसत होते का? हे सगळं खरं असलं, तरी जगाला सगळं दिसत होतं. किती दिवस तू मला, मी तुला आणि आपण जगाला एकमेकांपासून लपवलं. पण घडायचं ते घडलंच. प्रेम नावाच्या अध्यायाचा अंत अटळ असतो. तो घडणार होता, घडला. पण एवढ्या लवकर निर्णायकी येईल, असं नव्हतं वाटत. आणि घडला म्हणून कोसळून जायला मी आणि तू काही एवढे अविचाराने वागणारे नव्हतो. आयुष्य डावावर लाऊन जगणंच उधळायला निघालेलो नव्हतो. टोकावर उभं राहून कडेलोट करून घेण्याएवढे व्यवहारशून्यही नव्हतो. आलेल्या परिस्थितीला स्वीकारण्याइतके, ओंजळभर का असेना, शहाणपण दोघांत होते.

वाईट वाटले. तगमग झाली. अस्वस्थपणही सोबतीला राहिलं. पण म्हणून विरोध केला असता तर कदाचित काय घडले असते, ते काळालाच माहीत. आपल्या पावलांनी चालत आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचे आनंदपर्यवसायी शेवट फार कमी असतात. सुखसंवेदनांनी बहरलेल्या ताटव्यात नियती आपणास नेण्यास तयार नव्हती. अनेकांच्या कथेचा अंत झाला, तसा आपल्या कथेचासुद्धा. तेव्हा वाटले आपलं काहीतरी आपल्याकडून निसटल्याचं, हरवल्याचं. त्या वेदना अंतरी सल बनून जखमा करीत राहिल्या. वाहत राहिल्या तशाच. पण काळ खूप गमतीदार असतो नाही का? बऱ्याच गोष्टी विसरायला लावतो तो माणसांना. म्हणून आज काही वाईट वगैरे वाटत नाही. मग कुणी म्हणेल, हा सगळा खटाटोप केलाच का तुम्ही? याचा अंत अटळ होता, तर या गुंत्यात गुरफटलातच का? की निसर्गदत्त आकर्षणाचा भागच अधिक असल्याने अशा अंताची खंत नाही वाटली तुम्हाला? यांना काय माहीत, निसर्गाच्या सगळ्या नियमांना पुरून उरलोच ना आपण. मोहाचे अनेक क्षण टाळले. त्याच्या अनेक उर्मी परतवून लावल्या, अगदी निर्धारपूर्वक. त्यांना भिक न घालण्याइतका संयम सोबत होता म्हणूनच ना! आज इतक्या वर्षानंतरही प्रतारणा, फसवणूक या शब्दांना आपल्या जगण्यात निदान याबाबत तरी जागाच नाही. याचा अभिमान वाटावा असंच जगलो आहोत आपण. हेही आपल्या सहवासातून हाती आलेलं शहाणपणच, नाही का?

तो आणि ती:

उमलत्या वयाच्या पदरी प्रेमाचं दान पडत असावं का? ते सगळ्यांच्या वाट्यास येते की नाही, माहीत नाही. पण आपल्या आयुष्यात आलं. जगण्यात सामावलं. निदान याबाबत आपण नशीबवान म्हणायला हरकत नाही. खरंतर आपण एकमेकांकडे आकर्षिले गेलो, ते वय प्रेम वगैरे समजायचं होतंच कुठे. कदाचित निसर्गाचे प्रयोजन असेल. पण निसर्गाच्या नियमांपेक्षा नीतीच्या चौकटींचे भक्कम कुंपण असल्याने असेल, निसरड्या वाटांवरून चालताना घसरून पडायचे अनेक क्षण होते; पण घसरलो नाहीत. हे आपण दोघांशिवाय कुणाला ठाऊक आहे? जगाची नजर कोणत्या विचारांनी तुमच्याकडे बघते, यावर आपले नियंत्रण असतेच कुठे. त्यांनी समजायचे आणि समजून सोयिस्कर अर्थ लावायचे, ही रीतच.

विषय ज्यांच्या मनाच्या दलदलीत अधिवास करून आहेत, त्यांच्याकडून मकरंदास्वादाची अपेक्षा कशी करावी? काय नाही केलं त्यांनी आपल्यात अंतराय निर्माण करण्यासाठी. घर, घराणे, कुल, जात, परिस्थिती किती किती भिंती... उध्वस्त करायचा प्रयत्न करून टवकाही न उडणाऱ्या. शेवटी हताश, गलितगात्र. झाले ते योग्य की, अयोग्य हा भाग अलाहिदा. आपल्या सुखांची सूत्रे आणि वेदनांची तीर्थक्षेत्रे वेगळी होतीच कुठे. सुरवातीला खूप अवघड होतं, हे सगळं पार पडायला. तू किती सहजपणे सगळं विस्मृतीच्या कोशात टाकून दिलंस हे! म्हणतात पुरुष ठाम असतात. कठोर वगैरे असतात. पण मला वाटते सगळेच तसे नसतात गं! तू वागली ते योग्यच वाटते वयाच्या या पडावावर उभं राहून भूतकाळाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावून पाहताना. तुझ्या जागी मी असतो, तर इतका पटकन निर्णय घेतला असता का? माहीत नाही. कदाचित नाहीच.

खरं सांगू का, प्रेमाच्या परगण्याकडे प्रवासाचं पहिलं पाऊल मीच तुझ्या दिशेने टाकलं ना! त्या पावलांना गवसलेली वाट मुक्कामाच्या बिंदूवर पोहचेल की, नाही याची अंशमात्र काळजी नव्हती. केवळ तू आणि मी एवढंच मला दिसत होतं. परिणाम काय असतील, याची काळजी करायला अवधीच कुठे होता अधीर मनाला. म्हणूनच काय नाही सोसलं? मैत्रिणींच्या नजरा, समाजाचे टोमणे, नातेवाईकांचे नाके मुरडणे, घरच्यांचा असहकार, प्रसंगी टोकाची भांडणे, अवतीभवती सतत सक्त पहारे. संशयी नजरांच्या कैदेत असूनही डोळे तुलाच शोधत राहिले. तुला बघून साऱ्या वेदनांचे गाणे व्हायचे. आपलं ओअॅसिस हाती लागल्याचा आनंद व्हायचा. आनंदाचं झाड मनाच्या अंगणी वाढवताना वेदना विसरत होते. विरोधाचे वाहणारे शुष्क वारे बदलतील दिशा एक दिवस, सावकाश संपेल हे सगळं, या वेड्या आशेने.

घडू नये ते घडणार होते. नियतीचे ते अभिलेख होते. तुला साधं खरचटलं, तरी जीव तीळतीळ तुटणारी मी. माझं काय, मी सहन करीतच होते. पण तुझ्याबाबत वेडावाकडा विचार स्वप्नांतही करू शकत नव्हते. भलतंसलतं काही घडलं असतं तर... नुसत्या विचाराने काळीज कंप करायचे. म्हणूनच तुला बघणं, भेटणं टाळत गेले, अशक्य असूनही. तुझ्या मनात तेव्हा काय विचार आले असतील, तुलाच माहीत. मला तू विसरावं म्हणून प्रयत्न करीत होते. तू वेडेपण करीत राहिला; पण वेडेपणात टोकाचा अविचार करण्याची शक्यता नव्हती, हे माझ्याशिवाय कोणाला आणखी चांगलं माहीत असणार होतं. या वेडेपणाच्या लाटांना बांध घालणे गरजेचे होते. शेवटी मीच पर्याय निवडला, विसरणं... हो! अवघड होतं, पण आपल्या माणसासाठी अशक्यही नव्हतं. विसरले... हो, ठरवूनच अगदी जाणीवपूर्वक! जुळणाऱ्या बंधांना निदान मनात सजवून ठेवण्यासाठी ते गरजेचे होते. एक सांगू, ते तुझ्या आणि माझ्याही भल्याचंच होतं. कारण जे जुळणारंच नव्हतं, त्या नात्याला उगीचच लेबलं लावून नावे देण्यात काहीही अर्थ नव्हता. असला तरी समाजसंमत संकेतांच्या चौकटीच्या कुंपणांना मान्य होणार नव्हता. जगणं नियतीचं देणं असेल, मन मारून जगणे शाप असेलही; पण मनातल्या माणसासाठी मनाला समजावून जगणं माझ्यामते वरदान असतं, एवढंमात्र नक्की. मग कोणी काय समजायचे ते समजोत, अगदी तूसुद्धा.

...आणि आपण:

कालचक्र चालतच आहे. त्याच्या गतीला सोबत करीत सारेच चालतात. ऋतू येतात आणि जातात. निसर्ग बहरतो, फुलतो आणि उजडतोही. जुनी पाने डाहळ्यांचा निरोप घेतात. नवी पाने अंकुरित होतात. जीवनवृक्षाच्या अंगाखांद्यावर खेळत वाढलेली आठवणींची पाने गळून जातात. शुष्क फांद्या हिरमुसतात, पण काही दिवसांनी त्यांच्या आसपास आस्थेचे नवे कोंब कुतूहलाने डोकावत राहतात. हिरवी स्वप्ने सर्जनाच्या सोहळ्याने सजू लागतात. फुलांचा बहर निसर्ग घेऊन येतो. काही दिवसांनी तोही ओसरतो. दाटून आलेलं आभाळ निथळत राहतं. ढगांच्या ओंजळी रित्या झाल्या की, आकाश मुक्त होतं. त्याचा विस्तीर्ण पट नितळ निळ्या रंगांनी नटू लागतो. तो सोहळाही संपतो. दोनचार चुकार ढग कुठूनतरी चालत येतात आणि आठवणींचा हात धरून उगीचच इकडे-तिकडे विहार करीत राहतात, हरवलेलं काहीतरी शोधत. अवघं आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या पंखांनी विहार करीत कुठून कुठून येऊन मिळत जातात. ओळखीचे पदर धरून वाऱ्याच्या संगतीने वाहत राहतात. सरावाने सहवासाच्या वाटेवर चालत राहतात. एकमेकांच्या पाशात गुंततात. आठवणींचे गोफ नव्याने विणले जातात. आस्थेचे रंग गडद होत जातात. ओथंबून पुन्हा बरसण्यासाठी गारव्याची प्रतीक्षा करीत राहतात.

पात्र बदलतात. प्रसंग तेच असतात. तिच कहाणी नव्या वळणावरून हलक्या पावलांनी चालत येते. आस्थेचे अनुबंध घेऊन काळाच्या कातळावर अंकित होते. यशापयशाचा विचार न करता कृतींची मुळाक्षरे कोरली जातात. परिस्थितीच्या ऊन, वारा, पावसाची सोबत करीत आठवणींचे गोंदण करून कोरलेला कातळ ऋतू झेलत राहतो. कालांतराने कोरलेली अक्षरेही धूसर होत जातात. धूसर होत नसतात समाज नावाच्या व्यवस्थेच्या विचारांवर कोरलेली अक्षरे. त्यांना नष्ट होण्याचा शाप नसतो आणि प्रेमपरगण्यात विहार करणाऱ्यांच्या आठवणींना अमरतेचे वरदान असते.
***

10 comments:

  1. एकमेकांवर अगदी सहज तेवढंच नितळ प्रेम करणाऱ्या या दोन जीवांची होणारी घालमेल,त्यांच्या अपेक्षा ,इच्छा वागणं बोलणं, समाजाचा असणारा अडसर आणि तो समजून घेण्याचा समंजसपणा या सर्व बारीक बारीक गोष्टी अगदी बारकाईने टिपलेल्या आहेत.त्यामुळे लेख उत्कृष्ठ झालेला आहे.👌👌

    ReplyDelete
  2. तो आणि ती.पण तिच्या सावळेपणातही.... सुंदर वर्णन. फारच छान लिखाण.तो(चंद्रकांत चव्हाण)आणि ती(लेखणी) यांच्यातही असेच अतूट नाते आहे.हे नाते असेच बहरत राहो हि शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. पौगंडावस्थेतील प्रत्येक ...हो प्रत्येक तरुण तरुणीच्या बाबतीत घडणारा ...मनावर मोरपीस फिराव असा अनुभव देणारा ...प्रसंग रेखाटतांना आपल्या लेखणीला कमालीचे मोहोरलेपण प्राप्त झालेले दिसते... प्रत्येकाला अरे ही माझीच तर कथा नाही असा भास निर्माण करण्यात आपली लेखणी पूर्णपणे यशस्वी झाली यात तिळमात्र शंका नाही ... संजय पिले

    ReplyDelete
  4. *काही आठवणी विसरता येत नाहीत*,
    *काही नाती तोडता येत नाहीत*.,
    *मानस दुरावली तरी मन नाही दुरावत*,
    *चेहरे बदलले तरी*
    *ओळख नाही बदलत*,
    *वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत*,
    *पावल अडखलली तरी*
    *चालण नाही थांबत*,
    *अंतर वाढल म्हणून*
    *प्रेम नाही आटत*,
    *बोलण नाही झाल तरी* *आठवण नाही थांबत*
    💐💐💐💐

    Very nice and heart touching lines...
    Sir ji great,👍👍

    ReplyDelete
  5. सर तुमचा संपर्क क्र. मिळेल का

    ReplyDelete