Kavita: Kavi Ani Vachakanchi | कविता: कवी आणि वाचकांची

By
चित्र, शिल्प, साहित्यादी कलांचे जीवनातील स्थान नेमकं काय असतं? ते असतं की आपण कलासक्त नाहीत, असे कोणी म्हणू नये यासाठी; केवळ कुणी तसं म्हणालं म्हणून आपणही तसंच सांगतो. की याहीपेक्षा अधिक काही अशा सांगण्यात अनुस्यूत असते. सांगणं जरा अवघड आहे. आसपासच्या गोष्टींकडे पाहण्याचे पैलू प्रत्येकाचे वेगळे असतात अन् त्या अनुषंगाने त्याचे विचार प्रकटत असतात. तसंही व्यक्ती तितक्या प्रकृती, या न्यायाने सगळ्यांना सगळ्याच गोष्टी आवडायला हव्यात असंही कुठेय! कला, क्रीडा, साहित्यातील माणसाला काहीतरी आवडत असतंच. आवडणारं नेमकं काय, हे सांगता येईलच असे नाही. जगण्यासाठी मुलभूत गरजांची पूर्तता होणं आवश्यक असतं. त्यानी देहाचं भरणपोषण होतं, पण मनाचं काय? खरंतर मनाची बैठक वेगवेगळ्या प्रस्तरांवर अधिष्ठित असते. म्हणून त्याला समजून घेताना आधीच ठरवून घेतलेल्या पट्ट्यांनी मोजणं जटिल आहे. आसपास असणाऱ्या गोष्टींच्या आकलनाचे अनेक आयाम असतात. मनाला संपन्न करण्यासाठी अशी विखुरलेली श्रीमंती वेचता यायला हवी.

कलाक्रीडासाहित्य जगण्याच्या परिघाला समृद्ध करीत असतात, याबाबत संदेहच नाही. यांच्याशिवाय माणूस पशूवत असल्याचे म्हटले जाते. नेमकं हेच वेगळेपण माणूस आणि अन्य जीव यांच्यात उभी रेष ओढून माणसाला वेगळं करतं. कलावंत जन्मावा लागतो की घडवता येतो, हा वादविषय असू शकतो. कला सगळ्यांना अवगत असतात का? सगळ्यांना त्यांची समज असते का? हा भाग नंतरचा. हा विचार थोडावेळ वेगळा ठेऊया! खरंतर कलाविहीन जगणं आयुष्याचा प्रवास रुक्ष करण्याचं कारण असतो.

साहित्याच्या परगण्यात विहार करणारा वाचक मुळातच वाचनवेड घेऊन जन्माला येतो की, परिशीलनाने घडतो. की घडवता येतो? कारणे काहीही असोत, वाचक ही साहित्याची सार्वकालिक आवश्यकता आहे, एवढं मात्र नक्की. असं असेल, तर तो सारख्याच योग्यतेचा असू शकत नाही, हेही दुर्लक्षून चालत नाही. लिहित्या हाताना संवेदनशील, सुजाण वाचक मिळणे यासारखे सुदैव नाही. कोणी कादंबरी वाचनाच्या मार्गाने चालतो, कोणी कथेच्या विश्वात रमतो, कुणी नाटकांच्या संवादात गुंततो, कुणी कवितेच्या गावाला निघतो. प्रत्येकाच्या पसंतीचे परगणे भिन्न असतात. पण जाणत्या साहित्यिकांइतकाच सजग वाचकही महत्त्वाचा.

साहित्याची निर्मिती कशासाठी आणि कुणासाठी, या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाच्या अनुभवाच्या कक्षेत शोधता येतील. कधीकाळी माध्यमे सीमित असल्याने आणि ज्ञानसंपादनाचे विकल्प सीमित असल्याने साहित्यनिर्मितीच्या व्यवहारावर मर्यादा येणं स्वाभाविक होतं. काळाने कूस बदलली विज्ञानतंत्रज्ञानाने परिघाचा विस्तार झाला अन् अभिव्यक्तीला माध्यमांचा अवकाश गवसला. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी प्राप्त झाली. सोशलमीडियाने या वाटा अधिक प्रशस्त केल्या. माध्यमांच्या भिंती व्यक्त होऊ पाहणाऱ्यांच्या अंगणी येऊन विसावल्या. लेखणी हाती घेऊन व्यक्त होऊ पाहणाऱ्याचं विश्व विस्तारायला लागलं.

व्हर्च्युअल विश्वाच्या भिंतींवर व्यक्त झालेल्या सगळ्याच गोष्टी भले साहित्यनिकषांच्या साऱ्याच चौकटीत अधिष्ठित होत नसतीलही. पण व्यक्त होण्यासाठी असणाऱ्या मर्यादांची कुंपणे संपली, एवढं मात्र खरं. फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉगस् यासारख्या माध्यमांवर मोठ्याप्रमाणात लिहलं जातंय. अर्थात, ते किती वाचलं जातंय, हा आणखी वेगळा प्रश्न. त्याची उत्तरे काही असोत, पण लेखनाचे विविध प्रकार हाताळल्या जाणाऱ्या या माध्यमांत लिहिणाऱ्यांचा सगळ्यात अधिक वावर कवितेच्या परगण्यात असलेला आढळेल. अर्थात याबाबत वाचकांची अन्य काही निरीक्षणे असू शकतात. पण कवितेचं पीक उदंड आलेलं आहे. असं म्हटल्यास त्यात फार काही अतिशयोक्त आहे असे वाटत नाही.

कविता म्हटल्यावर सगळ्यात आधी आठवतात, त्या आपण शाळेत असतांना शिकलेल्या कविता. या कविता विसरलेला माणूस अपवादभूत असेल. भले कविता सगळी पाठ नसेल, पण त्यांच्या काही ओळी सहज ओठांवर रुंजी घालत असतात. नसेलच काही आठवत, तर कवितेचं नाव, आशय आठवत राहतो. श्रावणमासी असो, क्रांतीचा जयजयकार असो, पिवळे तांबूस ऊन कोवळे असो अथवा अन्य कोणत्या. या कविता विसरणं थोडं अवघडच. कारण त्यांचं गारुड म्हणा किंवा त्या-त्या कवींची किंवा कवितांची ही ताकद आहे असे म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट अप्रत्यक्ष अधोरेखित केली जाते ती ही की, या कवींच्या आणि कवितांच्या योग्यतेच्या कविता आता दृष्टीस पडत नाहीत, वगैरे वगैरे. अर्थात, या विधानात तथ्य किती, हा ज्याचा त्याचा प्रश्न. भलेतर याला नॉस्टेल्जीया म्हणा हवं तर. हेही म्हणण्यात काल्पनिकता किती किंवा तथ्य किती, याचं उत्तर आपापल्या परीने स्वतःच शोधावं. कसदार लेखन कालच होतं आणि आज तसं किंवा त्या योग्यतेचं लिहिलं जातच नाही, असं नाही. ते लिहलं जातं आणि त्या योग्यतेचं असतं याबाबत संदेहच नाही. वाचक कालही होता, आजही आहे. याचा अर्थ त्याची इयत्ता मोजण्याचं कारण नाही. सजग वाचक सार्वकालिक असतो आणि राहील. सकस साहित्याच्या शोधात असणाऱ्यांची धावपळ सार्वकालिक असते. आणि सर्वस्थळी असते.

साहित्याचा वाचक मग तो कोणत्याही प्रकारचे साहित्य वाचू देत, आपल्यासोबत त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, अपेक्षा, संकेत, पूर्वग्रह, मते घेऊन तो विहार करीत असतो. त्याला हव्या असणाऱ्या साहित्याचा आनंद घेत असतो. तो सविकल्प असेल अथवा निर्विकल्प. तो कसाही असू द्यात, पण वाचक घटका दोनघटका आनंदलहरींवर विहार करतो, हे महत्त्वाचं. अर्थात, साहित्याचा निर्विकल्प आनंद कितीजण घेऊ शकतात? अनुमान बांधणे अवघड आहे. या आनंदाची पातळी उच्च असल्याने या परगण्यात पोहचणारे संखेने कमी असतात, एवढं मात्र म्हणता येईल. या विधानाला मर्यादा असल्या तरी.

मराठीतील इतर साहित्यप्रकारापेक्षा कवितेला बरकत जरा जास्तच असल्याचे म्हटले जाते. यातील उपहास विसरूयात! लिहिल्या जाणाऱ्या कविता आणि प्रकाशित होणाऱ्या कवितासंग्रहांची संख्या पाहताना अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो. या अनुषंगाने एक प्रश्न समोर उभा राहतो, तो म्हणजे, भारंभार लिहिल्या जाणाऱ्या अशा कवितांना कोणत्या परगण्यात अधिष्ठित करावे. लिहिणारा हाती माध्यम आहे म्हणून लिहितो. वाचणाऱ्यास ते सहज उपलब्ध आहे म्हणून वाचतो. पण या दोघांच्यात संवाद किती? आणि दोघांना कवितेची समज किती? या प्रश्नावर घोडं अडतं. माध्यमांवर लिहून लाईक कॉमेंटसचा रतीब सुरु असला, म्हणजे ती कविता अथवा अन्य लेखन योग्यतेच्या साऱ्याच निकषांवर खरे उतरतेच असे नाही. ‘मी तुला, तू मला’, असा लाईक, कॉमेंटसचा सुरु असणारा खेळ लेखनाच्या मर्यादांना समोर येऊ देत नाही, हेही वास्तवच. अर्थात, येथे सगळाच कचरा असतो असे नाही. खूप दर्जेदार लेखनही येथून हाती लागतं, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कवितालेखनासाठी स्वतःचं असं काही आपल्याकडे असावं लागतं, तसंच हे समजायलाही. कवितेचं सौंदर्य केवळ वरपांगी नसून, ती आतूनच मोहरून यावी लागते. कवितेचे अर्थ आणि मनातील अर्थ यांच्या संवादाचा सांधा जुळणं म्हणून आवश्यकच. कविता काळाच्या अफाट अवकाशात भिरभिरत असते. या परिभ्रमणात परिवर्तनाची आवर्तने तिला टिपता यायला हवीत. त्याआधी तिला परिवलनाची गती गवसायला हवी. कविता कोणतीही असो, काळाची मुद्रा तिच्यावर अंकित झालेली असते. कविता जशी चांगली असते, तसा चांगला वाचकही असतो. तसाच चांगला कवी, साहित्यिकही असतोच. या साऱ्यातील चांगला हा शब्द कदाचित व्यक्तीसापेक्ष विचार असू शकतो.

वाचक रसिक असतोच, पण कवीच्या सगळ्याच कविता त्याला समजतील असे नाही. त्यासाठी त्याला परिश्रम घ्यावे लागतात. कवितेतील आशयसौंदर्य, भाषासौंदर्य, अर्थसौंदर्य समजून आनंद घ्यावा लागतो, तशीच असली तर कवितेतील दुर्बोधताही समजून घ्यावी लागते. कवीच्या लेखणीतून प्रकटलेल्या कवितेचे हेतू भावजागर, लोकजागर असतातच; पण ती विशिष्ट ध्येयानेही प्रेरित असतेच. ती काळाच्या गतीने निर्माण केलेल्या प्रश्नचिन्हांना समजून शब्दांकित करीत असते. साहित्यिकाचा संबंध भोवतालाशी असतो. आसपासचे प्रश्न, समस्या त्याला अस्वस्थ करतात. या संबंधातून त्याच्या मनावर मूल्यांचे संस्कार होतात. मनावर कोरल्या गेलेल्या रेषा कलाकृतीचं रूप धारण करून दृगोचर होतात. त्याची भाषा परिसरातून त्याच्याकडे येते, तसेच अनुभवसुद्धा. त्याला जे प्रश्न दिसतात, त्याकडे तो प्रकृतीधर्मानुसार बघतो. हे बघणं त्याच्या लेखणीची निर्मिती असते. वाचकांचं या सगळ्याला समजून घेणंही संवेदनशीलतेचा प्रत्यय असतो.

साहित्यिक का लिहितो? त्याने लिहायलाच हवे का? असे प्रश्न साहजिकच कधी तरी वाचकांच्या मनात डोकावून जातात. याबाबत काही लिहिते हात ‘स्वान्त सुखाय’ भूमिका घेऊन लिहिण्याचं समर्थन करतात. पण मनात आलं आणि लिहिलं, असं होत नाही. व्यक्त होतांना पूर्वसुरींच्या वाटांचं अनुकरण होत असतं. स्वतःला समृद्ध करण्यासाठी याही गोष्टीची आवश्यकता असते. या वाटेने चालताचालता लिहिणाऱ्याला आपली वाट सापडणे अपेक्षित असते. केवळ अनुकरणातून कोणीही संपन्न वगैरे होऊ शकत नाही. मनात साचले ते ओसंडून वाहू लागले, म्हणून काही कविता होत नसते. कविता कशी असावी आणि कशी नसावी, याचा विचार किमान एकदातरी लिहिणाऱ्यांकडून व्हायला हवा. आसपासच्या प्रश्नांकडे तटस्थपणे पाहता येत नाही, तोपर्यंत अनुभव सापडत नाही. लेखनाला अनुभवाचं कोंदण लाभत नाही, तोपर्यंत साहित्याला डूब मिळत नाही. प्रासंगिक आवेगांनी कविता तयार होत असल्या, तरी त्यांना चिरंजीव अस्तित्व असेलच असेही नाही. कविता काही कारखान्यातील उत्पादन नाही. दिला कच्चा माल, झाली प्रक्रिया अन् वस्तू हातात. असे होत नसते. सांप्रत कवितेचं आलेलं उदंड पीक पाहताना असंही असू शकतं, असं वाटायला लागतं.

सोशल मीडियाच्या भिंतींवर दिवसातून चारपाच कवितांचा, नसेल एवढं काही सूचत तरी निदान एकदोन कवितांचा घातलेला रतीब पाहताना लिहिणाऱ्यांच्या प्रतिभेचं कौतुक वाटतं. आणि त्यांना वाहवा करणाऱ्या वाचकांच्या संवेदनशीलतेचंही. काहींच्या नावावर दोनतीन वर्षात चारपाच कवितासंग्रह दिसतात. तसं पाचदहा वर्षात एखादाच संग्रह नावी असणारेही आहेत. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असला, तरी वाचक किती वाचतात? कितीजण संग्रह विकत घेतात? याचा विचार होतोच असे नाही. एकेक आवृत्ती संपायला पाचसहा वर्षे प्रतीक्षा नामांकित कवींच्या कवितासंग्रहांना करायला लागत असेल, तर इतरांविषयी विचार करण्यात काहीच हशील नाही. अर्थात आपल्या आसपास ऐकू येणारी अशी विधाने अनुमानाधारित असू शकतातं. वाचकांना वाचण्यास बाध्य करणारे लेखन साहित्यिकाच्या लेखणीतून व्हायला हवे असे म्हणतात. असे लेखन होत नाही, असे नाही; पण वाचकांची मानसिकता, वाचनाचा कल याही गोष्टींचा विचार करावा लागतोच की.

कवितेची व्याख्या अनेकांनी आपापल्या परीने केलेल्या आहेत. त्या परिपूर्ण की त्यातून अजून काही निसटलेलं आहे, हा प्रश्न थोडा बाजूला ठेऊयात. अंतर्यामी आनंद निर्माण करते, संवेदनशील मनाला विचार करायला उद्युक्त करते ती कविता, असं म्हटलं तर कोणतीही कविता आनंदाचं अभिधान असते, भावनांचं निधान असते, तशी अनुभवाचं अधिष्ठानही असते. तिच्यात भावनांची स्पंदने अखंड निनादत राहतात. ती सौंदर्याचा वेध घेत असते. समस्यांवर बोलत असते. वैगुण्यांना अधोरेखित करीत असते. सामाजिक दूरिते पाहून विचलित होत असते. तिचा प्रवास कालातीत असतो. एकाचवेळी ती भूतवर्तमानभविष्याच्या पटलावरून विहार करीत असते. तिचा प्रवास धरतीपासून अंबरापर्यंत होत असतो. तिचं आकाश मर्यादांच्या परिघात बंदिस्त नसतं. म्हणूनच तिच्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांना मर्यादांच्या चौकटी नसतात. कविता जेव्हा जगणं होते, तेव्हा ती जीवनाविषयी नेमके बोलत असते. म्हणूनच की काय कवीला बोलकं होतांना समकालाचं भान असावं लागतं.

आसपास दुभंगतोय. परिस्थिती उसवते आहे. जगण्याचे पेच अधिक जटील होत आहेत. माणसांचं असणं आस्थेच्या तरंगांवर अधिष्ठित असल्याचा काळ हरवला आहे. केवळ बाजारपेठाच वस्तूकेन्द्री होत नसून माणसाचंही वस्तूकरण होत आहे. व्यवस्थेला तडे जाताना जगणं प्रत्येक सांध्यातून निखळत आहे. माणूस माणसातून झपाट्याने वजा होतो आहे. जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत स्वार्थकेन्द्री भूमिकांना बरकत येत आहे. सामान्यांचा जगण्याचा आधार दोलायमान होतो आहे. आसपास जाणवणाऱ्या कंपनांची भीती मनात साकळते आहे. संवादाची साधने वाढली, पण माणसांच्या मनात अधिवास करून असणारा स्नेहसहवास संपतो आहे. आभासी जगण्याचा समस्या अनेक विसंगत कहाण्यांना जन्म देतायेत. माणसाचं उद्ध्वस्त होणं साहित्यात मांडलं जातंय, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. पण येथेही प्रत्येकाच्या अनुभवांचा वकूब सीमितच. आयुष्याच्या पूर्वार्धात खेड्यात राहिलेला साहित्यिक नंतर शहरातल्या झगमगाटात येऊन विसावतो आणि गावाकडच्या गोष्टी लिहितो. यात वावगे काहीही नाही. पण त्याला वर्तमान अनुभवांची डूब असल्याशिवाय खोली मिळेल का? कोणीतरी वेदनांचे ओरखडे अनुभवल्या, पाहिल्याशिवाय कसे कळतील?

माध्यमांची उपलब्धता वाढली याचा अर्थ कविता अधिक कसदार, सकस झाली, असे कसे म्हणता येईल. हा एक झालं, ती अधिक सहज झाली. याच विचाराने वाचक अधिक सुजाण झाला, अधिक गंभीर झाला असा होतोच असे नाही. कितीतरी कविता सोशल मीडियाच्या भिंतींवर आदळतायेत. त्यांच्या अशा लाटा येणं, त्यावर स्वार होऊन काही काळ झोके घेत परत विसर्जित होणं म्हणजे, ना कसदार कविता, ना सर्जनशील कवी, ना संवेदनशील वाचक! हा तात्कालिक दृश्याचा परिपाक असतो. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी क्षितिजाला धरून धुक्याचा पडदा पसरलेला असावा. आसपास दवबिंदूनी ओथंबलेपण भरून यावे. सार्वत्रिक आनंदाचा सोहळा संपन्न होत असल्याची अनुभूती मिळावी, असं चित्र शब्दांमध्ये लिहिताना कितीही सुंदर वाटत असले, तरी वास्तव काही एवढे रमणीय नसते. सूर्याच्या उदयाचली येण्याने हे सगळे संपणे अटळ आहे, याचीही जाणीव असणे आवश्यक नाही का? आहे आणि नाही  या अक्षांवर लोलक झोके घेत असतो, अशावेळी तो नेमक्या कोणत्या बाजूने कलतो, हे महत्त्वाचं. म्हणूनच अशा दोलायमान परिस्थितीत दोहोंच्या समन्वयाने हाती येईल, ते साहित्य टिकाऊ असावं, अशी अपेक्षा करण्यात वावगं काही नाही.
***

6 comments:

  1. वास्तव लेख छान

    ReplyDelete
  2. शेअर करतोय

    ReplyDelete
  3. सर छान... साहित्य,साहित्यिक,वाचक यांची स्थिती,वाचकाचे मत अगदी वास्तव मांडणी.

    ReplyDelete