वाघूर: शोध समृद्ध किनाऱ्यांचा

By

वाघूर: शोध समृद्ध किनाऱ्यांचा

दिवाळी अंक महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे, असं म्हणणं अतिशयोक्त होणार नाही. प्रत्येकवर्षी प्रकाशित होणाऱ्या चार-पाचशे दिवाळी अंकांचा विचार करताना भले आर्थिक नसेल, पण या वैभवाला बऱ्यापैकी सांस्कृतिक बरकत आहे, असे कोणास वाटत असेल, तर असे वाटण्यात वावगे काहीच नाही. विज्ञानवाटेने घडणाऱ्या प्रवासामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमे सहज उपलब्ध असल्याने व्हर्च्युअल अवकाश दिवाळी अंकांची नवी वाट संपन्न करू पाहतो आहे. मोठ्या संख्येने प्रकाशित होणाऱ्या अंकांच्या आर्थिक, सामाजिक यशापयशबाबत मतेमतांतरे असू शकतात. कदाचित हे मुद्दे वाद-संवादाचा विषय असू शकतात, पण प्रकाशित होणारे प्रत्येक अंक गुणवत्तेच्या निकषांवर खरे उतरतात आणि उतरून उरतात असे नाही. जे उरतात ते लोकस्मृतीतून सहसा सरत नाहीत. 

अंकांचं परिशीलन, परीक्षण त्यांच्या प्रकाशनानंतर होणं ओघानेच येतं. सिद्धहस्त लेखण्या आणि विचारांतून त्यांच्या गुणांचा, गुणवत्तेचा यथासांग गौरव होत असतो. याचा अर्थ सगळ्याच अंकांच्या ललाटी हे भागधेय अंकित असतं असं नाही. काही गुणांमध्ये उजवे असतात, काही गुणवत्तेत मोठे ठरतात; पण फार थोड्या अंकांना गुण आणि गुणवत्तेच्या चौकटी सांभाळता येतात. म्हणूनच ते दीर्घकाळ मनाच्या मातीत रुजत जातात. प्रत्येकवेळी नव्याने. 

आपण वाचतो किती? हा प्रश्न नेहमीच कुठूनतरी ऐकायला, वाचायला मिळत असतो. शिकतांना वाचन अनिवार्य आवश्यकता असते. ते पाठ्यपुस्तकापुरतं सीमित असतं बहुदा. म्हणूनच की काय अतिरिक्त वाचनाचा गंध नसणारी अनेक माणसे आसपास सहज नजर फिरवली तरी सापडतात. वाचनसंस्कार, वाचनसंस्कृतीविषयी बरेच सांगितले, लिहिले जाते. हल्ली तर मोबाईल फोनमुळे स्मार्ट झालेल्या तंत्राने सहेतुक वाचन हरवत चालल्याचा सूर सजत असल्याचे समजते. हे कितपत संयुक्तिक हे ज्याचे त्याने ठरवावे.

अभिरुची आणि सर्जन साहित्याच्या परगण्यास संपन्नता प्रदान करीत असतात. अभिरुचीचा दर्जा उन्नत असेल, तर सर्जनाला श्रेष्ठता लाभते आणि संकलनास उंची. अशीच अंगभूत उंची घेऊन तीन पावलात वाचनाचं अवकाश व्यापणारा अंक म्हणून ‘वाघूरकडे’ आश्वस्त विचारांनी पाहता येईल. दर्जा, गुणवत्ता आणि योग्यता कोणत्याही अंकाच्या असण्याला अर्थपूर्णता प्रदान करतात. या सगळ्याच आयामांना आपल्यात सामावणारे नाव म्हणून मान्यवरांच्या मनात ‘वाघूरने’ गेल्या तीन वर्षाच्या प्रवासात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अर्थात, शीर्षस्थानापर्यंतचा प्रवास कधीही सुगम नसतो. त्या वाटांनी घडणारा प्रवास आपल्या आत अनेक कहाण्या घेऊन मुक्कामाच्या दिशेने निघालेला असतो. त्याकरिता परिशीलन, प्रामाणिक परिश्रम आणि प्रसंगांना सामोरे जाण्याइतपत सहनशीलता अंगी असायला लागते. या गुणांचं पाथेय सोबत घेऊन चालणारे सव्यसाची संपादक ‘नामदेव कोळी’ यांनी वाघूरला हे स्थान मिळवून दिले आहे. हे म्हणणं कोणाला कदाचित अतिशयोक्त वाटेल, पण यावर्षाचा ‘वाघूर’ दिवाळी अंक हाती घेतल्यानंतर याचं प्रत्यंतर येईल.

वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी वेगळ्या वाटांचं मनात गोंदण घडणं आणि गोंदलेल्या खुणांचा मागोवा घेत मुक्कामाकडे मार्गस्थ होणं घडत असेल, तर निर्मितीचा आनंद वेगळा ठरतो. दर्जा आणि त्यानुसार लाभलेलं देखणेपण अन् मान्यवर साहित्यिकांच्या समृद्ध लेखणीतून सजलेला ‘वाघूर’ म्हणूनच महत्त्वाचा अंक ठरतो.

कोणत्याही पुस्तकाचे अथवा अंकाचे केवळ बाह्यरंग देखणे असणे पुरेसे नसते, तर अंतरंग समृद्ध असणे तेवढेच अनिवार्य असते. या दोनही निकषांची पूर्तता करणारा हा अंक मुखपृष्ठ ते मलपृष्ठ असा देखणा प्रवास वाचकास घडवतो. वाघूरची मांडणी आकर्षक आहेच, पण मजकूर वाचकाच्या मनात घर करतो. अंकात जागोजागी पेरलेली रेखाचित्रे आशयाला अधिक गहिरेपण देतात. सुंदर फॉण्ट, नॅचरल शेडचा कागद आणि हाती सहज विसावणारा आकार या साऱ्यांचा परिपाक अंक प्रत्येक पानागणिक मनात रुजत जातो. अंक बाह्यांगाने समृद्ध आहेच, पण सिद्धहस्त साहित्यिकांच्या साहित्याने त्याचा अंतरंग अधिक संपन्न केला आहे, म्हणूनच एक जमलेला अंक म्हणू या!

प्रत्येकवर्षी विशेष पुरवणीचा प्रघात वाघूरने कायम ठेवत यावर्षी श्रेष्ठ साहित्यिक ‘सआदत हसन मंटो’ यांच्या साहित्यावर आधारित पन्नास पानांची विशेष पुरवणी (याआधीच्या अंकांत ‘सलाम दादा’ ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर आणि ‘सैराट, नागराज आणि आपण’ या विशेष पुरवण्या) या अंकाचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २५२ पृष्ठसंख्येत कथा, ललित, समीक्षा, सिद्धांत, निबंध, आठवणी या परगण्यातून सफर करताना वाचक हरकून जातो. गुलजार, चंद्रकांत देवताळे, रवींद्र पांढरे, प्रवीण बर्दापूरकर, माधुरी शेवते, अशोक कोळी, गणेश विसपुते, रणधीर शिंदे, यशवंत मनोहर या आणि अशा नामवंत साठोत्तरी-नव्वदोत्तरी पिढीतल्या साहित्यिकांच्या कसदार लेखण्या सहज आविष्कृत झाल्या आहेत.

जाहिरातींच्या जंजाळातून अंकांना मुक्त होणं आर्थिक पातळीवरील गणिते आखताना अवघड असते. त्याला इलाज नाही. पण वाघूरमध्ये ही हर्डल्स अडथळा ठरत नाहीत. मोजक्या जाहिराती योग्यजागी विसावाल्याने वाचकांचा वाचनप्रवास विनाव्यत्यय सुरु असतो.

साधना, ऋतुरंग, मुक्तशब्द, अंतर्नाद, अनुभव, मौज, हंस, दीपावली आदि नामवंत अंकांच्या पंगतीत लीलया सामावणारे ‘वाघूर’ हे एक नाव स्वतःचे किनारे कवेत घेत संगमाच्या शोधात वाहते आहे, आसपासचे परगणे समृद्ध करत. याचं श्रेय ‘नामदेव कोळी’ यांच्या विचक्षण संपादनाला आहेच, पण अंकाला मुखपृष्ठाच्या माध्यमातून देखणेपण देणारे प्रकाश वाघमारे, अंकाच्या संसाराची सुंदर मांडणी करणारे विकास मल्हारा आणि रेषांची लयदार पखरण करणारे सगळे कलासक्त हात आणि अंकनिर्मितीचा गाडा ओढण्यास सहकार्याचा सतत संवाद ठेवणाऱ्या प्रमोद इंगळे यांना निर्विवाद. एकुणात सकस वाचनाच्या शोधात असणाऱ्या आणि वेगळेपणाच्या मागावर असणाऱ्या वाचनप्रेमींनी या अंकाला वाचावंच, पण वाचनाच्या वाटेने नव्याने वळलेल्या वाचकांनी वाघूरच्या वळणावर जरा वेळ विसावणे अधिक आनंददायी असेल, याबाबत कोणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नसावं. म्हणूनच नितांत सुंदर अंक वाचकांच्या हाती देणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन आणि पुढील अंकासाठी शुभेच्छा देताना पुढील वर्षासाठी अधिक अपेक्षा ठेवण्यात काही अतिशयोक्त आहे असे वाटत नाही.

संपादक: नामदेव कोळी
स्वागतमूल्य: रुपये २५०/-
अंकासाठी संपर्क: ७७६८००४४०४, ९४०४०५१५४३

मेल: waghoor@gmail.com
***

0 comments:

Post a Comment