कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...

By
वातावरणातल्या गारठ्याने हुडहुडत सूर्याच्या कोमल किरणांना आपल्या कुशीत घेऊन रविवारची निवांत सकाळ अंगणात अवतीर्ण झाली. आजूबाजूला धुक्याने पडदा धरलेला. गल्लीतली मोकाट कुत्री रस्ता आपलाच आहे, या थाटात रस्त्याच्या मधोमध सुस्तावलेली. पाखरांचा एक थवा आकाशात आनंदाने विहार करतो आहे. शेजारच्या आंब्याच्या झाडावर बसून पाखरांचा उगीचच गलका चाललेला. क्लासला जायचे म्हणून मधूनच सुसाट वेगाने स्कूटरवरून पोरं-पोरी रस्त्यावरील अडथळ्यांना हुलकावणी देत भुरकन पुढे निघून जातायेत. नेहमीपेक्षा पेपर टाकायला जास्तच उशीर झाल्याने पेपरवाला पोरगा रस्त्यावरूनच दारासमोर पेपर भिरकावत सायकल दामटत निघाला आहे. उन्हाच्यासोबत बसलेलो. शेजारी मोबाईल. वर्तमानपत्रात असचं काहीतरी इकडचं तिकडचं वाचत, पाहत रमलेलो. कोणतातरी संदेश आल्याची मंद किणकिण वाजवून मोबाईलने लक्ष वेधलं. वर्तमानपत्र बाजूला टाकून मोबाईल घेतला आणि लागलो बघायला.

कुठल्यातरी निष्काम सेवेची बातमी बनून एक व्हिडिओ फॉरवर्डचे पंख लावून आमच्या सेवाभावी सहकाऱ्यांनी तयार केलेल्या आणि नेटाने चालवलेल्या अन् इच्छा नसताना चिकटवलेल्या- खरंतर बाहेर पडूनही कुणीतरी उत्साहाने परत त्याच वर्तुळात ओढून घेणाऱ्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आला. नेहमीप्रमाणे चारदोन जणांनी आवडीचा संकेत म्हणून त्या व्हिडिओवर तीनचार फुले वाहिली. काहींनी ठेंगा दाखवला, तर काहींनी विनम्रपणे हात जोडून आदरांजली (आदर या अर्थाने, श्रद्धांजली या अर्थाने नाही.) वाहिली. रविवार असल्याने असेल किंवा आणखी काही कारण असेल, नेहमीपेक्षा अधिक संख्येने उत्साहमूर्ती समूहात आपापली कॉपीपेस्टची हत्यारे परजून अवतरले आणि त्यावर मान्यतेची मोहर अंकित करण्याच्या स्पर्धेत स्वतःला आजमावू लागले.

कॉपीपेस्टफॉरवर्डच्या उदंड पिकाने आबाद असणाऱ्या या ग्रुपवर मी सहसा कॉमेंट, लाईकचा खेळ नाही खेळत. पण कुणीतरी अनपेक्षितपणे कुणाच्यातरी वाढदिवसानिमित्त आपले प्रेम व्यक्त करून मोकळा होतो आणि पळून जातो. नंतर जाग येणारे आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी आणि अमक्या-तमक्या स्नेह्यावर आमचंपण प्रेम आहे, हे प्रदर्शित करण्यासाठी चढाओढीने शुभेच्छांचा वर्षाव करीत राहतात. सहकाऱ्याप्रती स्नेह प्रदर्शित करण्याच्या घाईत आधीच कुणीतरी आपल्या नावासह गृपच्या भिंताडावर चिटकवलेला मॅसेज कुणीतरी कुठलीही खातरजमा न करता कॉपी करतो. तेथेच फॉरवर्ड करायचा असल्याने शुभेच्छांना उशीर नको, म्हणून आधीच्या नावासह देतो ढकलून. ग्रुपवरील भिंतीचा एक कोपरा आपल्या रंगाने रंगवण्याच्या नादात आपण काय केलं आहे, हे काही त्याच्या लक्षात येत नाही. मग कुणीतरी जागरूक नागरिक त्याला काय चुकले ते सांगतो. या उत्साही जबाबदार नागरिकाला आपल्या कर्तव्याची सविनय जाणीव होते. शुभेच्छांचं पुण्य आपल्या पदरी जमा करून घ्यावं, म्हणून पुन्हा शोधमोहीम घडते. मनाजोगता कोणतातरी संदेश सापडतो आणि हा सुटकेचा निश्वास टाकून पुन्हा नव्याने आदर व्यक्त करून ग्रुपच्या माळरानावर रांगत राहतो.

एव्हाना स्नेहाचा वादळी पाऊस सुरू झालेला असतो. ढगांनी गच्च भरून आलेल्या आभाळात मध्येच लख्खकन एखादी वीज चमकून जावी, तसं कोणालातरी कुणाच्यातरी राहिलेल्या श्रद्धांजलीची मध्येच आठवण होते आणि वाढदिवसासोबत श्रद्धांजलीचे दुःखार्त सूर ग्रुपच्या आसमंतात विहार करू लागतात. सहवेदनांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहासोबत आधीच संवेदना व्यक्त करणारे आपण सहवेदना व्यक्त करायचे राहिलो की काय, या शंकेने थोडेसे विचलित होतात. संदेश पाठवण्यासाठी आपल्याला काय नव्याने पैसे मोजावे लागतात की, वैशिष्ट्यपूर्ण असे काही तयार करून लिहावे थोडेच लागते. आहे आयते समोर घ्या उचलून, असा शुद्ध व्यावहारिक विचार त्यांच्या मनात चमकून जातो. आपल्या समयसूचकतेवर खुश होतात आणि कुणीतरी आधीच फेकलेला संदेश उचलतात आणि देतात परत ढकलून. मृतात्म्याला स्वर्गलोकात शांती आणि यांच्याही आत्म्याला इहलोकी कर्तव्यपूर्तीप्रीत्यर्थ समाधान लाभते. व्यावहारिक जगण्याचे एक वर्तुळ पूर्ण झालेले असते. वाढदिवस मागे पडून थोडावेळ श्रद्धांजलीदिवस साजरा व्हायला लागतो. थोड्यावेळाने जन्म आणि मरण दिवसाचे प्रेमळ-दुःखी, सहर्ष-करुणार्त असेच आणखी काही संदेश एकरूप होऊन हातात हात घालून फिरायला लागतात. हे अनपेक्षित उमलून आलेलं प्रेम पाहून स्वर्गात पोचलेल्या आत्म्यास उगीच येथे आल्याचा पश्चाताप होत असेल.

तर सांगायचा मुद्दा असा की, समूहावर हे सगळं सुरू असताना मी त्या व्हिडिओवर बऱ्यापैकी मोठाचमोठा अभिप्राय खरडला आणि दिला सोडून, मुद्दामच. अर्थात, इतरांच्या दृष्टीने काहीतरी आणि तेही सविस्तर, अनाकलीय (हे त्यांचं माझ्याविषयी निरीक्षण) भाषेत लिहिण्याची वाईट खोड असणारं मी एक जुनं खोड असल्याने, त्यांनी सवयीने फारसे मनावर घेतलेले नसते. आजही शंभरातल्या नव्याण्णवांनी मनावर घेतले नाही. मनावर घेऊन उगीच आपला रक्तदाब का वाढवून घ्यावा, हा साधासा व्यवहारी विचार करून त्याला फाट्यावर मारले. नेहमीच्या सवयीने कॉपीप्रिय लोकांच्या हे सगळे आवाक्याबाहेर असल्याने, ते त्याच्या वाट्याला गेले नाहीत. कारण स्वतः व्यक्त होण्याचे कष्ट कोण घेतो. शिवाय आपण काही लिहावं, तर उगीच चूक घडून आपली असणारी नसणारी उंची सिद्ध होण्याची भीती मनात. त्यापेक्षा डोंगर दुरून साजरे दिसतात, ते पाहावे आणि आनंद घ्यावा म्हणून असेल कदाचित, कोणी अशा रिकामटेकड्यांच्या उद्योगांकडे वळत नसावेत. तेवढ्यात कुठूनतरी सापडलेली आणि त्याच्यासाठी फार म्हणजे फारच महत्त्वाची आणि आर्थिक वगैरे क्रांती घडवण्यास कारण ठरू शकणारी, कसल्यातरी वेतनआयोगाची जुनाट बातमी नवं लेबल लावून एखाद्या सासुरवाशिणीला माहेरी आणल्याच्या आनंदात ग्रुपवर कुणीतरी आणून सोडली. लागले सगळे आपल्या आर्थिक श्रीमंतीच्या गणितांना आखायला. कुणीतरी चेहऱ्यावरून मोरपीस फिरवल्याचा आनंद वेतनाच्या वाढत्या आलेखाला प्रगतीचे गमक समजणाऱ्यांना व्हायला लागला. असं काही-काही अन् तेच-ते; पण पाठवणाऱ्याच्या दृष्टीने प्रत्येकवेळी नवं आणि सर्जनशील वगैरे वगैरे टपकट राहिलं, गळक्या नळातून पडणाऱ्या पाण्यासारखं.

मी पाठवलेला अभिप्राय एकाने वाचला. म्हणजे का वाचला असेल, याचं नवल वाटलं. कारण वाचून व्यक्त होण्याची समूहाची सवय नाही आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला, त्यांना कुणी कधीही भीक घातली नाही. त्यांचं प्रेम खऱ्याअर्थाने ‘स्व’ऐवजी ‘समष्टी’कडे अधिक आहे. या अर्थाने त्यांना वैश्विक विचारधारा असणारे नक्कीच म्हणता येईल. बरं या अपवादाने अभिप्राय वाचून ‘खूप छान...!’ म्हणून परत रिप्लायही दिला. माझ्यासाठी हे जरा आश्चर्यजनक होतं. कारण समूहात अशी अपेक्षा करणं म्हणजे देवलोकातून इहलोकी विहार करायला आलेल्या अप्सरा अनपेक्षितपणे फक्त आणि फक्त आपणासच भेटाव्यात आणि त्यांनी आपल्यासोबत सुमधुर संवाद करावा...! हे जेवढं सत्य, तेवढंच आमच्या समूहावर कोणीतरी संवाद साधणं. त्याच्या रिप्लायला उत्तर देताना म्हणालो, ‘कॉपीपेस्टफॉरवर्डचे उदंड पीक घेणाऱ्या कसदार वावरात उगवलेलं हे तणकट आहे.’ वाचून त्याने हास्यरसाने ओथंबलेली एक मस्तपैकी इमोजी फेकून मारली. बाकीचे तसेच स्थितप्रज्ञ.

दुसऱ्या दिवशी निवांत वेळेत चहा घेण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. बोलताना सहज विषय निघाला. ग्रुपवरील संवादाचा धागा पकडत तो म्हणाला, “कारे भो, सेवा आणि स्वार्थ म्हणजे नेमकं काय? तुला काय वाटले, जगात सगळीच माणसे देवमाणसे आहेत आणि त्यांना सेवेव्यतिरिक्त काहीच कामे नसतात..."

त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणे भाग होते. कुठूनतरी वाचलेलं वाक्य आठवलं, तेच उचललं आणि दिलं फेकून त्याच्या अंगावर. म्हणालो, "सेवेत जग फुलवण्याची ताकद असते. निष्काम सेवा नंदनवन उभे करते."

"अरे, पण सेवा कुणाची? सामान्य माणसांची का? कोण विचारतो रे सामान्य माणसांना! आपण मास्तर लोक उगीच नैतिकतेच्या शिखरांकडे आशावादी डोळ्यांनी बघत राहतो. कसली सेवा आणि कसले काय. सगळ्यांना स्वार्थ मात्र बरोबर समजतो."

"समाजातील फाटकी माणसे आपल्या वकुबाने काम करतात, तेव्हा सेवेचा अर्थ समजतो. अशा कामांचे मोल संपत्तीची साधने वापरून कसे करता येईल? संपत्तीने तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक सुखांची उंची समजेल, पण नैतिकतेची उंची कशाने मोजाल? माणसांच्या भल्यासाठी कष्टणाऱ्यां अन् समाजातील दूरितांचे निर्मूलन करू पाहणाऱ्या नैतिक विचारांची उंची मोजायला संपत्तीची साधने कुचकामी ठरतात."- मी

त्याच्या बोलण्याच्या प्रतीक्षेत चेहऱ्याकडे बघत राहिलो. थोडी अस्वस्थ चुळबूळ. म्हणाला, “तरीही जगात दोनच गोष्टी सत्य आहेत. एक पैसा आणि दुसरा मृत्यू! कसली आलीये नैतिकता अन् कसले आलेयेत मूल्ये. तुझं हे सगळं तत्वज्ञानपर बोलणं व्याख्यानात, पुस्तकात खपवायला ठीक आहे. वास्तवात प्रयोग करणे अवघड आहे. मूल्यांची चाड आणि अन्यायाची चिड किती जणांना असते अशीही?"

माझं म्हणणं पटवून देणं आवश्यक असल्याने बोलत राहिलो तसाच पुढे. म्हणालो, "सुखांच्या उताराने वाहणाऱ्या प्रवाहांना धनिकांच्या जगात भले प्रतिष्ठा असेलही, पण सेवेला संपत्तीचं आकर्षण कसं असेल? संपत्ती मोजून एकवेळ सुख मिळत असेलही, पण समाधान मिळेतेच असे नाही. सगळ्याच गोष्टींचं मोल काही संपत्तीत करता नाही येत आणि हे माहीत असणारी माणसे या मोहापासून स्वतःला अलग ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात."

“झालं प्रवचन तुझं? हे फक्त शिकवायला सोपं असतं, आचरणात आणणारी माणसं फार थोडी असतात, समजला."- तो.

विषय पुढे ढकलत आणखी एकजण म्हणाला, "एवढं विरक्त राहायचं, तर कशाला माणसाचा जन्म घेऊन वाया घालवायचा. त्यापेक्षा इतर प्राणीच बरे, नाही का?"

"नाही नाही, तसे म्हणायचेही नाही मला! तुमचं म्हणणं मान्य, पण सीमित अर्थाने."

मध्ये कुणाला बोलण्याची संधी मिळू न देता म्हणालो, “तुम्ही परत म्हणाल, आता हा कोणता नवीन अर्थबोध? नाही, काही नवीन वगैरे नाही! आहे तो तुम्हालाही चांगलाच अवगत आहे. आणि तो समजून घेण्यासाठी फार मोठं शिक्षण तुमच्याकडे असायला हवे किंवा तुम्ही कोणी अभ्यासक अथवा प्रकांड पंडित असणे आवश्यक नाही."

"मग कशाला एवढे तत्वज्ञानाचे धडे शिकवायचे नसते उद्योग करता आहात?"- परत तो आपलं घोडं दामटत राहिला.

"हे बघा, डोळे सगळ्यांना असतात, नाही का? म्हणजे ज्यांच्यावर निसर्गाने आघात केला नाही किंवा काही झाले नाही, असे कोणीही सामान्य. बऱ्याच जणांचं सौंदर्य त्या डोळ्यांत सामावलेलं असतं. हे चांगलंच; पण डोळे नुसतेच सुंदर असून भागत नाही, त्यांना दृष्टीही असावी लागते."

"मान्य! पुढे बोला. विषय बदलवू नका."

"तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी विषयाच्या रस्त्यावरच आहे. डोळ्यांनी जग दिसते, पण ते समजून घेण्यासाठी दृष्टी असायला लागते. या अर्थाने डोळस माणसांना समाजातील दुःख, दैन्य अधिक स्वच्छ दिसते. कारण त्यांच्या डोळ्यांवर संपत्तीचा थर साचून ‘मोती’बिंदू झाल्याने दिसणं धूसर झालेले नसते."

आता सगळे ऐकण्याच्या मुद्रेत उभे. एकेक करून यांना बाटलीत बंद करता येण्याची शक्यता वाढल्याने माझा आत्मविश्वास अधिक वाढला. त्यांना कोणतीही संधी न देता म्हणालो,"आता तुम्ही परत शंका विचारण्याआधीच सांगतो, ज्यांना समाजातील दुरिते दिसतात ते समाजापासून दूर कसे राहतील? पैसा जगण्यासाठी आवश्यक असतो, हे बंदा रुपया खरे. पण तो किती असावा? याची काही परिमाणे आपण तयार केली आहेत का?"

"नाहीत!"

माझ्या मुखातून प्रकटणाऱ्या अमृतवाणीच्या श्रवणाने धन्य होत माझा भक्त होण्याच्या वाटेवर उभा असलेला कुणीतरी आवाज प्रकटला.

"आनंदाने जगता आले आणि तेवढेच समाधान अंतरी नांदते राहिले, की पुरे. पण पैसा माणसांच्या मनावर गारुड करून आपलं सार्वकालिक महत्त्व अधोरेखित करीत आला आहे. त्याच्या मोहपाशातून मुक्त राहणे भल्या भल्याना अवघड असते. म्हणूनच की काय, तो सगळ्यांना हवाच असतो. पैशाने सगळी जादू करता येते, पण जादूने कोणताही पैसा तयार करता येत नाही. केवळ याच कारणाने त्याची जादू सगळ्यांना मोहित करीत असेल."

“असेल, त्याचं काय?"- तो

"एकदाका या संमोहनाच्या आवर्तात आपण आलो की, ही कुंपणे उल्लंघून बाहेर येणे अवघड होत असते. म्हणूनच माणसांना मोठेपण मिरवण्यात धन्यता वाटत असेल. मग स्वनाम धन्यतेसाठी कवायती सुरू होतात आणि स्वतःला महान करण्याचे प्रयोग करून पाहिले जातात."

“असे प्रयोगशील संशोधक किती असतात आपल्या आसपास? मोजून चारदोन आणि तुम्ही सगळ्यांनाच पिंजऱ्यात उभे करायला निघालात. हे काही रुचत नाही बुवा आपल्याला." – पुन्हा त्याची शंका.

"साहेब, आवडनिवडचा प्रश्न येतोच कुठे! तुम्ही काहीही म्हटले, तरी त्यात अंतराय थोडीच येणार आहे. स्वतःला समर्थ समजणारी अशी माणसे बेगडी मुखवटे घेऊन आपणच उभ्या केलेल्या मखरात मढवून घेणास उत्सुक असतातच."

"पटतंय बघा, तुमचं म्हणणं!"- पसंतीची मोहर अंकित करणारा आणखी एक आवाज.

"समाजात निरपेक्ष भावनेने घडलेली कामं पाहून माणसांविषयी आस्था वाढते. असं काही पाहून स्वतःला धन्य समजावे, तर दुसरीकडे स्वतः स्वतःचे नगारे बडवणाऱ्याची संख्याही काही कमी नाही जगात. अभिनिवेशाच्या तुताऱ्या फुंकून माणुसकीची बेगडी गाणी गाणारे खूप आहेत."

"आता कसं रास्त बोललात!”- माझा भक्त होण्याच्या वाटेने निघालेल्या महानुभावाकडून सकारात्मक प्रतिसाद.

“माझ्याकडून साऱ्या जगातला अंधार दूर होणार नाही, हे माहीत असलेली साधी माणसे पावलापुरता प्रकाश पेरत चालतात तेव्हा वाटतं. यांच्यासमोर आपण कोण आहोत? या ‘कोण’ शब्दाचं उत्तर ज्याला मिळतं, त्याचे अहं आपोआप गळून पडतात, पक्व फळासराखे. नाही का?”

“हा! हे पटतंय बघा, तुमचं म्हणणं.”- भक्तासह आणखी दोनतीन प्रतिसाद.

“कोणाला आवडो अथवा नावडो, परिस्थितीने शिकवलेलं शहाणपण समजून घेण्यासाठी शाळेतील अभ्यासाच्या परीक्षा नसतात. आपणच आपले परीक्षार्थी आणि आपणच प्राश्निक असतो या परीक्षेचे. फक्त मातीत मिसळून पुन्हा नव्याने उगवून येण्यासाठी विसर्जनाची तयारी असायला लागते, नाही का?"

मी आणखी काही बोलण्याच्या पावित्र्यात होतो, तेव्हाशी एकाच्या मोबाईलची रिंग वाजते. माझ्या बोलण्याकडे लक्ष असणाऱ्यांची अस्वस्थ चुळबूळ अधिक गहिरी होत जाते. हा इशारा होता, पूर्णविराम घेण्याचा. समजायचं ते समजलो आणि त्यांच्या उत्साही हालचाली निरखत राहिलो, प्रश्नांकित नजरेने.

अष्टावधानी वगैरे असणाऱ्या या साऱ्यांचा अधून मधून मोबाईलकडे बघत संवाद सुरु होता. आकलनाची सगळी कौशल्य वापरून ही विद्या अवगत केल्याने असेल कदाचित, हे सगळं त्यांना जमत. डोळे, हात, बोटांची अखंड कवायत सुरु. मोबाईलच्या स्क्रीनवरच्या दृष्यांमध्ये जीव एकवटून जमा झालेला, बोधकथांमधील पोपटाचा कशात तरी जीव असतो तसा. कोणत्यातरी ग्रुपवरून आलेले संदेश कोणालातरी ढकलून देताना फार मोठं काम पार पडल्याच्या आनंदलहरींवर काहीजण झुलत होते. कुणी आहे तेवढ्या वेळात काल खेळताना अपुऱ्या राहिलेल्या मोबाईलमधील खेळाची पुढील पायरी पकडण्याचा प्रयत्न करीत होते...

तेवढ्यात एकजण खूप मोठं घबाड हाती लागल्याच्या आनंदात ओरडला, “अरे, हा पहा नवा व्हिडिओ...! मस्तयं...!! ग्रुपवर फॉरवर्ड करतो...!”

उत्सुकता शिगेला. उघडला ग्रुप एकेकाने. लागले व्हिडिओ बघायला. सेकंदाच्या हिशोबाने पुढे सरकणाऱ्या घड्याळाच्या काट्यासारखे चेहऱ्यावरील हावभाव क्षणाक्षणाला बदलत राहतात. स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांना प्रतिसाद दिले जातात. त्यांच्या चेहऱ्यांवरील बदलणाऱ्या रेषांचे अर्थ शोधत मी पाहत राहतो त्यांच्याकडे, काही नवे हाती लागते का या अपेक्षेने...  

4 comments:

  1. वास्तव ,पण कटू समाजाला मान्य होत नाही त्याला काळ जाऊ द्यावा लागतो

    ReplyDelete
  2. वास्तववादी आणि काॕपीपेस्टच्या युगातील माहितीच्या माखनचोरांना जबरदस्त चपराक.

    ReplyDelete