Bhumika | भूमिका

By
श्वास सोबत घेऊन आलेला प्रत्येक जीव आपल्या उपजीविकेच्या वाटा शोधत इहतली नांदतो. श्वासांची सोबत असेपर्यंत त्याचा प्रवास सुरु असतो. जीवन सगळ्यांच्या वाट्याला येतं, पण जगणं किती जणांचं घडतं? सांगणे अवघड आहे. पण जगण्याच्या सूत्रांना सोबत घेत सगळेच काहीना काही शोधत असतात. हा शोध सुखांच्या क्षितिजांचा असतो. आयुष्याचे पोत तलम असावेत. नाती आस्थेच्या धाग्यांनी गुंफलेली असावीत. आपलेपण त्यातून झुळझुळ वाहत राहावं. प्रसन्नतेचा परिमल घेऊन परिसर दरवळत राहावा. सुखांचं इंद्रधनुष्य आयुष्याच्या क्षितिजावर कमान धरून उभं राहावं. जीवनाचे मळे बहरलेले राहावेत. अशा आयुष्याची चित्रे माणूस मनात रंगवत असतो. जगणं आनंदपर्यवसायी असावं, म्हणून अनेक खटपटी करून सुखतीर्थे गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. सुख अंगणी नांदते असणाऱ्या आयुष्याची सगळ्यांनाच आस लागलेली असते. असे असण्यात अप्रस्तुत काही नाही. सुंदर आयुष्याची संकल्पित चित्रे मनाच्या कॅन्व्हासवर माणसे सतत साकारत असतात. पण आयुष्य काही आखून दिलेल्या चाकोऱ्यांच्या रेषा धरून पुढे सरकत नसते. दिसल्या उताराने पाण्यासारखे वाहत नसते. त्याच्या मार्गात अनेक व्यवधाने असतात. ते असतात म्हणून पर्याय शोधावे लागतात. याचा अर्थ शोधलेले प्रत्येक पर्याय अचूक असतातच असे नाही. त्याची व्यवहार्यता, उपयुक्तता, प्रासंगिकता तपासून बघायला लागते. कोणत्यातरी विचाराने आणि भूमिकेने वर्तावे लागते. म्हणूनच शोधलेल्या पर्यायांना आणि धारण केलेल्या भूमिकांना वैचारिक अधिष्ठान असावे लागते.

आयुष्यात प्रत्येकाला स्वतःची एक चौकट हवी असते आणि ती सुरक्षित असावी असेही वाटत असते. सुरक्षेच्या अशा चौकटी उभ्या करून माणूस प्रवाहासोबत वाहत असतो. फार थोडे असतात, ज्यांना प्रवाहाच्या विरोधात पुढे जाण्याची स्वप्ने येतात. जगणं काही आखीव रेखीव साच्यांच्या चौकटीत सामावलेला आनंदाचा उत्सव नसतो. सरळ रेषेत पुढे सरकत नसतं ते कधी. त्याच्या प्रवासाच्या वाटा अडनिड वळणं घेत पळत राहतात. इच्छा असो नसो तुम्हांला चालावे लागतेच. पायाखालच्या वाटेची सोबत असतेच. फक्त त्या निवडता यायला हव्यात. निवडलेल्या वाटांची सोबत करीत माणसे निघतात, आपलं असं काही आणण्यासाठी. काही धावतात, काही रखडत सरकत राहतात, काही सरपटत राहतात, एवढाच काय तो फरक.

वैगुण्ये, वंचना, उपेक्षा, अपेक्षा, दुःख, वेदना, समस्या, प्रश्न कुठे नसतात? त्यांचं सर्वत्रिक असणं सार्वकालिक सत्य आहे. ते सगळीकडे असतात आणि सगळ्यांसाठी असतात. त्यांना राव-रंक सगळे सारखेच. त्यांच्या असण्यात काही फरक असलाच, तर प्रत्येक प्रश्नांचे पैलू निराळे आणि उत्तरांचे पर्याय वेगळे असतात. पण प्रश्न नाहीत, असा माणूस आसपास असणे जवळपास असंभव. प्रश्न असतात म्हणून उत्तरेही असतात. फक्त ती शोधावी लागतात. प्रत्येकवेळी ती अचूकच असतील असेही नाही. बऱ्याचदा अपेक्षाभंग करणारी असतात. म्हणून प्रश्न बदलता नाही येत. प्रश्न केवळ एकेकटेच असतात असेही नाही. अनेक गुंत्याना घेऊन त्यांचा प्रवास घडत असतो. आपल्या अंगणी त्यांचा अधिवास घडणे सगळ्यांना अप्रिय असते. अर्थात, सकारात्मक विचार अन् सर्जनशील कृती घेऊन येणारे प्रश्न यास अपवाद असतात, हे काही वेगळं सांगायला नको. काही प्रश्न साधेपणाची घोंगडी पांघरून येतात, काही समस्यांची वसने परिधान करून. म्हणून ते नाहीत, असे सहसा घडत नाही. कधी परिस्थितीनिर्मित प्रयोजनांची सोबत करीत ते आयुष्यात येतात. कधी प्रासंगिक पर्याय बनून दारावर दस्तक देतात, तर कधी हात दाखवून आपणच ओढवून घेतलेले असतात. माणूस त्यांच्या परिघात फिरत असतो. हे फिरणंही अटळ भागधेयच. हजारो वर्षापासून सुरू असणारी ही भटकंती कितीतरी पिढ्यांची सोबत करीत चालतेच आहे. चालणं तिचा धर्म आणि पर्यायांच्या शोधात भटकणं माणसाचं कर्म असतं.

प्रत्येकाचा जगण्याचा पैस ठरलेला असतो. जीवनविषयक काही धारणा असतात. निवडलेल्या विचारधारा असतात. अंगीकारलेल्या भूमिका असतात. आपला वकुब ओळखून पर्याय मात्र त्यालाच शोधायला लागतात. पुढ्यात येणारे प्रश्न प्रत्येकवेळी निराळे असतात, म्हणून उत्तरेही तशीच निवडावी लागतात. त्यांचे साचे नसतात, आधीच निर्धारित केलेल्या कोंदणात ओतून हवा तसा आकार देणारे. आयुष्यात अकल्पित येणाऱ्या गोष्टी काही सांगून येत नसतात. अनपेक्षितपणे दारावर दस्तक देतात त्या. त्यांच्या स्वागताची तयारी मात्र ठरवूनच करायला लागते. जगण्यात समस्यांची कमतरता कधी नसते? त्यांचं असणं आहेच, म्हणून त्यांची धग अनुभवण्याची तयारी असायला लागतेच. यापासून कुणी सुरक्षित राहिला आहे, असे सहसा घडत नाही. अर्थात, ही जाणीव नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. समजा सापडलाच असा एखादा तर, तो एकतर वेडा असला पाहिजे किंवा सर्वसंग परित्याग केलेला यती, संत, महंत तरी.

उत्तरांच्या आत अनेक प्रश्न दडलेले असतात. एकाचं उत्तर शोधावं, तर आणखी दुसरे जन्माला येणारे. म्हणूनच दिसणारे प्रश्न निरखून घ्यावे लागतातच, पण त्यांच्याआड दडलेले पैलू पारखून घ्यायला लागतात. अर्थात, ते सगळ्यांनाच ज्ञात असतील किंवा असायला हवेत असे नाही. ते तसे असतात की नाही? माहीत नाही. समजा असलेच, तर त्यांच्यापर्यंत किती जणांना पोहचता येत असतं? मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची दिशा निश्चित करायला लागते. त्यासाठी आखून दिलेल्या चौकटी पुरेशा नसतात. इप्सितस्थळी पोहचवणारे रस्ते पायघड्या टाकून अंथरलेले नसतात. परिस्थितीच्या प्रत्येक आघाताला प्रतिकार करीत ते घडवावे लागतात. कोणत्यातरी विचारावर विश्वास ठेवून वाटा तुडवत निघावं लागतं.

जगणं साकारण्यासाठी भूमिका घ्यावी लागते. उन्नत, उदात्त जगणं काही सहजी हाती लागत नसतं. त्यासाठी साधना लागते. कोणाच्या आशीर्वादाने ते घडत नसतं. तीर्थक्षेत्री जावून ते आकाराला येत नसतं. कोणाचातरी अनुग्रह घेऊन आयुष्याला सुखांचे रंग नाही भरता येत. आपलेच कुंचले हाती घेऊन आपणच आपल्याला रंगवल्याशिवाय जगण्याचं इंद्रधनुष्य नाही उमलून येत. त्यासाठी विचारांना दिशा असायला लागते. परिस्थितीचे भान असायला लागते. परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असायला लागतं. ते कुठून उधार आणता येत नाही. त्याकरिता भूमिकांचे परीघ समजून घ्यायला लागतात. कोणत्यातरी भूमिकेने वर्तावे लागते. पण भूमिकेबाबत भूमिका घेणारे किती असतात? सांगणे अवघड आहे. वास्तव हेही आहे की, बऱ्याच जणांना भूमिकांची वर्तुळे आकळत नाहीत, म्हणून भूमिका नाहीत, हे खरे आहे. भूमिकांच्या परिणामांची किंवा पलायनाची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. ती शोधावी लागतात. समजून घ्यावी लागतात.

आयुष्याच्या वर्तुळाभोवती परिवलन करताना केवळ फेऱ्या घडत नसतात. प्रत्येक फेरी पदरी काहीतरी टाकून जाते. पदरी पडलेलं दान काही दैवाचं देणं नसतं. त्या-त्यावेळी घडणाऱ्या वर्तनाचा तो परिपाक असतो. हाती लागलेल्या कवडशांचे अर्थ समजून घ्यायला लागतात. त्या प्रकाशात स्वतःच स्वतःला शोधत वाटा चालाव्या लागतात. कधी दिशा चुकतात. वाटा सुटतात. मार्ग भरकटतात. काही माणसे चुकलेल्या वाटांची चिंता करतात, काही चिंतन. चिंतेच्या निबिड जंगलात हरवलेली माणसे आपल्याभोवती समस्यांची झाडे वाढवत राहतात. काही प्राप्त परिस्थितीतून आस्थेचा दिवा विझू न देता मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात. मनी वसतीला असलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी पावले अपेक्षित दिशेने वळती करायला लागतात. कालसंगत पर्यायांशी सख्य असणाऱ्यांना आव्हाने आपली वाटत, पण प्राप्त परिस्थितीच्या विभ्रमांशी अनभिज्ञ असणारी माणसे समस्यांचे ओझे खांद्यावर घेऊन सरकत राहतात. काही साचेबंद चौकटींच्या कुंपणात उत्तरे शोधत राहतात. अभ्यासाच्या वाटेने घडणाऱ्या चिंतनातून काही पर्याय हाती लागतात. पण ‘स्व’ सुरक्षित राखण्याची काळजी करत घडलेले चिंतन परीघ हरवून बसते.

परिशीलनाने माणूस परिणत होत असतो. जाणिवा विस्तारतात, हे मान्य. पण त्यांना सुरक्षेच्या कुंपणात कोंडून ठेवले, तर प्रगतीचे पथ आक्रसत जातात. समस्यांची उत्तरे शोधून आणण्यासाठी प्रश्नांना भिडावे लागते. अभ्यासाने शहाणी झालेली माणसे प्रश्नांपासून पलायन करू पाहतात, तेव्हा पर्याय हरवतात. ओंजळभर स्वार्थ साध्य करण्यासाठी कोणतीच बाजू न घेता सत्तेचे सापळे हाती असणाऱ्या मंडळींच्या वर्तुळात वर्तताना विचारांना तिलांजली देणे वर्तन विपर्यास ठरतो. सत्तेचे सोहळे साजरे करण्यात काहींना सौख्य सामावलेले दिसते, तर काहींना सत्तेच्या परिघापासून शक्य तितके अंतर राखून ठेवण्याचा पर्याय संयुक्तिक वाटतो. अंतरावर राहणे सीमित अर्थाने रास्त विकल्प असू शकतो, पण त्यात परिस्थितीला भिडायचे धाडस नसते. अगरबत्त्या हाती घेऊन पूजा बांधणाऱ्या आणि आरत्या ओवाळणाऱ्यांना समोर असणाऱ्या प्रश्नाचे अर्थ समजत नसतात. त्यांच्यासाठी स्वार्थ हाच एकमात्र अर्थ असतो.

सत्तेचे गालिचे पसरून त्यावर सिंहासने मांडून बसलेल्यांना दुखावले, तर संधी हातातून निघेल, म्हणून सावधगिरी बाळगणारे आसपास असतातच. त्यांचे प्रश्न सुरु होतात त्यांच्यापासून आणि संपतात स्वतःजवळ. अशा विचारधारांना विकल्पांशी काही देणे-घेणे नसते. प्रत्येक पर्याय अशांसाठी स्वतःच्या संकुचित विश्वाच्या वर्तुळाएवढे असतात. निष्क्रिय कर्मवादाचे अनुसरण करणाऱ्या प्रत्येकाची तीर्थक्षेत्रे असतात. लहानमोठ्या पायऱ्या आखून घेतलेल्या असतात त्यांनी. तेथील प्रसाद हाती लागला, माथ्यावर आशीर्वादाचा मळवट भरला की, अशा विचारधारांना आणि त्याप्रती असणाऱ्या निष्ठांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही उरत. त्यांचे तसे असणेच निष्ठांची परिभाषा असते.

काहींना कुणाच्या अध्यात पडायचे नसते, ना कुणाच्या मध्यात. आपले मूठभर अस्तित्व सांभाळत अशी माणसे वाट्यास आलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. सारी ताकद एकवटून आलेला दिवस ढकलत नेतात पुढे. त्यांच्यापुरते ते सुख असल्याचे सांगतात, पण या सुखाला समाधानाची किनार खरंच असते का? आणि अशा समाधानाला नैतिकतेचे अधिष्ठान असते? स्वतःसाठी जगणारे स्वतःपुरते उरतात. इतिहासाची पाने यांच्या कार्याच्या नोंदीनी कधी अक्षरांकित होत नसतात. काहींना मुळात कसल्याच वादात पडायचे नसते. कशाला हात दाखवून अवलक्षण करून घ्या, अशा विचारांनी वर्तणारी माणसे काही मतप्रदर्शनासाठी धाडस गोळा करू शकत नाहीत. विशिष्ट विचारातून निर्मित भूमिकांचा अंगीकार तर यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट असते. यांच्या धाडसाच्या कहाण्या इतरांच्या पराक्रमात आनंद शोधणाऱ्या असतात.

आयुष्याच्या वाटेने प्रवास घडताना काही विचार, काही मते घेऊन पावले उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा ठरवावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात, काही गणिते आखायला लागतात. सूत्रे शोधायला लागतात. घेतलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. विचारांशी पडताळून पाहायला लागतात. भूमिका अनुकूल असो अथवा प्रतिकूल. तिची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून यावी लागते. रुजलेल्या विचारांच्या साक्षीने चालत राहावे लागते. भूमिका घेतली, तर त्यासाठी किंमत मोजण्याची तयारीही असायला लागते. अशी तयारी नसल्यामुळे काहीजण गप्प राहतात. परिस्थितीपासून पलायन करणाऱ्या, वेगवेगळ्या कारणांनी वजा होत जाणाऱ्यांना वगळले तर उरतात किती?

व्यवस्थेच्या खडकावर कशाला डोके आपटून घ्या, म्हणून मागच्या रांगेत उभे राहून पाहणारे अनेक असतात. एकेक वजा होत जाणारे निघाले की, वावटळींना अंगावर घेण्याची तयारी असणारी मूठभर माणसे मागे उरतात. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात ठाम भूमिका घेणाऱ्यांचे प्रमाण तसेही फार मोठे नसते. हे सावर्कालिक सत्य आहे आणि ते तेवढेच राहील, हेसुद्धा वास्तवच. काळाच्या कोणत्याही तुकड्यात यांना शोधले, तरी सुरक्षित अंतर राखणारी माणसे सहज हाती लागतील. प्रश्नांना भिडणारी माणसे शोधल्याशिवाय सापडत नसतात. नुसती नजर इकडे-तिकडे वळवली, तरी मिरवणारे असंख्य जीव आसपास वळवळताना दिसतील. कोणताही काळ याला अपवाद नसतो. सांप्रत काळही यास कसा अपवाद असेल.

सहकार्य, साहचर्य, सहिष्णुता ही सार्वकालिक मूल्य आहेत. त्यांच्या कक्षा कधीही संकुचित नसतात. सोयीचे अर्थ काढून माणसे आपल्या भूमिकांना त्यात घट्ट बसवण्याचा प्रयत्न करतात. समाज काही सतत निरामय विचारांनी वर्तत नसतो. त्यात दुरिते असतात. वैगुण्ये असतात. ती वाढू नयेत म्हणून प्रयत्न करायला लागतात. त्यात कालानुरूप परिवर्तन घडवावे लागते. बदलांना परिपूर्णता तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा त्यांच्यामागे नैतिक विचारांचे अधिष्ठान असेल आणि विचारांना कार्यान्वित करणारी भूमिका. लोकशाही शासनप्रणाली विचाराने वर्तणाऱ्या समाजाचा सहिष्णुता श्वास असते. जगण्यात ती रुजावी म्हणून योजनांची मुळाक्षरे गिरवावी लागतात. स्वीकारलेल्या विचारांचे परिशीलन घडून त्यांची वर्तुळे विस्तारायला लागतात. प्रत्येकवेळी आपलेच विचार रास्त असतात असेही नाही. काही कमतरता असल्यास, त्या दूर करता यायला हव्यात. म्हणून अंगीकारलेल्या भूमिकांची पडताळणी करून अनावश्यक भाग खरवडून काढता यायला हवा. समानता सन्मानाने समाजात सामावली की, अंतरे मिटवता येतात. संकुचित विचारातून निर्मित अहं प्रगतीच्या प्रवासाला खीळ घालतात. सर्वांप्रती समत्वदर्शी नजरेने बघणारे विचार, हीच माणसाची खरी कमाई. सत्याला सामोरे जातांना विचारांत सहजपण सामावलेले असले की, विकासाचे पथ प्रशस्त होत असतात.

माणसाला जीवनयापन करताना कोणत्यातरी भूमिकांचा स्वीकार करून वर्तावे लागते. समाजात भूमिका घेणारे आहेत. तसे नाकारणारेही असतात. सगळ्याच भूमिका सगळ्यांना मान्य असतील असेही नाही. नसल्या मान्य, म्हणून त्या त्याज्य असतात असं नसतं. माणूस माणूस म्हणून मोठा व्हायचा असेल, तर त्याचे विचार, त्याचे स्वातंत्र्य मान्य करायलाच हवे. त्याच्या वर्तनाचा प्रतिवाद मान्यतेच्या चौकटीतच करता यायला हवा. समाजाच्या वर्तन व्यवहाराचे सगळेच साचे काही ठरवून घडवता येत नसतात. काळाच्या ओघात त्यांचे आकार बदलत जातात. समाज त्यानुरूप बदलत राहावा असे वाटत असेल, तर सकारात्मक सुधारणांना संधी असायला हवी. सुधारणेचे सगळेच मार्ग संयुक्तिक असतीलच असे नसते.

काळाचे प्रश्न घेऊन समाजाच्या वर्तनाच्या दिशा निर्धारित होतात. अनुकूल आणि प्रतिकूल काय, हे कळले की विकासाचे पथ प्रशस्त होतात. या पथावरून मार्गस्थ होणारी पावले प्रगतीचे आयाम उभे करतात. त्यांची उपयुक्तता प्रासंगिक असो अथवा सार्वकालिक, ती पारखून स्वीकारायला हवी. माणूस आकांक्षांच्या गगनात विहार करीत असतो. कोणत्यातरी अपेक्षांनी सुखांच्या शोधत चालत असतो. समाधानाच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या आणि त्या सगळ्याच पूर्ण होतीलच असे नसले, तरी त्यातून समन्वय साधत सम्यक मार्गाची निवड करणे अशक्य नसते. निर्धारित विचारातून निवडीला आकार देता येतो. कोणत्यातरी भूमिकेच्या चिंतनातून, मंथनातून ती साकारत असते. त्याला आकार द्यायचा असला, तर प्रत्येकाला निदान किमान काही तरी समान विचार असणारी भूमिका घेता यायला हवी, नाही का?
     
(चित्र गूगलवरून साभार)

4 comments:

  1. विचारांना चालना देणारा लेख. खूपच छान.
    जीवनात ठाम भूमिका अंगिकारली असलेल्यांना बहूदा अडचणी येतात प्रचंड,पण वास्तव अभ्यासून स्वीकारलेली भूमिका जीवनाचा मार्ग आणि जीवनाच्या उद्देशाबाबत संभ्रमित नक्कीच नसते.अर्थात, केवळ तसा अभिनय करणाऱ्यांना मात्र प्रत्यक्षात संभ्रमा शिवाय काहीही साध्य होत नाही.��

    ReplyDelete
  2. चिंतनशील..... आवडला लेख...

    ReplyDelete