अडीच अक्षरे

By
प्रेम. अर्थाचे किती आयाम, संदर्भांच्या किती कोमल कळ्या, आशयाच्या उमललेल्या किती पाकळ्या, आकलनाचे किती बिंदू, जगण्याचे किती पदर या एका शब्दांत सामावलेले असतात. संदर्भांच्या पाकळ्या ज्याला उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. असं वेड आतूनच येतं का? एकदाका ते श्वासातून वाहू लागले की, थांबायला अवधी असतोच कुठे. हा प्रवास मेंदूपासून मनाकडे घडत नाही. याचा प्रारंभ मनातून होतो आणि शेवट मनातच. म्हणूनच कदाचित भावनांच्या आवेगात अवरुद्ध झालेल्या मनाने घेतलेल्या निर्णयांना चुकण्याचा शाप असावा. मनातल्या मनात समीप राहण्याचं प्रत्यंतर प्रेमात पडलेल्यांना येत असावे. पडणे कदाचित अपघात असू शकतो. कुणाच्या मते गफलत असू शकते. काहींच्यासाठी समस्या किंवा फार थोड्यांच्या मते सुखांचं अंगणभर पसरलेलं चांदणं असू शकतं. काहींना हे सगळं अविचार वगैरे वाटतं. कोणाला आणखी काय काय. पण प्रेम परगण्यात विहार करणाऱ्यांना एवढा विचार करायला अवधी असतोच कुठे आणि असला तरी समजून घेण्याएवढे शहाणपण उरलेलं असतंच कुठे?

तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चांदण्यांच्या सोबत बोलतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचतात. स्वप्नांच्या इंद्रधनुष्यावर झोके घेतात. यांच्यासाठी उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर अंगावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार मनात उगीचच काहूर उठवतो. संधिप्रकाशाचा हात धरून मावळतीच्या क्षितिजावर संध्यारंगांनी केलेली उधळण मनात आस्थेचे रंग भरते. मनात दाटून आलेल्या अनामिक अस्वस्थतेने कातरवेळा कातरकंप करतात. हो, हे सगळं वेडं असल्याशिवाय घडत नाही. तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी साठवून ठेवलेलं असतं, काहीच आठवत नाही. नेमका प्रारंभ कुठून आणि कुणाकडून, शोधूनही उत्तरे हाती लागत नाहीत. मग घडतंच कसं हे सगळं? असा कुठला चुकार क्षण असतो, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा. अशी कोणती स्पंदने असतात, एकच सूर छेडणारी. असे कोणते बोल असतात, जे एकच गीत गातात. नाहीच सांगत येणार. पण कुठल्यातरी गाफील क्षणी हे घडतं आणि त्यांचे प्रत्येकक्षण आसुसलेपण घेऊन प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहतात.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेम परगण्यात विहार करायला कसली आलीयेत मर्यादेची वर्तुळे. उमलतं वयचं वादळविजांचं. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करायचं. झोपाळ्यावाचून झुलायचं. वाऱ्याशी सलगी करायचं. मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या संदर्भांचा शोध घेता घेता मनंच कधी चोरली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वेगळ्या वाटेने वळणं त्यांनी निवडलेलं असतं. जगाच्या पाऊलखुणांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत. आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत.
**

2 comments: