बदल

By
काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही. त्यांना टाळून मुक्कामाची ठिकाणेही कुणाला गाठता येत नाहीत. बदलांना सामोरे जाणे क्रमप्राप्त. पण बहुदा बरकतीची गणिते आखताना काही प्राधान्यक्रम ठरवले जातात. फायद्याचा परीघ संकुचित करणाऱ्या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, असे करण्यातही कुणाचातरी स्वार्थ असतोच. काळाचा कोणताही तुकडा यास अपवाद नसतो. वाट्याला आलेल्या तुकड्यात प्रत्येकाच्या आयुष्याची सूत्रे सामावलेली असतात. ती वैयक्तिक असतात, तशी सामुहिकही असतात. नियतीने हाती दिलेल्या तुकड्यांना घेऊन आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी मार्ग मात्र स्वतःच निवडायला लागतात. काहींसाठी परिस्थिती पायघड्या घालून स्वागताला उभी असते, काहींच्या वाटा वैराण असतात, एवढाच काय तो फरक.

घडलेल्या घटितांना तत्कालीन परिस्थिती कारण असते. भावनावश संयम सैल होतो. प्रमाद घडतात. घडून गेलेल्या प्रसंगांना पुन्हा अधोरेखित करण्यात कोणताही सुज्ञपणा नसतो. प्रमादांचे परिमार्जन करण्याचा संयुक्तिक विकल्प पश्चातापदग्ध संवादही असू शकतो. प्रायश्चित्त हा अंतिम विकल्प असू शकतो की नाही, सांगणे अवघड असते एवढेमात्र नक्की.

उमदे मन म्हणजे नेमके काय असते? माहीत नाही. कारण याबाबत प्रत्येकाची परिभाषा वेगळी. उमदेपण माणसांच्या लहान लहान कृतीतून व्यक्त होत असते. त्यांच्या कृती भलेही लहान असतील; पण मोल तेवढेच असते, जेवढे मोठ्या त्यागाचे. समर्पणशील माणसे न्यून नाही, तर नवे काही शोधतात.

हां एक आहे, कधी कधी तोल ढळतो, संयम सुटतो. पण त्यावर नियंत्रण मिळवता आले की, बऱ्याच प्रश्नांची सकारात्मक उत्तरे हाती लागण्याचे विकल्प उपलब्ध होतात.

विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसाचे अस्तित्व तसे नगण्यच. एक बुद्धीचा अपवाद वगळला तर त्याचाकडे असं काय आहे, ज्यावर त्याने नाझ करावा? हे खरं असलं तरी त्याच्याकडे असणाऱ्या बुद्धिसामर्थ्याने प्रेषितालाही विस्मयचकित करणारे काम त्याने इहतली केले आहे. पण तो प्रेषित काही बनू शकला नाही. ही त्याची मर्यादा आहे. जीवनयापनाचं हे वास्तव स्वीकारून आयुष्याच्या प्रवासाच्या दिशा त्यालाच शोधाव्या लागतात. समकालीन जगण्याचे वास्तव शोधतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगाचे सगळ्याच अंगाने वेगाने सपाटीकरण होत आहे. सोबतच स्वार्थाचा परिघही समृद्ध होत आहे. म्हणूनच की काय जगण्याचा गुंताही बऱ्यापैकी वाढला आहे.

आसपास स्वार्थपरायण विचारांची वर्तुळे भक्कम होत आहेत. माणसातून माणूस झपाट्याने वजा होत आहे. उन्नत विचारांच्या व्याख्या बदलत आहेत. सगळीकडून क्षितिजे संकुचित होतं असताना हेही भान असायला हवे की, या वर्तुळांच्या बाहेर असेही काही जीव आहेत, जे देहाने माणसं आहेत; पण नियतीच्या आघाताने पशुवत जगत आहेत. खरंतर हे वास्तव माणसाला माहीत नाही असे नाही. सगळं काही माहीत असूनही आसक्तीपरायण विचारांनी वर्तताना ते सोयिस्करपणे विस्मृतीच्या कोशात टाकले जाणे वर्तन विपर्यास असतो. समाजातून एक प्रवाह अशा उपेक्षेचा नेहमीच धनी राहिला आहे. ही उपेक्षा कधी परंपरेने, कधी रूढीने, तर कधी परिस्थितीने त्यांच्या जगण्यात पेरली आहे. अभावग्रस्त असणं व्यवस्थेच्या अभ्येद्य चौकटींनी त्याच्या पदरी दिलेलं दान आहे. प्रगतीचे नवे आयाम निर्मिणाऱ्या विश्वात; व्यवस्थानिर्मित वर्तुळाच्या परिघावर उभं राहून, अभ्युदयाच्या वाटा शोधू पाहणाऱ्या कितीतरी पावलांची, दूरवर दिसणाऱ्या धूसर क्षितिजांची प्रतीक्षा संपलेली नसणे व्यवस्थेतील व्यंग असतं, नाही का?
••

0 comments:

Post a Comment