अक्षरलिपी

By
अक्षरलिपी: दिवाळी अंकांच्या परिभाषा विस्तारणारा अंक
नेहमीप्रमाणे दिवाळी आली अन् गेली. अर्थात, तिचं येणं अन् जाणं माणसांना काही नवं नाही. पण ती यावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं वाटू नये, असंही नाही. प्रकाशाचे कवडसे सोबत घेऊन येणारी दिवाळी अंधारल्या आयुष्यात ओंजळभर प्रकाश पेरून जाते. तिचं जाणं टाळता आलं असतं, तर साऱ्यांनीच सर्वानुमते अनुमोदन दिलं असतं. पण ते काही शक्य नाही. तिचं येणं जेवढं शाश्वत, तेवढंच जाणंही सत्य. माणूस मुळात वास्तव अन् कल्पिताच्या सीमारेषांवर उभं राहून आयुष्याचे अर्थ शोधत असतो. मिळतील तेथून वेचत राहतो. जगण्याला वाचत राहतो. समजून घेता येईल तेवढं समजून घेतो अन् अंगीकारता येईल तेवढं स्वीकारतो. घर, देवडी, कोनाडे जेथे कोठे पेरता येईल तेथे प्रकाश पेरला. आस्थेच्या लहानमोठ्या पणत्या पेटवून त्यांच्या ओंजळभर प्रकाशात नाहत राहिला. एकेक दिवे मालवत गेले, पण त्यांनी पेरलेला प्रकाश मनात अजूनही आस्थेचे अनुबंध शोधत आहे.

दिवाळीने कोणाला काय दिले, कोणी काय घेतले, नाही सांगता येत. तिच्या असण्यात सामाजिक, सांस्कृतिक वगैरे संदर्भ शोधता येतात. पण महाराष्ट्रात दिवाळीला एक अधिकचा संदर्भ आहे तो साहित्याचा अन् याला चांगला शतकाचा वारसा आहे. दिवाळीच्या आगमनाची चाहूल आधी दिवाळी अंकांना लागते. चारपाच महिने आधीच साहित्याचे किनारे धरून हा प्रवाह पुढे चालत राहतो. सुमारे चारपाचशे अंक प्रकाशाचे कवडसे वेचत येतात. अर्थात, सगळ्याच अंकांना एका परिमाणात कोणी मोजतही नाही. यातले सर्वोत्तम किती, साधारण किती हा वाद-प्रतिवादाचा विषय असू शकतो. तसेही सगळ्याच अंकांच्या ललाटी लोकमनात अधिष्ठित होण्याचे भागधेय लेखांकित झालेलं नसतं. ते घडवणारे हात त्यांच्या प्राक्तनाच्या रेषा रेखांकित करीत असतात.

दिवाळी अंकांच्या सर्वमान्य परिभाषा कोणत्या आहेत, माहीत नाही. वाचक, विचारवंत, बुद्धिमंत आपापल्या कलाने त्यांच्या असण्या-नसण्याचे अर्थ शोधतात. काही अंकांची केवळ नावे पुरेसी असतात. काही हाती घेतले जातात. काही चाळले जातात. काही वाचले जातात. काही मनात घर करतात. प्रत्येकाचे भागधेय वेगळे. फार कमी अंक असे असतील, ज्यांचा जन्मच शुभशकुनाचा सांगावा घेवून आलेला असतो. ‘अक्षरलिपी’ अशीच शुभंकर पावले घेऊन आला आहे. दिवाळी अंकांच्या विश्वात या अंकाचं वय फक्त दोन वर्षे. पहिल्या अंकाने सगळ्यांचे लक्ष वेधले अन् आताच्या अंकाने त्यावर मान्यतेची मोहर अंकित केली. ‘हल्ली कोणी फारसं वाचत नाही हो!’ या विधानाने साहित्य व्यवहार करणाऱ्यांनी विचलित होणं तसं स्वाभाविकच. पण अशा विधानांचे सार्वत्रिकीकरणही करता येत नाही, हेही वास्तव. एखादा अंक वाचणे सुलभ आहे. त्यावर अभिप्राय देणे त्याहून अधिक सुगम आहे. पण अंक तयार करायचा. तो मनाजोगता करण्यासाठी जगण्याच्या वर्तुळात प्रदक्षिणा करायला लावणाऱ्या कामांच्या प्राथमिकतेला स्वल्पविरामाच्या चिन्हात अधिष्ठित करायचे. नियोजित दैनंदिन कामाची सूत्रे सोडायची अन् अंकाचे समीकरण सोडवत राहायचे. यासाठी एक वेडेपण अंतरी वसती करून असायला लागते.

अंक वाचकांच्या हाती पोहचवणे सहजसाध्य असतं का? त्यासाठी कोणते सायास-प्रयास करायला लागतात, ते अंक निर्मितीसाठी धडपडणाऱ्यांना विचारा. दुरून सगळेच डोंगर साजरे दिसतात. पण त्यावरचा वावर सुंदर असतोच असं नाही. शेवटी सगळी उत्तरे ‘अर्थ’ या एका ‘अर्थपूर्ण’ शब्दात सामावलेली असतात. यासाठी तयार सूत्रे नसतात. तरीही काही माणसे हा खेळ का खेळत असावीत? असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. पण अंतर्यामी काहीतरी करायची आस असली अन् वाचकांच्या हाती अर्थपूर्ण आशय द्यायचा असला की, अनेक अनर्थ ओढवले तरी अशी माणसे विचलित होत नाहीत. अक्षरलिपीला अंगभूत अर्थ देण्यासाठी श्रमरत राहणारी महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतीक पुरी यांची जातकुळीच वेगळी. या सगळ्यांचं गोत्र एकच आहे, ते म्हणजे अक्षरलिपी. या सगळ्या सव्यापसव्याला नकाराची लेबले न लावता साधन मानणारी ही सगळी मंडळी म्हणूनच कौतुकास पात्र आहेत, नव्हे तो त्यांचा अधिकार आहे, असं म्हणणं अतिशयोक्त वाटत असलं तरी वास्तव आहे.

दिवाळी अंक केवळ तीनशे पासष्ट दिवसांची परिक्रमा नसतो. खरंतर दिवसांचे किनारे धरून अनेक गोष्टी वाहत येतात. वर्षभरात निसर्गही कूस बदलून नव्या वळणांवर विसावतो. मग माणूस तरी याला कसा अपवाद असेल? तो घडतो, घडवतो अन् बिघडवतोही. अशा घटितांना साकळून शब्दात बांधणे आवश्यक असतं, आपणच आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी. गेल्या काही वर्षांच्या दिवाळी अंकांचा धांडोळा घेतला, तर भवतालात घडणाऱ्या घडामोडींच्या नोंदी नेहमीच वाचकांच्या आस्थेचा विषय राहिल्या आहेत असे वाटते. सभोवती काही तरी घडतंय त्यामागची तथ्ये जाणून घ्यायची उत्सुकता असतेच प्रत्येकाच्या मनात. माणूस समाजाचा घटक असल्याने सामाजिक संवेदना टिपण्याला म्हणूनच आशयघनता लाभते. तो आरसा असतो आपणच आपल्याला न्याहळण्याचा. एखाद्या घटनेचे वस्तुनिष्ठ वार्तांकन म्हणूनच भावनांचं अधोरेखन ठरतं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अक्षरलिपीने आशयघन रिपोर्ताजांना केंद्रस्थानी ठेऊन अंकाची मांडणी केली आहे.

वार्तांकनाचं वाचन आनंददायी वगैरे वाटत असेल, पण वार्ता वेचण्यासाठी घडणारी वणवण समोर येतेच असे नाही. देश-प्रदेशाच्या सीमा पार करून ही माणसे सगळे किंतु-परंतु बाजूला ठेवून वेड्यासारखे धावत राहतात, सोयी-गैरसोयी नावांच्या सुखाना विसरून. परिसर वाचतात, अनुभव वेचतात अन् लेखांकित करतात. किती सहज लिहिलं हे! पण चारपाच पाने वेचण्यासाठी या लोकांनी काय केलं हे कळतं, तेव्हा आपल्या वाचक म्हणून मर्यादा आपोआप दृगोचर होत जातात. दिवाळी अंकातील नेहमीचे साचे बाजूला सारून वार्तांकन करणारी ही माणसे देशभर भटकली. त्याचा परिपाक हा अंक केवळ आपल्या प्रदेशापुरता सीमित न राहता समष्टीचा सोबती झाला आहे.

शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातलं जालियनवाला बाग हे धगधगतं प्रकरण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल. रौलेट कायदा, हरताळ, बैसाखी, डायरचे अमानुष कृत्य वगैरे गोष्टी पुस्तकाच्या पानावरून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना समोर ठेऊन अभ्यासल्या असतात. वर्गात पाठाचे अध्यापन करताना अर्धातास देशाभिमान वगैरे ओसंडून वाहत असतो. पण घटनेचे सगळेच अर्थ काही हाती लागत नाहीत. अर्थात, तेव्हा ते शक्यही नसते. म्हटले तर तशी आवश्यकताही नसते. या घटनेला शंभर वर्ष होत आहेत, हे लक्षात घेऊन तिथे प्रत्यक्ष जाणं हे किती महत्त्वाचं आहे याची प्रचीती ‘मनोहर सोनवणे’ यांनी लिहिलेल्या ‘जालियानवाला बाग शंभर वर्षांनंतर’ या लेखातून येते. केवळ इंग्रजांच्या साम्राज्यवादी राजवटीचा विघातक परिणाम कसा घडला, क्रौर्याची परिसीमा कशी झाली, या सीमांकित परिघाभोवती प्रदक्षिणा न करता त्यामागे असणाऱ्या संदर्भांची उकल या लेखातून केली आहे.

गडचिरोली नावाभोवती अनुकूल-प्रतिकूल अर्थाचे अनेक अंश आहेत. हा जिल्हा अनेक अर्थानी आपल्या आकलनाच्या मर्यादांच्या वर्तुळात बंदिस्त होणारा. घटनेकडे पाहण्याच्या प्रत्येकाच्या प्रतिमा वेगळ्या असतात. केवळ स्वतःच्या सुखांभोवती प्रदक्षिणा करीत फिरणाऱ्या आणि त्या गतीलाच प्रगती समजणाऱ्यांना दत्ता कानवटेंनी ‘जंगलातल्या माणूसकथा’ या लेखातून गडचिरोलीची प्रदक्षिणा घडवून आणली आहे. तेथे वसती करून असणाऱ्या माणसांचं जगणं, परिस्थितीने त्यांच्या पदरी घातलेलं आयुष्य वाचताना आपल्या आणि त्यांच्या जगण्यातील अंतर अधोरेखित केलं आहे. सुखांचे इमले उभे करणाऱ्या अन् प्रगतीच्या परिभाषा पद्धतशीर अवगत असणाऱ्या जगाला परिस्थितीच्या अंधारातला आस्थेचा कवडसा दाखवला आहे.

आपल्या देशाच्या सीमा लोकांच्या अस्मितेचा विषय. तो असू नये असे नाही. सीमेवरील सैनिकांच्या पराक्रमाची चित्रे पाहून उर अभिमानाने भरून येतो. देशाचे नागरिक असण्याची ही एक धवल बाजू. पण त्या परिसरात वसतीला असणाऱ्यांच्या जगण्याची दुसरी बाजू- ती कुठे आपल्याला दिसते. दाखवली जाते. चित्रपटात दिसतं ते आणि खऱ्याखुऱ्या बॉर्डरवासियांचं जिणं किती वेगळं आहे, याची जाणीव ‘मुक्ता चैतन्य’ यांच्या 'बॉर्डरलगतचं जगणं' या लेखाने होते. कोशात रममाण असणाऱ्यांची सुखे त्यांच्या वर्तुळापुरते विस्तारित असतात. पैसे टाकून सुखे विकत घेता येतात, असा समज असणाऱ्यांना सीमेवरचं जगणं समजेलच असं नाही. जमिनीचे तुकडे निर्देशित करणाऱ्या कुंपणांच्या तारांमध्ये लटकलेलं आयुष्य कधी आपल्या वाटेला आलं तर... याचा कधी आपण विचार केलेला असतो का? युद्धे विध्वंसक वगैरे असल्याचा वार्ता करतो. पण सतत युद्धाच्या छायेत जगणाऱ्याना विचारा, त्याची दाहकता काय असते. राहायचं भारतात अन् शेती करायला जायचं पाकिस्तानात, ही कल्पना कितीही मनोरम वगैरे वाटत असली, तरी त्यात नियमांच्या काटेरी तारांचे किती वेटोळे आहेत, हे कळल्यावर अस्वस्थ वाटतं.

वेदनांच्या वाहत्या जखमा घेऊन जगणारा जम्मू-काश्मीर. एकाचवेळी वैमनस्याच्या आणि अस्मितांच्या आवर्तात अडकलेला. काश्मीर आपल्या देशाची भळभळती जखम. तिथे घडणाऱ्या घटना माध्यमांचे हात धरून आपल्यापर्यंत चालत येतात. पण तिकडच्या गोष्टी टिपणाऱ्या माणसांचं जगणं काय असेल, याचा विचार आपण करतोच असं नाही. ‘अभिषेक भोसले’ यांनी ‘बुलेटस आणि स्टोन्समधला माध्यमस्फोट’ या लेखात हे जगणं रेखाटलं आहे.

‘जमाव, चार हत्या आणि दोन गोरक्षक’ या लेखातून मॉब लिन्चिंगवर लिहिलं आहे. व्हॉट्सअपवर फॉरवर्ड झालेल्या व्हिडिओला प्रमाण मानून माणसं कुठलीही खातरजमा न करता दुसऱ्या माणसाच्या जिवावर उठतात. होत्याचं नव्हतं करतात. माणसांच्या वागण्याच्या विसंगतीचा शोध या लेखातून घेतला आहे. माणसं एवढा विकृत विचार कसा करतात, मने कलुषित कसे होऊ शकतात, याची कारणमीमांसा करतात. घडतंय ते भयंकर आहे, भीषण आहे, अकल्पित आहे, पण वास्तव आहे, हेही नाकारता येत नाही. ‘शर्मिष्ठा भोसले’ यांनी अशा घटनांमध्ये आहत झालेल्या पीडितांची गावं गाठून त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिक परिस्थितीला मांडण्याचा प्रयास केला आहे. तसेच गोरक्षकांची बाजूही मांडली आहे.

‘नियमगिरी हमार ठा’ या लेखाच्या निमित्ताने सर्वस्वी वेगळंच विश्व ‘आदर्श पाटील’ आपल्यासमोर उभं करतात. विकास की विस्थापन, हा सतत संदेहाच्या परिप्रेक्षात असणारा प्रश्न. ओडिशातल्या बॉक्साइटने समृद्ध जंगलात वेदांता नावाचा मायनिंग प्रकल्प उभा राहतो. ही बहुराष्ट्रीय कंपनी तिच्या सगळ्या सामर्थ्यानिशी विकासाच्या संदर्भांचे टॅग लावून आपला पसारा उभा करते. विकासाची स्वप्ने साध्या माणसांच्या मनात पेरली जातात, पण पेरलेल्या बिया प्रत्येकवेळी मधुर फळे देणाऱ्या असतील असे नाही. त्या विरोधात इथले स्थानिक संघर्ष करतात. काय कमावतात, काय गमावतात हे वाचणं आपणच आपल्याला समजून घेणं आहे.

श्रद्धा अन् अंधश्रद्धा दोन धृवावर अधिवास करणाऱ्या गोष्टी. श्रद्धा डोळस असेल तर कोणाला संदेह करण्याचे कारण नाही, पण विचार जेव्हा दृष्टी हरवून बसतात, तेव्हा विज्ञानाने सिद्ध केलेले निष्कर्षही वांझोटे ठरतात. यासाठी निरक्षर, अशिक्षित असणे एवढीच अट असते असे नाही. देवाच्या नावाने आपल्याकडे अनिष्ट प्रथांना येणारी बरकत काही नवी नाही. महिलांच्या डोक्यावरच्या जटा हा त्यातलाच एक प्रकार. कर्मठ व्यवस्था तिला अधिक बळ देणारी. एक सामाजिक दबाव यामागे असतो. तो झुगारून जटा काढून टाकण्याचा निर्णय घेणं तसं अवघड. व्यवस्थेने शिरावर दिलेले हे अनावश्यक ओझे झुगारून देणाऱ्या महिलांबाबत ‘हिना कौसर खान-पिंजार’ यांनी ‘जटा मोकळ्या होतात तेव्हा’ या लेखातून लिहिलं आहे. लेखातल्या बाया परिस्थितीवश हताश आयुष्य जगत परंपरेच्या पात्रातून वाहत राहिल्या. परंपरेचं जोखड फेकून देताना त्यांना त्रास झाला. पण प्रेरणेचा हात मिळाल्यानंतर व्यवस्थेवर आघात करताना खंबीरपणे उभ्या राहतात.

‘तो’ एकटा की एकाकी?’ हा ‘मिनाज लाटकर’ यांचा लेख काळाचे पट दूर सारून पुढचा विचार मांडणारा आहे. आजच्या सामाजिक, सांस्कृतिक वर्तमानात एकटं जगणाऱ्या पुरुषांच्या भावविश्वाचा मागोवा घेणारा लेख लिहिणं, त्यासंदर्भात विचार करणं, त्यासाठी अभ्यास करणं, आवश्यक परिणाम साधण्यासाठी धांडोळा घेणं, हे सगळं वेगळेपण घेऊन येतं. लेख वाचताना आपल्या सामाजिक वास्तवाचे नवे पैलू आकळतात.

गावाकडल्या गोष्टींनी यूट्यूबवर लोकप्रियतेचे मापदंड अधोरेखित केले. अर्थात, हे यश काही सहजसाध्य नव्हते. काहीतरी निराळं करू पाहणाऱ्यांकडे विचारांचे वेगळेपण असायला लागते. सह्याद्रीच्या कुशीत मूठभर कोपऱ्यात वसलेल्या केळेवाडी गावापर्यंत जाणं हेच मुळात दिव्य. अवघड वाटांची सोबत करीत ‘मनश्री पाठक’ तेथे पोहचतात. गाव, गावातलं निसर्गाच्या सानिध्यात विहरणं आवडतं आपल्याला. पण तेथल्या माणसांच्या जगण्याची गोष्ट जाणून घ्यावी, असं किती जणांना वाटत असेल? माहीत नाही. पण अक्षरलिपीसाठी ते वाटणं हेच वेगळेपण ठरते. स्वनातीत वेगाने धावणाऱ्या माध्यमांच्या जगात केळेवाडीपर्यंत जाणंही किती कष्टप्रद आहे, हे ‘कोऱ्या पाटीवरची फिल्मी मुळाक्षरं’ या लेखातून कळतं.

हृषीकेश गुप्ते यांचा ‘पिसारा मानवी मोराचा’ लेख कालसुसंगत विषयाच्या वर्तुळात विहार करताना कामप्रेरणा केवळ जैविक नसून त्यात सामाजिक, सांस्कृतिक भान अन् इतर आनुषंगिक संदर्भ जुळताना कामप्रेरणा नेमकी काय असते, याचा विचार केला आहे. मानवी लैंगिकतेचा उत्क्रांतिजन्य मागोवा घेणाऱ्या त्यांच्या आगामी पुस्तकातील हा एक वाचनीय भाग आहे.

अॅक्शनपट अनेकांना आवडतात. सिनेमामधली मारझोड अनेकांना पराक्रमाची परिभाषा वाटते. पण हे सगळं उभं करताना मागे अनेक अज्ञात हात श्रमत असतात. चित्रपटसृष्टीतल्या अशा दुर्लक्षित मंडळींविषयी ‘प्रभा कुडके’ यांनी लिहिलं आहे. चित्रपट नायक नायिका यांच्याविषयी भरभरून लिहिलं जातं. पण चित्रपट घडवण्यात पडद्यामागे कार्यरत असणारे हात समोर येत नाहीत. या मंडळींबद्दल बहुदा लिहिण्याची आवश्यकता वाटत नसेल. पण या अंकात लिहावंस वाटणं हेच मुळात वेगळेपण आहे.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ या रंगनाथ पठारे लिखित आगामी कादंबरीतून संकलित ‘शंभूराव’ हा भाग, ‘बियास का उधाणली, त्याची गोष्ट’ प्रणव सुखदेव यांनी लिहिली आहे. ‘काही नोंदी: शेती मातीतील जगण्याच्या’ कल्पना दुधाळ यांनी लिहिलेलं ललित तसेच ‘स्व’पलीकडचा शोध घेणाऱ्या ‘आनंदाची सावली’ पराग पोतदार आणि ‘आनंदनिकेतन: तोत्तोचानची शाळा’ शिल्पा दातार-जोशी यांनी लिहिलेले सामाजिक संस्थांची ओळख करून देणारे लेख आवर्जून वाचावेत असे.

इंद्रजीत खांबे यांचे मुखपृष्ठ आणि ‘फॅमिली फोटोग्राफी’ मोबाईलचा परिणामकारक उपयोग करून कशी करता येईल, याचं महत्त्व अधोरेखित करणारे फोटो फीचर ‘फॅमिली ड्रामा’ प्रसंगांकडे अन् परिस्थितीकडे बघण्याचा नवा अँगल देते.

धगधगता भवताल ओंजळीत भरणाऱ्या कविता या अंकाला अधिक आशयघन करतात. कविता महाजन यांच्या स्मृतीस अर्पण केलेला हा विभाग कवितेच्या उंचीच्या परिमाणांचा शोध घेणारा आहे.

एकुणात वाचनात काही वेगळं हवं असेल. आधीच निर्धारित करून घेतलेल्या धारणांना छेद देणारं परखड आणि पारंपरिक विचारांच्या परिघाला परास्त करणारं वाचन आपल्या आस्थेचा विषय असेल अन् चौकटींच्यापलीकडे जावून काही शोधण्याची आस अंतरी अधिवास करून असेल, तर ‘अक्षरलिपी’ अंकाकडे आश्वस्त विचारांनी पाहता येईल, एवढं मात्र नक्की.

-चंद्रकांत चव्हाण
••
अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०१८
पृष्ठे: १८८
किंमत: ₹१६०
अंकासाठी संपर्क: महेंद्र मुंजाळ
संवाद: ७७४४८२४६८५
mahendramunjal@gmail.com
aksharlipi2017@gmail.com
••

0 comments:

Post a Comment