मी

By

'मी' हा शब्द स्वतःला अधोरेखित करण्यासाठी जिभेवर आला की, जगण्याचा परीघ सीमित होतो. आयुष्याचे अर्थ आक्रसतात. कुंपणे अधिक प्रिय वाटायला लागतात. स्व-भोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा समर्थनीय वाटू लागतात. गुंता वाढू लागतो. वेढून घेतलेल्या कोशात सुरक्षित असल्याचं वाटतं. खरंतर हे सगळं आभासी. तरीही माणसांच्या मनात अन् जगण्यात एवढा बेफिकीरपणा कुठून येत असेल? रोज कुठेतरी, काहीतरी अतर्क्य गोष्टी घडतात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं, तरीही माणूस मूळचा बदलायला तयार नाही. 'पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा' हे फक्त सांगण्यापुरतं, नाही का? भगवान गौतम बुद्धांची कथा वाचलेली असते आपण. ज्या घरात मृत्यू झाला नाही, तेथून मूठभर मोहऱ्या आणायला सांगितल्या. पण असं घर काही अस्तित्वातच नाही, हे नाहीच समजलं आम्हांला. की माहीत असून सोयीने दुर्लक्ष केलं?

काय आहे माणसाकडे एक बुद्धीचा अपवाद वगळला तर, उन्माद करण्यासारखे? ना हत्तीसारखी ताकद, ना गरुडासारखी गगनझेप, ना पाण्यात माशासारखा सूर मारता येत. काहीच नाही. हे सगळं नसलं, तरी बुद्धिमत्तेच्या बळावर त्याने विमाने तयार करून गगनाला गवसणी घातली. पाणबुड्या माशाला लाजवतील असा सूर अथांग पाण्यात मारतात वगैरे वगैरे. हे किंवा असंच काहीसं सांगेल कोणी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ. मान्य! त्याच्या या सामर्थ्याचा अधिक्षेप करण्याचं कोणतंच प्रयोजन नाही. पण माणूस आव तर असा आणतो की, सृष्टीचा उद्गाता केवळ तोच आहे. केवढा हा भ्रम! निसर्गनिर्मित आपत्तींसमोर आहे तरी केवढा त्याचा जीव? हे तो सोयिस्करपणे विसरतो अन् तत्वज्ञान तर जगातल्या सगळ्या पुस्तकातलं सांगतो. अगदी कोळून प्याल्यासारखं. पण मस्तक? त्यात तर द्वेष, असूया, मत्सर खच्चून भरला आहे. आधी हे ओझं रिकामं करणं आवश्यक नाही का? शक्य आहे का हे? अवघड असले, तरी अशक्य नाही. पण माणसाला साक्षात्कार झालाय आपल्या महान असण्याचा. तुझ्याकडे सगळं काही आहे, मान्य. पण माणूसपण आहे? नसेल तर घेतला शोध कधी त्याचा? नाही ना! मग कशाला व्यर्थ गोष्टी करतो आपण सामर्थ्याच्या. असतील माणसाकडे अणुबॉम्ब, असतील अस्त्रेशस्त्रे वगैरे वगैरे. पण तो कुणाला नव्याने श्वास देऊ शकतो का? मारणं खूप सोप्पंय, पण जीवन देणं... कोणी वैद्यकीय प्रगतीचे आलेख दाखवेल, पण त्यांच्या उंचीला मर्यादांनी सीमांकित केलंय त्याचं काय?

आयुष्य आहेच किती, या अफाट पसाऱ्यात माणसाच्या वाट्यास आलेलं? चिमूटभर! हो तेवढंच, पण... हा 'पण' काही माणसाला माणूस उमजू देत नाही. तो ज्याला आकळला, त्याला ग्रंथांचा, दार्शनिकांच्या दर्शनांचा अन् महात्म्यांच्या महत्तेचा अर्थ समजला. सॉक्रेटिस दिवसा कंदील हाती घेऊन त्याच्या प्रकाशात रस्त्यावर माणसं शोधत होता म्हणे. एकही माणूस नाही दिसला त्यांना. केवळ चालत्या बोलत्या आकृत्याच तेवढया नजरेस पडत होत्या. खरंखोटं काय माहीत नाही. आजही शोधून पाहा; माणूस दिसेलच याची शाश्वती आहे का? खरंतर माणसे कंदील घेऊन आपणच आपल्याला पाहताना अन् मीच महात्मा म्हणून सांगताना दिसतात. हे सगळं पाहतो तो माणूस अन् अनुभवतो तोही माणूसच, तेव्हा वाटतं प्रवास अजून खूप बाकी आहे. अर्थात, हे सगळं अपेक्षित नसलं तरी अनपेक्षितही नाही. सगळ्याच बाजूंनी अंधार असेल, तर उगीच त्रागा करून हाती काय लागणार आहे? बदल वगैरे गोष्टींना अंगभूत आशय नसतो असं नाही. बदल अपेक्षांचे पर्यवसान असतो. परिवर्तनाची आस अंतर्यामी नांदती असण्यात काही गैर नाही.

'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो लहानमोठा असू शकतो. अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. समतल पातळीवरून वाहत राहावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील, तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.

तसंही आपलं वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तन व्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तन व्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! इच्छापूर्तीचा मार्ग निग्रहातून निघतो. प्रसंगवश इच्छाशक्तीचा अभाव दिसत असेलही, पण ती संपली आहे, असे नाही. जीवनाच्या गुणवत्तेचा प्रश्न आहेच. वादच नाही. गुणवत्ता सहयोगातून साकार होते. करूया ना थोडे आणखी प्रयत्न. झिजलो तर झिजू थोडे. कोणी नाही काही केलं किंवा केलं तरी, कोणतीही तक्रार न करता. असं आपल्याला किती वेळा मनापासून वाटत असतं?

सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये दिसली असती का? आतापर्यंत प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. पण आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
••

1 comment:

  1. छान, माणसे आहेत पण माणुसकी हरवत चाललीय.डोळे आहेत दृष्टी हरवत चाललीय. हे सर्वांना कळतंय पण वळत नाही.

    ReplyDelete