सुरक्षा

By

व्हॉट्सऍप गृपवर एक चित्र संदेश कोणीतरी फॉरवर्ड केला. पाठवलेल्या चित्रात प्राण्यांचा कळप जंगलातल्या वाटेने चालला आहे. यातले वयोवृद्ध समूहाच्या अग्रस्थानी आहेत. संभाव्य आक्रमणापासून सुरक्षेची जबाबदारी घेऊन त्यांच्या मागे काही ताकदवान चालत आहेत. कळपातील थोडे कमकुवत, वयाने लहान मध्यभागी अन् सर्वात शक्तिशाली त्यांच्या मागे चालून समूहाला सुरक्षित करत आहेत. सर्वात मागे समूहाचे नेतृत्व करणारा नायक चालतो आहे. अर्थात, अशी चित्रे काही नवीन नाहीत अन् नवल वाटावं असंही काही नाही त्यात. जिवांची भटकंती अटळ भागधेय असतं. उपजीविकेच्या निमित्ताने घडणारी वणवण असते ती. निसर्गदत्त प्रेरणा असते. जगण्याचा कलह असतो. त्याला टाळून कोणत्याही जिवांचे जीवनयापन घडणे अवघडच. चित्रातील प्राण्यांच्या चालण्याच्या क्रमाला अधोरेखित करीत सुरक्षेच्या सामूहिक तंत्राला संदेशातून समजावून सांगण्याचा प्रयास मात्र लक्षणीय. परस्पर संवाद, सहकार्य अन् समायोजन असेल, तर जिवांच्या जीवित राहण्याच्या शक्यता अधिक वाढतात वगैरे वगैरे असं काही सांगायचा हेतू लिहणाऱ्याचा, पाठवणाऱ्याचा आहे, हे वेगळं सांगायला नको.

खरंतर सोशलमीडियाच्या वाटेने चालत आलेले शेकडो संदेश मिनिटा-मिनिटाला मोबाईलच्या स्क्रीनवर आदळत असतात. त्यातले वाचले किती जातात, हा एक भाग अन् डिलीट किती केले जातात, हा दुसरा. समजा हे संदेश वगैरे पाहिले, वाचले, तरी वाचून विचार कितीजण करत असतील? माहीत नाही. हा एक नक्की की, हा पळभर कुतूहलाचा विषय अवश्य असू शकतो. तसंही रोज मिळणारा दीड जीबी डेटा अशा गोष्टी फार मनावर घेऊ देत नाही, हेही तेवढेच खरे. क्वचित कोणाची नजर अशा संदेशावर स्थिरावते. केवळ पाहून अथवा वाचून पुढच्या वळणांकडे पावले चालती होतात. त्यावर चिंतन वगैरे प्रकाराची अपेक्षा करणे अवघडच. सतत आदळणाऱ्या अशा संदेशांनी कोण किती सुधारला, याचं काही संख्याशास्त्रीय परिमाण नाही अन् कोणी त्याचं सांख्यिकी विश्लेषण सांगून आपल्या म्हणण्याची पुष्टी करतो, असंही नाही. खरंतर असा प्रश्न विचारणे हाच विनोदाचा विषय.

कदाचित लिहिणाऱ्याला अन् फॉरवर्ड करणाऱ्याला असे वाटत असावे की बस्स, जगातली सगळीच नाही; पण संदेश वाचणारी माणसे पुढच्या मिनिटाला सात्विक, सोज्वळ, समंजस वगैरे होतील. एवढा गोड भ्रम माणसाच्या मनात का असतो? कुणास ठाऊक. निदान असे संदेश पाठवणारा तरी व्यापक विचारांनी वर्तत असेल का? असलाच तर अपवाद असावा. बहुदा नसण्याचीच शक्यता अधिक. कारण फारकाळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मोबाईलने माणसाकडे राहू दिली नाही. लिंक, हायपर लिंक असा खेळ सुरूच असतो. आपल्या जगण्याच्या व्यवहारांकडे थोडं गंभीरपणे पाहिलं तरी हे कळेल.

आपल्या सार्वजनिक जगण्याच्या स्वभावाला साजेसा हा संदेश असल्याचे नाकारून काही फरक पडत नाही. सार्वजनिक जीवनातला गोंधळ, गलथानपणा, भोंगळपणा आम्हां लोकांना काही नवा नाही. तो आहे म्हणून कोणी फार विचलितही होत नाही. झालेतच कुणी थोडे इकडेतिकडे, थोडे व्यथितचित्त तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं असंही कुणाला फारसं आवश्यक वाटत नाही. आपल्या सार्वजनिक जगण्यातल्या व्यवहारांकडे नुसता एक कटाक्ष टाकून पाहिला, तरी कुणाचेही प्रथमदर्शनी मत असेच व्हावे इतके आम्ही बजबजपुरीबाबत बांधील आहोत. आम्हाला वैयक्तिक अन् वैकल्पिक चेहरे आहेत. स्वार्थ साध्य करायचा असला की, वैयक्तिक देखणेपण दाखवण्यात कोणतीही कसर राहू देत नाहीत, पण 'आपला' हा शब्द आला की, वैकल्पिक चेहरा समोर येतोच येतो.

निसर्गासोबत जगताना देहाने झेललेले उन्हाळेपावसाळे पदरी शहाणपण पेरून जातात. अनुभवातून आलेल्या शहाणपणातून घडणाऱ्या मार्गदर्शनाला एक अनुभवनिष्ठ अधिष्ठान असतं. ते संचित असतं, भल्याबुऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यातून संपादित केलेलं. यातून समूहाला सुरक्षित राहण्याचे आश्वस्त केलं जातं. काही उमेदीच्या वाटेने प्रवास करणारे एक अल्लडपण घेऊन असतात. उत्साह दांडगा असतो. उत्साहाने कामे मार्गी लागतात, पण अंगातील या सळसळत्या चैतन्याला मर्यादांचे बांध घालणे आवश्यक असतं. उत्साह प्रत्येकवेळी पर्याप्त पर्याय असेलच असं नाही. अंगात धमक अन् विचारांत संयम असणारे समूहाचं संरक्षक कवच असतात अन् या सगळ्या स्तरांवर असणारा संवाद, सहकार्य सुरक्षेचे प्रमाण असते, तसेच समूहाच्या प्रगतीचे गमकही. यातला एखादा घटक विचलित झाला, तरी सुरक्षेला भेदण्याचे पर्याय दुसऱ्या चाणाक्ष समूहाला गवसतात. एखादा अलिप्त झाला, तर केवळ अन् केवळ दैवच त्याचे आयुष्य सुरक्षित राखू शकते. प्रगतीच्या परिभाषा पर्याप्त पर्यायात सामावलेल्या असतात. समायोजन, सहकार्य, सहयोग, असणं महत्त्वाचं. वैयक्तिक कांक्षा, आपापसातील हेवेदावे, एकमेकांचा द्वेष, परस्परांविषयी वाटणारी असूया व्यवधाने असतात. ती बाजूला सारून सहकार्याचे साकव उभे करता आले की, सुरक्षित राहण्याच्या शक्यता कितीतरी अधिक होतात.

आदर्शवत आयुष्य असण्यासाठी संयमाच्या कक्षेत विहार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही असते, ही या संदेशाची एक बाजू. पण दुसरी बाजू जी कधी दिसत नसते, पण काम मात्र निष्ठेने करीत असते. सामान्य वकुब असणारी माणसे आदर्शांनी हरकून जातात. त्यांना हरवण्यासाठी अनेक विकल्प असतात. दुर्दैव हे की असे विकल्प लोकांना माहीत नसतात असं नाही, पण त्याची धग स्वतःला लागत नाही तोपर्यंत त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. असो, सुविचारांनी जग सुधरत नसतं. सुविचारांची अक्षरे समोर नसली म्हणून कोणी बिघडतही नसतं. विपरीत मानसिकतेने वावरणारे दोन वाईट माणसं आसपास नांदते असले, म्हणून काही सगळा समाज वाईट नसतो. पण बेफिकिरी समाजाच्या जगण्याची रीत झाली की, प्रश्न अधिक टोकदार होतात. आधी विचार करणारे सुधरले, तर सामान्यांच्या अपेक्षा साकार होतात. चिमूटभर स्वार्थाला परमार्थ मानण्याची मानसिकता प्रबळ झाली की, आयुष्याची गणिते अधिक जटिल होतात. एकुणात अवघड प्रश्न फक्त प्रश्नच राहतात.

हे सगळं प्राण्यांच्या माध्यमातून माणूस समजावून देतो, पण माणूस माणसाला समजवताना अपुरा का पडतो? खरंतर जीवशास्त्राच्या व्याख्येत तोही एक प्राणीच; पण प्राण्यात अन् माणसात एक फरक आहे. प्राणी समूहाच्या सुरक्षेत आपलं आयुष्य शोधतात, माणसं मात्र समूहात राहूनही स्वार्थात. प्राण्यात मिंधेपण असल्याचे अवगत नाही. ते असते का? माहीत नाही, पण बहुदा नसते. माणूस या गुणाला अपवाद. प्राण्यांच्या गरजा देहधर्माजवळ येऊन थांबतात. त्यांची पूर्तता करणे सहजप्रेरणा असते त्यांच्या जगण्याची. माणसांच्या गरजा मात्र वेगळ्या, त्या निसर्गदत्त जेवढ्या, तेवढ्या प्रगतीच्या वाटेवरून प्रवास करताना त्याने निर्माण केलेल्या असतात. त्याच्या आवश्यकतेचे क्रम, गरजा स्वतःपासून सुरू होऊन स्वतःजवळ संपतात. तरीही तो जीवसृष्टीत श्रेष्ठ. श्रेष्ठत्वाच्या परिभाषा मुळात चुकीच्या गृहितकावर आधारित असल्या की, सहजप्रेरणा पराभूत होणं अटळ भागधेय असतं. स्वतःभोवती प्रदक्षिणा विस्ताराच्या परिभाषा नाही होऊ शकत. फारतर गतीचा आभास निर्माण करतात. गती आणि प्रगती शब्दांना जगण्यात वाजवीपेक्षा अधिक मोल आले की, तत्वे पोरकी होतात अन् संकुचितपणाला बरकत येते.

गतीला अंगभूत अर्थ असले की, प्रगतीचे पथ प्रशस्त होतात. प्रगती विकास सूत्रांच्या व्याख्या निर्धारित करते. सुखाचं गोत्र सगळ्यांचं सारखं कसं असेल? सम्यक समाधानाचा धर्म साऱ्यांचे हित केंद्रस्थानी घेऊन मांगल्याची आराधना करतो, पण स्वार्थाचा संदर्भ संकुचितपणाला बरकत समजतो. एकीकडे पसायदान मागायचे अन् दुसरीकडे प्रसाद केवळ स्वतःच्या हाती राखायचा, हा वर्तन विपर्यास नाही का? 'समूहाचे समाधान' हा शब्दच मुळात निसरडा असला, तरी त्याला समर्पणाच्या चौकटीत अधिष्ठित करून पर्याप्त अर्थ प्रदान करता येतो, हेही वास्तव आहे. समूहमनाची स्पंदने कळली की, व्यवस्थेला सूर गवसतो अन् सुरांना सुंदरतेचा साज चढवता आला की, आयुष्याचं गाणं होतं, नाही का?
••

0 comments:

Post a Comment