तंत्रज्ञाननिर्मित साधनांबाबत बरीच मतमतांतरे असतात. त्यांच्या असण्या-नसण्याविषयी काही धारणा, काही दृष्टिकोन, काही वाद, काही प्रवाद असतात. अर्थात, हे स्वाभाविकच. ते असतातच. असतील. असूच नयेत असं वाटत असेल कोणाला तर... याला काही अर्थ नसतो. विज्ञाननिर्मित सगळीच साधने अन् त्यांचा उपयोग सरसकट संयुक्तिक नसतो, असं म्हणणारा एक प्रवाह; तर यांच्याशिवाय तुमच्या प्रगतीचे अर्थ अपूर्ण असल्याचे मानणारा दुसरा अन् त्यांचा डोळस वापर केला, तर कोणतंही तंत्रज्ञान वाईट नसतं सांगणारा आणखी एक मध्यममार्गी समूह असतो. आपल्या आसपास थोड्या सजगपणे पाहिलं, तरी हे सहज प्रत्ययास येईल. त्याकरिता दुर्बीण घेऊन शोधण्याची आवश्यकता नाही.
अर्थात, हे सगळ्याच साधनांबाबत कमीअधिक प्रमाणात होतच असते. गेल्या काही वर्षांपासून या विचारप्रवाहात आणखी एक भर पडली आहे ती समाजमाध्यमांची. हे माध्यम बरे, चांगले, वाईट की आणखी कसे, याबाबतीत अगदी टोकाचे म्हणता येतील एवढे प्रवाद विचारांमध्ये आहेत. ते समर्थनाचे आहेत, तसे विरोधाचेही. ते असू नयेत असे मी म्हणणार नाही. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, मते अनुभवसिद्ध असतील तर कुठल्याही वादविवादांना अर्थ असतो. पण केवळ कुणी तसं म्हणतो म्हणून मीही अगदी तसंच सांगत असेल, तर ते केवळ अनुकरण असते. अनुकरणाला अनुयायी असले की पुरते. त्यात अभ्यास असायलाच हवा असं नसतं. अशा समर्थनाला उंची असते, पण खोली नसते. अभ्यासाने विचारधारांना अर्थ गवसतो. अनुकूल-प्रतिकूल विचारांचा लसावी काढला तर सांगता येईल की, प्रवाद अवश्य असावेत; पण अभिनिवेश नको.
तंत्रज्ञान, मग ते कोणतेही असो, कोणत्याही पिढीत जन्माला आलेले असो, आधी त्याविषयी कुतूहल असतं, जिज्ञासा असते. थोडा कालावधी उलटून ते अवगत झाले की, एकतर आसक्ती असते अथवा तिरस्कार. पण ते जसजसे जगण्यात झिरपू लागते, तसे प्रवादाचे मुद्दे बाजूला पडतात. वादही बऱ्यापैकी निवळतात. उरते ते फक्त त्याचे असणे अथवा स्वीकारणे किंवा नाकारणे. कोणी फार खळखळ न करता त्यावर मान्यतेची मोहर अंकित करतो, कोणी नफा-नुकसानीची गणिते करून काळाच्या तुकड्यात त्याला अधिष्ठित करतो इतकेच. काळ काही कोणाचा सोयरा नसतो अन् कोणासाठी प्रतीक्षा करायला त्याच्याकडे सवडही नसते. कधीकाळी आपल्याकडे संगणकाचं आगमन झालं, तेव्हा त्याच्या विरोधात लोकांनी एकच ओरडा केल्याचे आपण वाचले, ऐकले असेल. श्रमणाऱ्या हातांचं काम अन् त्यामुळे ताटातली भाकर हे यंत्र ओढून घेईल, या अनाठायी भीतीपायी अनेकांनी नकारघंटा वाजवण्यात धन्यता मानली. लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शित केला. आज याबाबत काय चित्र दिसतंय, ते सगळ्यांच्या समोर आहेच. अपवाद लोक असतील, ज्यांना संगणक माहीत नसेल.
हे सगळं आताच घडलं आणि आधी नव्हतं असंही नाही. तंत्रज्ञान त्या त्या काळाचं अपत्य असतं. शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या पाच हजार वर्षात जेवढे शोध लागले नसतील, तेवढे त्याच्या पुढच्या पाचशे वर्षात लागले. त्याही पुढे जाऊन पुढच्या पन्नास वर्षाचा शोधांचा आलेख कितीतरी उंचीवर पोहचला अन् या पन्नास वर्षात माणसांनी कमावले, त्याच्या कितीतरी पटीने लगतच्या पाच वर्षात मिळवले. प्रगतीच्या वेगाचा धांडोळा घेतलाच, तर एक गोष्ट अधोरेखित करायला लागते, ती म्हणजे तंत्र वेगाने विकसित होत असते. जर त्याचा विकासाचा वेग एवढा अफाट असेल, तर याचा अर्थ सरळ आहे तो म्हणजे, ते नक्कीच उपयुक्त असावे. नसते तर कुणी त्याकडे ढुंकून तरी पाहिले असते का? तरीही माणूस याबाबत नकाराची लेबले का लावत असेल? की मुळात नको ती सगळी भानगड, म्हणून केवळ नकाराला नकार अन् विरोधापुरता विरोध करायचा असतो, म्हणून हे केलं जात असेल? निश्चित विधान करणे अवघड आहे. अर्थात, हेही माणसाचं स्वाभाविक वागणं.
तंत्रज्ञानाबाबत काही आवाज अधून मधून आपापले आलाप आळवत असतात. त्यांनी आपले सूर लावू नये, तंबोरे ताणू नये असे नाही. पण सुरांना स्वरांचा साज चढवून त्याचे गाणे करता यावे. आपण जाणतो, समजतो त्यापलीकडे आणखी एक बाजू असते, जी आपल्याला आकळली नसेल कदाचित, एवढं भान असावं की नको. असो, खरंतर सगळ्याच गोष्टी एकजात चांगल्या अन् सगळ्याच सरसकट वाईट नसतात. आपण त्या कशा हाताळतो, यावर त्यांचं असणं ठरत असतं. आपल्या सार्वजनिक जगण्यात काही लाटा अधूनमधून येत असतात. जात असतात. त्यावर काही स्वार होऊन आनंद घेतात काही अन् काही उगीच गटांगळ्या खातात.
माणूस तंत्रज्ञान विकसित करणारा प्राणी आहे, हे काही नव्याने सांगायला नको कुणाला. त्याचे अर्थ अनुभवांनी बहुतेकांना अवगत असतात अन् नसलेच ज्ञात तर येणारच नाहीत, हे खात्रीपूर्वक सांगता नाही येत. तसंही अनुभव ही वैयक्तिक जाणण्याची बाब आहे. एखाद्याचा चांगला अनुभव दुसऱ्यासाठी वाईट असू शकतो. तिसऱ्यासाठी आणखी वेगळा. सांप्रत अशा भल्याबुऱ्या प्रतिक्रियाचं सगळ्यात अधिक धनी कोण असेल, तर व्हाट्सअप अन् फेसबुक. एक काळ असा होता, विशेषतः तीसएक वर्षांपूर्वीच्या पिढीचा, तेव्हा सिनेमा अशा टीकेचा धनी असायचा. आता ती जागा सोशलमीडियाने घेतली आहे इतकेच. पण तंत्रज्ञानाला नावे ठेवण्याची पद्धत आहे तशीच आहे. त्यात काहीही बदल नाही. समाजमाध्यमाचा अनिर्बंध वापर करणाऱ्या मुलांबाबत विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांबाबत तर ही ओरड काकणभर अधिकच.
अर्थात, ही माध्यमे बरी की वाईट, हा मुद्दा नाहीच. प्रश्न आहे, तंत्रज्ञानातून निर्मित साधनांचा उपयोग आपण करतो कसा? त्यांच्यामुळे सुविधा येतात, तसा सवंगपणाही सोबतीला चालत असतोच. सम्यक उपयोगाची सूत्रे समजून घेता यावीत. कोणतेही तंत्रज्ञान सुखाच्या अपेक्षेनेच शोधकर्ता शोधत असतो. पण त्याचा उपयोग कोणी कसा करावा, हे काही ठरवायचा अधिकार त्याला नाही अन् ते संभवही नाही.
तर सांगायचा मुद्दा असा की, आमच्या काही सहकाऱ्यांमध्ये अशाच तात्विक मुद्द्यांवरून प्रचंड आवेशाने संवाद सुरू होता. विषय होता तंत्रज्ञानाबाबत. त्यातही अधिक भर होता मोबाईलवर. हे तंत्रज्ञान किती अन् कसे उपयुक्त-अनुपयुक्त वगैरे वगैरे. याला कारण ठरले कुठल्यातरी विद्यार्थ्याने वर्गात मोबाईल आणल्याचे. आईनेच त्याच्याकडे तो दिला होता. कारण तिला नोकरीच्या कामानिमित्ताने बाहेरगावी येणे जाणे भाग होते. घरी पोहचण्यास रोजच उशीर होत असल्याने मुलाची, त्याच्या अभ्यासाची काळजी होतीच. आवश्यक असेल तेव्हा संपर्क करता यावा, म्हणून तिने तिचा मोबाईल मुलाला वापरायला देण्याचा विकल्प निवडला. बरं वर्गात मोबाईल आणला म्हणून फार काही बिघडत नाही, हे मान्य. पण तो अनपेक्षितपणे त्याच्या दप्तरातून नाहीसा झाला. हरवला की कुणी चोरला (?), हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
हे सगळं घरी कळलं, तेव्हा चारपाच दिवसांनी तासमिनिटंसेकंदांचा हात धरून भूतकाळाच्या अंधारात आपला अधिवास शोधला होता. वेळ हातून निघून गेलेली. पर्यायाने मोबाईल परतीच्या शक्यता धूसर झालेल्या. मेमरीकार्डमध्ये आईच्या कार्यालयीन कामाच्या काही नोंदी होत्या. त्या त्यांना हव्या होत्या, म्हणून मुलाकडे मोबाईल मागितला. कुठलीतरी कारणे सांगून त्याने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. पण न सांगून किती दिवस वेळ मारून नेता आली असती अशी मुलाला? कळले घरी एकदाचे. आले मुलाचे पालक शाळेत. केली तक्रार शिक्षकांकडे. नंतरचे सगळे सोपस्कार पार पाडायचे. पण त्यांनी दाखवला समजूतदारपणा. गेला मोबाईल, जाऊ द्या म्हणाले. गेलाच आहे अन् तो काही सहजी हाती लागणार नाही, या भावनेतून त्यांनी फारसे मनावर नाही घेतले. निदान मेमरीकार्ड मिळाले परत तर बघा, असं सांगून परत गेले. नंतर शिक्षकांनी या प्रकारचा छडा लावण्यासाठी आपल्याकडच्या अनुभवसिद्ध क्लृप्त्या वापरून पाहिल्या. पण मोबाईल काही हाती नाही लागला. जे काही घडलं, ते ज्याचा मोबाईल होता त्याला किंवा ज्याने नेला त्यालाच ठाऊक. मास्तर मात्र उगीच याविषयावर काथ्याकूट करीत राहिले.
तरीही एक प्रश्न शेष राहतोच की, संवादकर्त्यांपैकी नेमके कोण खरे? समर्थन करणारी की, विरोध करणारी विचारधारा? या प्रश्नाच्या उत्तरासाठीच तर एवढे नमनाचे घडाभर तेल जाळले. यापैकी एक तंत्रज्ञाननिर्मित साधनांच्या आवश्यकतेबाबत, तर दुसरा त्याच्या चुकीच्या वापराबाबत आपल्याकडील ज्ञानाची सगळी अस्त्रे-शस्त्रे परजून आपलं म्हणणंच कसं रास्त आहे, हे सांगण्याचा प्रयास करीत होता. यांत चूक कोण अन् बरोबर कोण? हा मुद्दा वेगळा. तसंही मुद्द्यांबाबत सगळेच आग्रही असतात. प्रत्येकाला आपणच योग्य असल्याचे वाटत असते. पण मुलाचं म्हणणं काय होतं? याबाबत कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. त्याने सांगितलेले कारण विचारात घ्यावे, असं कोणाला का वाटलं नसेल? आईबाबांना नोकरीच्या निमित्ताने दिवसातला बहुतांश वेळ बाहेरच राहावे लागते. त्यांच्याशी संपर्कात राहावे, म्हणून मोबाईल सोबत असतो. मी तो शाळेत कधी आणत नाही. पण शाळेत यायला आज उशीर झाला. घाईतच घरून निघालो अन् बॅगमध्ये चुकून राहिला. खरंतर चर्चेतील मुद्द्यांचे प्रश्न अन् उत्तर येथेच आहे; पण त्याकडे लक्ष द्यावं असं का कोणास वाटलं नसेल? खरंतर त्याच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे की नाही, हा प्रश्न नाही. त्याचा उपयोग कशासाठी, केव्हा अन् कसा करावा, याची जाण अन् भानही त्याला आहेच. आईबाबांनी या सगळ्या मोहांबाबत जाणीव करून दिली आहे म्हणून तो सांगतच होता. पण प्रामाणिकपणाला प्रत्येकवेळी प्रतिसाद मिळतोच असे नाही. कारण तंत्रज्ञानाची हीपण एक बाजू असते. ती योग्य की अयोग्य, हे त्यावेळेची परिस्थिती ठरवते. तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहतोच, तो प्राधान्यक्रमाचा. एकदा का ते निर्धारित करता आले की, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे गवसतात, नाही का?
••
0 comments:
Post a Comment