दुरावा एक लहानसा शब्द. मोजून तीन अक्षरे फक्त. पण त्यात किती अंतर असतं नाही! कित्येक मैल, कितीतरी कोस, अनेक योजने, की अजिबात पार करता न येण्याइतके... की आणखी काही? नक्की सांगता येत नाही. पण काही शब्द आशयाचं अथांगपण घेऊन जन्माला आलेले असतात. मनाच्या विशिष्ट भावस्थितीला निर्देशित करणे त्यांना नेमकं जमतं. तसाच हाही एक शब्द म्हणूयात! दुरावा केवळ नात्यांत निर्माण होणाऱ्या अंतराचा असतो, की भावनांच्या आटत जाणाऱ्या ओलाव्याच्या. तुटत जाणाऱ्या बंधांचा की, आणखी काही? सांगणे अवघड आहे. तो दिसत असला, जाणवत असला, तरी त्याला निर्देशित करण्याची काही निश्चित अशी परिमाणे नसतात. असली तरी ती पर्याप्त असतीलच असं नाही. कदाचित प्रासंगिक परिणामांचा तो परिपाक असतो किंवा आणखीही काही. हा 'काही' शब्दच अनेक शक्यता सोबत घेऊन येतो. शक्यतांच्या परिघातून आशयसंगत विचार जन्माला येईलच असं नाही. बऱ्याचदा त्यात गृहीत धरणंच अधिक असतं. याचा अर्थ सगळ्याच गोष्टींना गृहीतके वापरून नाही पाहता येत. तसंही गृहीत धरायला नाती काही बीजगणित नसतं, याची किंमत एक्स समजू किंवा त्याला वाय मानू म्हणायला. नाती उगवून येण्यासाठी अंतरी असलेल्या ओलाव्यात आस्थेची बीजे पेरायला लागतात. रुजून आलेले कोंब जतन करायला लागतात. आघातापासून सुरक्षित राखायला लागतात.
कोणीतरी निर्धारित केलेल्या सूत्रांच्या साच्यात ढकलून आयुष्याची समीकरणे सुटत नसतात अन् उत्तरेही सापडत नसतात. कधीकाळी आपली असणारी, आस्थाविषय बनून अंतरी नांदणारी, साधीच पण स्नेहाचे झरे घेऊन झुळझुळ वाहणारी माणसं कळत-नकळत दुरावतात. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे ओहळ अनपेक्षितपणे आटतात. मागे उरतात केवळ कोरड्या पात्रातील विखुरलेल्या शुष्क आठवणींचे तुकडे. आसक्तीच्या झळा वाढू लागल्या की, ओलावा आटत जातो. नात्यात अंतराय येतं. दुरावा वाढत जातो. समज थिटे पडायला लागले की, गैरसमज स्वाभाविकपणे वाढत राहतात. झाडावर लटकलेल्या अमरवेलीसारखे पसरत जातात. विधायक विकल्प निवडीला पर्याय देतात, पण विचारांत विघातक विकल्पांचं तण वाढू लागले की विस्तार थांबतो.
समजूतदारपणाच्या मर्यादा पार केल्या की, तुटणे अटळ असते. स्नेह संवर्धित करायला अनेक प्रयोजने शोधावी लागतात. नात्यांच्या माळा विखंडीत व्हायला एक वाकडा विकल्प पुरेसा असतो. मने दुरावण्यामागे एकच एक क्षुल्लक कारणही पर्याप्त असते. ते शोधायला लागतातच असं नाही. अविश्वासाच्या पावलांनी चालत ते आपल्या अंगणी येतात. आगंतुक वाटेवरून प्रवासास प्रारंभ झाला की, अनेक कारणांचा जन्म होतो. ती एकतर्फी असतील, दोनही बाजूने असतील किंवा आणखी काही. मूठभर मोहापायी माणसे बदलली की, मनाच्या चौकटीत अधिवास करून असलेल्या प्रतिमेला तडे पडतात. हे तडकणे अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन वाहत राहते. त्यांच्या असण्याचा आनंद निरोप घेतो. मागे उरतात व्यथा अन् क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या अंतराने जन्माला घातलेल्या वास्तव-अवास्तव कथा. वेदनांच्या गर्भातून समाधानाचे अंश प्रसवत नसतात. सर्जनात आनंद असला, तरी सगळ्याच निर्मिती काही सर्जनसोहळे नसतात.
कधीकधी काही प्रश्न अशा वळणावर आणून उभे करतात की, पायाखालच्या सरावाच्या वाटाही अनोळखी वाटू लागतात. असं का व्हावं? नेमकं चुकलं कोणाचं? यासारखे प्रश्न मनाभोवती उगीच पिंगा घालू लागतात. अधिक जटिल होत जातात. गुंता वाढत राहतो. ते सोडवायचा प्रयत्न करावा तेवढ्या गाठी घट्ट होत जातात. काही सोडवत राहतात परत परत. काही तो विचारच सोडून देतात. विचारांतून एखादी प्रतिमा पुसली गेली की, बरेच प्रश्न आपोआप निरोप घेतात. पण ओरखडे कायम राहून जातात. त्यांना सहजी नाही मिटवता येत. त्या खुणा पुसणाऱ्या काळाची प्रतीक्षा संयमाची परीक्षा असते. अर्थात, हे काही प्रत्येकवेळी नाही घडत. पदरी पडलेल्या परिस्थितीच्या खेळाला अनेक कंगोरे असतात. तो एकदा का सुरु झाला की, सुरू होतात समर्थनाची अनेक विधाने अन् विरोधाची एकेक कारणे. कुणी घेतो सहजपणे समजून. कुणी उगीच पापुद्रे काढत राहतो.
माणसांच्या वागण्याची सुनिश्चित तुलना करणे अवघड. प्रत्येकवेळी त्याचे वागणे सुसंगत असेलच असे नाही. त्याच्या असण्यात अनेक अतर्क्य गोष्टी अनुस्यूत असू शकतात. त्याच्या तर्कविसंगत वर्तनाची तुलना कुणी सरड्याच्या जगण्याशी करतात. कुणी आणखी कुणाशी. अशा विधानांमागे काही सूचक अर्थ असतात. सूचकतेत परंपरेच्या साच्यात घट्ट बसवलेले संदर्भ दडलेले असतात. ते सम्यक असतीलच असं नाही, पण काही सामूहिक शक्यता त्यात समाविष्ट असतात. अशी विधाने व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करणाऱ्या वर्तन प्रवाहांविषयी अपुरे कथन करतात, असे कोणी म्हटले तर वावगं ठरू नये. काही गोष्टी निष्कर्ष असतात. काही केवळ अनुमान. अन्वयार्थ गवसले की, अनुमान बदलतात. रंग बदलणं सरड्याची सहजवृत्ती असते. नैसर्गिक गरज आहे ती त्याची. त्यात स्वार्थ वगैरे कसला आलाय? ती स्वाभाविक प्रतिक्रिया असते, आपल्या अस्तित्वाला अबाधित राखण्याची. असलाच काही स्वार्थ, तर आहे तोपर्यंत जगणं एवढाच विचार तेथे असतो. पण काही माणसे सरड्यापेक्षाही वेगाने रंग पालटतात. वैयक्तिक हव्यासापोटी क्षणात बदलणाऱ्यांना काय म्हणावं? या प्रश्नामागचं वास्तव समजणं अवघड आहे.
स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी संघर्ष करावा लागणे, या इतके लाजिरवाणे इहतली काही नसते. तुमच्याकडे पद, पैसा, पॉवर वगैरे काही असेल अन् जगण्यात स्वाभिमान नसला, तर त्यांचं मोल शून्य असते. तुम्ही संपत्तीने कंगाल असलात, पण कृतीने कुबेर असला आणि विचारांची श्रीमंती तुमच्या चेहऱ्यावर विलसत असेल, तर त्या इतके मूल्यवान काही नसते. स्वहित महत्त्वाचे वाटू लागले की, तत्त्व पोरकी होतात अन् स्वार्थाचा गोतावळा वाढू लागतो. तत्त्वांसाठी आग्रही असणारी माणसे निग्रहाने अन्यायाच्या विरोधात उभी राहतात, तेव्हा मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. एकदा का मान तुकवायची सवय झाली की, स्वाभिमानाचा कणा मोडतो. कणा मोडलेले विचार अन्यायाच्या डोळ्यात पाहत ताठ कसे उभे राहतील? मिंधेपणात सुखाचे संदर्भ दिसू लागतात, तेव्हा आयुष्याचे अन्वयार्थ हरवतात. मनाला असणाऱ्या कण्याचा विसर पडला की, सरपटणे प्राक्तन ठरते. कुणीतरी भिरकावलेले तुकडे लाचारीच्या जिण्यात मधुर वाटू लागले की, समजायचे संस्कृती फक्त सांगण्यासाठी असते, आचरणात आणण्यासाठी नाही. स्वाभिमान वगैरे गोष्टी अशावेळी वांझोट्या ठरतात. अशावेळी समर्पणशील वृत्तीने वर्तनाऱ्यांचे किस्से सांगण्यापुरते उरतात. त्याग वगैरे गोष्टी कहाण्यातून शोभून दिसतात. भूत-वर्तमानातील स्वाभिमानाचे संदर्भ केवळ कथा म्हणून उरतात.
सुख, सत्ता, संपत्तीच्या प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे बाणेदारपणे आत्मसन्मानार्थ सर्वंकष उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो. एकांगी विचारांनी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? ती कितीही मोठी असली अन् त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागले असेल, तर आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या माणसांसमोर खुजी वाटू लागतात. बोन्साय फक्त कुंड्यात शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, तरी वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नसतं. त्यांच्या आकांक्षांचे आकाश कोणाच्या दारी गहाण पडलेले असते. मुळं मातीशी असलेले सख्य विसरले की, विस्ताराचे परीघ सीमांकित होऊन उंची हरवते. मूल्यांमधून माणूस हरवला, की विचारांचे विश्व संकुचित होते. माणूसपणाच्या परिभाषा चुकतात. मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ हताशपण. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसे आसपास असणे अस्वस्थ करणारे असते.
अविचारांशी लढावं लागलं की, वेदना अधिक प्रखर होतात. वैयक्तिक स्वार्थापायी सामूहिक समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. त्यावरून पुढे जाण्याची वाट असेल, तर परतीचा मार्गही असतो. पण स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या एकेरी मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. तसंही प्रत्येक वेळी, प्रत्येकाला काही समंजसपणे नाही वागता येत; पण संवेदना जाग्या ठेवता येणे काही अवघड नसते, एवढं नक्की. संवेदनांचे किनारे धरून प्रवास करता आला की, स्नेहाचे एकेक संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. स्वार्थ जगण्याचा सम्यक मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी काल्पनिक वाटू लागतात. आपलेपणाचा ओलावा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात.
सगळ्याच गोष्टी काही सहज घडून येत नसतात. काही प्रयत्नपूर्वक संवर्धित करायला लागतात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो. आस्था आपलेपणाचे किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने वाहत नसते. किनारे प्रवाहाशी प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात त्याला आपल्या कुशीत. नात्यांमधील अंतराय कलहनिर्मितीचे एक कारण असू शकते. ते संयुक्तिकच असेल असे नाही. माणसे दुरावतात त्याला कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो; पण पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते. वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही उरत; पण वेगळे विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प तर अबाधित राहतातच ना! पण खरं तर हेही आहे, की स्वार्थाच्या परिघाभोवती परिवलन घडू लागते, तेव्हा पर्यायांचा प्रवास संपतो, नाही का?
••
दुरावा ....वाचावासा आणि मानवी स्वभावाचे यथायोग्य चित्रण करणारा !
ReplyDeleteआभार!
Delete