मनाजोगत्या आकारात घडायला काही आयुष्याचे आयते साचे नसतात. घडणंबिघडणं त्या त्या वेळचा, परिस्थितीचा परिपाक असतो. प्राप्त प्रसंगांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. येथून पलायनाचे पथ नसतात. नियतीने म्हणा किंवा परिस्थितीने, कोणाच्या पुढ्यात काय मांडले आहे, हा भाग नंतरचा. काही गोष्टी ठरवून केल्या जातात, काही कळत घडतात, काही नकळत, तर काही अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकतात. चांगलं चांगलं म्हणताना नको असलेल्या मार्गाने आयुष्य वळण घेतं अन् नको ते घडतं. कुणी याला आपल्या भल्याबुऱ्या कर्माचे भोग म्हणून स्वीकारतो. कुणी विचारत रहातो स्वतःला, नेमकं कुठे अन् काय गणित चुकलं? कुणी कर्माचं संचित असल्याचे सांगतो. ते तसं असतं की नाही, माहीत नाही. चांगलं काय अन् वाईट काय असेल, ते त्या त्या वेळी स्वीकारलेल्या पर्यायांचे किनारे धरून वाहत येते. स्वीकार अथवा नकार या व्यतिरिक्त तिसरा पर्यायच नसतो कधीकधी. अशावेळी एखादया कृतीचे विश्लेषण अचूक असेलच असे नाही. ते सापेक्ष असू शकते.
परिस्थितीने वाहून आणलेल्या बऱ्यावाईट गोष्टी आयुष्याच्या किनाऱ्यांवर साचत जातात. भूगोलात नद्यांविषयी शिकवताना गाळाचा प्रदेश सुपीक वगैरे असल्याचे शिकवले असते. पण अविचारांचे तीर धरून वाहत आलेल्या अन् आयुष्यात साचलेल्या गाळाला अशी परिमाणे नाही वापरता येत. मनावर चढलेली अविचारांची पुटे धुवायला काही अवधी द्यावा लागतो. वाहते राहण्यासाठी भावनांना पूर यायला लागतात. विचारांचं आभाळ भरून कोसळत राहायला लागतं. कोसळता आलं की, वाहता वाहता नितळ होता येतं. साचले की डबकं होतं. वाहत्या पाण्याला शुद्धीचे प्रमाणपत्र नाही लागत.
परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग प्रारंभी अपवाद वगैरे म्हणून असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. चालत्या वाटेला अनेक वळणे असतात. उधानलेल्या स्वैर प्रवाहाला मर्यादांचे बांध घालून नियंत्रित करावे लागते. व्यवस्थेचे पात्र धरून वाहणाऱ्या विचारांना नियंत्रणाच्या मर्यादांमध्ये अधिष्ठित करायला लागते. रूढीपरंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच. परिवर्तनाचे प्रयोग योजनापूर्वक करायला लागतात. ते पर्याप्त असतीलच असे नाही. त्यांना प्रासंगिक परिमाणे असतात. सम्यक परिणामांसाठी पथ प्रशस्त करायला लागतात. विशिष्ट भूमिका घेऊन उभं राहायला लागतं. सत्प्रेरीत हेतूने केलेलं कार्य कधीही नगण्य नसतं. काहीच भूमिका न घेण्यापेक्षा काहीतरी भूमिका घेणं महत्त्वाचं. कदाचित ती चुकू शकते. पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केल्याचे समाधान अंतरी असते. समजा चुकलंच काही, तर ते सुधारता येते. स्वतःला नामानिराळे ठेऊन महात्मा नाही होता येत. बेगडी महात्म्याला झगमगाट असतो, पण तो टिकत नाही. कुणीतरी आपलं म्हणणं मांडतो आहे, हा काही अपराध असू शकत नाही. तर काहीच न करणे हा मात्र प्रमाद असू शकतो.
केवळ चार गोष्टी अधिकच्या केल्या म्हणून कोणाला मोठं नाही होता येत. मोठेपण मिळवण्यात अन् मिरवण्यात अंतर असतं. ते झुल म्हणून कुणी परिधान केले असेल, तर त्याला मोठेपणाच्या व्याख्येत कसे ठेवता येईल? मोठेपणा मिरवायला कुणाला नाही आवडत? ही माणसांच्या स्वभावाची मर्यादा अन् वर्तनातील दोष आहे. तो काही सहज काढता येत नाही, पण विवेकी विचारांनी एखाद्या गोष्टीला, कृतीला प्रतिष्ठा अवश्य मिळवून देता येते. तुम्ही किती विद्वान आहात, याला अशावेळी शून्य किंमत असते. तुमच्या ठायी सौजन्य किती आहे, हा भाग महत्त्वाचा असतो. यासाठी आधी आपण कोण? हा प्रश्न स्वतःला दहावेळा विचारून मगच आपली ओळख करून द्यावी लागते.
मोठेपण इतरांच्या मतांचा आदर करण्यात आहे. सोबत घेऊन चालण्यात आहे. विधायक वाटेने वळलेल्या पावलात आहे. चिमूटभर माती आणून सेतू उभा करण्यातल्या योगदानात आहे. उक्तीचे अर्थ कृतीत आणण्यात आहे. धडे शिकून पदवी मिळवता येते, पण शहाणपण येतंच असे नाही. पण बहुदा काही गोष्टी दुर्लक्षित होतात. त्यातील एक अंतरी अधिवास करणारा अहं असतो. तो टाळता आला की, विचारांना मोहरलेपण अन् आयुष्याला गंध लाभतो. विचार जिवंत असतात, तेथे बदल अटळ असतो. अशावेळी सम्यक भूमिका घेणे महत्त्वाचं. केवळ निरीक्षक बनून समस्यांची उत्तरे नाही मिळत. सगळ्यांनाच काहीना काही होण्याचा विकल्प असतो. पण सगळ्यांनाच काही परिवर्तनाचा प्रवर्तक वगैरे नाही होता येत; पण स्वप्रज्ञेने विधायक मार्ग शोधता येतो, हे कळलं तरी खूप असतं. केवळ चारदोन जणांच्या प्रयत्नांनी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडत नाही, पण पडसाद अवश्य उमटतात. मत व्यक्त करायलाही आधी काहीतरी मत असायला लागतं. माणसाला आपलं असं ठाम मत निर्माण करता आलं, तरी खूप आहे. आरती ओवाळून भक्तिभाव अवश्य कळतो, पण त्यातून काही हाती येईल याची खात्री देता येत नाही.
आपल्या मतांबाबत आक्रमक असणं आणि कार्यप्रवण असणं यात फरक असतो. आक्रमकतेला विचारांची डूब असेल आणि ती आत्मीय आस्थेतून आली असेल, तर सफल ठरते. आपण कोणी मोठं असण्याचा आभास वांझोट्या अपेक्षांशिवाय हाती काही देऊ शकत नाही. म्हणून उक्ती आणि कृती यातलं अंतर आकळायला हवं. आत्मकेंद्रित वृत्ती हानीकारक असते. एवढं जरी कळलं, तरी आयुष्याचेे सार्थक झाले, असं समजायला संदेह नसावा. स्वतःकडे लहानपण घेऊन लोकांच्या मनात मोठेपणाच्या बिया पेरतात, तीच तुमची कमाई! तुम्ही स्वतःला काय समजतात, तुम्ही किती महान आहात, याला काहीच मोल नसतं. लोक तुमच्याविषयी काय म्हणतात, ते तुमचं वास्तव, तोच तुमचा वर्तमान अन् भविष्यातील तुमच्या प्रतिमेची चौकट. बाकी केवळ बुडबुडे, अस्तित्व असलेले; पण आयुष्य नसलेले.
माणूस या एका शब्दात अर्थाचे अनेक आयाम अंतर्भूत आहेत. आपल्यातील माणूसपण आधी आकळायला हवं, नाही का? स्वतः मखर मांडून आपलीच आरास करायची म्हटलं, तर प्रश्नांचे अनुबंध आकळतीलच कसे? ही काही नैसर्गिक समस्या नाहीये. स्वार्थप्रेरित विचारातून उद्भवणारे प्रश्न असतात ते. यांची उत्तरे कोणत्याही पुस्तकात नाही मिळणार. जगण्यातून स्वतःच शोधून घ्यायला हवीत. अंगावर झूल ओढून घेतली असेल, तर विकल्प हाती लागणे अवघड असतं. खरं सांगायचं तर जेथे विचारांचा पराभव झालेला असतो, तेथे फार काही सकारात्मक घडण्याच्या शक्यता धूसर होत जातात. पण स्वार्थाचं तण मात्र दणकून वाढायला पर्यावरण अनुकूल असतं.
विकल्प संपले की, उरते केवळ हताशपण. सुज्ञांना हे अवगत नसते, असं कसं म्हणावं? विवंचना शब्दाचा अर्थ आकळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. एखादा संघर्ष सामूहिक असतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिक गरज असू शकते. काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधाराचे आकलन घडते, त्यांना अंधाराच्या व्याख्या समजावून नाही सांगायला लागत.
निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. अस्मितांचे अर्थ ज्ञात असून अनभिज्ञ असल्याचे कोणी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातले अधिक गहन संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेलही. तसे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असले, तरी स्वातंत्र्य अबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम असायला लागतात. 'स्व'तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते. निवड करता येते कुणालाही, पण निर्धाराचा धनी कोणीच नाही होऊ शकत. तो फक्त एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे केवळ आपण आणि आपणच. हेही खरंय की, सुविचारांनी जग सत्वर नाही बदलत. असे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. पण विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील, ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी बदलाच्या ऋतूंची प्रतीक्षा करता येते.
आज सकाळीच एका व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज आला 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड.' आता तुम्ही म्हणाल, "यात काय विशेष? हे अग्निहोत्र तर रोजच सुरू असतं. यज्ञकुंडात समिधा पडत राहिल्या की, ते धगधगत असतंच." हो, मलाही अगदी हेच अन् असंच काहीतरी सांगायचंय. माध्यमांचे किनारे धरून हा प्रवाह पुढे वाहत असतो. हे काही कोणाला ज्ञात नाही, असं नाही. माहीत असून काय होणार आहे? काही गोष्टी सरावाने म्हण किंवा सहजपणाने घडत असतात. त्यासाठी प्रयोजने असायलाच हवीत असे नाही. दीड जीबी इंटरनेट रोज मिळत असल्याने अशी अन्हिके यांत्रिकपणे पार पाडली जातात. ना त्यात आस्था, ना आपलेपणाचा ओलावा. अर्थात, असे संदेश सरावाने दुर्लक्ष करण्याची कला समाजमाध्यमामुळे बहुतेकांना अवगत झाली आहे, हेही तेवढंच खरंय. दिवसभर सुविचारांचा रतीब घातल्यावर अजीर्ण होणे स्वाभाविक. अति परिचयात अवज्ञा होणे अटळ भागधेय असतं, अशा ढकललेल्या विचारांचे, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या उपदेशांनीे ओतप्रोत भरून ओसंडून वाहणारे विस्तीर्ण पट अथ पासून इति पर्यंत वाचले जातील, याची शाश्वती देणे अवघडच. एकतर कोणाकडे एवढा वेळ नाही अन् एवढं ओझं पेलण्याएवढा संयम आहे, असंही वाटत नाही. पण कधीकधी काही अपवाद अनपेक्षितपणे समोर येतात. एखाददोन ओळीतील मजकूर समोर असला की, कळतनकळत नजर त्यावरून सरकते. हा अनुभव बऱ्यापैकी सारखाच.
प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा घडायला निमित्त असायलाच हवं असं नाही. मग मी तरी कसा अपवाद वगैरे प्रकारात असेल? वाक्यावरून सरावाने नजर वळली. वाचून त्याच्या आशयाचा अनुबंध शोधत राहिलो आपला सहज. वाटलं की, माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे, जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो, मांगल्याची आराधना करतो, कशावरतरी श्रद्धा ठेवून असतो, असे असूनही स्वार्थाच्या परिभाषा पाठ करणाऱ्यांच्या विचारांत विधायक वृत्तीची प्रयोजने का रुजत नसतील? सम्यक विचारधारांच्या वर्तुळांचा परीघ का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, सहिष्णुता आदी शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. आपल्या मर्यादा माहीत असतात, त्यांना प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती परिवर्तनाचे प्रतिरूप असते. अर्थात, त्यासाठी नुसती सहानुभूती असून चालत नाही, अनुभूती असायला लागते, नाही का?
••
0 comments:
Post a Comment