मुखवटे

By

माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला का सिद्ध करू पाहत असतील? समाज नावाच्या व्यवस्थेत  प्रत्येकाच्या हातात आपली एक मोजपट्टी असते. त्या वापरून समोरच्याला मोजण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्याकडील पट्ट्यांच्या लांबीची, उंचीची चिंता का करावी? त्यांच्या पट्ट्यांची मापं आपल्याला लावून घेण्यात कुठलं शहाणपण आहे? आपली असलेली, नसलेली उंची वाढवण्यासाठी माणसं नको तितकी धडपडत राहतात. हेलपाटतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कवायत करत राहतात. मुखवटे हाती घेऊन उभे राहतात. या धडपडीचा शेवट काय असेल, याचा विचार न करता का चालत राहतात?

माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी, मानसशास्त्रज्ञांनी केला. विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या हाती यातून कोणत्या गोष्टी लागल्या असतील, त्या असोत. हा मतमतांतरांचा विषय आहे. माणसांना जगण्यासाठी नेमकं काय हवं असतं? मूलभूत गरजांची पूर्ती झाली की, त्यात संतुष्ट असायला काय हरकत असावी? काहीच नाही. पण समाधानही नाही. तेच नसेल तर आणखी नवे काही घडण्याची शक्यताच मावळते. समर्पणशील जगण्यात जीवनाचं सौंदर्य सामावलेलं असतं. त्यागात कृती असते, तर नीतिविसंगत भोगात विकृती. निरामय विचारांनी वर्तणारा माणूस जगण्याचा देखणा चेहरा असल्याचे सांगून-सांगून जगभरातील संतमहंत थकले. तरीही माणसांच्या मनातील विकार काही निरोप घेत नाहीत. जग अनेक विसंगतींनी खच्चून भरले आहे. कलहांनी फाटले आहे. याची कारणे काय असावीत? ‘स्वार्थ’ या एका शब्दात याचं उत्तर सामावलेलं असल्याचं अनेक मुखातून ऐकू येतं. मग, जी मुखे मोक्षाचं महात्म्य विशद करतात, तेच मुखवट्यांच्या मोहात का पडत असतील? अर्थात स्वार्थाची परिभाषाही परिस्थितीजन्य आणि परिस्थितीसापेक्ष असते. काही माणसं जगण्यातलं साधेपण आपल्यात सहज सामावून घेत असतात. कष्टाच्या भाजीभाकरीत त्यांना आयुष्याचे अर्थ सापडतात. काही तूपसाखरेच्या गोडीसाठी विसंगत मार्गाने चालताना क्षणभरही विचार करत नाही. अर्थात, कोणी कोणत्या वाटेने निघावे, हा ज्याच्या-त्याच्या पसंतीचा पर्याय असतो. ती निवड वैयक्तिक असते, समाजमान्यतेची मोहर नसते.

पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. जगणं समृद्ध होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले, तरी पुरेसे असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत?  केवळ जगाला दाखवता यावे म्हणून? कुंपणाला मालकी असली, तरी विस्तार असतोच असं नाही. आणि तसंही काट्यांशी सख्य करायला कोणाला आवडेल?

नाहीतरी आपण कोणते तरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवतही असतो. मुखवट्यांना टाळून माणसांना जीवनयापन करणे काही अवघड नाही. सीमित अर्थाने मान्य करूया की, कधी कधी अनिच्छेने मुखवटेही परिधान करायला लागतात. समजा केला परिस्थितीवश धारण किंवा करावा लागलाच, तर त्यामागचा हेतू स्व-पलीकडे असायला काय संदेह असावा? प्रश्न फक्त एवढाच असतो की, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे. मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना मुखवटे धारण करून जगायला बाध्य करते, तेव्हा गुंते अधिक जटिल होत जातात.

जग एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन वगैरे करावे लागते, असे काहीसे आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारी माणसंही आसपास असतात. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो. अशा चेहऱ्यांकडे पाहण्याऐवजी आपलं लक्ष मुखवट्यांकडेच का वळत असेल?
••

0 comments:

Post a Comment