अहं

By
आयुष्याच्या वाटेने प्रवास घडताना पावलं योजनापूर्वक उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा निर्धारित करावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात, काही गणिते आखायला लागतात. सूत्रे शोधायला लागतात. अंगीकारलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. विचारांशी पडताळून पाहायला लागतात. घेतलेल्या अनुकूल प्रतिकूल निर्णयांची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून घ्यावी लागते. हे सगळं खरं असलं तरी कोणी कोणत्या प्रसंगी कसे वर्तावे, याचे काही संकेत असतात. नीतिनियमांची कुंपणे असतात. व्यवस्थेने मान्य केलेली वर्तुळे असतात. याचा अर्थ व्यवस्थेतले सगळेच प्रवाह एका सरळ रेषेत वाहतात असंही नाही. प्रतिकाराचे, समर्थनाचे परस्पर भिन्न आवाजांचे पडसाद आसपास उमटतात. साद-प्रतिसादाचे प्रतिध्वनी आसपासच्या आसमंतात निनादायला लागले की, एक प्रश्न आवर्जून समोर येतो तो, माणसे अशीच का वागतात? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर अद्याप माणसाला मिळायचं आहे. पुढे मिळेल की नाही, माहीत नाही. कारण उत्तरे शोधणारा माणूस आणि ज्याच्यासाठी उत्तर शोधलं जातंय तोही माणूसच. माणूस म्हटले की, सोबत मर्यादाही चालत येतात. बहुदा त्या त्याच्या जगण्याशी निगडीत असतात. आयुष्यातून वाहत राहणाऱ्या विचारप्रवाहांच्या कक्षा आक्रसत जावून स्वार्थाच्या सीमारेषेवर येऊन थांबल्या की, त्यांचे अर्थ बदलतात. स्वार्थाच्या प्रतलावरून सरकणारे प्रवाह कधीच समतल मार्गावरून प्रवास करत नसतात. वेडीवाकडी वळणे घेवून चालणे त्यांचं प्राक्तन असतं. केवळ अन् केवळ ‘मी’ आणि ‘मीच’ एवढा परीघ सीमित झाला की, माणूसपणाच्या विस्ताराचे अर्थ हरवतात. ‘स्व’ एकदाका स्वभावात येवून सामावला की, स्वाभाविकपण पोरके होते अन् सुरु होतो अभिनिवेशाच्या वाटेने घडणारा प्रवास.

‘सुंभ जळला पण पीळ काही गेला नाही’, अशी एक म्हण कोणाच्यातरी बोलण्यातून आपण अधूनमधून ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकतच नसतो. कधीकधी आपल्या बोलण्यातील भाव व्यक्त करण्यासाठी उपयोगही करीत असतो. म्हणी, वाक्प्रचार केवळ भाषेचं सौंदर्य नसतं. अनुभवाच्या अथांग पात्रातून वाहत आलेलं संचित असतं ते. अर्थात, ही काय किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या म्हणी असल्यात काय, त्या या विचारांस अपवाद कशा असतील? म्हणी-वाक्प्रचारांतून असं काही सांगण्यात अर्थाचे अनेक आयाम अनुस्यूत असतात. अनुभूतीचे कितीतरी कंगोरे दडलेले असतात. कोणीतरी केलेल्या अवलोकनातून ही निरीक्षणे बोलीत गोंदली जातात. प्रासंगिक परिस्थितीचा परिपाक म्हणून उद्धृत केली जातात. सर्वश्रुत होतात. भाषिक व्यवहारात सामावून जातात. समाजाच्या जगण्याशी एकजीव होतात अन् कालोपघात प्रघातनीतीचा अविभाज्य भाग बनून वाहत राहतात, समाजमनाचे किनारे धरून. निरीक्षण, अवलोकन, अनुमानाच्या वाटेने ती चालत आलेली असतात. याचा अर्थ अनुमान प्रत्येकवेळी अचूक असतातच असं नाही अन् ते नेहमीच चुकतात असंही नाही. तो प्रयोग असतो संचिताच्या साखळ्या हाती घेऊन भावनिक आशय अधोरेखित करणाऱ्या बिंदूना जोडण्यासाठी. 

माणूस, मग तो कोणत्याही देशप्रदेशात वसती करून असला, तरी त्याच्या माणूसपणाच्या मर्यादा टाळून त्याला जगता येत नाही. ज्यांना आपल्या मर्यादांचे परीघ आकळलेले असतात, ते फारफार तर प्रमादापासून अंतरावर राहण्याचा प्रयास करतात. तसंही प्रमाद ठरवूनच करायला हवेत असं काही नसतं. कधीकधी परिस्थितीच प्रमादाच्या पथावरून प्रवास करायला बाध्य करीत असते. प्रमादांचे परिमार्जन करण्याचे पर्याय असले, तरी ते पर्याप्त असतीलच याचीही खात्री देता येत नाही. प्रमादाच्या परिघाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना परिस्थितीनिर्मित कारणे असतात, तसे प्राक्तनाचे संदर्भही असतात, असं मानणारेही आसपास संख्येने कमी नसतात. अर्थात, त्यांनी तसे मानू नये असंही नाही. हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा भाग. जशी ज्याची श्रद्धा, तशी त्याची भक्ती. पण श्रद्धा असा परगणा आहे, जेथे तर्काच्या परिभाषा पुसट होत जातात.

तर्काच्या मार्गाने चालताना आसपासची विसंगती लक्षात येते. डोळसपणे घडणारा प्रवास असतो तो. त्याला अनुलक्षून नियोजन घडते. कधी-कधी नियोजनाचे अर्थही चुकतात. चुका घडून नयेत, असे नाही; पण त्या स्वभावदत्त असतील, केवळ स्वतःचे अहं कुरवाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे घडत असतील, तर तेथे तर्क कुचकामी ठरतात. सुख-दुःखाच्या पथावरून घडणारा प्रवास बहुदा आपणच निवडलेल्या संगत-विसंगत पर्यायांचा परिपाक असतो. समाधानाच्या पथावरून पडणारी पावले आणि वेदनांच्या मार्गावरून घडणारी वणवण आपणच निर्माण केलेल्या भावस्थितीचा परिपाक असतो. सगळेच प्रवास काही देखणे नसतात. आनंदतीर्थे शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाचे अर्थ आगळे असतात आणि पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी घडणाऱ्या मार्गावरील चालण्याचे अन्वयार्थ वेगळे असतात.

आयुष्याच्या अग्रक्रमांना अबाधित राखणाऱ्या आवश्यकता आपली अवस्था अधोरेखित करतात. माणूस म्हणून असणारी पात्रता सिद्ध करतात. काही सहजपणाचे साज लेवून जगणं सजवतात. काही शक्यतांच्या संदर्भांमध्ये मुखवटे शोधतात. काही सहज जगतात, काही जगण्यासाठी सहजपण सोडून वाहतात. उन्माद एक भावावस्था आहे. ती केव्हा, कशी आणि कोठून आयुष्यात प्रवेशित होईल, हे काही सांगता येत नाही. एकदाका आपणच आपल्याला अलौकिक वगैरे असल्याचा साक्षात्कार झाला, आपणास बरंच काही अवगत असल्याचं मानायला लागलो की, अंतरी अधिवास करणाऱ्या अहंचे एकेक पीळ अधिक घट्ट होत जातात. दोरीला पीळ जितका अधिक दिला, तेवढी ती ताठर होत जाते. कठोरपणाच्या ललाटी काही अढळ चिरंजीवित्वाचे अभिलेख कोरलेले नसतात. कालांतराने एकएक पीळ वेगवेगळा होत राहतो. उसवत जातो एकेक धागा बंधातून. दोरीचा ताठपणा तुटत तुटत संपून जातो. माणसांच्या मनाचेही असेच असते नाही का? परिस्थितीच्या आघातासमोर सगळे वाकतात. कायेत असणाऱ्या उमेदीचा कणा वाकला की, आपली वास्तव उंची आकळते. कधीकाळी पद, पैसा, प्रतिष्ठेचा धनी असलेला कुठल्यातरी प्रमादाचा धनी होतो अन् जमा केलेल्या सगळ्यां अहंची किंमत शून्य बिंदूवर येवून थांबते. नंतर सुरु होतो गोठण्याच्या वाटेवरचा प्रवास.

प्रमाद घडतात, पण त्यांना बदलण्याचे पर्यायही असतात, फक्त त्या शक्यता आजमावून बघायला लागतात. ते समजण्याइतके सुज्ञपण अंतरी नांदते असायला लागते. तरीही अस्तित्वाचे अन्वयार्थ लावताना काहीतरी सूत्र सुटतं अन् सगळं समीकरणच चुकतं. उत्तरांची वणवण तशीच आबाधित राहते. वणवण आपल्या जगण्याचा चेहरा आहे तसा समोर आणून उभा करते. देखणेपणात आकर्षणाचं, आसक्तीचं अधिक्य असण्याचा संभव अधिक. मुखवटे परिधान करून देखणेपण उभं करता येईलही, पण सौंदर्याचा साक्षात्कार घडायला मुळांच्या टोकापर्यंत पोहचायला लागतं. काळाच्या आघातांनी देखणेपणाला सुरकुत्यांनी वेढले जाते. परिस्थितीने त्यावर ओरखडे पडतात. देहाच्या देखणेपणाला विटण्याचा शाप असेल, तर विचारांना अमरत्वाचे वरदान असते. 

झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. काळाचे किनारे धरून निसर्ग वाहत राहतो अनवरत. कुणाच्या आज्ञेची परिपत्रके घेऊन नाही बहरत तो कधी. कळ्या उमलतात, परिमल पसरतो, सूर्य रोज नव्या अपेक्षा घेऊन उगवतो, रात्रीच्या कुशीत उमेद ठेवून मावळतो, अंधाराची चादर ओढून पडलेल्या आकाशाच्या अंगाखांद्यावर नक्षत्रे खेळत राहतात, आभाळातून अनंत जलधारा बरसतात, नदी वळणांशी सख्य साधत वाहते, पक्षी गातात, मोसम येतात जातात, ते काही त्यांचं प्राक्तन नसतं. स्वाभाविकपणाच्या वाटेवरून घडणारा प्रवास असतो तो. पण माणूस मात्र वर्तनविसंगतीवर स्वाभाविकपणाच्या झुली टाकून समर्थनाच्या सूत्रात सामावू पाहतो. उगवणे, वाढणे, मोहरणे या प्रवासात एक बिंदू असतो तो म्हणजे, सामावून जाणे. नेमकं हेच घडत नाही. मग सुरू होतो प्रवास किंतु-परंतु घेऊन नांदणाऱ्या वाटांवरचा. म्हणून संदेहाचे विकल्प आयुष्यातून वेळीच वेगळे करता यायला हवेत. मनात उगवलेल्या विकल्पांचं तण वेळीच वेगळं केलं की, विचार मोहरून येतात अन् आयुष्य बहरून, नाही का?

इहतली अधिवास करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा ठायी ठायी निराळ्या असल्या, तरी वेदनांच्या परिभाषा सगळीकडे सारख्याच. भविष्याच्या धूसर पटलाआडून शक्यतांचे कवडसे वेचता आले की, आयुष्याची एकेक प्रयोजने आकळत जातात. ती समजावी म्हणून नितळ मन आणि मनात माणूसपण नांदते असायला लागते. आयुष्याप्रती असणाऱ्या आस्थेतून उगवून येणाऱ्यांना समर्पणाच्या परिभाषा अवगत असतात, त्यांना जगण्यातील सहजपण समजावून सांगावं नाही लागत. कोंबांना जन्म देण्यासाठी बियांना मातीत गाडून आपलं अस्तित्व विसर्जित करून घ्यावं लागतं. रोपट्याला आपले अहं त्यागता आलं की, झाडाला उंचीचे अर्थ अवगत होतात.

डोळ्यांना अंतरावरचे धूसर दिसत असले, तरी विचारांना ही अंतरे सहज पार करता येतात. नजरेला अंतराच्या मर्यादा येतात, पण विचारांना अंतरे बाधित नाही करू शकत. अनुभवांना भविष्याच्या पटावर कोरलेल्या आकृत्यांना समजून घेण्यात मर्यादांचे बांध टाकून सीमित नाही करता येत. योजनापूर्वक निवडलेल्या अन् विशिष्ट विचारांना प्रमाण मानून अंगीकारलेल्या मार्गावरून चालताना भविष्य स्पष्ट दिसत असतं. यासाठी अंधाराची पटले सारून आयुष्याचे अर्थ तेवढे शोधता यायला हवेत. एखाद्याने एखाद्या विचाराला बादच करायचे ठरवले असेल, तर तेथे पर्याय असून नसल्यासारखेच. अशावेळी उगीचच मी माझ्यातून वजा होत असल्याचं वाटत राहतं कधी. खरंतर वजाबाकी बेरजेइतकेच शाश्वत सत्य, पण कधी कधी दिसतं ते स्वीकारायला अन् पदरी पडलं, ते मान्य करायला माणूस तयार नसतो. सूर्यास्त समीप आला की, पायाखालच्या सावल्या लांब होतात, माणूस मात्र आहे तेवढाच राहतो अन् आसपासचा अंधार आकृतीला वेढत आपल्यात सामावून घेण्यासाठी अधिक गहिरा होत जातो. अविचारांच्या वाटेवर चालताना एक बिंदू असा येतो, जेथे प्रतिसादाचे प्रतिध्वनी गोठतात. अशावेळी कुणी साद घातली, तरी त्याला अर्थ राहत नाहीत. अर्थांशिवाय शब्दांनाही मोल नसतं, नाही का?
••

0 comments:

Post a Comment