माणसाचं जगणं एक शोधयात्रा आहे. इथे प्रत्येकाला काहीना काहीतरी हवंय आणि ते मिळवण्याची आस अंतरी अनवरत अस्तित्वात आहे आणि शोधण्यासाठीची धडपडही. कुणाला सुखांचा शोध घ्यायचा, कुणाला समाधानाची नक्षत्रे वेचून आणायची आहेत, कुणाला पैसा शोधून गाठीला बांधायचा आहे, कुणाला प्रतिष्ठेचे परगणे खुणावत आहेत, कुणाला पदप्राप्ती करून आपलं वेगळं असणं अधोरेखित करायचं आहे. कुणाला प्रेमाच्या परिभाषां अवगत करून घ्यायच्या आहेत. कुणाला आणखी काही... एकुणात इहतली असा कोणताही जीव नाही, ज्याला काही मिळवायचं नाही. निसर्गाने निर्धारित केलेल्या अन् देहधर्माशी निगडित गोष्टीही काहीतरी हवं असणं असतंच ना! जगण्यासाठी लागणारे श्वाससुद्धा या धडपडीचं रुपच. भले ते स्वाभाविकतेचे किनारे धरून सरकत असतील. आपल्याकडे काहीतरी असावं, ही आस अंतरी घेऊन सगळेच नांदत आहेत येथे. कोणी मोहापासून अंतरावर असल्याचे सांगत असेल, तर तेही अर्धसत्यच. कारण मोह सत्य आहे अन् त्यांना नाकारण्यात कोणतेही हशील नाही. मुक्तीमार्गाच्या कोणी वार्ता करत असेल, तर विरक्तीसोबत येणारा मोकळेपणा त्याला हवा आहे. हेही हवंच असणारं नाही का? शक्य झालं तर सगळ्यांना सगळंच हवं आहे. पण ते मिळवता येतंच असं नाही. कोणी म्हणेल, यात काय वाईट? काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करण्यातच अवघ्या आयुष्याचे अर्थ सामावले आहेत. अर्थात, हे अमान्यही करता नाही येत. जगण्याच्या वाटेने प्रवास घडताना प्राप्तीची आस अंतरी असण्यात काहीच वावगे नाही, पण त्याचा सोस होत असेल तर... जगणं प्रश्नचिन्हांनी वेढलं जातं, एवढं मात्र नक्की.
माणूस कशाच्या न् कशाच्या शोधात आयुष्यभर धावत असतो. या वैश्विक सत्याला वळसा घालून पुढे नाही पळता येत. आयुष्याच्या अर्थाचे अन्वय शोधता शोधता किती अंतर पार करून येतो आपण. कोणाच्या वाट्याला जगण्याचे किती दिवस यावेत, हे काही कुणाला ठरवता नाही येत आणि ते किती असावेत, हेही कुणाला नाही सांगता येत. अगदी विज्ञानही एखाद्या देहाच्या जीवशास्त्रीय परिमाणात परिभाषा करेल. जीव म्हणून त्याच्या असण्याचे अर्थ विशद करेल; पण आयुष्यासोबत नांदणाऱ्या व्याख्यांची उकल नाही करू शकत. माणूस नावाच्या कायेचा सुमारे साठसत्तर वर्षाचा इहलोकी घडणारा प्रवास आपल्यात बऱ्याच सफल-असफल कहाण्या घेऊन विसाव्याच्या वळणाच्या शोधात सरकत असतो. एवढी वर्षे जगणाऱ्या एखाद्या जिवाच्या आयुष्यातला अंधार-उजेडाचा हिशोब केलाच, तर महिने दिवसांची संख्या लक्षणीय असेल, हे निर्विवाद. तास, मिनिटे, सेकंदाच्या हिशोबात तर डोळे विस्फारून पाहण्याइतके अंक मोठे असतील. हे सगळं सगळं खरं असलं, तरी संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या सफलतेची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने; तुमच्या पदरी पेरलेले क्षणच खरे, बाकी सगळी यातायात, समाधानाच्या चमकणाऱ्या बेगडी कागदांना जमा करण्याची.
वयाने जेष्ठ असणाऱ्याचा आदर आपणाकडून केला जातो. तो केवळ वाढत्या वयाप्रती व्यक्त केलेला नसतो. वय जसे वाढत जाते, तसे अनुभवही गहिरे होत जातात. खरंतर अनुभवाच्या उन्हाळ्या-पावसाळ्याना केलेला प्रणिपात असतो तो. अनुभवातून जमा केलेलं संचित आयुष्यात घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना परिपक्वतेकडे नेत असतं, याबाबत संदेह असण्याचं कारण नाही. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे आयुष्याच्या प्रवासाच्या कहाण्या सांगत असतात. तुम्ही सोसलेली धग अथवा बरसणाऱ्या धारासोबत अनुभवलेला आनंद असेल. ते केवळ दुःखांच्या काळ्या अन् सुखांच्या पांढऱ्या रंगात रंगणे नसते. तुमच्या टिकून असण्याचे अन्वयार्थ त्यात सामावलेले असतात.
मोहरलेपणाला ओंजळभर सौख्याचे क्षण गंधभारित करत असतात. ऋतू येतात अन् जातात. त्यांना काही कोणी थांबवू नाही शकत. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. निसर्ग नियत मार्गापासून विचलित नाही होत. ते काही त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. ऋतूंचं चक्र नियत मार्गाने क्रमन करत राहतं. त्याचं येणं जेवढं शाश्वत, तेवढंच जाणंही. ऋतू कूस बदलून नव्या वळणावर विसावताना आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा वाटेवर कोरून जातात. त्यांचे अन्वयार्थ शोधत चालावं लागतं प्रत्येकाला. कुणाच्या वाट्याला मोहरलेपण येतं, कुणाच्या ओसाडपण. काळाने मनःपटलावर गोंदलेल्या आकृत्यांचा माग काढत माणूस पळत राहतो. येणाऱ्या-जाणाऱ्या ऋतूंनी कोरलेल्या ठशांचे अर्थ आकळायला ऋतूंचे रंग समजून घ्यायला लागतात. रंगांशी सख्य साधता आलं की, मोहरून येण्याचे एकेक कंगोरे कळत जातात. फक्त त्यांची संगती लावता यायला हवी.
निसर्गाने आपल्या ओटीत ओतलेल्या ओंजळभर अस्तित्वाचे अन्वय अवगत करून घ्यायला लागतात. आयुष्य अशाच प्रयत्नांना दिलेलं नाव आहे. पण सत्य तर हेही आहे की, प्रत्येक प्रयत्न सफल व्हावेत असं नसतं. अपयश आपल्या अस्मितेच्या रेषांच्या उंचीशी आपणास नव्याने अवगत करून देते. कळत-नकळत घडलेले प्रमाद कधी होत्याचं नव्हतं करतात, तर कधी परिस्थिती वाटेवर काटे पेरत जाते. पण खरं तर हेही आहे की, प्रयत्नांच्या परिभाषा संघर्षाच्या कहाण्या लेखांकित करीत असतात. प्रमादांची पावले घेऊन आपल्या अंगणी चालत आलेल्या दुःखाबाबत एकवेळ समजून घेता येतं. त्यासाठी मनाने तयारी करून घेतलेली असते. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर...?
दोष कुणाचा, यश कुणाचं, अपयशाचं धनी कोण? अशा काही प्रश्नांची उत्तरे अवश्य शोधता येतात. पण प्रत्येकवेळी पराक्रमाची अन् पराभवाची सटीक कारणमीमांसा करता येतेच असं नाही. यशापयशामागे केवळ एक आणि एकच कारण उभे करता येत नाही. अर्थात, प्रत्येक पराभव म्हणजे संघर्षाचा शेवट नसतो अन् मिळालेले, मिळवलेले सगळे जय म्हणजे वेदनांचा अंत असतो, असं नाही. वाट्याला येणाऱ्या वेदनेच्या पोटी प्रयत्नांचे वेद जन्म घेत असतात.
मी आज पराभूत झालोय. अगदी पूर्णपणे रिता झालो. पुन्हा उगवून येण्याच्या शक्यता आता मावळल्या. असं कधी कधी वाटत असतं. पण अंधाराच्या कुशीतून उजेड जन्म घेत असतो, हे तरी कसे नाकारावे? उजेडाची महती समजून घेण्यासाठी अंधाराचे अर्थही अवगत असायला लागतात. अंधार केवळ नकार नसतो, तर आस्थेच्या अगणित शक्यता उदरी घेऊन पहुडलेला आकांक्षांचा कोंब असतो तो. तमाकडून तेजाकडे होणारा प्रवास अंतरी अधिवास करणाऱ्या अगणित आकांक्षांना घातलेली साद असते. कवडशांच्या संगतीने घडणारा प्रवास प्राक्तन नसते, तर प्रयासांच्या प्रतिध्वनीला दिलेला प्रतिसाद असतो.
आयुष्याच्या वाटेवरून चालताना वंचना, अवमान, अभाव सहन केला नाही, असा माणूस इहतली अधिवास करून असणे अपवाद असेल. सगळ्या जखमा अंतरी ठेवून स्वप्नांच्या प्रदेशात वस्तीला उतरलेल्या नक्षत्रांचा शोध घेत पावले पुढे टाकायला लागतात. मिळतं काहीना काहीतरी. काही अभागी झगडत राहतात नियतीशी. काही झडून जातात. काही अभावाच्या प्रदेशात प्रभावाच्या परिभाषा शोधत राहतात उगीच. कारण अंतरी असणारी आस अशी अचानक विसर्जित नाही करता येत. नाही का?
••
0 comments:
Post a Comment