नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात, हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. निर्मळ मनांनी अन् उमद्या हातांनी काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात ती. अशी माणसे इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर नेटक्या विचारांनी वर्तनाऱ्या माणसांनी निवडलेल्या विचक्षण वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसाद नसतो.
सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.
वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो. आसपास चेहरे तर अनेक दिसतात; पण त्यावर आनंदाची अक्षरे अंकित करणाऱ्या रेषा आक्रसत आहेत. रस्त्याने माणसे अनेक चालतात; पण केवळ त्यांच्या सावल्याच पुढे सरकतात. बघावं तिकडे गर्दी तेवढी असंख्य प्रश्नचिन्हे घेऊन पुढे पळत असते. माणूस नावाचं चैतन्य चालताना दिसतच नाही. माणसे झुळझुळ वाहणेच विसरली आहेत. पावलांशी सख्य साधू पाहणाऱ्या पथावर प्रत्येकाने बांध घालून घेतले आहेत.
साचलेपणाला विस्तार नसतो. त्याच्या कक्षा सीमांकित असतात. विस्ताराचं विश्व संकुचित झालं की, विचारांची क्षितिजे हरवतात. शब्दांत सामावलेल्या सहजपणाची सांगता झाली की, संवादाचे सेतू कोसळतात. म्हणून आशावाद काही विचारातून विसर्जित नाही करता येत, हेही वास्तवच. बऱ्याचदा आपलं काही हाती लागलं म्हणता म्हणता आपणच आपल्यातून निखळत जातो. संकेतांच्या सूत्रातून सुटत जातो. उसवत जातं जगणं अन् आयुष्याला अर्थ देणाऱ्या चौकटींचा एकेक धागा निसटत जातो.
शेकडो वर्षे झाली. माणूस काही शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण हव्यास की आस्था, सांगणे अवघड आहे. प्रस्थान वाटांवर लागतं काही हाती, सापडतं काही थोडं अन् बरंच काही निसटतंही, म्हणून प्रयासांच्या प्रेरणांनी त्याच्या परिभ्रमणाच्या परिघातून पूर्णविराम घेतला आहे असं नाही. प्रत्येकजण आपापल्या पावलांना सापडलेल्या वाटांनी निघतो. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी लेखणीला खड्ग करू पाहतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी चित्रे रेखाटतो. कोणी आणखी काही. कितीतरी लोक लिहतायेत, बरेच जण बोलतायत. कुणी सेवेच्या साह्याने जग सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत.
माणसे काहीना काही तरी करतायेत, म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर आयुष्यात एवढे गुंते वाढले असते का? आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात म्हणून आपापली पणती टाकून अंधाराच्या कुशीत विरघळून जावं का? खरंतर जग बदलावं म्हणून कोणी लिहू, बोलू नये आणि ते बदलतं, या विचारधारेला प्रमाण मानण्याचा प्रमादही करू नये. जगाच्या जगण्याची आपली अंगभूत रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याच्या जगण्याला गैरसोयीचं असणारच नाही असं नाही. कोणी तसा प्रयास करीत असेल, तर तो त्यांच्या निवडीचा भाग. आपल्याला काय सयुक्तिक वाटतंय, हे महत्त्वाचं. आपल्या मनी असलेल्या ओंजळभर प्रकाशाच्या सोबतीने मांगल्याच्या शोधात चालत राहणे अधिक श्रेयस्कर असतं, कारण परिस्थिती परिवर्तनाच्या पावलांनी प्रवास करत असते, नाही का?
••
0 comments:
Post a Comment