अर्थ

By
आयुष्याचे अर्थ शोधता शोधता कित्येक शतकाचं अंतर पार करून माणूस विद्यमान वळणावर विसावला आहे. याचा अर्थ हा प्रवास मुक्कामी पोहचला आहे असा नाही. प्रवासाचा आरंभ माणसाला अनुमानाने आकळला असेलही, पण अंताबाबत तो केवळ भाकितच करू शकतो. अफाट पसाऱ्यातल्या त्याच्या प्रवासाला मोजलंच तर महिने, हप्ते, दिवसांची संख्या लक्षणीय असेल हे निर्विवाद. तास, मिनिटे, सेकंदाच्या हिशोबात तर डोळे विस्फारून पाहण्याइतके अंक मोठे असतील. हे सगळं सगळं खरं असलं, तरी संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने; तुमच्या पदरी पेरलेले भलबुरे क्षणच खरे. बाकी सगळी समर्थनाची धडपड असते. वाढत्या वयाला घेऊन आयुष्य पुढे पळत असतं. जगण्याने पुढ्यात मांडलेले प्रसंग निरोप घेत नाहीत अन् नियती वगैरे असं काही मानत असलं कोणी, तर पदरी पडलेले प्राक्तन काही केल्या संगत सोडत नाही. 

वय जसे वाढत जाते, तसे आयुष्यात घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना वाचलेलं विश्व अन् वेचलेले अनुभव परिपक्वतेकडे नेत असतात. याबाबत संदेह असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे आयुष्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाच्या कहाण्या कथन करत असतात. कहाण्या सांगता येतात. खुलवताही येतात. गुंतवून ठेवता येतं त्यात. म्हणून सगळेच गुंते सुटतात असं नाही. व्यवस्थेने तयार केलेल्या साच्यात किती लोकांना जगता येतं? साचे सर्ववेळी सम्यक असतीलच याची शाश्वती देता येते का? जर-तरच्या अगणित शक्यता त्यात असतातच ना! त्या कुठे नाहीत. इहतली अधिवास करणाऱ्या सगळ्याच जिवांचं आयुष्यच जर-तरच्या शक्यतांभोवती प्रदक्षिणा करत असतं. शक्यतांची कुंपणे पार करण्यासाठी पात्रतेचे काही पूल पार करता यायला लागतात. नेमक्या वाटा निवडता निकडीचे असते. त्या निवडणे काही निसर्गदत्त देणगी नसते. प्रयत्नसाध्य परिस्थितीचा परिपाक असतो तो.

आयुष्याचे अन्वयार्थ आकळणे एवढं सोप्पं नसतं. समजलं म्हणता म्हणता हाती लागतं त्यापेक्षा अधिक निसटून जातं. अंतरी अधिवास करून असलेल्या ओंजळभर मोहरलेपणाला चिमूटभर सौख्याचे क्षण गंधभारित करत असतात. ऋतू येतात अन् जातात. त्यांना कोणी आवतन देत नाही अन् थांबवूही शकत नाही. ते कुणाच्या आज्ञा प्रमाण मानून पळत नाहीत. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. निसर्ग हस्तक्षेपाशिवाय विचलित नाही होत. ते त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. ऋतूंचं चक्र नियत मार्गाने क्रमन करत राहतं. आयुष्याचाही ऋतू असतो. कधी एकेक पान डहाळीवरून विसर्जित करणारा असेल, तर कधी बहरलेला. एक आहे अन् दुसरा नाही, असं सहसा होत नाही. त्यांच्या प्रदक्षिणा सुरू असतात अनवरत. प्रत्येकाच्या अंगणी अधिवास असतो त्यांचा. सौख्याचा सुमनांनी सजलेले ताटवे सदाकाळ संगत करीत नसतात. ऋतू कूस बदलून नव्या वळणावर विसावताना पाठीमागे आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा कोरून जातात. त्यांचा माग काढत माणूस पळत राहतो. काळाने गोंदलेल्या आकृत्यांचे अर्थ आकळायला आपल्या अस्तित्वाचे आयाम आधी अवगत करून घ्यायला लागतात. आयुष्य समजून घेण्याच्या प्रयत्नांना दिलेलं नाव आहे ते. पण सत्य तर हेही आहे की, प्रत्येक प्रयत्न सफल व्हावेत असं नसतं. तसे ते होत नसतातही. कधी प्रमाद, तर कधी परिस्थिती प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन अंगणी चालत आलेल्या दुःखाला समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर? 

दोष कुणाचा, यश कुणाचं, हे अवश्य शोधता येतं. पण प्रत्येकवेळी पराक्रमाची परिभाषा अन् पराभवाची कारणमीमांसा करता येतेच असंही नाही. मी आज पराभूत झालोय, अगदी परिपूर्ण. असं कधी उगीच वाटतं. ते वाटू नये असं नाही. ती भावावस्था आहे मनाची. त्यामागे कारणे कोणती असतील ती असोत. त्यांचा धांदोळा घेता येतो. आयुष्याच्या वाटेने चालताना समाधानाचे अंश हाती लागतात, तर कधी वंचना, अपमान, अभाव सहन करावा लागतो. म्हणून प्रयत्नांच्या व्याख्या बदलत नसतात. यशाची सूत्रे समजून घेत आयुष्याची जटिल समीकरणे तेवढी योग्यवेळी सोडवता यायला हवी. 

आयुष्याच्या अध्यायांचा अर्थ आकळणे अवघड असलं, तरी अशक्य नसतं. माणसाला यश मिळवता येतं अन् अपयश पचवता येतं एवढं नक्की. अगदीच सरसकट असं म्हणता येत नसलं, तरी उभं राहायची उमेद टाकून नाही देता येत. गलितगात्र, हतबुद्ध वगैरे असले कोणी तर ते अपवाद. यशाची आयती सूत्रे नसतात. ती स्वतःची स्वतःच तयार करायला लागतात. यश कसं आणि कोणत्या मार्गाने संपादित करावं अन् अपयशाचं धनी होताना स्वतःला कसं सावरावं, हा मनावर कोरलेल्या संस्कारांचा परिपाक असतो. यशाने कोणी हुरळून जातात. काही अपयशाने खचून. पण परिस्थिती पाहून उभं राहता येतं, त्यांना आयुष्याचा तोल अन् ताल सांभाळता येतो. यशोपथ पादाक्रांत करण्याचे पर्याय वेगवेगळे असू शकतात. कोणी वळणाची वाट निवडतो, कुणी वळणाला वळसा घालून वळतो. कुणी आधीच बांधलेल्या पायऱ्यांचा वापर करतो. कुणी घातलेल्या पायघड्यांवरून प्रवास करून सिंहासने मिळवू पाहतो. पण अशा यशाला अंगभूत आवाज असेलच असं नाही. सहकार्याच्या कुबड्या अन् वशिल्यांच्या शिड्या न वापरता, स्वतःची पात्रता सिद्ध करून संपादित केलेल्या यशाचा रंग वेगळा असतो. तो अंतरंगातून आलेला असतो. स्वप्रज्ञेला प्रमाण मानून पुढे निघता येतं अन् झालाच पराभव तर तो पचवण्याची प्रचंड कुवत असते, त्यांना यशापयशाच्या परिभाषा अवगत असतात. नसल्या तर शिकून घेता येतात. 

अपयशाला सामोरे जाण्याची अंतर्यामी तयारी असायला लागते अन् यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही. आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित होतात, तेव्हा चिन्हांचे अर्थ शोधावे लागतात. आयुष्य मानापमानाचा अनवरत चालणारा खेळ आहे. इच्छा असो अथवा नसो तो खेळावाच लागतो. कधी कळत, कधी नकळत. कधी जिंकण्यासाठी, कधी जिंकून हरण्यासाठीही सुरक्षेची चौकट लाभलेली घरे उधळून द्यावी लागतात. कारण विजयापेक्षा काही पराभव अधिक देखणे असतात, फक्त त्यांना सत्प्रेरीत विचारांची किनार असावी. 

आयुष्याच्या पटावर अंथरलेल्या काळ्यापांढऱ्या चौकटीच्या घरातील सोंगट्या तेवढ्या योग्यवेळी अन् योग्यस्थळी विचारपूर्वक सरकवता यायला हव्या. खेळातला प्रत्येक विजय हा अंतिम नसतो अन् प्रत्येक पराभव प्रयत्नांचा शेवट नसतो. पराभूत होऊन जिंकता येतं, तसं जिंकून हरताही येतं. तो काळाने गोंदलेल्या रेषांचा परिपाक असतो. मानाचा तोरा मिरवताना मनी मोद मावत नसेल, तर अपमानाच्या क्षणांना विस्मृतीच्या अंधाऱ्या पटलाआड दडवून ठेवताना आपलं म्हणता यायला हवं. अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही. असलेच कुणी तर अपवाद असतील. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका प्रत्येकवेळी अगदीच रास्त असतील असं नाही. मग त्या यश संपादनाच्या असोत अथवा अपयश पेलण्याच्या. आकांक्षांच्या गगनात सदन असलं की, आपल्या पंखांवर विश्वास असल्याशिवाय निवाऱ्याची चौकट गाठता नाही येत. अपेक्षा असणं अवास्तव नसतं. असं म्हणतात की, संधी आयुष्यात क्वचित साद घालत असते. असेल किंवा नसेलही असं. पण ज्यांना संधी शोधता येते, ते त्यांची संख्या नाही मोजत. कारण संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनतात, नाही का?
••

2 comments:

  1. सर,खूप छान लेख आहे !! आयुष्य म्हणजे काय आणि ते कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन आपली ओजस्वी शब्दकळा लाभलेल्या या 'अर्थ' नामक लेखातून प्रचितीस येते.

    ReplyDelete