आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे...
स्मृतीची पाने चाळताना: तीन
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा! तसंच गुल्या नावाचं. ‘गुलाब’ बनून तो मोहरला फक्त कागदपत्रांवर. सामान्यांच्या संवादात ‘गुल्या’ म्हणूनच फुलत राहिला, बहरत राहिला.गावातलं हे एक अचाट पात्र....
स्मृतीची पाने चाळताना: दोन
काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो. आठवणीतल्या वाटा आणि परिसर तसाच प्रसन्न, प्रफुल्लीत आणि टवटवीत. पण नजरेच्या वर्तुळात दिसणारा प्रदेश भग्न उदासपण घेऊन उभा असलेला, कोणीतरी भिरकावून दिलेल्या कचऱ्यासारखा. अंगावर अवकळा घेऊन केविलवाणा उभा. कुपोषित मुलासारखा. सगळीच रया गेलेला....
स्मृतीची पाने चाळताना: एक
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं. खरंतर आपल्याला अहिराणीत शिकवलं पाहिजे असं याचं म्हणणं. हिंदी याला समजायला जवळची असली, तरी यार इसमे कुछ दम नही. हे याने परस्परच ठरवून टाकलेलं. अहिराणीविषयी याला नितांत...