स्मृतीची पाने चाळताना: दोन

By
काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो. आठवणीतल्या वाटा आणि परिसर तसाच प्रसन्न, प्रफुल्लीत आणि टवटवीत. पण नजरेच्या वर्तुळात दिसणारा प्रदेश भग्न उदासपण घेऊन उभा असलेला, कोणीतरी भिरकावून दिलेल्या कचऱ्यासारखा. अंगावर अवकळा घेऊन केविलवाणा उभा. कुपोषित मुलासारखा. सगळीच रया गेलेला. निंब, बाभळीची झाडं हिरमुसलेल्या चेहऱ्याने पांगलेली. पिंपळ पोरक्या पोरासारखा अवघडून उभा. वड तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला; पण त्याच्या जगण्यातील श्रीमंती आता हरवली आहे. आपला भूतकाळ आठवीत हरवलेलं चैतन्य शोधत आहे. परिसराने जगण्यातील श्रीमंती शेवटचा डाव खेळून जुगाऱ्यासारखी उधळून दिलेली. सगळीकडे खुरटं गवत वाढलेलं. रानवनस्पतींनी आपापल्या जागा हेरून धरलेल्या. त्या असण्यापेक्षा असण्याचीच अधिक अडचण. त्यांच्या अतिक्रमणाने परिसर आपलं अंगभूत वैभव हरवून बसलेला.

कधीकाळी माणसांच्या राबत्यात रमलेला हा परिसर सळसळते चैतन्य घेऊन नांदायचा. दिवसभर आनंदाचे तराणे गात राहायचा. गावातील लहानमोठी माणसे या ना त्या निमित्ताने येथे येऊन जुळत रहायची. आम्हां मुलांसाठी हे वड आणि पिंपळ परिसरासह आंदणच दिलेले. सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूरपारंब्यांचा सूर लागलेला असायचा. पोरं माकडांसारखी या फांदीवरून त्या फांदीवर सरसर सरकत रहायची. वडाच्या सानिध्यात विटीदांडूचा खेळ टिपेला पोहचलेला असायचा. सगळा गलका चाललेला. माळावर चरून दुपारच्या निवांत वेळी गावातली गुरंवासरं वडाच्या सावलीत विसावलेली असायची. डोळे मिटून शांतपणे रवंथ करीत बसलेली. दुपारची आळसावलेली मरगळ झटकीत सायंकाळी पश्चिमेला उन्हं कलताना परिसर पुन्हा जागा होऊन गजबजायचा, तो थेट चांदणं आकाशात उतरेपर्यंत. 

गावात पाण्यासाठी नळांची सोय नसल्याने नदीवरून पखाली भरून पाणी घरी आणायचे. ज्यांच्याकडे पखालींची सोय नसायची ते घागरी, हंडे भरून पाणी वाहून आणायचे. भरलेल्या घागरी डोक्यावरून उतरवून थोडा विसावा घेण्यासाठी वडाखाली थांबायचे. नदीकडून आणलेल्या पाण्याच्या ओझ्याने थकलेल्या रेड्याचीही पावलं या परिसरात येऊन हमखास मंदावयाची. तो वडाच्या सावलीत थांबायचा. हातातला कासरा सोडून त्याचा मालक; असला हाती वेळ थोडा, तर तेवढ्या वेळात खिशातून पानतंबाखूची चंची काढून वडाच्या पायथ्याशी टेकायचा. नदीवरून पाणी भरायला जाणारी आणि येणारी माणसे वडाच्या बुंध्याशी बसून पानतंबाखूची देवघेव करीत बोलत असायचे. विडी काढून आनंदाचे झुरके मारले जायचे. तेवढ्या वेळात शेती, पीकपाण्याच्या, हंगामाच्या गप्पा रंगायच्या. 

गावातल्या सासुरवाशिणी पाण्यासाठी, धुणं धुण्यासाठी नदीवर जातांना-येताना डोक्यावरील ओझं उतरवून वडाच्या सावलीत आपल्या माहेरच्या आठवणींची मुळं शोधत राहायच्या. थोडं थांबून एकमेकींचे सुख-दुःख सांगत मन हलकं करून घ्यायच्या. सुना, लेकीबाळी आपल्या सत्यवानाला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करीत वटसावित्रीच्या सणाला वडास श्रद्धेच्या धाग्यांनी बांधून ठेवीत. त्याच्याकडे भक्तिभावाने आपल्या सौभाग्यासाठी दीर्घ आयुष्य मागत. तोही आस्थेने आपल्या लेकीबाळींचे सौभाग्य सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारी घ्यायचा. सुताचे ते धागे बरेच दिवस अभिमानाने मिरवत राहायचा. 

धार्मिक आस्था असणाऱ्या माणसांसाठी वड जिव्हाळ्याचा विषय. परिसरात मंडप टाकून पारायणाचा जागर घडायचा. मंत्रजागराने परिसर दुमदुमत राहायचा. धूप-अगरबत्त्यांच्या सरमिसळ गंधाने दरवळत राहायचा. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा वाचनाचे सूर वातावरणात मंगलनाद निर्माण करीत राहायचे. माणसे आस्थेने ऐकत असायची. बायाबापड्या वाती वळत भक्तीभावाने कथा ऐकत बसलेल्या. 

फावल्या वेळात वडाची विस्तीर्ण सावली धरून गप्पांचे फड रंगायचे. गतकाळाच्या स्मृती जाग्या व्हायच्या. एकत्र जमलेली पोक्त माणसे आठवणीत रमलेली. स्मृतीच्या पोतडीत पडलेल्या आठवणी एकेक करून काढल्या जायच्या. भूतकाळाच्या उबदार शालीत झोपलेल्या आठवणींना जाग यायची. स्मृतिकोशातल्या मातीत रूजलेल्या विचारांच्या रोपट्यांना पालवी फुटून बहरत राहायचा. 

नदीच्या पात्रापासून वड तसा बराच दूर. पण नदीला मोठा पूर आला की, पाणी परिसरातील खोऱ्यातून उड्या मारत उनाड मुलाप्रमाणे मुक्त उधळत राहायचे. मग गावातली माणसे चौकशी करीत रहायची. पुराचे पाणी कुठपर्यंत आले, म्हणून प्रश्न विचारायचे. वडाजवळ पाणी पोहचले का? पारंब्या पाण्यात कुठपर्यंत बुडाल्या? या प्रश्नांच्या उत्तरांवरून पुराचे प्रमाण ठरवले जायचे. वड ओलांडून पाणी पिंपळापर्यंत पोहचले की, माणसे चिंतीत व्हायची. 

वडाशी गावाचं जगणं जुळलेलं. कोणत्यातरी निमित्ताने माणसं वडाच्या कुशीत क्षण-दोनक्षण विसावयाची, जिवंतपणी आणि अखेरच्या यात्रेच्या वेळीसुद्धा. अंत्ययात्रा नदीकडे जातांना गावाला वळसा घालून येणाऱ्या लांबच्या रस्त्याने चालत यायची. खांदेकरी थकलेले असायचे. नदीकडे जातांना वडाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थोडे थांबायचे. वडासोबत वाढलेला देह त्याच्या पायाशी अखेरचा विसावा घ्यायचा.  चैतन्य विसर्जित झालेला निष्प्राण देह खांद्यावर घेऊन माणसे चालती व्हायची. वड डबडबलेल्या अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप द्यायचा. क्षणभर दुःखी झालेला वड आणि शेजारचा परिसर दुःख गिळून पूर्वपदावर यायचा. आनंदाचे झुले परत हलायला लागायचे. मुलं खेळण्यात दंग व्हायची. आस्थेचे नवे गीत बनून परिसर पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटायचा.

मुलंमाणसांनाच नाही तर पोपट, कावळे, चिमण्यांच्या संसाराला वडाने आपल्या अंगाखांद्यावर आश्रय दिला. त्यांचे चिमणसंसार त्यावर बहरले. दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असायचा. ठरल्यावेळी ऋतू बदलायचा. ऋतुमानानुसार वड आपल्या पानांची वस्त्रे बदलवत राहायचा. उन्हाळ्यात कोरडीठाक पडलेली कांती पावसाच्या पाण्याने चिंब भिजून सुस्नात लावण्यवतीच्या रूपाशी स्पर्धा करताना दिसायची. 

हिवाळ्यात माळावर खेळणारी मुलं उड्या मारण्यात थंडी विसरायची. पाण्याला गेलेली माणसे ओली होऊन कुडकुडत नदीवरून हंडे, घागरी घेऊन यायची. शेत राखायला आलेली आणि थंडीने कुडकुडणारी माणसं शेकोटी पेटवून अंग शेकत गप्पा झाडीत बसलेली असायची. खेळात लक्ष नसलेली मुलं कोवळे ऊन अंगावर घेत वडाच्या कडेवर जाऊन बसायची. शाळा चुकवून मास्तरच्या माराच्या धाकाने येथेच लपून बसायची. वडाच्या संगतीने मुलांचं वर्षभर खेळणं, वाढणं सुरु असायचं. वड आपला वाटायचा. हे आपलेपण परिसराशी जुळलेल्या नात्याच्या धाग्यांची वीण घट्ट करीत राहायचे. 

आस्थेची ओल अंतरी साठवत जीवनऊर्जा घेऊन अनेकांनी आकांक्षांच्या आकाशात भरारी घेतली, आपलं क्षितिज शोधण्यासाठी. वडपिंपळ अन् तेथला परिसर तसाच मागे ठेवून. माळावरील मोकळ्या जागेत हुंदडणारी पावलं थांबली, थबकली. त्यांची जागा घेऊन रानगवत, रानवनस्पतींनी आपले पाय परिसरात पसरवले. त्यांच्या पावलांचा पसारा वाढला. त्या पसाऱ्यात परिसराची रया पार हरवली आहे. एक बकाल उदासपण त्यावर पसरलेलं. कधीकाळी माणसांच्या राबत्याने गजबजलेला परिसर शापित जगणं घेऊन उभा आहे. आपलं गतवैभव परत येईल या आशेवर. कोण्या उद्धारकर्त्या प्रेषिताची वाट पाहत.

0 comments:

Post a Comment