स्मृतीची पाने चाळताना: पाच

By
ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला. देहाचे पार्थिव अस्तित्व विसर्जित झाले. पण गावाला सवय झालेल्या या आवाजाची सय अजूनही तशीच आहे. गावातल्या लग्नकार्याच्या, कुठल्याशा सण-उत्सवाच्यानिमित्ताने कळत-नकळत त्याच्या आठवणी जाग्या होतात आणि वीसबावीस वर्षापूर्वीचं चित्र मनःपटलावरून सरकत राहतं. 

आमच्या गावात नारायण नावाभोवती कौतुकाचं, कुतूहलाचं एक वलय लाभलेलं. अशी वलयांकित माणसं गावागावात आजही असतील; पण काही माणसं आपल्या आठवणींचं एक वर्तुळ अनेकांच्या अंतर्यामी कोरून जातात. गावातल्या मोठ्या माणसांसाठी नाऱ्या, समवयस्कांचा कधी नारायण तर कधी नाऱ्या, लहान्यांसाठी काका, काहींसाठी काही, कुणासाठी काही; पण माझ्यासाठी गावाच्या नात्याने मामा. या गावातच लहानाचा मोठा झालो. गावाने नुसत्या संस्कारांनी घडवलं नाही, तर विचारांनीही वाढवलं. वाढत्या वयासोबत मनःपटलावर कोरली गेलेली संस्कारांची अक्षरे येथूनच गोंदून घेतली. जगण्याचं अफाटपण येथूनच कमावलं. अमर्याद आकांक्षांच्या आभाळात विहरण्याइतपत पंखाना बळ घेतलं. जगण्याच्या संघर्षात टिकून राहण्याचा चिवटपणा येथूनच देहात रुजला. आपलेपणाचं पाथेय दिमतीला देऊन गावानेच उदरभरणाच्या वाटेने शहरात आणून सोडले. देह शहरात येवून विसावला. पोटपाण्याचे प्रश्न घेऊन येताना मनात वसती करून असलेलं गाव काही विचारविश्वातून टाकता नाही आलं. शहरी सुखांच्या चौकटीत स्वतःला फ्रेम करून घेतलं. आजही गावमातीच्या धुळीच्या कणांनी रंगवलेल्या आणि दिसामासाने धूसर होत जाणाऱ्या चित्राची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. विटत चाललेल्या आकृत्यांना जतन करून ठेवतो आहे. अंतर्यामी विसावलेलं गाव कधीतरी अनपेक्षितपणे जागं होतं आणि आस्थेचं इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर आठवणींची कमान धरतं. प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवलेली आपली माणसं त्यात शोधत राहतं. काही सापडतात, काही विस्मरणाच्या धूसर पडद्याआड हरवतात. 

सव्वापाच-साडेपाच फूट उंचीचा देह निसर्गदत्त लाभलेली सावळ्या वर्णाची चादर लपेटून कोणत्याही ऋतूत गावात सारख्याच तन्मयतेने वावरताना दिसायचा. साधारण अंगकाठी घेऊन उभी राहिलेली ही आकृती जगण्याचं आकाश पेलून धरण्याची कसरत करीत राहायची. गळ्यातल्या बागायतदार रुमालाशी याच्या कायमस्वरूपी मर्मबंधाच्या गाठी बांधलेल्या. एकवेळ शंकराच्या चित्रात गळ्यात नाग दिसणार नाही; पण याच्या गळ्यात रुमालाने सतत विळखा घातलेला. जणू प्रेयसीने अनुरक्त होऊन लडिवाळपणे दोन्ही हातांनी गळ्याला लपेटून घेतलेलं. हवेच्या झुळुकीने झुलणारा केसांचा झुपकेदार कोंबडा. ओठांवर कोरून घेतलेल्या तलवारकट मिशा. तोंडात गायछाप विसावलेली. तंबाखू नसेल तर विड्याच्या पानाने रंगलेली जीभ. जिभेला निसर्गदत्त मिळालेली धार. पांढरा पायजमा आणि सदरा याव्यतिरिक्त अन्य रंगाचेही कपडे असू शकतात, हा प्रश्न याच्या मनात कधीच उदित झाला नसेल. मनमुराद नीळ वापरल्याने मुळचा रंग हरवून बसलेले हे साधेसे कपडे सगळ्या मोसमात सोबत करणारे. हिवाळ्यात थंडी वाजायला लागली की, गोधडी अंगावर येऊन विसावयाची. पावसाळ्यात घोंगडी. एवढाच काय तो याच्या पेहरावात वरपांगी दिसणारा बदल. या सगळ्या भांडवलासह साकारणारी ‘नारायण’ नावाची प्रतिमा गावात आपली स्वतंत्र ओळख घेऊन वावरत असे. नारायण नावाचा धनी बनून ओळखला जाणारा हा साधारण चणीचा देह अख्ख्या गावाचा स्नेहाचा विषय. हा स्नेह अर्थात त्याच्या अंगभूत स्वभावानेच घडविलेला. 

गावातल्या लग्नकार्यात आहेर वाजवण्याचा कार्यक्रम असायचा. हा कार्यक्रम नारायणमामाची खास ओळख. अमक्याकडून तमक्यांना आलेला आहेर सांगायचा, तेव्हा ऐकणाऱ्याचे मन आनंदित व्हायचे. स्पीकरची सोय सहज उपलब्ध नसलेल्या काळात हा खणखणीत आवाज मांडवभर दुमदुमत राहायचा. पंचक्रोशीत असा आवाज कोणाचा नाही म्हणून आलेली पाहुणे मंडळी त्याला दिलखुलास दाद द्यायची. त्यांच्या बोलण्याने नारायणमामा हरकून जायचा. कितीतरी दिवस मुलां-माणसांना सांगत राहायचा. अमक्या गावाच्या पाहुण्यांनी माझे कसं तोंडभरून कौतुक केलं वगैरे वगैरे. त्याच्या या कहाणीत मात्र प्रत्येकवेळी काही नव्या कड्या जुळत राहायच्या. हळदीचे, वरातीचे, लग्नाच्या टाळीचे निवते देताना नारायणमामाला जरा जास्तच चेव यायचा. त्यात हातभट्टीची थोडी रिचवली असली की, थाट काही और असायचा. गावात लोकांना जेवणाचे निवते सांगताना सारखा या गल्लीतून त्या गल्लीकडे धावत राहायचा. मंडपात मोक्याच्या जागी उभा राहून हातातल्या निमंत्रणाच्या यादीवर जेवणाला आलेल्यांच्या नावासमोर खात्री करीत रेघोट्या ओढीत राहायचा. उरलेल्यांना बोलावण्यासाठी परत धावायचा. कधी थोडी अधिक रिचवून झाली की, त्याच्या गप्पांना अद्भुततेची रुपेरी किनार लागायची. खास ठेवणीतल्या गोष्टी, आठवणी एकेक करून जाग्या व्हायच्या. प्रत्येक वेळी तीच गोष्ट आणखी काही भर घालून रोचक होत जायची. 

काळाच्या प्रवाहात आसपास बदलतो, तशी माणसेही बदलत जातात. परिवर्तनाच्या गतीशी जुळवून घेणारे पुढे निघतात; पण ज्यांना जुळवून घेता येत नाही, ते थबकतात. साचतात. हे साचलेपण घेऊन आहे तेवढ्या ओलाव्यात आस्था शोधत राहतात. परिस्थितीच्या रुक्ष वातावरणात ओल आटत जावून भेगाळलेल्या तुकड्यांशिवाय काहीच उरत नाही, हे माहीत असूनही. नारायणमामा परिस्थितीच्या भेगाळलेल्या तुकड्यांना जमा करून सांधत, बांधत, सावरत, आवरत राहिला. सजवत राहिला स्वप्ने कोरभर सुखांचे, अनेकातल्या एकासारखा. पण ती काही हाती लागली नाहीत. मनाजोगते आकार कधी कोरताच आले नाहीत त्याच्या वर्तमानाला. भविष्याच्या कुशीत पहुडलेले समाधानाचे अंश शोधत आयुष्याच्या वाटेने चालत राहिला. थकला. थांबला. परिस्थितीच्या कर्दमात रुतला. संपला. नियतीने त्याच्या जीवनग्रंथाला पूर्णविराम दिला. पण अनेकांच्या अंतर्यामी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आठवणींच्या रूपाने तो कोरून गेला.

गावातली माणसं आजही त्याला आठवतात. भलेही ते आठवणे प्रासंगिक असेल. त्याला ओळखणाऱ्या पिढीच्या मनात तो अजूनही आहे आणि नव्या पिढीच्या मनात कोणाकडूनतरी त्याच्याविषयी ऐकलेल्या गोष्टीतून रुजतो आहे. जगातल्या अनेक सामान्य माणसांसारखा तो जगला. त्याच्या असण्याने गावाची कोणतीही भौतिक प्रगती झाली नसेल किंवा त्याच्या जाण्याने कोणतेही नुकसान झाले नसेल. त्याच्या असण्या-नसण्याने समाजाच्या दैनंदिन व्यवहारात काडीचाही फरक पडला  नाही. पण काही माणसे अशी असतात की, आपल्या अस्तित्वाचे लहानमोठे तुकडे गोळा करून मनांत लहानशी घरटी बांधून जातात. परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी धडका देत ती कोटरे टिकून राहतात. कालोपघात जीर्ण होऊन रिती होतात; पण आस्थेच्या लहानशा धाग्याने स्मृतींच्या फांदीवर लटकून थरथरत राहतात. नारायणमामा अजूनही गावातल्या माणसांच्या मनात आहे, त्याच्या खणखणीत आवाजाच्या रूपाने. का कुणास ठाऊक; पण हा आवाजही आता आपल्या स्मृतिशेष अस्तित्वाला विसर्जनाकडे न्यायला निघालाय असं वाटतंय. काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टीना संपण्याचा शाप असतो. त्याला हा आवाज तरी कसा अपवाद असेल, नाही का? 

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment