समस्या

By
समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या इकडच्या असतात, तिकडच्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात तशा अधल्या-मधल्याही असतात, प्रवाहातल्या असतात, तशाच किनाऱ्यावरच्याही असतात, कधी उथळ असतात, कधी अथांग असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. अभ्यागताची पावले घेऊन चालत येतात त्या. त्यांना टाळायचे, नसतील टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय संदेहाची अनेक वर्तुळे त्यांच्याभोवती कोरलेली असतात. 

समस्यांचा गुंत्यात माणूस गुरफटला की, त्याभोवती प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त. एका अस्वस्थ वणवणचा आरंभ असतो तो, तसा विरामही त्यातच सामावलेला असतो. काही शेवट कडवटपणा कोरून जातात, तसे काही गोडवाही ठेवून जातात स्मृतीच्या पानांवर. याचा अर्थ सगळेच शेवट गोडवा घेऊन येतात असं नाही. समस्यांच्या महाकाय बुरुजांच्याआडून डोकावणारा एखादा हलकासा मुक्तीचा कवडसा दिसला तरी केवढं आश्वस्त वाटतं. आस्थेचा चतकोर तुकडा हाती घेऊन चौकटी पार करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण हेही काही सहज नसतं.

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच.

समस्या कुठे नसतात? त्या सार्वकालिक असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील सहज हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. नवे सवंगडी, जुने सोबती, थोडी अनुभूती, थोडं आकलन सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. माणसे मदतीचे हात बनून आले तर तीही माणसे असल्याने प्रमाद घडतीलही त्यांच्याकडून. म्हणून प्रमाद काही पूर्णविराम नसतो. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी.

संवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. काही किंतु राहू नयेत म्हणून त्या योग्यतेची उंची संपादित करायला लागते. आश्वासन दिली घेतली जातात, त्यात विश्वास असला की, अविश्वास आसपास फिरकतही नाही. हाती घेतलेले एखादे काम वाकुल्या दाखवते, तेव्हा दोष नेमका कुणाचा, हे आपणच शोधायला लागतं. केवळ कुठल्यातरी निमित्ताला कारण करून दोषांपासून विलग नाही होता येत. दोषरहित कुणी नसतो, पण दोषसहित स्वीकारांसाठी स्वतः सरळ असायला लागतं. संदेहाच्या ससेमिऱ्यापासून सुटका हवी, तर स्वच्छ असणं आवश्यक असतं.

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते, पण दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. निवड आपलीच असते, आपण कोणता विकल्प निवडायचा. सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊन चालत नाही. कारण काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु राहिलेच असतील शिल्लक, तर संवादातून उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज म्हणजे उत्तर असते, नाही का?

व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका मात्रेचे अंतर आहे अन् ते पार करता येतं त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं व्यापकपण अंतरी नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण व्यवस्थेने आखून दिलेली अथवा आपण भोवती कोरून घेतलेली एक चौकटही आसपास नांदती असते. तिच्या मर्यादा पार करता येणे जमले की, विचार वाहते राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन उपलब्ध विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण असावं. विचारांत निर्व्याजपण राहावं आणि आचरणात निखळपण नांदतं असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा वाहता असला की, उगवून येण्याचे अर्थ आपोआप आकळतात.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी कळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment