माणूसपणाच्या मर्यादा माहीत असतात, त्यांना महात्म्याच्या व्याख्या नाही शिकवाव्या लागत. मर्यादांचं भान हीच त्यांची महती असते. आपण करत असलेल्या अथवा कराव्या लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळात नाही शोधता येत. कधीतरी त्यांना भावनांच्या चौकटीतही तपासून पाहावं. तर्कनिष्ठ विचार जगण्याची अनिवार्यता असेल, तर भावना आयुष्याची आवश्यकता असते. प्रत्येकवेळी तर्काच्या तिरांनी पुढे सरकण्याऐवजी कधीतरी भावनांच्या प्रतलावरूनही वाहता यावं.
मान्य आहे, तर्क ज्यांचं तीर्थ असतं, त्यांच्या आयुष्यात तीर्थे शोधण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या सत्प्रेरीत कृतीच तीर्थक्षेत्रे असतात. सद्विचारांची वात विचारांत तेवती असेल, तर तेच मंदिर अन् तेच तीर्थक्षेत्र असतं. पाण्याला तीर्थरूप होता येतं, कारण त्यात कुणीतरी नितळ भक्तीचा भाव ओतलेला असतो. त्यातला भक्तिभाव वगळला तर उरतं केवळ ओंजळभर अस्तित्व, ज्याला केवळ पाणीच म्हटलं जातं. पाणी महत्त्वाचंच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो भाव. अंतरी आस्थेचे दीप तेवते असले की, आयुष्यातले अंधारे कोपरे उजळून निघतात. उजेडाची कामना करत माणसाचा प्रवास अनवरत सुरू असतो. वाटा परिचयाच्या असणं हा भाग तसा गौण. कदाचित दैवाने टाकलेल्या अनुकूल दानाचा भाग. कुण्या एखाद्या अभाग्याला जगण्याचा अर्थ विचारला तर आपल्या आयुष्याचे अन्वयार्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत.
तुमच्याकडे सुखांचा राबता असणं माणूसपणाची परिभाषा नसते. अभावात प्रभाव निर्माण करता येतो, त्याचा मोलभाव नाही करता येत. अंतरीच्या भावाने त्यांकडे पाहता यायला हवं. तुमच्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीने तुम्ही काही काळ चमकालही. पण झगमग आयुष्यात कायम अधिवास करून असेलच असं नाही. काजव्यांचं चमकणं देखणं असूनही त्यांना अंधाराचा नाश नाही करता येत. पण अंधाराच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक रेषा नक्कीच अधोरेखित करता येते. आसपास अगणित प्रकाशपुंज दिमाखात मिरवतात म्हणून काजव्याने प्रकाशापासून पलायन करावं का? अंधाराच्या ललाटी प्रकाशाची प्राक्तनरेखा कोरण्याच्या कामापासून विलग करून घ्यावं का? नाही, अजिबात नाही. त्याला त्याच्या मर्यादा आकळल्या तरी पुरे. पणतीला उजेडाच्या परिभाषा अवगत असतात अन् आपल्या मर्यादाही माहीत असतात, म्हणून तर ती सभोवार पसरलेल्या काजळीतला कोरभर अंधार पिऊन ओंजळभर कोपरा उजळत राहतेच ना! स्वैर विहार करणाऱ्या झगमगाटमध्ये कुणाची तरी तगमग दुर्लक्षित होणं विपर्यास असतो.
काही गोष्टी कुणाला बऱ्या वाटतात म्हणून आपणही तशाच कराव्या का? कुणाच्या कांक्षा आपल्या समजून अंगीकार करावा असं कुठे असतं? जगाला आपल्या जगण्यात जागा असावी; पण त्याचा कोलाहल होऊ नये इतकीच ती असावी. जगावं स्वतःला लागतं. जग एक तर मार्गदर्शन करतं किंवा तुमच्या मर्यादा मांडतं. कधी कुणी कुणाच्या कर्तृत्त्वाला कोरतं. कोरणारा हात कलाकाराचा असेल तर सुंदर शिल्प साकारतं अन्यथा केवळ टवके निघतात. तसंही ढलपे काढणारेच अधिक असतात आपल्या आसपास. जग तुमच्या जगण्याचं साधन असावं. साध्य आपणच निवडायचं. ते निवडण्याची कला जगातील भल्याबुऱ्या वृत्तीप्रवृत्तीकडून शिकून घ्यावी. समोर दिसणारी धवल बाजू पाहून जगाचे व्यवहार गोमटे आहेत, असं म्हणणं अज्ञानच. पलीकडील अंधारात अपरिचित असं काही असू शकतं. अंधारात हरवलेला अज्ञात आवाज ऐकता यायला हवा. प्रत्येक परंतुत एक प्रश्नांकित कोपरा असतो. त्याच्या विस्ताराच्या रेषा समजल्या की, आयुष्याचे अर्थ गवसत जातात.
आयुष्याच्या पटावर परिस्थितीने पेरलेल्या वाटांनी प्रत्येकाला चालायला लागतं. त्या कशा असतील हे सांगणं इतकं सहज नाही. सुगम असण्यापेक्षा अवघडच अधिक वाट्यास येतील. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या पथावर पहुडलेल्या काही वाटा खुणावतील. काही खुलवतील. काही भुलवतील, तर काही झुलवतीलही. त्या प्रत्येकांचे अर्थ शोधण्याएवढं प्रगल्भपण प्राप्त करता यावं. साद देणारी सगळीच वळणे विसावा होत नसतात अन् सोबत करणाऱ्या सगळ्याच वाटा देखण्या नसतात. पायासमोर पसरलेल्या प्रत्येक चाकोऱ्या मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत नेणाऱ्या असतातच असंही नाही, हेही तेवढंच खरं.
काही वाटा दिसतात देखण्या, पण आपण समजतो इतक्याही सहजसाध्य नसतात. निदान सामान्यांच्या आयुष्यात तरी नाही. असंख्य अडनिड वळणे असतील. संयमाची परीक्षा घेणारे सुळके समोर दिसतील. आपण शून्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या दऱ्या असतील. परिस्थितीने पथावर पेरलेले अगणित काटे दिसतील. म्हणून पावलांना एका जागी थांबवून नाही ठेवता येत. निवडलेला पथ अन् वेचलेल्या वाटा वाचता आल्या की, विचारांचं विश्व समृद्ध होतं. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटा कशा असाव्यात, हे कदाचित सीमित अर्थाने ठरवता येईलही. निवडीचे काही विकल्प हाती असले, तरी ते सम्यक असतीलच असंही नाही. म्हणून आपल्याला चालणं टाकून नाही देता येत. लक्ष ठरलेले असतील अथवा नसतील, चालायचं तर सगळ्यांनाच असतं. त्यासाठी चालताना फक्त नजरेत क्षितिजे अन् विचारात आभाळ उतरून यायला हवं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment