“बापू, आपलं ऐहिक जगणं पाहणाऱ्याला दिसणं आणि दिसतं तसं असण्यात एवढी तफावत का असेल हो?” कुणाच्या ध्यानीमनी नसताना तात्याने विचारलेल्या प्रश्नाचा आवाज.
असं काही वाक्य कानी पडेल, याचा अदमास नसल्याने आम्हां सहकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या संवादाला क्षणभर विराम. बोलणं थांबवून सगळे त्याच्या चेहऱ्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहू लागले. झालं असं की, ऑफ तासिकेला शिक्षकदालनात आम्ही चारपाच जण इकडचं तिकडचं बोलत बसलेलो. थोड्या अंतरावर तात्याही त्याचं शाळेतलं शिल्लक राहिलेलं काही काम करीत बसलेला. त्याचे हात कागदांवर सफाईदारपणे फिरत असले, तरी कान आमच्या बोलण्याकडे असावा. अर्थात आमच्या बडबडीचा विषय खूप गहन आणि तात्विक वगैरे नव्हता. कोरोनाने माणसांच्या मनावर कोरलेल्या ओरखड्यांना समजून घेणं सुरु होतं.
कोणत्याही शाळेत जा, तेथे रिकाम्या तासिकांना हमखास दिसणारं हे चित्र. चर्चेचे विषय, चर्चा करणाऱ्यांची नावं वेगळी असली, स्थळे निराळी असली तरी सगळीकडे असणाऱ्या तऱ्हा एकजात सारख्याच. आम्ही असलो काय अन् आणखी कोणी काय, या चौकटींना कोणी अपवाद वगैरे असतील, तर ते फक्त अपवादापुरते. पण बहुदा नसावेतच.
काळाच्या बदलत्या सूत्रांबाबत अन् परिस्थितीच्या आवर्तात सापडलेल्या पात्रांबाबत आमचं आपापसात बोलणं सुरु. परिस्थितीने पुढयात पेरून ठेवलेल्या गोष्टी भविष्यात अभिनिवेशरहित जगणं कसं अवघड करीत जाणार आहेत याचा अदमास बोलण्यातून घेत होतो. काहींनी प्राक्तनाच्या पदरी सारी पापं बांधून नैतिकतेचा वगैरे ऱ्हास कसा होतोय अन् मूल्यांचा प्रवास अवनतीचे किनारे धरून झपाट्याने कसा सुरु आहे, याचा अध्याय वाचायला सुरवात केलेली. तर माणसाच्या नालायक वागण्यामुळे ही सगळी अरिष्टे अंगणी आली असल्याचा निवडा करून काहीजण मोकळे. समर्थनाचे सूर आणि विरोधाचे आवाज बऱ्यापैकी टिपेला लागलेले. तात्याच्या बोलण्याने संवादाचे सूर विखंडीत झाले. शब्दांचे साज सूत्रातून सुटले. समर्थनाचा ठेका चुकला. विरोधाच्या पट्ट्या सुरातून निखळल्या.
विषयाला अल्पविराम देत बोलण्याचा ओघ त्याच्याकडे वळता करून विचारलं, “तुला नेमकं काय म्हणायचंय रे, तात्या?” खरंतर त्याच्या प्रश्नाचं नीटसं आकलन वगैरे न झाल्याने एकदा विचारून खात्री करून घ्यावी म्हणून तसं म्हणालो.
हातातील फाईल, कागद वगैरे साहित्य शेजारी ठेवत त्याने तोच प्रश्न शांतपणे परत एकदा आमच्या पुढ्यात ठेवला. म्हणाला, “बापू, मला माणसांच्या बेगडी असण्याबाबत बोलायचं होतं. तुम्हां लोकांचा सुरु असलेला संवाद हे खरे आहेच आणि तेपण खोटं नाही, अशा सुरात सुरुये. असं बोलू नये असं काही मला म्हणायचं नाही. पण ते काही पर्याप्त आहे असं मलातरी वाटत नाही. हे फारच एकांगी वगैरे होतंय, नाही का? आपण काय करतो माहितीये? समर्थनाची एक बाजू आवडली तर ती घेऊन उभे ठाकतो किंवा नाहीच पटलं तर विरोधाचे आवाज अधोरेखित करीत राहतो. पण माणसांच्या उक्ती आणि कृतीत अंतर आहे, हे आपण माणूस म्हणून कधी मान्य करणार आहोत? तुम्ही लोक दोन वेगळ्या भूमिका घेऊन दोनही बाजूनी मते मांडतायेत. पण याचं मूळ माणसांच्या आत्मकेंद्रित वृत्तीत आहे, असं नाही का वाटत तुम्हांला?” त्याला अपेक्षित असलेला मथितार्थ समजून घेणं थोडं अधिक सुलभ व्हावं म्हणून काही समांतर विधाने केली. काही उदाहरणे घेऊन माणसांच्या वृत्तीप्रवृत्तींबाबत स्पष्टीकरणात्मक नोंदी अधोरेखित केल्या.
तात्याने केलेल्या प्रश्नाचा रोख समजून घेत कोणी काही बोलण्याआधी आबा त्याला चिडवत म्हणाला, “काय रे भो, सध्या तत्वज्ञानना गह्यरा अभ्यास होयेल दिसंस. सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल का काय म्हनतस, त्या समदा मोठा मोठा मान्से पानी भरी राह्यना व्हतात वाटते तुन्हांकडे. साला, कोरोनानी जबरदस्ती देयेल आम्हन्या सुट्ट्या अशाच उडी ग्यात. आनी तू तं पुस्तकसना पानं वाचीसन चिंध्या चिंध्या करी टाक्यात वाटतं.”
त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षाही न करता अण्णाने आपलं घोडं पुढे दामटलं. म्हणाला, “सुट्ट्या सत्कारनी लागेल दिस्ता भो तुह्या, तात्या! नहींतं आम्ही आपले गैबान्यावानी ते व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतच गरगर फिरी राह्यले होतो. हे व्हाट्सअपमधले मॅसेज म्हणजे एक गंमतच अस्ते नही का. आहेराच्या साड्यावानी असतं यायचं. आहेराच्या साड्या रोज वापरता का कोन्ही. आलेल्या तं गह्यऱ्या राहता, पन नेस्याले कोनी काढतं का त्याह्यले? इकडून आली की, देली ढकलून तिकडे. व्हाट्सअपवर आहेर वाटून झाले आनं तो देयाचा कटाया आला की, आहेच फेसबुक. तठी दिसलं कोन्या देखन्या चेहऱ्याचं चित्र की, कर लाईक. कमेंटमंधी मार लववाला बदाम. तेभी करीसन बोर झालं की, काय ते टीव्हीवर रामायण पाहाय, नही तं महाभारत. तठीभी नवं काहीच नही. त्या सिरीयलायमंधी न्याऱ्या न्याऱ्या वृत्तीची मान्से दाखोले अस्ता ना, आपल्या आसपास नजर टाकली तरी तुम्हाले अशे शेकड्याने सापडतीन. पाहून पाहून किती पाहनार. त्याचाबी कटाया यायचा. नुस्त्या टिवल्याबावल्या करी राह्यले होते.”
“तू तेव्हढं काम गह्यरं मस्त करशीन. कोनालेबी इचारलं हे तं अख्खं गाव सांगीन. वाचलं अस्ते चारदोन पुस्तकं तं तुह्यवालं वजन कमी झालं असतं का रे? पण नही नं. बाकी उचापती कऱ्यांयले कोण राहिलं अस्तं मंग.” तात्या त्याला चिडवत म्हणाला.
“तू काहीबी म्हण भो तात्या, तसंभी आम्हाले वाच्याचं येड कधी नोव्हतं. आमचं वाचनं आभ्यासाच्या पुस्तकाय पुरतं. हे पुस्तकेच आमच्याकरता धर्मग्रंथांइतके पवित्र. तीच आमच्यासाठी गीता, तेच आमचं बायबल आन कुरान पन. आमची भक्ती एवढीच. झालंच जास्ती तं रोजचा पेपर पाह्या पुरतं. आम्ही पडले सायन्सवाले. आनी आता झालो मास्तर तरी मूळची सवय काही जात नही. तुमच्या त्या साहित्यचं अन् आमचं कधी पटलंच नही. देलं कोनी पुस्तक हातात कोंडून तं नावडत्या बायकोबरोबर जबरदस्ती नांदल्यावाणी होतं आम्हाले. तेवढयापुरतं जमलं तं नांदलं. नही तं देली फारकत.”
“ओ अन्ना, तू गप बस न रे भो जरासा! त्याना इशय काय शे आनी तू बोली काय राह्यना? कसाले चड्डी ओढी राह्यना त्यानी. काय म्हननं शे त्यानं, जरासं आयकी तं ले. आयकाले का पयसा पडतस?” थोड्या वेळेआधी तात्याच्या विधानांची फोलपटे काढणारा आबा आपलं आंतरिक ज्ञान प्रकट करीत बोलता झाला.
“अरे पुरे ना आता! किती चिवट्या सोलतात रे त्याच्या?” तात्याकडे येणाऱ्या शब्दांच्या तीरांना थांबवत ढाल झालो. “खरंय रे तुझं म्हणणं. असणं आणि दिसणं यात फरक करता यायला हवा. खरंतर आपण असतो तसे दिसतो का, याची काळजी माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाने घ्यायला हवी. प्रत्येकाच्या जगण्याचे काही कंगोरे असतात. काही कोपरे असतात. चेहरे असतात तसे मुखवटेही असतात. पण चेहरा लपवण्याची परिस्थिती ओढावली की, मुखवटे सुंदर वाटू लागतात. एकदाका मुखवटे परिधान करून मिरवायची सवय झाली की, हरवलेल्या चेहऱ्याचं स्मरण नाही राहत. बोले तैसा चाले... हे शब्द मुलांना वर्गात शिकवण्यापुरते राहतात किंवा भिंतीवरील सुविचारांपुरते उरतात.”
“आता कसं बोलले बापू तुम्ही! त्याचं काय आहे, तुम्ही होते साहित्याचे विद्यार्थी, म्हणजे तसे आजही आहेतच. लिहिणारा आयुष्यभर विद्यार्थीच असतो नाही का? असायला हवं. पण दोन लेख, तीन कविता कुठे छापून आल्या की, आपण प्रथितयश वगैरे साहित्यिक असल्याचं वाटायला लागतं हो लोकांना. खरंतर भास असतात ते. पण यांना सांगेल कोण अन् सांगितलं तरी यांनी मान्य करायला हवं ना! कुठेतरी वाचलेलं आणि थोडं पाठ केलेलं आलटून पालटून बोललं येथे तेथे की, मोटिव्हेशनल का काय म्हणतात, तो वक्ता झाल्याच्या समज होतो काहींचा. अज्ञानातून आलेल्या आत्मविश्वासाने आपण ग्रेट वगैरे असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. तो अमरवेलीसाराखा वाढू लागला की, आपला विस्तार होतोय याची प्रचीती येऊ लागते. आपण वाढता वाढता वाढतच चाललोय, हे पाहून हे जीव सुखावतात. मिंधेपणाला मुक्तीपथ मानणारे मोठेपणाच्या झुली पांघरून उगीच मिरवत राहतात. स्वतःची स्वतः मखरे तयार करून मिरवत राहतात. मळवट भरून भक्त जमा करीत आरत्या ओवाळून घेतात. आयुष्यात जो स्वतःशीपण स्पर्धा करू शकला नाही, तो कुठल्यातरी स्पर्धापरीक्षांचा प्रेरणादायी मार्गदर्शक होतो. कोणी पाचपन्नास पुस्तके इकडून-तिकडून गोळा करून आणतो. त्यातल्या मजकुरालाच नवे कपडे चढवून आयुष्यात प्रचंड सकरात्मक बदल घडवून आणणारे प्रेरणादायी वगैरे पुस्तके लिहितो. खरं म्हणजे कॉपीपेस्ट करत राहतो अन् आपलं पुस्तक कसं जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारं आहे, म्हणून भाजीपाला विकावा तसा गल्लोगल्ली हाळ्या देत राहतो. ओळखीच्या चेहऱ्यांना पकडून इच्छा असो अथवा नसो, त्यांच्या माथी मारत फिरतो. खरंतर नजरेसमोर अन्याय, अनाचार, अत्याचार वगैरे घडत असल्याचं दिसतं असूनही त्याविरोधात उभं राहण्याचीच काय; पण ब्र काढायचीपण हिम्मत होत नाही, ते काय इतरांच्या आयुष्यात प्रेरणा पेरणार आहेत. पुस्तकातल्या शब्दांनी हाच पेटत नसेल, तर समाजातल्या वाटांवर कोणता प्रकाश पेरणार आहे?”
“तात्या, तुला काय म्हणायचं आहे नेमकं? मी केवळ बोलका सुधारक आहे! करत्या सुधारकांचे विचार उसने घेऊन वर्गात तीस-पस्तीस मिनिटे पोपटपंची करणारा. पांढऱ्या कागदाला काळा करून कालपटावर कोरीवकाम केल्याच्या आवेशात मिरवून घेणारा वगैरे वगैरे. समोर बसलेल्या समूहाला आणि वर्गात शिकायला एकत्र आलेल्या निरागस जिवांना संस्कृतीची, संस्कारांची, इतिहासाची असलेली महती आणि नसलेली माहिती विशद करून सांगणारा.” त्याला चिडवण्याच्या हेतूने हसत बोललो.
“घ्या, तुम्हीपण घ्या आमची मजा आता! तुम्हीच तेवढे राहिले होते. आधीच हे लोकं गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात आणखी एकाने तुमची भर.” तात्या वातावरणाला आणखी हलकं करीत बोलला.
अण्णाला बोलण्यासाठी आयती संधी चालून आली. तिचं बोट धरून तो चालत आला. म्हणला, “तात्या, बापूंची गोस्ट कुठी खोटी आहे. आता तूच आमच्या समद्यायले तसं समजी राह्यला असीन तं आम्ही काय करो बुवा? तसेभी आमच्या बाशिंगायचे एकेक मनी गयाले लागले आता. कव्हलोग टिकाव धरतीन ते तरी.”
“ओ अन्ना, तात्यानं म्हननंबी एकदम खरं शे रे भो! तो सांगी राह्यना त्यांनामा काय खोटं शे? आरे, मान्से वागीच राह्यनात तसा. दाखाळानं एक आनी करानं भलतंचं. आरे, जन नी नही तं, निदान मननी तरी राव्हाले जोयजे नं आपलाकडे. पन नही करतत तसं. करावबी नहीत. एकदाका कंबर नं सोडीसन डोकाले गुंडाई लिधं नं मग कसानी लाज, नी कसानी शरम. सगळा बिनलाज्या धंदा शेतस भो!” आसपास आढळणारा वैताग आबाने आपलं म्हणणं मांडताना व्यक्त केला.
“थांबा रे थोडं! साला, संधी सापडली की, एकजात सगळे तयारच रिंगणात घ्यायला. आणि मी तर काय तुमच्यासाठी बकराच. सापडला की हलाल करायला. अरे, कापायचं तर निदान सुरी तरी प्रेमाने चालवा रे! ते जाऊद्या तिकडे. नंतर बोलतो या विषयावर. घेतो तुम्हांला सवडीने आखाड्यात. बापू, भाषा तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचं साधन झालेलं. खरंतर मी बघतोय भाकरीसाठी चाकरी करत असल्याचं तुम्ही सांगतात. हे तर सगळेच करतात, पण पत्करलेल्या चाकरीचा कधी व्यवसाय नाही होऊ दिला. ना कधी धंदा केला. तुमच्यासाठी तो पेशा. तुम्हीच म्हणतात ना, पेशाविषयी आपलंपण अंतरी नांदतं असलं की, पैशाचं मोल नगण्य होतं. व्यवसाय आला की, नफ्याची गणिते प्रिय वाटू लागतात. धंदा झाला की विधिनिषेध नाही उरत. केवळ आपलं सुख तेवढं दिसतं. पण पेशामध्ये नैतिकतेच्या मर्यादा येतात आणि त्याच तुम्हांला मोठं करतात. केवढं समर्पक आहेना, हे म्हणणं. ना तुम्हांला तुमच्या ज्ञानाचा माज, ना मिळवलेल्या यशाचा उन्माद. या सगळ्याला ‘माझं ओंजळभर विश्व’ म्हणतात तुम्ही. तुम्हीच तर सांगितलंय, ओंजळी अर्ध्य देताना अधिक देखण्या होतात म्हणून. आम्ही का पाहत नाहीत हे. कुठे काही चुकत असेल, न्याय होत नसेल तर ठाम भूमिका घेऊन उपेक्षितांच्या बाजूला उभं राहतात. चुकणारा आपला असो की, परका तेवढ्याच आवेशाने प्रतिवाद करतात, कोणाचाही मुलाहिजा न राखता. तुम्हांला हे जमत असेल, तर इतरांना का नाही? का म्हणून बोटचेपी भूमिका घ्यायची? बाता सगळ्या जगाच्या करायच्या आणि आपण काही करायची वेळ आली की सफाईदारपणे निसटायचं, ही कुठली तत्वं म्हणायची? तुम्हीच म्हणतात ना नेहमी की, जग श्रीमंतांच्या पैशांनी नाही समृद्ध झालं. ते फाटक्या माणसांच्या प्रयत्नांनी चाललं आहे म्हणून.” तात्या आपलं मत मांडता झाला.
“तात्या, खरंय तुझं म्हणणं. सामान्य माणसेच विश्वाचे नियंते आहेत. माणसांनीच निर्माण केलेल्या देव, धर्म, नियंता वगैरे गोष्टी म्हटलं तर मानसिक समाधानासाठी शोधलेली प्रतीके. अंतरी अधिवास करून असणाऱ्या अमूर्त आस्थांना अधिष्ठित करण्यासाठी. विकारांना विचारांतून विलग करण्यासाठी. समजाचं वागणं संयमित असावं, म्हणून केलेली सोय म्हणा हवं तर. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टी सामाजिकवर्तन सभ्यतेच्या संकेतांना धरून वाहते राहावे, म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न. एकीकडे देवाधर्माच्या गोष्टी करायच्या अन् सापडली संधी की, लोकांच्या माना मोडायच्या. अशीही माणसे असतातच की आपल्या आसपास. देव, दैव, प्रार्थनास्थळे असली म्हणून माणूस सभ्यतेचे सारे संस्कार घेऊन वागेलच याची शाश्वती देवालाही नाही देता येत. कशाला हवं असं दुटप्पी वागणं. खरंतर देवाला देव्हाऱ्यात अन् धर्माला मनात ठेवता आलं की, आयुष्य खूप देखणं वगैरे होतं. पण माणसे मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टी समोर आणतात आणि आपल्या स्वार्थाचे मार्ग प्रशस्त करून घेतात. मी केवढा श्रद्धाशील अन् धार्मिकवृत्तीचा आहे, म्हणून ढोल बडवत राहतात. पण मनातून विकार काही निरोप घेत नाहीत. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांचा राग येतो खूप. खरं सांगू का, माझ्याकडे आहे काय उन्माद करण्यासारखं? आज आणि आता जो पळ पदरी पडला आहे, तो आणि तेवढाच. उद्या कोण काय, कुठे असेल कसं सांगावं. मिळालाय क्षण तर तो सुंदर का करू नये? आहे वेळ तर आयुष्य का सजवू नये? ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं, तो नागड्या भूमिका घ्यायला घाबरत नाही, असंही म्हणतात लोक. अशा विचारांच्या धन्यांची फिकीर करायची कशाला? भलेही माझा खिसा रिकामा असेल, त्याची मी कधी चिंता केली नाही आणि करणारही नाही. पण माझे विचार कोते व्हायला लागले की, अस्वस्थ होतो. मान्य की, मी कोणी दार्शनिक नाही, महात्मा नाही. पण दार्शनिकांच्या विचारांना अन् महात्म्यांच्या कृतींना कोरभर का असेना कोपरा देऊन आपल्या आयुष्याचा भाग तर करू शकतो ना. नाही मला अख्खं आभाळ पंखावर घेता येणार. माझ्या पंखांमध्ये तेवढी ताकद नाही. माझा वकूब नसेलही तितका, पण समोर दिसणाऱ्या अफाट पसाऱ्यातलं एखादं क्षितिज शोधण्याएवढी भरारी तर घेऊ शकतो की नाही. जगाचा संसार सुंदर होईल तेव्हा होईल, पण कुणाचा तरी आज देखणा करता येत असेल तर तो का करू नये?” माझ्या मतांचे चिटोरे संवादाच्या पाटीवर मी पद्धतशीर चिटकवले.
“हेच, नेमकं हेच म्हणायचं आहे मला! अशी काहीशी भूमिका घेऊन जगता येण्यात काय अवघड आहे? पण नाही. स्वार्थ अडवा येतो ना प्रत्येकवेळी. ठीक आहे. प्रत्येक जीव थोडाबहुत स्वार्थ सोबत घेऊन जगत असतो. पण त्याचा सोस नको ना व्हायला. कुठेतरी थांबायला हवं की नको. पण मृगजळाची मोहिनी पडली की, माणूसपण, माणुसकी विस्मरणाच्या डोहात ढकलली जाते.” तात्याने विषय स्पष्ट करून मांडला. बाकीची मंडळी आता मूक साक्षीदार झालेली. त्यांची श्रवणभक्ती भक्तिभावाने सुरु.
“तात्या, एक सांगू का? प्रतिमा असतात आसपासच्या आसमंताला अनेक आयामात निर्देशित करणाऱ्या. आकलनाच्या अनेक शक्यता गर्भात घेऊन ज्ञात-अज्ञात अर्थांना प्रसवणाऱ्या. काही अर्थांच्या गूढ अंधारात अधिवास करून असतात, काही अगम्यपणाच्या प्रस्तराआड दडलेल्या. अज्ञाताच्या अंधारात दडलेले कवडसे वेचून आणण्यासाठी आधी अंतरीचे पलिते प्रज्वलित करावे लागतात. लख्ख प्रकाशाची कामना करून वाटा उजळून नाही निघत. पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या पणत्या प्रदीप्त कराव्या लागतात. आसपास साकळलेला अंधार उपसून वेगळा करावा लागतो. अंधाराच्या राशी उपसून वेगळ्या करण्यासाठी सहकार्याचे हात शोधावे लागतात. आसपास भरून राहिलेल्या निबिड अंधारात एकटेपणाशिवाय काहीही नसेल अन् कंठशोष करूनही प्रतिसादाचे प्रतिध्वनी परत येत नसतील, तर प्रयासांच्या परिभाषावरचा विश्वास कसा प्रवर्तित होईल?” कोणत्या तरी तंद्रीत बोलून गेलो.
“ओ बापू, लोकांना समजेल अशा भाषेत सांगा हो काही. अरे काहीच पचनी पडत नाहीये हे. शब्दकोश सोबत घेऊन बसायला लागेल की काय. साला, ही सगळी वाक्ये ऐकून मी खरंच मराठी शिकलो आहे का, म्हणून माझाच मला संशय यायला लागला आहे. मला वाटतं एकदा माझ्या मास्तरांना विचारून घ्यावं की, आमच्यावेळी असं मराठी शिकवायला अभ्यासात नव्हतं का म्हणून.” तात्या थट्टेने म्हणाला.
“आहेत का पण ते आता इहलोकी. की वर अप्सरांच्या संगतीने अध्यापन सुरु आहे त्यांचे...? असो, जरा जास्तीच तत्वज्ञानपर आणि आकलनपार बोललो. पण खरं सांगायचं तर संकटांनी, दुःखांनी माणसे कोसळताना सावरणारे स्तंभ उभे करावे लागतात. सहकार्याचे साकव घालून तोल सांभाळावा लागतो. आसमानी आघातातून उभं करतांना सहृदय हात पुढे येतात. पण सुलतानी सोट्यांच्या फटक्यांनी पदर फाटत असेल तर... आयुष्याचं वस्त्र विणताना मनाजोगते टाके टाकून कशिदा कोरता आला की, त्याला देखणेपण लाभतं. पण पदरावराच्या नक्षीला बांधून ठेवणारा धागा ओढून काठ उसवत असेल तर... उसवणाऱ्या धाग्यांना गाठी टाकून तुकडे जोडावे लागतात परत परत.” - मी
“व्वा, क्या बात! कितलं मस्त आनी नामी बोलनात आते तुम्हीन बापू. आसं आनी इतलंभी करता उनं मानूसले तरी गह्यरं व्हयनं नही का” आबाचा पसंतीचा प्रतिसाद.
“खरंय आबा. पुढयात पहुडलेल्या चौकटींच्या तुकड्यांना समजून घेत रिकाम्या रकान्यात आस्थेचे रंग भरता येतात, त्यांना छटांचे अन्वयार्थ नाही शोधावे लागत. प्रत्येक तुकड्याच्या कहाण्या वेगळ्या असतात. काही अध्याहृत अर्थ असतात, आयाम असतात. काही प्रमाण असतात, काही परिमाणे. त्यांचे अर्थ अवगत करण्याइतका संवेदनांचा विस्तार झाला की, पर्याप्त पर्याय पदरी पडतात. विश्वाचा विस्तार असेल तेवढा असो, आपले परीघ विस्तारता येतात, त्यांना शक्यतांसोबत असणारी सूत्रे समजत जातात. आकलनाचा पैस वाढवणाऱ्या प्रत्येक चौकटी आयुष्याच्या विस्ताराच्या परिभाषा नव्याने अधोरेखित करतात. फक्त त्यांच्याकडे डोळसपणे बघता यायला हवं. समजून घेता यावं की, प्रत्येक प्रतिबिंबासही विस्ताराचे बांध असतात. आकलनाच्या सीमा असतात. परीघ असतात, भ्रमणाच्या कक्षा निर्धारित करणारे. तरीही असतात त्यात शक्यतांचे काही कंगोरे दडलेले. कवडसे असतातच आसपास आपणच आपणास शोधत निघालेल्या वाटेवर आश्वस्त करणारे. मनात आकार अंकुरित होतात, ते केवळ आकृत्यांचे कोलाज नसतात. तो शोध असतो अंतरी अधिवास करणाऱ्या स्वप्नांचा.”
सगळे शांतपणे ऐकतायेत. काय बोलतोय हा माणूस, म्हणून वाक्यांचे अर्थ मनातल्या मनात जुळवत समजू पाहत होते. काही कळणारं अन् न कळणारंसुद्धा. माझं बोलणं थांबलं तरी कोणी काही म्हणालं नाही. स्तब्ध शांतता काही वेळासाठी. तिला छेद देत तात्याच पुढे म्हणाला, “बोला बापू तुम्ही. खरंतर तुमचं बोलणं बऱ्याचदा कळत नसलं, तरी ऐकावसं वाटतं एवढं मात्र नक्की. काहीतरी आतून उमलून आलेलं असतं त्यात.”
“तसं नाहीरे तात्या! जित्याची खोड... म्हणतात ना, तसंच काहीसं. माझा स्वभावदोष म्हणा हवं तर याला. असो, ते फारसं महत्त्वाचं नाही. पण आपण जसे बाहेरून दिसतो, तसे आतूनही असले की आयुष्य खूप सोप्पं वगैरे होतं. ज्यांना चांगुलपणाचा परिमल परिसराच्या प्रांगणात पसरवता येतो, त्यांना प्रमुदित जगण्याचे अर्थ शोधावे नाही लागत. त्यांच्या कोरभर कृतीतून प्रसवणारे प्रकाशाचे कवडसे आसपास समृद्ध करीत राहतात. ते प्रतिरूप असतं सत्प्रेरित विचारांचं. शोध असतो प्रतिरुपाचा. प्रतिष्ठापना असते मूल्यांची. प्रचिती असते नैतिकतेच्या अधिष्ठानाची. प्रतीक असतं सद्विचारांनी प्रेरित भावनांचं. प्रतिबिंब सर्जन असते प्रतिभूत आकारांना जन्म देणारे. आपण त्याला हुबेहूब वगैरे असे काहीसे नाव देतो. शेवटी नावही प्रतिबिंबच. कारण ती ओळख असते कोणत्यातरी आकाराची. आकार चिरकाल असतीलच, याची हमी काळालाही नाही देता येत हेही वास्तवच.”
“भारीच हो बापू एकदम. आम्हाले खरंतर तुमच्या या बोलन्याचा हेवा वाटतो गह्यरा. आनी एक सांगू का, मत्सर का काय म्हंता, ते भी! सालं, आपल्याले असं बोल्याले काहून जमत नसीन, म्हनून आपलीच आपल्याले लाज वाटते.” अण्णाने मन मोकळं केलं.
विषय आणखीही विस्ताराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहिला असता, पण तास संपल्याची घंटा वाजली. चर्चेच्या सुरांनी सजलेली मैफल मोडली. आपल्या तासिकांना पुढच्या वर्गावर जाण्यासाठी एकेक करून सगळेच निघाले. नंतरचाही तास ऑफ असल्याने आहे तेथेच बसून राहिलो. शिक्षकदालनात नव्या आवाजांचा गलका सुरु. मी मात्र तसाच मख्खपणे बसलेलो. मनात तोच विषय भुंगा बनून गुणगुण करीत राहिला. राहून राहून वाटत होतं की, माणसांचं जगणं सहज, सोप्पं का नसतं. की तो स्वतःच अवघड करून घेतो?
माणसाचे ऐहिक आयुष्य बिंब असेल, तर त्याचं तसंच आतूनही असणं प्रतिबिंब म्हणायला काय हरकत असावी? चित्रकाराच्या मनातील आकृत्यांचे प्रतिबिंब कॅन्व्हासवर रंगरेषांनी प्रकटते. गायकाच्या सुरातून ते प्रतिध्वनीत होते. समाजसेवकाच्या सेवेतून प्रवाहित असते. धनवंताच्या ऐश्वर्यात चमकते. दारिद्र्याच्या दशावतारात कोमेजते. दैन्य, दास्यात अडते, तेव्हा भेसूर दिसते. अन्यायाच्या प्रांगणात भीषण होते. प्रयत्नांचा परगण्यात प्रफुल्लित होते. आस्थेच्या प्रदेशात देखणे दिसते. लावण्यखणीच्या चेहऱ्यात सजून सुंदर होते. कुरुपतेत ते कोणत्यातरी कोपऱ्यात काया आकसून बसते. वंचनेत विकल होऊन असते. आनंदात उधानते. दुःखात कोसळते. अनुभवाच्या कोंदणात प्रगल्भ होते. पण खरं हेही आहे की, प्रतिमानच प्रतिबिंब बनते तेव्हा मनी विलसणाऱ्या विचारांचा चेहरा अधिक देखणा होतो. देखणेपणाची परिभाषा परिपूर्णतेत असते आणि परिपूर्ण प्रकाशाचे चांदणे विवेकाचे प्रतिबिंब बनते. खरंतर प्रतिबिंबही खेळच आभासी आकृत्यांचा. अपेक्षांच्या झोक्यावर झुलत राहणं त्याचं अटळ प्राक्तन असतं. ज्या कधी स्थिर नसतात. स्थिर असतात, ते मनात कोरलेले आणि विचारात गोंदलेले आकार. तो कोलाज सांभाळता येतो, त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ आकळले असण्याच्या शक्यता अधिक असतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
●
0 comments:
Post a Comment