अंतर

By
व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका अक्षराच्या अधिक्याचे अंतर आहे. तसं पाहता अंतरे असतात. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिली तरी ती अधिवास करून असतात. कदाचित त्यांचे प्रासंगिक अर्थ वेगळे असू शकतात इतकंच. ती नसली म्हणून खूप काही वेगळं घडतं असं नाही आणि असली म्हणून काही वेगळं प्रत्ययास येतं असंसुद्धा नाही. अंतरे असतातच. ती पार करता येतात त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं शहाणपण विचारांत वसती करून अन् व्यापकपण अंतरी अधिवास करून नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण विस्तारला सीमांकित करणारी एक चौकट आसपास अनवरत नांदती असते. ती परिस्थितीने आखून दिलेली असेल अथवा आपण भोवती कोरून घेतलेली, एवढाच काय तो फरक. परिस्थितीने घातलेले बांध ओलांडता आले अन् भोवती कोरून घेतलेल्या मर्यादा पार करता आल्या की, कृतीचे एकेक अर्थ अवगत होतात. 

विचारांचं सख्य काळाशी असावं, पण सोयरिक भविष्याशी हवी. विचारांना प्रगतीचे प्रवाह धरून पुढे सरकता आलं की, बदलांचे संदर्भ आकळत राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण नांदते असावे. विचारांत निर्व्याजपण वसती करून राहावे आणि आचरणात निखळपण असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा असला की, उगवून येण्याचे अर्थ आकळतात अन् बहराच्या व्याख्या उलगडत जातात. एकेक पाकळ्या विलग होऊन कळीचं फुलात रुपांतर व्हावं अन् त्याचा परिमल परिसराच्या प्रांगणाला प्रमुदित करीत राहावा तसं.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी आकळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून काही पाणी मधुर होत नसते. त्यात तो गुण अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते. माणसाचं आयुष्यही एक प्रश्नचिन्हच आहे. त्याची उत्तरे मार्गदर्शकाच्या पानात नाही सापडत. परिभाषा करून पुस्तकात नाही सजवून ठेवता येत त्यांना. ती शोधण्यासाठी आयती सूत्रे नसतात आणि खरं हे आहे की, ते काही खूप सरळ नसतात. अनेक वाटा असतात, वळणे असतात त्यांना. त्या अडनिड वाटांशी सख्य साधता आलं अन् वळणांशी संवाद करता आला की, विस्ताराचे अर्थ उलगडत जातात. विस्ताराच्या व्याख्या कळल्या की, चिन्हांची परिभाषा बदलत जाते.
    
कालावधी नावाचं परिमाण परिस्थितीवर परिमाण करणारं असतं का? माहीत नाही, पण असावं कदाचित. ते पराक्रमाच्या परिभाषा करायला पर्याप्त असतं की नाही, हेही खात्रीदायक सांगता नाही येत. त्याचं कमी अधिक असणं प्राप्त परिस्थितीचा परिपाक असतो एवढं मात्र नक्की. अंगीकृत कार्ये समर्पणशील विचारांनी हातावेगळी करता येतात, त्यांना काळाच्या लांबीरुंदीची परिभाषा नाही करायला लागत. त्याच्या चौकटी मापायची परिमाणे नाही शोधायला लागत. 

अंतर्यामी वसतीला असलेलं काही जसं पाहिलं तसं आणि तेव्हढंच हाती लागेलच, असंही नसतं. ते हाती लागण्याची फारशी शक्यता समोर नसतांना शक्यतांवर टिकून राहणं अन् साध्यप्राप्तीच्या प्रवासात अनंत अडचणी असूनही कार्यरत असणं हेच अवघड. पण अशा अवघड वाटांची वळणे ओलांडता येतात, त्यांना आपल्या माणूस असण्याचे अर्थ अधिक चांगल्याप्रकारे अवगत असतात. माणसांनी मानपानाच्या शिड्या आधीच उभ्या करून ठेवलेल्या असतात अन् सन्मानाचे इमले सजवून देखणे करून घेतले असतात, अशा परगण्यात पोहचणाऱ्या वाटा संदेहाच्या परिघाभोवती सतत परिभ्रमण करीत असतात. त्या टाळून पुढच्या वळणाकडे वळता येतं, त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ करायला नाही लागत. तो त्यांच्या परिपाठाचा भाग असतो. प्रयास शब्दाचा अर्थ कोशात शोधण्यापेक्षा पावलांच्या प्रवासात ते शोधत असतात. 

मुक्कामाची ठिकाणे अवगत असली, तरी पर्याप्त ठिकाणी पोहचण्यासाठी वाटा सुयोग्य निवडाव्या लागतात हेही खरेच. त्या प्रत्येकवेळी सुगम असतीलच असंही नाही. त्या सहज असल्या म्हणून यशाची शिखरे लीलया हाती लागतीलच असंसुद्धा नाही. इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवांचा प्रवास निसर्गप्रेरणांचा परिपाक असला, तरी माणूस नावाच्या जिवाच्या प्रवासात याहून अधिक काही असतं. प्रयत्नरत असणाऱ्या पावलांच्या ध्यासप्रेरित प्रवासाची कथा असतो तो. पण याचा अर्थ प्रत्येकवेळी पावले पाकळ्यांची माखलेल्या वाटेने पडतीलच असं नाही. 

परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्राक्तनाचे एक टोक पकडावे, तर दुसऱ्याचे पीळ सुटतात. उसवलेले धागे सांधावे, तर दुसरे सैल होतात. एक गाठ मोकळी करावी, तर दुसऱ्या निरगाठी गुंफल्या जातात. खरंतर हे आणि असं काहीसं असणं स्वाभाविकच. कारण माणूस शेवटी माणूस या संज्ञेपर्यंतच येऊन थांबतो. यापलीकडे पोहचणे सामान्यांना अवघड असतं. ज्यांना असं काही जमलं ते असामान्य म्हणून ओळखले गेले. अर्थात, ही आपल्या माणूस असण्याची मर्यादा. मर्यादांचे बांध फार कमी लोकांना पार करता येतात. ज्यांना हे जमलं ते महात्मे म्हटले गेले. 

साध्य आणि असाध्य या बिंदूना जोडणारी प्रयत्न नावाची एक रेषा असते. तिचे पीळ, तिची वळणे तेवढी आकळायला हवीत. ती ज्याला समजतात त्याला आनंदाची अभिधाने उसनी नाही आणावी लागत. आपण काय करतो आहोत, हे सांगण्यासाठी ढोल बडवायची आवश्यकता नसते, कारण प्रामाणिक प्रयत्नातून उभ्या असलेल्या कामाचे सुरच निराळे असतात. त्यांना सजवून त्यांचं गाणं तेवढं गुंफता यावं. सत्प्रेरीत हेतू समोर ठेवून साध्याच्या दिशेने प्रवास घडावा. प्रसंगी सायास पडले तरी सहन करावेत. ‘स्व’ पासून सुटता आलं की, सर्वस्वाचे अर्थ आकळतात. कारण ‘स्व’ पासून सुटण्याचा प्रवास वेदनादायी असतो. वेदनांचे वेद त्यासाठी वाचता यायला हवे. आसपास असलेल्या वेदनांचं आकलन घडलं की, आपल्या ओंजळभर दुःखाचे अर्थ आकळतात.

पण, नियतीने करंटेपण कपाळी कोरलं असेल अथवा कोणी आपणहून कोरून घेतलं असेल, तर अन्य कोणी काहीच करू शकत नाही. अभावच भागधेय असेल, तर प्रभाव शब्दाला फारसा अर्थ नाही उरत. उजेडाचा कोरभर कवडसाही आश्वस्त करणारा असतो असं म्हणतात, पण प्रकाशाच्या वाटा नाकारून अंधाराची संगत करीत कोणी निघाला असेल, तर दोष उजेडाचा नसतो. कवडशांना बोल लावून अवतीभवती असणाऱ्या चौकटी नाही उजळून येत. अविचारांच्या संगतीने चालणं नियतीने ललाटी गोंदलं असेल किंवा कोणी त्याचा अंगीकार केला असेल, तर काळही आपला ओंजळभर कोपरा धरून अंधाराच्या कुशीत विसावतो. करंट्याना उजेडाची सूत्रे समजून सांगितली, प्रकाशाच्या परिभाषा विशद करून मांडल्या तरी कोरभर कवडसा काही हाती लागत नाही तो नाहीच. अशावेळी वाटतं, काहींना आत्मघात करायची आस असते हेच खरं. तेच त्यांचं अटळ भागधेय असेल, तर संजीवनीसुद्धा केवळ वनस्पतीची एक मुळी ठरते. ती हाती लागूनही जीवनाचे अर्थ कधीच नाही गवसत...

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते. पण विचारांतील वैगुण्ये आणि आचरणातील दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. हे असो अथवा ते, निवड आपलीच असते. आपण कोणता विकल्प निवडायचा ही आपल्या प्रगल्भतेची परीक्षा असते. आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच समस्या आपल्याला समूळ संपवणाऱ्या असतात असं नाही. किंवा आपल्याला त्या समूळ संपवता येतात असंही नाही. संकल्पनेतील साम्राज्ये सुंदर असतात. ते परगणे गोमटे वाटतात. त्या प्रदेशात विहार करावासा वाटतो, पण... हा पणच महत्त्वाचा असतो हे विसरून नाही चालत. कल्पनेने सजवलेल्या साम्राज्याला स्वप्नात संचार करता येईल, पण वास्तवात आकार देता येईलच असं नाही. अर्थात, ज्यांना हे जमलं त्यांना आपण आणि आपला आसपास आकळला, असं म्हटलं तर अतिशयोक्त नाही होणार. अंतरी अधिवास करून असलेल्या संकल्पनांच्या अमूर्त आकृतीला आकार देण्यासाठी कृतीत प्रयोजने कोरावी लागतात. 

समस्या असतात आणि त्या अनवरत नांदत्या असतात. त्यांना टाळून कुणाला आपलं वेगळंपण अद्याप तरी नाही सिद्ध करता आलं. नकारांचे पाढे पाठ करून स्वीकाराचे संदर्भ बदलत नसतात आणि होकाराची सूत्रे स्मृतिगत करून प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित होत नसतात. समीकरणांची आयती उत्तरे मिळवून यातायातचे अर्थ बदलत नसतात. अभाव आणि प्रभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा घडत राहतात. आहे त्यांच्यासह आणि नाही त्याच्याशिवाय अभ्युदयाच्या वाटा आपणच आपल्याला शोधायला लागतात. मदत, सहकार्य, मार्गदर्शन या शब्दांना काही अर्थ असतो, नाही असं नाही. पण खरं हे आहे की, सायासप्रयास ज्याचे त्याला करायला लागतात अन् घडणाऱ्या भल्याबुऱ्या परिणामांना सामोरेही ज्याचं त्यालाच जावं लागतं. खरं हेही आहे की, सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊनही चालत नाही. कारण, आयुष्यात काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु, पण, परंतु राहिलेच शेष, तर संवादातून त्यांची उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज जगण्यात सकारात्मक विचार अन् आयुष्यात आश्वस्तभाव पेरून जाते. तो एक कवडसा असतो तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment