शब्दांना अंगभूत अर्थ असतो तसा आनुषंगिक आशयही. काळानेच तो त्याच्या कपाळी कोरलेला असतो. त्यांच्या उच्चाराने विशिष्ट अर्थवाही प्रतिमा मनाच्या प्रतलावरून वाहत राहतात. त्यांचे अर्थ अंतरी अंकित होत असतात. शब्द अक्षरांचा हात धरून चालताना दिसत असले, तरी त्यांचे अर्थ कृतीतून गवसतात. बऱ्याचदा शब्द एक, पण अपेक्षित परिणाम निराळा असतो. अर्थांचे अनेक आयाम त्याला लाभलेले असतात. तेच त्यांचं वैभव असतं अन् तीच त्याची श्रीमंतीही. 'माणूस' हा शब्दही याला अपवाद नाही. एखाद्या शब्दाच्या पाहण्याऐकण्यावाचण्याने मनःपटलावर कोणती आकृती अंकित होईल, हा अनुभूतीचा म्हणा किंवा आकलनाचा भाग.
माणूस या शब्दाने माणसाच्या मनात माणसाविषयी नेमकी कोणती प्रतिमा मनात निर्माण होते? इहतली अधिवास करणारा प्रगत जीव की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून अभ्युदयाच्या आकांक्षा अंतरी कोरून आभाळाएवढा होऊ पाहणारा की, आपल्या ओंजळभर विश्वात आत्मरत असलेला स्वार्थपरायण जीव? की यापेक्षा आणखी काही. शब्दांना अंगभूत अर्थ असतो. ती केवळ अक्षरांची जुळवाजुळव नसते. बरे-वाईट-चांगले-ठीक वगैरे अशा काही अर्थांच्या आकृत्या मनात उभ्या करीत असले, तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे अर्थ सार्थपणे समोर येतीलच असं नाही. शब्द स्वतंत्र असतील किंवा वाक्यांच्या समूहात, सर्वकाळ त्यांचे अर्थ सुयोग्य असतीलच असं नाही. त्यात काही सोयीच्या वाटा असतात. संदेहाची काही वळणे असतात. माणूस म्हणून आपण अशा शब्दांना किती समजून घेतो? माणूस माणसाला समजून घेतो की, भाषेचे किनारे धरून वाहत आलेला केवळ एक शब्द म्हणून पुढ्यात पडलेल्या शब्दांचे अर्थ लावतो. की याहून आणखी काही कंगोरे त्याच्या कृतीला असतात? अगदी ठामपणे काही सांगता येणं अवघड. माणूस या शब्दाची सुनिश्चित परिभाषा असली, तरी तो अथपासून इतिपर्यंत कोणाला आकळला आहे? अद्याप तसा कोणी दावा करत नाही. तसं असतं तर माणूसच माणसाला सगळ्यात बदमाश प्राणी वगैरे असल्याचं म्हटला असता का? माणूस मुळात प्रश्नांच्या संगतीत अन् संदेहाच्या पंगतीत विहार करणारा जीव आहे. त्याच्या जगण्याची सूत्रे अन् आयुष्याची समीकरणे सांगता आली, तरी ती सोडवता येतातच असं नाही.
भाषेतील एक शब्द म्हणून किती सुगम वाटतो नाही माणूस हा शब्द! पण त्याचा तळ गाठताना त्याचं अथांग असणं आकळतं अन् विस्तारला समजून घेताना अफाट असणं कळतं. तो सहजगत्या कळला असता, तर त्याच्याभोवती संदेहाचे एवढे धुके जमा झाले असते का? माणूस या शब्दाची व्याख्या काही असू द्या. ती त्या शब्दाला अन् त्याभोवती असणाऱ्या संदर्भांना केवळ निर्देशित करेल; पण सभोवती साकळलेला संदेह सोडता नाही येत. शक्यतांच्या परिघात त्याला पाहता येणं संभव असलं, तरी त्या पलीकडे आणखी काही काकणभर उरतं. त्याच्या असण्याचा लसावि काढता येणं अवघड.
माणूस हा शब्द व्याकरणाच्या परिभाषेत सामान्यनाम निर्देशित करणारा असला, तरी माणूस म्हणून जगणारा प्रत्येक माणूस स्वतःला असामान्य समजतो. असलेच काही अपवाद अन् ते वगळले तर इहतली अधिवास करणाऱ्या माणसांना आपण असामान्य असल्याचा अवकाळी साक्षात्कार अनवरत अथवा अधूनमधून होत असतो. आपण असामान्य वगैरे आहोत असं वाटून घेऊ नये असं नाही. पण त्या असामान्यत्वाला किमान काही अर्थ असावेत की नाही. आपण कोणी काहीतरी वेगळे आहोत ही अंधश्रद्धा अंतरी अधिवास करून असणे आत्म्याला संतुष्ट करणारं असलं, तरी माणूस म्हणून विचारांना पुष्ट करणारं नसतं.
माणूस हा केवळ एक शब्द नाही. त्यासोबत अनेक शक्यता, अनंत अपेक्षा चालत येतात. असंख्य आडाखे आणि आराखडे त्यात अनुस्यूत असतात. या शब्दाची व्याकरणातील जात कोणतीही असो. संदर्भ काय असतील ते असोत अथवा कोशातले अर्थ काही असोत, या काहीच्या यापलीकडे तो आणखी काहीतरी असतो, हेही खरेच. अर्थात, धांडोळा घेतलेल्या सगळ्याच गोष्टी काही अर्थाच्या परिघात नाही सापडत. त्याच्या असण्यानसण्याचे अनेक कंगोरे असतात. त्याभोवती काही वलये असतात. याचं विस्मरण व्हायला नको. इहलोकी नवलकथांची कमी नाही. माणूस आणि त्याचं असणंसुद्धा अनेक शक्यता घेऊन नांदणारी एक कथा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरू नये. माणूस म्हणून त्याचं असणं माणसाला अवगत असलं, तरी तो आकळतोच असं ठामपणे सांगता येत नाही, याचं कारण हेच असावं बहुदा.
आयुष्याचे अर्थ शोधता शोधता कित्येक शतकाचं अंतर पार करून माणूस वर्तमान वळणावर येऊन उभा आहे. मोजलेच तर महिने दिवसांची संख्या लक्षणीय असेल, हे निर्विवाद. तास, मिनिटे, सेकंदाच्या हिशोबात तर डोळे विस्फारून पाहण्याइतके अंक मोठे असतील. चारदोन वळणे ओलांडून आला, याचा अर्थ त्याला आयुष्याचे सगळेच अर्थ आकळले असं नाही आणि अन्यांना त्याचे अन्वयार्थ लावता येतीलच असंसुद्धा नाही. अर्थात, हे सगळं सगळं खरं असलं, तरी संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने, तुमच्या पदरी पेरलेले क्षणच खरे, बाकी सगळी जुळवाजुळव असते. हे जोडणं अन् तोडणंही सोयीच्या व्याख्या घेऊन असतं. वय वाढत जातं, तसे अनुभव आयुष्यात घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना परिपक्वतेकडे नेत असतात. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे तुमच्या प्रवासाच्या कहाण्या सांगत असतात. ह्या कहाण्याही प्रत्येकाच्या निराळ्या अन् प्रत्येकासाठी वेगळ्या. कोणाच्या आयुष्यात कोणते अध्याय लिहले जातील अन् खोडले जातील, हे कोणी अन् कसे सांगावे? कदाचित काळच त्याची अक्षरे आयुष्यपटावर कोरत असेल.
हाती लागलेल्या ओंजळभर मोहरलेपणाला सौख्याचे क्षण गंधभारित करत असतात. फक्त तो परिमल पदरात साकळून घेता यावा. ऋतू आपल्या मार्गाने चालत येतात, रमतात दोनचार दिवस अन् निघून जातात आपल्या वाटेने, कोणताही मोह मनात न ठेवता. त्याचं येणं जेवढं स्वाभाविक, जाणंही तेवढं सहज. त्यांना या म्हणून कोणी आवतन देत नाही अन् आले की, राहा आणखी चारदोन दिवस जास्तीचे म्हणून थांबवूही शकत नाही. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. निसर्ग हस्तक्षेपाशिवाय विचलित नाही होत. निर्धारित मार्गाने क्रमण करीत राहणे त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. त्याच्या प्रवासाच्या सुनिश्चित व्याख्या करता येत असल्या, तरी पथ नाही बदलता येत कुणाला.
ऋतू कूस बदलून नव्या वळणावर विसावताना आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा वाटेवर कोरून जातात. त्यांचा माग काढत माणूस पळत राहतो. पुढे पळणाऱ्या प्रत्येक पावलांना मुक्कामाची ठिकाणे गवसतातच असं नाही. संक्रमणाचं बोट धरून पुढे निघताना ऋतूंनी मागे ठेवलेल्या ठशांचे अर्थ आकळायला आधी आपल्या असण्या-नसण्याचे आयाम अवगत करून घ्यायला लागतात. आयुष्य अशाच प्रयत्नांना दिलेलं नाव आहे. म्हणूनच प्रयत्नांच्या परिभाषा त्यातल्या कंगोऱ्यांसह समजून घ्यायला लागतात. पण सत्य हेही आहे की, प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकवेळी सफल व्हाव्यात असं नसतं. कधी प्रमाद घडतात, कधी पदरी पडलेली परिस्थिती प्रयत्नांच्या व्याख्या लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन चालत आलेल्या दुःखाबाबत एकवेळ समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते, त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर...?
अशावेळी पहाडाला धडका देण्याशिवाय माणूस करूही काय शकतो? पण एक नक्की की, आयुष्याला अर्थ देता येतात. ते देण्याएवढी प्रगल्भता तेवढी विचारांमध्ये नांदती असायला हवी. विचार तर सगळेच करतात, पण त्यांचं प्रयोजन कृतीत किती जण शोधतात? विचारांचं वैभव कळलं की, कृतीचे संदर्भ सापडत जातात. लढून उभं रहायची उमेद अंतरी नांदती असेल तर त्यासाठी माथा फोडून घ्यायची तयारी असायला लागते. नसेल तर परिस्थितीत परिवर्तनाची प्रतीक्षा करण्याशिवाय आणखी विशेष काही करता येतं? समजा करता आलं तरी ते प्रत्येकवेळी सफल असेलच असं नाही आणि झालं तरी पर्याप्त असेलच असं नाही. प्रमाद कुणाचा, प्रयास कुणाचा, यश कुणाचं, अपयश कुणाचं, हे अवश्य शोधता येतं. सांगताही येतं, पण प्रत्येकवेळी पराक्रमाची अन् पराभवाची सम्यक कारणमीमांसा करता येतेच असंही नाही. कारण त्यांच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात अन् प्रत्येकासाठी निराळ्या असतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment