नेहमीप्रमाणे आम्हा मित्रांचा चर्चेचा फड रंगलेला. विषय अर्थातच नेहमीचेच. काही इकडचे, काही तिकडचे. अर्थासह म्हणा किंवा अर्थहीन, चर्चा चाललेल्या. वाक्ये आणि विषयांचाही चावून चावून चोथा झालेला. तरीही शब्द संवाद बनून चर्चेच्या वर्तुळात विहार करतायेत. कुठल्याशा कारणाचा धागा पकडून समर्थनाचे पलिते प्रदीप्त होत होते, तशा विरोधाच्या मशालीही प्रज्वलित केल्या जात होत्या. सरळ सरळ दोन गटात विभागले जाऊन आपलं मत कसं प्रमाणित आहे, हे प्रत्येकजण प्रामाणिकपणे पटवून देत होता. शब्दांची खड्गे खणखणत होती. प्रतिकाराचे पडसाद उमटत होते, तसे समर्थनाचे सूर अन् विरोधाचे आवाज निनादत होते. या सगळ्या कोलाहालास छेद देत राज्या म्हणाला, ‘पराभूत झालोय, साला आज! संपूर्ण सपाट झालो. पार आपटलो आहे. फिरून पुन्हा पूर्वपदावर येऊन पुढचा प्रवास करणं अवघडच नाही तर जवळपास अशक्य. हाती केवळ एक निर्जीव शून्य उरलंय. त्याच्या विशाल पोकळीत दिशाहीन गरगरतोय. समोर केवळ अंधार आणि अंधारच नाचतोय. कोणताही कोपरा कोरला तरी कवडशाचा कोरभर तुकडाही काही हाती नाही लागत...!’
काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट. आता याला गोष्ट म्हणावं, कहाणी म्हणावं की, आणखी काही; हे ज्याचं त्याने ठरवावं. तर, हा राज्या आम्हां मित्रांच्या वर्तुळात विहार करणारा मुक्त विचारांचा जीव. प्रगतीच्या परिभाषा अन् परिणत विचारांच्या व्याख्या चांगल्या अवगत असलेला. उमदा वगैरे स्वभाव म्हणतात ना, अगदी तशाच स्वभावाचा! तसं त्याचं, आमचं चर्चेच्या रंगलेल्या फडात एखाद्या विषयावर आपापलं घोडं पुढे दामटत बोलणं नित्याचं. विशेषतः त्याच्या आणि माझ्यात झडणाऱ्या तात्त्विक वादांचे आमच्या या वर्तुळाला अधिक अप्रूप. नसेल एखाद्या दिवशी अशी वादळी चर्चा होत, तर आमच्यातलाच कुणीतरी काडी टाकतो.
खरंतर आमच्या संवादातला नावीन्य वगैरे प्रकार सरावाने कधीचा संपला. शिष्टाचाराची औपचारिक कुंपणे कधीची पार झाली आहेत. नित्य सहवासातून आलेलं सहजपण आहे त्यात. नाही आवडलं एखाद्याचं मत, तर भीडखातर बेगडी विधान करून वेळ मारून नेणे, असला प्रकार नाही की, केवळ मन आणि मान राखायचा, म्हणून मान तुकवणेही नाही. प्रसंगी एखाद्या मुद्द्यावर एकमत होत नसेल, तर आपापले मुद्दे घेऊन शेवटपर्यंत खिंड लढवत राहणे स्वभाव. पण याचा अर्थ आमच्यात आक्रस्थाळेपणा कुटून कुटून भरला आहे असा नाही. मुद्दे आहेत तोपर्यंत भिडत राहू. पण ते संपले की, पुन्हा पूर्वपदावर. मुद्द्यांना धरून भिडणं जेवढं सहज, तेवढंच माघार घेणेही स्वाभाविक. मुद्द्यांना धरून घडणारी तात्विक म्हणा किंवा सात्विक वगैरे भांडणे आमच्या इतर मित्रांसाठी मोफत मनोरंजन.
पण आज असा काही भाव त्याच्या संवादात नव्हता. लढण्याआधी तलवार म्यान केली की काय याने, म्हणून त्याला चिडवत म्हणालो, “राजे, आज अस्त्रेशस्त्रे परजून न येता थेट तहाची बोलणी करायला?”
“नाही रे, साले काही गुंते काही केल्या सुटत नाहीत ते नाहीच...! अशाच एका गुंत्याचं उत्तर शोधत भटकतोय. लाख प्रयत्न करतोय, पण काही म्हणता काही हाती लागत नाहीये. वाटतं, परीक्षेत उपयोगी पडतात तशी मार्गदर्शके आयुष्यातल्या प्रश्नांसाठी मिळाली असती तर. पण नाही! साला आराखडे आखावेत एक आणि प्रश्न पुढयात भलतेच. बरं परिस्थितीही अशी की, धरलं तर चावतं अन् सोडलं तर पळतं.” तो उद्विग्नपणे बोलला.
“अच्छा, असं कारण आहे तर या संतापाचं. हताश वगैरे व्हायचं! असो, काय झालं ते तरी सांग. म्हणजे काही विचार तरी करता येईल. असेल उत्तर तर शोधू. काय ते आधी कळू तरी दे नीट.” वसंता त्याच्याकडे पाहत म्हणाला.
“काही नाही फार... मनात राग खदखदत होता म्हणून बोललं गेलं.” आत खोलवर सुरु असलेली घालमेल लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत तो म्हणाला.
“ये, टाळायचं म्हणून उगीच काहीतरी उत्तर देऊन सुटका नको करून घेऊ. काय झालं ते खरंखरं सांग. उगीच महात्मा नको बनू’. आणि तसा विचार असेल तर सांग. तुझ्या महात्म्याच्या महतीची चारदोन स्तोत्रे रचून घेतो.” - मी
“अरे ओ, नालायक माणसा, तुला प्रत्येक ठिकाणी विनोद सुचतो तरी कसा रे? जरा परिस्थिती तरी समजून घे ना!” माझ्या अप्रस्तुतपणाविषयी नाराजी व्यक्त करीत दिप्या म्हणाला.
“नाही रे, फार काही नाही! असेल काही तसंच, तर सांगेनच की सगळ्यांना...!” काहीतरी हाताचा राखून तो तुटकपणे बोलला.
विषयाला फार ताणून धरणं प्रशस्त वाटेना. आयुष्य म्हटलं की, अशा लहानमोठ्या वावटळी येतंच असतात. म्हणून काही कोणी लगेच उन्मळून नाही जात. राहिलं थोडं मातीला घट्ट पकडून की, त्या आल्या तशा निघूनही जातात. हेही होईल सगळं व्यवस्थित. चारदोन दिवस आल्या वाटेने पुढे निघून गेले की, विसरेल सगळी खदखद, म्हणून आम्ही तो विषय बदलला. इतर मुद्द्यांवर बराच वेळ बोलत राहिलो.
मावळतीच्या वाटेने चालत जाऊन सूर्याने दिवसाचा निरोप घेतला. रात्रीच्या आगमनाचा सांगावा घेऊन आकाशात एकेक चांदण्या हसायला लागल्या. रस्त्यावरचे दिवे घराकडे परतणाऱ्या गर्दीकडे टक्क डोळ्यांनी बघू लागले. खिशातला फोन खणखणला. नेहमीप्रमाणे परिचित वाक्ये कानावर. अर्थात, हेही आता सरावाचं झालेलं. घर वगैरे काही प्रकार असतो, याची आठवण अगत्याने करून देण्यात आली. आजची मैफल मोडली. पण, याला नेमकं असं बोलायला काय झालं असेल? या विचाराचा खिळा डोक्यात ठोकला गेला, तो काही स्वस्थ बसू देईना.
असं एकदम विकल्पविहीन, उपायशून्य का वाटलं असावं याला? हा प्रश्न काहीकेल्या मनातून निरोप घेईना. खरं हेही आहे की, एखादवेळी असं किंवा असंच काहीसं कुणाला वाटत असेल, तर त्यात वावगं काही नाही. याचा अर्थ आपल्या मनाला मोठा विकार झाला आहे असा नाही. त्याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एकदा आपणच आपल्याला अपादमस्तक तपासून पाहावं असंसुद्धा नाही. आयुष्य काही प्रयोगशाळेत सिद्ध करता येणारा प्रकाशकिरणांच्या प्रवासाचा प्रयोग नाही. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करीत असेलही, पण आयुष्य कधीच सरळ रेषेत पुढे सरकत नाही.
आपल्यातल्या कोणाला कधी असं विमनस्क वगैरे वाटत असेल तर ते स्वाभाविक. मी तर म्हणेन आपण जिवंत असल्याचा हा दाखला आहे. होतं काय की, अख्खं विश्व व्यापून उरणारी एक पोकळी आपल्या अंतरी अधिवास करून असते. तिच्या निबिड अंधारात मन उगीच विहार करीत असतं. आपणाकडून घडणाऱ्या प्रमादांमुळे काही केल्या काही धड होत नाही. प्रयत्न करूनही भोपळा पदरी पडतो अन् आपणच आपल्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह अंकित करायला लागतो. गलितगात्र वगैरे होणं यालाच म्हणतात. लढता लढता आयुधे टाकून पलायन करणे वगैरे या भावावस्थेचा परिपाक.
किंकर्तव्यमूढ वगैरे होणं म्हणतात, ते हेच. कुरुक्षेत्रावर संघर्षासाठी उभ्या अर्जुनाच्या विचारांत किंतु निर्माण झाला. तो कर्तव्यपथापासून विचलित होऊ लागला. संदेहाचं धुकं भोवती फेर धरून प्रदक्षिणा करू लागलं. कोणता पथ पावलांनी निवडावा? कोणत्या मार्गाचा प्रवास मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोचता करेल? इकडे जावं की तिकडे? कोणता रस्ता रास्त असेल? समोर प्रश्न. पुढे प्रश्न. मागे प्रश्न. प्रश्नांच्या पुढे प्रश्न. प्रश्नांनंतर प्रश्न. केवळ प्रश्न आणि प्रश्नच. एक न अनेक प्रश्नांचा गुंता समोर. प्रमाण मानावे तरी कशास? अंतरी अधिवास करून असणाऱ्या आस्थांना? आत्म्याच्या आवाजाला? की आपलेपणा घेऊन नांदणाऱ्या आप्तांच्या असण्याला?
कोणत्या दिशेने वळावे, नाही कळत कधी कधी. कोणी सोबत असेल, तर वळणे साद देतात. वाटा सोबत करतात. मुक्कामाची ठिकाणे प्रतीक्षा करतात. पण असा वाटाड्या सगळ्यांच्या सोबतीने असेलच असं नाही. अर्जुन याबाबत अधिक भाग्यवान म्हणायला हवा, कारण त्याच्या मनावर जमलेली कर्तव्यपरान्मुख विचारांची जळमटे काढण्यासाठी निदान भगवान तरी सोबत होता. काळाच्या अंधाऱ्या पटलापलीकडे पाहण्याची नजर असलेला श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक केवळ संयोगवश अर्जुनाला मिळाला म्हणून असेल किंवा आणखी काही, त्याला त्याची कर्तव्ये योग्य समयी आकळली. पण सगळेच काही अर्जुनासारखे भाग्यवान नसतात. सोबतीला लाख लोक असतात, पण लाखात एक असा कोणी नसतो. अभिमन्यू होणं नियतीने ललाटी लेखांकित केलंच असेल, तर चक्रव्यूह टाळता नाही येत हेच खरं.
पुढयात पेरलेल्या प्रश्नांचं मिळालं उत्तर कोणाला तर निघतो तो पुढच्या वळणाला वळसा टाकून नव्या वाटेने. नाहीच झालं काही की स्वतःला, दैवाला दोष देत बसतो. दोष देणे सहजवृत्ती असते की, पलायनला अधिकृत करण्याचा प्रकार? असं होत असेल? माहीत नाही. असेलही अथवा नसेलही! समजा होत असेल मनाची अशी दोलायमान अवस्था तर... स्वाभाविकपणे माणसे समर्थनाची अनेक कारणे उभी करून आपलं अपयश दडवण्याचा आणि नाहीच शक्य झालं ते, तर सीमित करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, असं करणंही स्वाभाविक. जीव कोणताही असूद्या पुढयात पडलेल्या प्रसंगांपासून पार पलीकडे राहण्याचा विकल्प निवडतो. शक्य असेल तर परिस्थितीच्या गुंत्यातून मुक्तीचे मार्ग शोधले जातात. पलायनाचे पथ प्रशस्त वाटू लागतात. कारणे कोणती असतील ती असोत. कदाचित काही कसर राहून जात असेल किंवा कोणता कोपरा कोरून कवडसा शोधायचं राहून जात असेल किंवा आणखी काही.
कोणाला वाटेल आयुष्याच्या वाटेने चालताना खूप अवहेलना, अवमान, अभाव सहन केला. वंचनेने तर भोवती वर्तुळ टाकून वेठीस धरले. पण प्रयासांच्या परिघाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा करणं टाकलं नाही अन् उमेदीच्या वाटा शोधणं टाळलं नाही. वय वाढत्या वाटेने आपली वळणे शोधत पुढे सरकत गेले, पण परिस्थितीने केलेल्या आघातांनी ओढलेले ओरखडे काही गेले नाहीत. विचारांवर उठलेले वळ मिटले नाहीत ते नाहीतच. पात्रता सिद्ध करत आयुष्य शोधत गेलो. स्वप्रज्ञेला प्रमाण मानून जगण्याशी भिडत गेलो. कितीतरी पराभव पचवले आणि विजय अनुभवले. हरलो म्हणून पुढयात पेरलेल्या प्राक्तनापासून पळलो नाही अन् जिंकलो म्हणून उन्मादाने मिरवलो नाही. प्रत्येक जय-पराजयात स्वतःच स्वतःला शोधत गेलो. नव्याने गवसतही गेलो. बलस्थाने दिसली तशी वैगुण्येही अनेक आढळली. वजाबाक्या पावला पावलाला सोबत करीत होत्या, म्हणून बेरजांचा शोध थांबवला नाही. सुटतील ती समीकरणे सोडवत गेलो. न सुटणाऱ्या कोड्यांसाठी सूत्रे शोधत राहिलो. वाईट परिस्थितीत विचलित न होता संयम राखायचा वकुबही होता. पण आज असं का वाटतंय, कोणास ठाऊक! माझ्याकडून काहीतरी कसर राहिली की काय? माझ्याच ललाटी नियतीने हे अभिलेख का कोरले असतील?
असं वाटतं कधी कधी? न वाटायला काय झालं! आपण सामान्य माणसे असतो. कोणी संतमहंत नसतो की, यती महात्म्ये. सर्वसंग परित्याग करून संसाराकडे पाठ फिरवून मुक्तीच्या पथे निघालेलो मोक्षमार्गीही नसतो. मोहापासून मुक्ती सगळ्यांना सहजगत्या जमते असं नाही. विकारांच्या विश्वात विहार घडणे यालाच तर माणूस वगैरे म्हणत असतात. विकार टाळून विचार करता आला की, वैग्युण्येही आपली वाटू लागतात, नाही का? सदासर्वकाळ सुखं तुमच्या अंगणी नांदती नसतात, एवढं भान असलं की, आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी शब्दकोश धरून बसावे नाही लागतं.
काय असेल ते असो, पण सगळं काही करून आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित केली जात असतील तर...? खरंतर हे आणि असं काहीसं असणारे इहतली आपणच नसतो काही एकटे. आपल्या ओंजळभर वर्तुळाभोवती प्रदक्षिणा आपण करीत असल्याने परिघाबाहेर असणारी वेदना, दुःखे सहसा दिसत नाहीत. अगणित अडचणी आयुष्यात असणारे असंख्य जीव आसपास आहेत. त्यांच्या जगण्यात समस्या आहेत, आयुष्यात अभाव आहे, म्हणून ते दृश्य पटावरून कायमचे सरकले असा नाही आणि याचा अर्थ कलहास सामोरे जाणारे सगळेच संपतात असाही नाही. परिस्थितीला भिडताना पडण्याची भीती विचारांत नसेल अन् उठून उभं राहण्याची उमेद कृतीत कायम असेल, तर अस्मितांचे अर्थ हाती लागतात.
कळत न कळत कोणीतरी आपल्याला दुखावून जातो, कुणी सहजपणे केलेल्या कृतीने कधी सुखावून. कुठल्याशा कारणाने दुखावलं एखाद्याचं मन म्हणून कर्तव्य विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् भूमिकांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही. असलेच कुणी तर ते अपवाद. एवढी जाण अन् भान अंतरी असलं तरी पर्याप्त असतं. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका योग्य अन् निवडलेले अवघे विकल्प अगदीच रास्त नसतील, पण प्रत्येकवेळी अवास्तवही नसतात. वास्तव अन् अवास्तव ही दोनही टोकं सांधताना काही किंतु असू शकतो, याबाबत दुमत नाही. पण याचा अर्थ प्रत्येक कृती सरसकट संदेहाच्या धुक्याने वेढलेली असतेच असंही नाही. आयुष्याचे अनुकूल अन्वय लावण्यात अवास्तव काही नाही. पण त्याला प्रतिकूलतेचे पदर असतील तर त्यात गैर ते काय? सर्वकाळी सर्वस्थळी परिस्थिती पर्याप्त प्रमाणात प्रमुदित जगणं पदरी पेरेलच असं नाही. अनुकूल बाजूचे अन्वय सहजगत्या लावता येत असतील, तर प्रतिकूल बाजूचे पैलूही तेवढ्याच सहजपणे पाहता यायला हवेत.
बरं आणि वाईट या दोनही टोकांना सांधणाऱ्या रेषेवरील प्रवासात आपणच आपल्याला एकदा तपासून बघायला काय हरकत असावी? आपण खूप चांगले आहोत, असं सगळ्यांना वाटतं. अर्थात, ते स्वाभाविकसुद्धा आहे. याचा अर्थ आपल्या आसपास असणारे सगळेच चांगले असतील असा नाही आणि सगळेच काही वाईट नसतील. कधीतरी विपरीत असं काही पदरी पडतं. म्हणून नियती सूड उगवते असा अर्थ नाही होत. कदाचित तो परिस्थितीचा परिपाक असेल अथवा तुम्ही घेलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिणाम. प्रतिकूल दान पदरी पडलं म्हणून पदरच कापून फेकावा का?
ज्यांच्यासाठी तिळतिळ तुटावं, तेच सगळे अनुबंध तोडायला निघाले असतील तर... हो, हे असं घडणार नाही असं नाही. घडलं म्हणून तुम्ही संपले आणि नाही म्हणून वाढले, असंही नाही. कोणी काय समजावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. दोरी रेशमाची असली काय किंवा आणखी कसली, त्यानी कोणता फरक पडणार आहे? कोणी तुमच्या आयुष्याच्या चौकटीतून वजा झाला अन् कोणी अधिक झाला म्हणून जगण्याच्या व्याख्या थोड्याफार बदलतील, सुखदुःखाचे संदर्भ बदलतील, पण आयुष्याने आखून घेतलेल्या किंवा कोरून दिलेल्या चौकटी सुटतीलच असं नाही.
जीवन गुंतागुंतीचं आहे आणि जीवनव्यवहार अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. प्रवास घडतो. चालणं जिवांचं प्राक्तन असतं. कुणी कशासाठी चालावं, हा भाग परिस्थितीजन्य असेल किंवा आणखी काही. कारण कोणतेही असो, चालणं जिवांचं भागधेय असतं. स्वतःच स्वतःचा शोध घेत आयुष्याचे अर्थ शोधावे लागतात. आपल्या असण्यानसण्याचे अन्वय लावावे लागतात. अस्तित्वाचे संदर्भ शोधताना समर्थ असतील तेच टिकतात. समायोजन साधणारे पुढच्या वळणावर विसावतात. नव्या ऋतूंच्या आगमनासाठी उभे राहतात, त्यांना बहराच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. हे सगळं खरं असलं अन् तर्क, अनुमान, निष्कर्ष या आणि अशा काही गोष्टी कितीही सुसंगत असल्या अन् वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी पर्याप्त असल्या, तरी प्रत्येकवेळी तर्काच्या मोजपट्ट्या लावून जीवन कळतेच असे नाही आणि आयुष्याचे अर्थ आकळतातच असंही नाही. कारण निकषांची निहित परिमाणे आयुष्याला प्रत्येकवेळी लावता येत नाहीत, ही माणूस म्हणून माणसाची मर्यादा असते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
आभार!
ReplyDelete