विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी. त्यासाठी मुखवटे काढून चेहरा शोधावा लागतो. चेहरा असेल तसा सापडेलही एकवेळ, पण माणूस...? तो गवसेलच याची शाश्वती नाही देता येत.
पण तरीही एक मुद्दा शेष राहतो, तो म्हणजे माणूसपण सगळंच संपलं आहे असं सरसकट नाही म्हणता येत. पण आसपास सगळंच काही गोमटं आहे असंही नाही. हे सगळं निर्विवाद मान्य केलं, तरी एक वास्तव विसरता नाही येत की, माणूस माणसापासून सुटत अन् आपलेपणापासून तुटत चालला आहे. माणसांचा राबता या शब्दासोबत असणारे अर्थ अन् त्या अर्थाला आशय देणारे संदर्भ काळाच्या वाहत्या प्रवाहाने बदलले आहेत. आसपास माणसं तर अनेक आहेत, पण गर्दीत केवळ आकृत्या दिसतात. चेहरे कधीच हरवले आहेत. माणूस आपला हरवलेला चेहरा गर्दीत शोधतो आहे. मुखवट्याच्या जगात खरा चेहरा शोधणं अवघडच असतं, नाही का?
अंतरी कोरलेल्या प्रतिमांना आकार देऊन माणूस नावाची आकृती माणूस उभी करू पाहतोय. खरं सांगायचं म्हणजे आभासी विश्वात आपलं ओंजळभर विश्व शोधू पाहतो आहे. ते हाती आहेही. पण सत्य अन् तथ्य यात अंतराय असतं, याचा विसर त्याला पडलाय. हाती लागलेल्या चतकोर विश्वाभोवती तो प्रदक्षिणा करतो आहे अन् त्यालाच प्रगती वगैरे समजतो आहे. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय अन् माध्यमांचा व्हर्च्युअल मुखवटा अॅक्च्युअल जगण्यावर चढतो आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो, हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का?
रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. त्यातल्या सगळ्याच नाही अधोरेखित करता येत कुणाला अन् सगळ्यांचीच समर्पक उत्तरे नाही शोधता येत. खरं तर हेही आहे की, कुण्या एकाला जगाचं जगणं देखणं नाही करता येत. खरं हेही आहे की, काळ कोणताही असो आसपास कुठेतरी, कोणावर तरी अन्याय होतच असतो. त्याचं प्रमाण कमी अधिक असलं म्हणून त्याच्या परिभाषा नाही बदलत. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. चौकटींना आयुष्याची परिसीमा मानून अन् बंधनांना जगणं समजून वर्तणारे आभाळाचं अफाट असणं अन् सागराचं अथांग असणं काय समजतील?
चौकटीनी निर्देशित केलेल्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. स्वतःला शोधण्यासाठी आवश्यक असतं ते. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी विसंगतीला प्रमाण मानणारे हात अगत्याने पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? अन्याय होतो आहे, म्हणून परिस्थितीला प्रश्न विचारून पाहतो का? निदान आपणच आपल्याला तरी विचारतो का? व्यवस्थेतील वैगुण्यांचा विचार करतो का?
इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो! एकदोनदा नाही अनेकवेळा विचारतो. पण प्रत्येकवेळी ते कळतातच असं नाही. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. इहतली कुठल्याही परगण्यात अधिवास करणाऱ्या कुण्याही माणसाला आपला देश, प्रदेश अधिक प्रिय असतो. त्याच्यापुरतं ते संचित असतं अन् श्रीमंतीही. ओंजळभर का असेना, पण इतिहास असल्याचा अभिमानच असतो त्याला. अर्थात असं असणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का?
माणूस नावाच्या जिवाभोवती विपुल व्यवधाने आहेत. आयुष्यात अनेक गुंते आहेत. खरंतर त्यांची कमतरता त्याला कधीच नव्हती. ते असतातच, हे काही नाकारता नाही येत. त्यांना टाळून कुणालाही पुढे नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना सामोरे तरी जावे लागते, नाहीतर निराकरण तरी करावे लागते. पण, ते व्हावे कसे? हाही एक जटिल प्रश्नच आहे. जीवनाच्या वाटेने प्रवाहित होताना अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
आभार!
ReplyDelete