सत्य

By
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? असा प्रश्न कुणाच्या मनात कधी आला असेल का? माहीत नाही. पण माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही. शपथ घेताना सत्याची कास सोडणार नाही, म्हणून माणूस माणसाला आश्वस्त करतो. पण सार्वजनिक समाधान, सौख्य स्थापित करण्यासाठी एखादी निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली की, पलायनाचे पथ का शोधत राहतो?

सत्याचा महिमा विशद करण्यासाठी आपण राजा हरिश्चंद्रला पिढ्यानपिढ्या वेठीस धरत आलो आहोत. निद्रेत राज्य स्वामींच्या पदरी टाकणारा सत्यप्रिय राजा म्हणून आम्हाला किती कौतुक या कृतीचं. या कथेमागे असणारं वास्तव काय किंवा कल्पित काय असेल ते असो. सगळंच नाही, पण निदान जागेपणी यातलं थोडं तरी आपण करायला का कचरतो? करता येणं थोडं अवघड असलं तरी असंभव नक्कीच नाही. सर्वसंग परित्याग करून विजनवासाच्या वाटा जवळ कराव्यात असं नाही म्हणायचं. मोहापासून थोडं वेगळं होता आलं तरी पुरेसं. कुणी मूल्यांचा महिमा विशद करून सांगितला म्हणून काही सगळेच नीतिसंकेत काळजावर कायमचे कोरले जात नसतात. काही सुटतात काही निसटतात. माणसाकडून सगळंच काही निर्धारित निकषांत सामावेल तेच अन् तेवढंच घडेल अशी अपेक्षा करणंच मुळात अप्रस्तुत आहे. अर्थात, अशा निकषांच्या मोजपट्ट्या लावून आयुष्याचे सम्यक अर्थ आकळत नसतात.

तसंही साऱ्यांनाच एका मापात कसं मोजता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात सगळेच काही सारख्या विचारांनी वर्तत नसतात. तशी अपेक्षा करणेही रास्त नाही. कुठल्याही काळी, स्थळी ठाम भूमिका घेऊन वर्तनाऱ्यांची संख्या तशीही फार वाखाणण्याजोगी नसते. खरंतर वानवाच असते त्यांची. अर्थात, हे विधानही तसे ढोबळ अनुमानांचं अपत्य म्हणूयात. सत्य कोणत्याही समूहाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यापासून पलायनाचे पर्याय नसतात. त्याच्या प्रतिष्ठापणेसाठी पर्याप्त प्रयास हा एक प्रशस्त पथ असतो. पण सगळ्यांनाच हा प्रवास पेलवतो असंही नाही. बहुदा सापेक्ष असतं ते सत्य, असं म्हणणं वावगं ठरू नये. कारण एकासाठी असणारं सत्य दुसऱ्यासाठीही तसेच असेलच कशावरून? वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. ते समजून घेता आले की सत्याचे अंगभूत अर्थ गवसतात.

देशोदेशी नांदत्या विविध विचारधारांनी सत्याचा नेहमीच आग्रह धरला आहे. ते जीवनाचं प्रयोजन वगैरे असल्याचे सगळ्याच शास्त्रांनी विदित केले आहे. पण याचा अर्थ सगळ्यांनीच ते अंगीकारले आहे, असा होत नाही. प्रसंगी त्याचा अपलापही झाला आहे. सत्य कुठलंही असूद्या माणसे त्याचा अर्थ बऱ्याचदा सोयीस्करपणे लावतात अन् त्याचा स्वीकार स्वतःच्या सवडीने करत असल्याचे दिसेल. अर्थात हा माणूस स्वभाव आहे. स्वार्थापासून त्याला विलग नाही होता येत. त्याच्या मनी अधिवास करणारे विकारच सत्याच्या परिभाषा बदलतात, असं म्हणणं वावगं ठरू नये, नाही का?

'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले परमता.' असं म्हणायलाही आपल्याकडे स्वतःचं मत असायला लागतं. ते संत तुकारामांकडे होते म्हणूनच ते हे लोकांना सांगू शकले. पण दुर्दैव असे की, कोरभर स्वार्थासाठी माणसे सोयिस्कर भूमिका घेतात. त्यांना समर्थनाची लेबले लावतात. बोंबलून बोंडे विकण्याची कला अवगत असलेले विसंगतीला विचार म्हणून बुद्धिभ्रम करत राहतात. माणसे अशा भ्रमाभोवती भोवऱ्यासारखे फिरत राहतात. भोवऱ्याला गती असते, पण ती काही अंगभूत नसते. कोणीतरी त्याचा वेग निर्धारित केलेला असतो. स्वहित साध्य करण्याच्या प्रयत्नात सामूहिक हिताला तिलांजली दिली जात असेल, तर प्रश्न अधिक गहिरे होत जातात. हे खरं वगैरे असलं, तरी एक प्रश्न उरतोच तो म्हणजे, सत्य सापेक्ष संज्ञा आहे अन् तिचा अक्ष किंचित स्वार्थाकडे झुकलेला असतो. त्याचा सुयोग्य तोल सावरता आला की, ते झळाळून येते अन्यथा अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन मुक्तीच्या शोधात भटकत राहते. त्याला हा अभिशापच असावा बहुतेक, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment