माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला का सिद्ध करू पाहत असतील? सांगणं अवघड असलं, तरी असंभव नाही. माणसांच्या असण्यातच त्याचं उत्तर आहे असं म्हणणं वावगं ठरू नये. मुळात कोणत्यातरी निकषांवर आपली उंची नजरेत भरण्याइतकी ठसठशीत असावी अशी आस जवळपास प्रत्येकाच्या अंतरी सुप्तावस्थेत का असेना, पण अधिवास करून असते. आहोत त्यापेक्षा अधिक काही आहे आपल्याकडे, हे दाखवणं आनंददायी असतं आणि वाटणं सुखावणारं असतं म्हणून असेल तसे.
समाज नावाच्या व्यवस्थेत प्रत्येकाच्या हातात आपली एक मोजपट्टी असते. त्या वापरून समोरच्याला मोजण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्याकडील पट्ट्यांच्या लांबीची, उंचीची चिंता का करावी? त्यांच्या पट्ट्यांची मापं आपल्याला लावून घेण्यात कुठलं शहाणपण आहे? आपली असलेली, नसलेली उंची वाढवण्यासाठी माणसं नको तितकी धडपडत राहतात. हेलपाटतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कवायत करत राहतात. मुखवटे हाती घेऊन उभे राहतात. या धडपडीचा शेवट काय असेल, याचा विचार न करता का चालत राहतात?
माणसांच्या अंतरंगाचा ठाव नाही घेता आला अद्यापतरी कुणाला. कुणी कितीही कोपरे कोरले तरी काकणभर उरतोच तो. माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी, मानसशास्त्रज्ञांनी केला. तो सफल की असफल हा भाग नंतरचा, पण विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या हाती यातून कोणत्या गोष्टी लागल्या असतील, त्या असोत. हा मतमतांतरांचा विषय आहे. माणसांना जगण्यासाठी नेमकं काय हवं असतं? मूलभूत गरजांची पूर्ती झाली की, त्यात संतुष्ट असायला काय हरकत असावी? काहीच नाही. पण समाधानही नाही. तेच नसेल तर आणखी नवे काही घडण्याची शक्यताच मावळते.
समर्पणशील जगण्यात जीवनाचं सौंदर्य सामावलेलं असतं. त्यागात कृती असते, तर नीतिविसंगत भोगात विकृती. निरामय विचारांनी वर्तणारा माणूस जगण्याचा देखणा चेहरा असल्याचे सांगून-सांगून जगभरातील संतमहंत थकले. तरीही माणसांच्या मनातील विकार काही निरोप घेत नाहीत. जग अनेक विसंगतींनी खच्चून भरले आहे. कलहांनी फाटले आहे. याची कारणे काय असावीत?
‘स्वार्थ’ या एका शब्दात याचं उत्तर सामावलेलं असल्याचं अनेक मुखातून ऐकू येतं. स्वार्थ सोडून जगणं काही असंभव नाही आणि फार अवघड आहे असंही नाही. पण तरीही सगळ्यांना असं असणं का जमत नसेल? मोहत्याग महत्त्वाचा कसा, याचं मंडन माणसे करीत राहतात. मोहमय आयुष्य अप्रस्तुत असल्याचं सांगतात. काही मोहापासून विलग राहण्यातले फायदे मांडत राहतात. मोहाच्या मायाजालातून मुक्त होता येतं, त्यांना माणूस असण्याचे अर्थ अवगत असल्याचे माहितीपूर्ण विवेचन करतात. आपली परंपरा भोगात नसून त्यागात असल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होतात. हे सगळं अवास्तव वगैरे नसलं, तरी त्यांना माणूसपण खरंच आकळलेलं असतं का?
माणूस नावाची व्याख्या तयार करून त्या साच्यात सगळ्यांना सामावून बसवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माणूस खरंच कळलेला असतो का? जी मुखे मोक्षाची महती मोठ्या हिरहिरीने मांडतात, तेच मुखवट्यांच्या मोहात का पडत असतील? आसक्ती वगैरे याचं उत्तर असेल तर त्यात तरी संदेह का असावा? अर्थात स्वार्थाची परिभाषाही परिस्थितीजन्य आणि परिस्थितीसापेक्ष असते. तिची सुनिश्चित परिमाणे नसतात, पण परिणाम असू शकतात.
काही माणसं जगण्यातलं साधेपण आपल्यात सहज सामावून घेत असतात. नाकासमोर चालत राहतात. बिकट वाट वहिवाट नसावी म्हणून कटाक्षाने काळजी घेतात. कष्टाच्या भाजीभाकरीत त्यांना आयुष्याचे अर्थ सापडतात. काही तूपसाखरेच्या गोडीसाठी विसंगत मार्गाने चालताना क्षणभरही विचलित होत नाहीत अन् विचार करत नाहीत. सगळ्या चौकटी फाट्यावर मारतात. मर्यादांचे बांध ध्वस्त करतात त्यांच्या आणि संकेताना जगणं अन् परंपरांना प्रमाण मानणारी माणसे यांना मोजण्याची परिमाणे सारखी कशी असतील? माणूस मोजण्याची सूत्रे सारखी नसली, तरी माणुसकी समजण्याची समीकरणे सामायिक असू शकतात. अर्थात, कोणी कोणत्या वाटेने निघावे, हा ज्याच्या-त्याच्या पसंतीचा पर्याय असतो. ती निवड वैयक्तिक असते, समाजमान्यतेची मोहर नसते, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment