दिसतं तसं नसतं

By
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. कोण कोणत्याकाळी, कसा वागेल, याची हमी कोणाला देता येत नाही हेच खरे. हमी देण्याइतका माणूस कोणत्या काळी नितळ होता? सांगणं अवघड आहे. काळाला हा प्रश्न विचारला, तर कदाचित त्यालाही हे काडीमात्र सांगता नाही येणार. 

माणूस म्हणून माणसांच्या प्रगतीचा माणसांना कितीही अभिमान असूद्या, पण त्याच्या वर्तनातील वैगुण्यांचंही सम्यक भान असणं आवश्यक नाही का? कुठल्याही गोष्टीला समजून घेताना समोर न दिसणाऱ्या देखणेपणाचं कौतुक अवश्य व्हावं, पण पलीकडील बाजूला असणाऱ्या पैलूंचाही विचार करता यायला हवा. पलीकडच्या बाजूचा विचार केला की, उजेडाच्या झगमगाटात अंधार दुर्लक्षित नाही होत. 

अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती वगैरे म्हणतातना तो प्रकार असतो काहींच्या जगण्यात विसावलेला. त्यांना आसपास अंधारच वसती करून असलेला दिसतो. कवडशांच्या व्याख्या त्यांना कितीही आणि कशाही शिकवल्या, तरी उमेद शब्दाला असणारे अर्थ नाही सापडत त्यांना. सगळे कोश त्यांच्यासमोर शून्य असतात. माणूस आपल्याच कोशात शिरला की, सगळ्या कोशांची प्रयोजने संपतात अन् मागे उरतो केवळ गुंता. 

कवडशांकडे लक्ष असण्याऐवजी आसपास असणारा अंधारच बघायची अंतरी आस असली की, उजेडाचे अर्थ हरवतात. एकदा का ही मानसिकता विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, अथांग सागरातही न्यून सापडतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. 

कुणाच्या वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस दिसतो तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं काही नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. 

काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. मत प्रदर्शित करायला फार कष्ट घ्यायची आवश्यकता नसते, पण माणूस समजून घायला पर्याप्त वेळ द्यावा लागतो. कारण असणं अन् दिसणं यात अंतराय असतं, नाही का.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या कक्षेत तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं,  हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment