आयुष्याचा परिघ समजून घेताना

By
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात.
 
आयुष्याचा विस्तार काही आपल्या हाती नसतो, पण त्याचा परीघ समजून घेणं शक्य असतं. त्याची लांबीरुंदी किती असावी हे आपल्या हाती नसलं, तरी कोण्या नजरेला अधोरेखित करता येईल एवढी खोली देता येणं संभव आहे. डोळ्यात स्वप्ने आणि नजरेत क्षितिजे सामावली की, आपल्या असण्याचे ज्ञातअज्ञात अर्थ उलगडू लागतात. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो. 

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह.
 
काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा. 

पाणी वाहता वाहता नितळ होत जाते. उताराचे हात धरून ते सरकत राहते पुढे. वळणांशी गुज करीत पळत राहते. वाहत्या पाण्याला नितळ असण्याचं वरदान आहे, पण प्रवास थांबला की, त्याचे डबके होते अन् डबक्याला कुजण्याचा अभिशाप. प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. ती त्यांची त्यांनीच तयार केलेली असतात बहुदा. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. वास्तव विस्मृतीच्या वाटेने वळते करून दुर्लक्षित केलं जातं. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. 

काल जेथे तो उभा होता आजही तेथेच दिसतो. त्याचे आवाज नाही पोहचत व्यवस्थेच्या पोकळीत. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आळवले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. अभाव आणि प्रभावाचा खेळ सुरूच असतो अनवरत, पण या दोघांमध्ये निभाव लागायचा असेल, तर नजरेला माणूस दिसायला हवा अन् संवेदनांना कळायला. पण खरं हेही आहे की, कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव होता, आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment