समस्यांचे जाळे

By
‘समस्या’ हा असा एक शब्द आहे, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या लहान असतात, मोठ्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. त्यांना टाळायचे, नसतीलच टाळता येत, तर त्यापासून पळायचे विकल्प बहुदा नसतात. समजा असले म्हणून त्यातून काही मुक्तीचा मार्ग गवसतो असंही नाही. म्हणून की काय त्यांच्याभोवती संदेहाची अनेक वर्तुळे कोरलेली असतात. 

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. अवघड असतात, सुघड असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच. 

सगळ्याच समस्यांना आपण आवतन दिलेलं नसतं. कधीतरी कुठल्यातरी आडवाटेने आगंतुकासारख्या चालत आपल्या अंगणी येतात. उंबरा ओलांडून आपल्या आसपास अधिवास करू पाहतात. समस्या असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, चुकतं एखादं गणित. याचा अर्थ परीक्षेत नापास झालो असं नाही. एखादा कठीण प्रश्न टाळून इतर प्रश्नांची उत्तरे शोधावीत. एखाद्या परीक्षेत चारदोन गुण कमी मिळाले, म्हणून काही पुढे जायला कुणी अपात्र ठरत नाही. म्हणून प्रयत्न नको सुटायला. 

पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. ओंजळभर अनुभूती अन् पसाभर सहानुभूती सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी तर कधी सुखांशी. सुखाची परिमाणे अन् दुःखाचे परिणाम माहीत असतात त्यांना प्रवासाच्या परिभाषा समजून नाही सांगायला लागत. चालण्याचे अर्थ आकळतात त्यांना अडनिड वाटांची अन् वेड्यावाकड्या वळणांची क्षिती नसते. अंतरी आत्मविश्वास असला की, समस्यांचे अर्थ आपसूक कळतात.

संवाद आपणच आपल्याशी केलेला असो की समूहाशी, तो आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. माणसांचा सगळा प्रवासच आस्थेच्या कवडशांचा शोध आहे. आजचा दिवस वाईट होता, पण उद्या याहून अधिक काही चांगलं असेल, या आशेवरच तर सुरु असतो त्याचा प्रवास. अगदी आदिम अवस्थेपासून आतापर्यंत माणूस म्हणून जेकाही माणसांनी संपादित केलं आहे, ते या आशेच्या धाग्यांनी बांधलेल्या आस्थांच्या अनुबंधचा परिपाक आहे. अंतरी अनवरत नांदती असणारी आस्थाच त्याच्या आयुष्याचं ओंजळभर संचित असतं. 

समोर दिसणाऱ्या कवडशांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. त्यासाठी अंतरी ओंजळभर विश्वास अधिवास करून असावा लागतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय किंवा आणखी कशावर, तो असला की, आयुष्यात किंतु अन् जगण्यात परंतु नाही राहत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment