'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. अर्थात, हा जमणं अथवा न जमण्याचा प्रवास त्या-त्यावेळच्या प्रयोजनांचा, प्रसंगांचा अथवा परिस्थितीचा परिपाक असू शकतो.
मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात.
वैयक्तिक म्हणा अथवा समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो प्रसंगिक असेल, छोटा-मोठा असेल अथवा आणखी काही. म्हणून त्याच्या असण्याचे अथपासून इतिपर्यंत अर्थ सापडतात असंही नाही. खरंतर अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत. आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.
तसंही आपलं माणूस म्हणून वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तनव्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तनव्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! पण चांगुलपणालाही काही कंगोरे असतात. ते कोण कोणत्या कोनात त्याकडे पाहतो आहे यावर अवलंबून असतं नाही का?
सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. डोळ्यांचे विकार बरे करता येतात, पण विचारांची वानवा असल्याने दृष्टीत आलेल्या दोषाचं काय? दोष माणसांच्या असण्यात आदिम अवस्थेपासून सोबत करतो आहे. तो दूर करणारं औषध अद्याप सापडलं नाही. खरतर ते शोधायची आवश्यकता नाही. ते ज्याचं त्याने आणायचं असतं. ते कुणाला कुठे मिळेल सांगणं अवघड आहे. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात.
कुणी शहाणपणाच्या व्याख्या सोयीच्या चौकटीत अधिष्ठित करू पाहतात. कुणी अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा विचार, संस्कार वगैरे पोरके होतात. संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे.
असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये विश्वात नांदताना दिसली असती का? प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोधच्या वावटळी येतील. समर्थनाचे सूर सजत राहतील. त्यामागे कुणाचे स्वार्थ, कुणाचे अहं उभे असतील. त्यातून कुणी समर्थन करेल कुणी विरोध. पण वास्तव हेही आहे की, विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment