मनाजोगत्या आकारात घडायला आयुष्याचे काही आयते साचे नसतात. घडणंबिघडणं त्या त्या वेळचा, परिस्थितीचा परिपाक असतो. प्राप्त प्रसंगांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. येथून पलायनाचे पथ नसतात. पदरी पडलं ते पवित्र मानून कुणी पुढे पळत राहतो. कुणी पुढ्यात पडलेल्या पसाऱ्याचे एकेक पदर उलगडून पाहतो. कुणी आहे तेच पर्याप्त असल्याचे समाधान करून घेतो. नियतीने म्हणा किंवा परिस्थितीने, कोणाच्या पुढ्यात काय पेरले आहे, हा भाग नंतरचा. जगणं मात्र परिस्थितीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करत असते. तो प्रवास असतो जगण्याच्या वाटेने पुढे पडणाऱ्या पावलांचा. अस्तित्वाला आकार देणाऱ्या आकृत्या आपणच आपल्याला कोरायला लागतात. त्यासाठी अवजारे कुठून उसनी नाही आणता येत. कोणाचं आयुष्य कसं असावं, हे काही कुणी निर्धारित नाही करू शकत. ज्याचं त्यानेच ते ठरवायचं. त्याचे संदर्भ त्याचे त्यानेच समजून घ्यायचे असतात. प्रवासाचे पथ स्वतःलाच मुक्रर करायला लागतात. मुक्कामाची ठिकाणे त्यानेच निवडायची असतात अन् वाटाही.
आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही ठरवून नाही करता येत. काही चालत अंगणी येतात. दुसरा कोणताच विकल्प नसल्याने काही केल्या जातात, काही कळत घडतात, काही नकळत, तर काही अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकतात. चांगलं चांगलं म्हणताना कधी कधी नको असलेल्या मार्गाने आयुष्य वळण घेतं अन् नको ते घडतं. कुणी याला आपल्या भल्याबुऱ्या कर्माचे भोग म्हणून स्वीकारतो. कुणी विचारत रहातो स्वतःला, नेमकं कुठे अन् काय गणित चुकलं? कोरत राहतो आपल्याच विचारांचे कोपरे. शोधत राहतो एकेक कंगोरे. कुणी सगळ्या गोष्टींचा भार देवावर टाकून मोकळा होतो. कुणी दैवाला दोष देतो. तर कुणी कर्माचं संचित असल्याचे सांगतो. ते तसं असतं की नाही, माहीत नाही. चांगलं काय अन् वाईट काय असेल, ते त्या त्या वेळी स्वीकारलेल्या भल्याबुऱ्या पर्यायांचे किनारे धरून वाहत येते. स्वीकार अथवा नकार या व्यतिरिक्त तिसरा पर्यायच नसतो कधीकधी.
विकल्प विचारांतून वेगळे होतात, तेव्हा आपणच आपल्याला तपासून पाहता यायला हवं. याचा अर्थ प्रत्येकवेळी एखादया कृतीचे विश्लेषण सम्यकपणे घडलेले असेलच असे नाही. ते सापेक्ष असू शकते. सापेक्ष असणं समजू शकतं, पण संदेह... त्याचं काय? तो विचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असेल तर. परिवलनाचे परीघ अन् त्यासोबत भ्रमण करणारे अर्थ समजून घ्यावे लागतात. संदेहाच्या सोबत किंतु चालत येतात, तेव्हा परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या चिन्हांचे संदर्भही बदलत जातात.
परिस्थितीच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या बऱ्यावाईट गोष्टी आयुष्याच्या किनाऱ्यांवर साचत जातात. भूगोलात नद्यांविषयी शिकवताना गाळाचा प्रदेश सुपीक वगैरे असल्याचे शिकवले असते. पण अविचारांचे तीर धरून वाहत आलेल्या अन् आयुष्यात साचलेल्या गाळाला अशी परिमाणे नाही वापरता येत. मनावर चढलेली अविचारांची पुटे धुवायला काही अवधी द्यावा लागतो. वाहते राहण्यासाठी भावनांना पूर यायला लागतात. संवेदनांचं आभाळ भरून कोसळत राहायला लागतं. कोसळता आलं की, वाहता वाहता नितळ होता येतं. साचले की डबकं होतं. वाहत्या पाण्याला शुद्धीचे प्रमाणपत्र नाही लागत.
परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग प्रारंभी अपवाद वगैरे म्हणून असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. चालत्या वाटेला अनेक वळणे असतात. प्रत्येक वळण मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचवणारे असतेच असे नाही. अपेक्षित वळणे वेळीच निवडता येण्यासाठी योग्य वळणावर योग्य वेळी वळता यायला लागतं. यासाठी फार काही वेगळं करण्याची आवश्यकता नसते. फक्त आपणच आपल्याला एकदा तपासून पाहता यायला हवं. विचारांइतकी अस्थिर गोष्ट आणखी कुठली असेल माणसांकडे माहीत नाही. पण त्यांना वेळीच विधायक वाटेने वळते करता आले की, अस्मितांचे अन् त्यासोबत असणाऱ्या शक्यतांचे अर्थ बदलतात.
उधनालेल्या स्वैर प्रवाहाला मर्यादांचे बांध घालून नियंत्रित करावे लागते. व्यवस्थेचे पात्र धरून वाहणाऱ्या विचारांना नियंत्रणाच्या मर्यादांमध्ये अधिष्ठित करायला लागते. रूढीपरंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच. परिवर्तनाचे प्रयोग योजनापूर्वक करायला लागतात. ते प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच असे नाही. त्यांना प्रासंगिक परिमाणे असतात. सम्यक परिणामांसाठी पथ प्रशस्त करायला लागतात. विशिष्ट भूमिका घेऊन उभं राहायला लागतं. सत्प्रेरीत हेतूने केलेलं कार्य कधीही नगण्य नसतं. काहीच भूमिका न घेण्यापेक्षा काहीतरी भूमिका घेणं महत्त्वाचं. कदाचित ती चुकू शकते. पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केल्याचे समाधान अंतरी असते. काहीच न करणे हा मात्र प्रमाद असू शकतो, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment