विवेकाच्या वाती

By
आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात. काही पश्नांची उत्तरे सापेक्षतेची वसने परिधान करून विचारांच्या विश्वात विहार करीत असतात. त्याबाबत एक अन् एकच विधान करणे तितकेसे सयुक्तिक नसते. सांगणं बरंच अवघड असतं अशा काही प्रश्नांबाबत. अनेक कंगोऱ्यांना कुशीत घेऊन त्यांचा प्रवास सुरु असतो. शक्यतांचे दोनही किनारे धरून ते वाहत असतात. पण प्रवाहच आटले असतील तर... वाहण्याचे अर्थ बदलतात. एक ओसाडपण आसपास पसरत जातं. हेही तेवढं खरं. चिमूटभर ज्ञानाला अफाट, अथांग, अमर्याद वगैरे समजून त्यावर आनंदाची अभिधाने चिटकवणाऱ्यांना प्रगल्भ असण्याच्या परिभाषा कशा उमगतील? त्या समजण्यासाठी आवश्यक असणारं सुज्ञपण आधी अंतरी रुजलेलं तर असायला हवं ना!

विवेकाच्या वाती विचारांत तेवत असतील, तर पावलापुरता प्रकाश सापडतो. अंतरी नांदत्या भावनांचा कल्लोळ असतो तो. तो आकळतो त्यांना बहरून येण्यासाठी प्रतीक्षा नाही करायला लागत. बहर घेऊन ऋतूच त्यांच्या अंगणी चालत येतात. फक्त त्यांच्या आगमनाचा अदमास तेवढा घेता यायला हवा. भावनांचा पैस ज्यांना कळला त्यांना प्रतिसादाच्या परिभाषा नाही पाठ कराव्या लागत. प्रतिसाद देता येतो त्यांना विस्ताराचे अर्थ नाही शोधावे लागत. चिमूटभर डोळस शहाणपण अंतरी नांदते असले की, आयुष्याचे एकेक ज्ञातअज्ञात अर्थ आकळू लागतात.

इहतली अधिवास करणाऱ्या जिवांकडे जुजबी असली, तरी काहीतरी माहिती असतेच. ती अनुभवातून अंगीकारली असेल, निसर्गदत्त प्रेरणांच्या पसाऱ्यात सामावली असेल अथवा गुणसूत्रांच्या साखळ्या धरून वाहत आली असेल. याचा अर्थ एखाद्याकडे असलेली माहिती म्हणजे ज्ञान असते का? माहितीचे उपयोजन सम्यक कृतीत करता येण्याला ज्ञान म्हणता येईल आणि ज्ञानाचा समयोचित उपयोग करता येण्याला शहाणपण. पण वास्तव हेही आहे की, सम्यक शहाणपण प्रत्येकाकडे पर्याप्त मात्रेत असेलच असे नाही आणि असलं तरी त्याचं सुयोग्य उपयोजन करता येईलच याची खात्री बुद्धिमंतांनाही देता येणार नाही. शहाणपणाची सूत्रे समजली की, जगण्यात सहजपण येतं. सहजपण सोबत घेऊन जगता येतं, त्यांना आयुष्याची समीकरणे सोडवताना अभिनिवेशांच्या झुली पांघरून प्रवास नाही करायला लागत. मखरांचा मागोवा घेत मार्ग नाही शोधावे लागत.

जगण्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची पावले पुढे पडताना काहीतरी पदरी पडतेच, हेही खरेच. पण पदरच फाटका असेल तर... त्याला इलाज नसतो. ना तो प्राक्तनाचा दोष असतो, ना नियतीने ललाटी कोरलेला अभिलेख. ज्याच्या त्याच्या विस्ताराची वर्तुळे ज्याने त्याने तयार करायची असतात. वाढवायची असतात अन् सजवायचीही. ती काही कुणी कुणाला उसनी आणून देत नाही की, कुणाकडून  दत्तक घेता येत. शहाणपण काही कोणाची मिरासदारी नसतं. खाजगी जागीर नसते. कुळ, मूळ बघून ते दारी दस्तक देत नसतं. त्यासाठी माणूस असणे आणि किमान स्तरावर का असेना विचारी असणे पर्याप्त असते. पण वास्तव याहून वेगळं असतं. माणूस असणं निराळं आणि विचारी असणं आणखी वेगळं. या दोनही शक्यता एकाठायी लीलया नांदत्या असणं किंतु परंतुच्या पर्यायात उत्तर देणारं असतं, नाही का? असेलही तसं कदाचित, पण असंभव आहे असंही नाही.

विचारांच्या वाटेने वळते होण्यासाठी अनुभूतीचे किनारे धरून वाहते राहावे लागते. केवळ कोरडी सहानुभूती असणे पुरेसे नसते. नियतीने माथ्यावर धरलेल्या सावलीपासून थोडं इकडेतिकडे सरकून ऊन झेलता आलं की, झळांचे अर्थ आकळतात. वातानुकूलित वातावरणात वास्तव्य करणाऱ्यांना चौकटींपलीकडील विश्वात नांदणारी दाहकता कळण्यासाठी धग समजून घ्यावी लागते. ती समजून घेण्यासाठी स्वतःभोवती घालून घेतलेली मर्यादांची कुंपणे पार करायला लागतात. सुखांच्या वर्षावात चिंब भिजणाऱ्यांना वणव्याचा व्याख्या कळतीलच असं नाही. त्यासाठी वणवा झेलावा लागतो. कदाचित त्याची दाहकता कोण्या प्रतिभावंताने लेखांकित केलेल्या शब्दांतून कळेल. पण सहानुभूती आणि अनुभूतीत अंतर असतं. ते पार करण्यासाठी स्वतः झळा झेलाव्या लागतात. वणवा होऊन जळावं लागतं. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment