काळाचे कंगोरे

By
काळ म्हणजे नेमकं काय असतं? विशिष्ट वेळ की, ज्याचे मोजमाप दिवस, प्रहर इत्यादीनी करता येते. की कुठलासा हंगाम, मोसम जो बहरण्याचे, उजाड होण्याचे अर्थ सांगतो. अथवा मृत्यु, ज्याने स्मृतींशिवाय मागे काहीच शेष राहत नसल्याचे सूचित होते. की कुठलंही आवतन न देता चालून आलेलं एखादें संकट किंवा चांगलें-वाईट होण्यास कारणीभूत अशी परमेश्वराची इच्छा. की भूत, भविष्य, वर्तमान इत्यादी संकल्पना निर्देशित करणारा विशिष्ट शब्द. की याहून आणखी बरंच काही अनुस्यूत असतं त्यात. खरंतर एखादा शब्द लिहला, बोलला जातो, तेव्हा तो आपल्या सोबत अनेक दृश्यअदृश्य शक्यता घेऊन येत असतो. त्याच्या असण्याला अनेक कंगोरे असतात, तसे अर्थाला अगणित कोपरे अन् आकलनाला अनंत आयाम.

कदाचित असं काही असेल अथवा नसेलही. शक्यतांचा गर्भात अनेक ज्ञातअज्ञात किंतु सामावलेले असतात. अर्थात, सगळ्याच गोष्टी काही सरळसोट मार्गाने प्रवास करणाऱ्या नसतात. सगळ्यांना सगळेच अर्थ आकळतात असं नाही अन् अथपासून इतिपर्यंत सगळं कळायलाच हवं असंही नसतं काही. पण शब्दमागे असणाऱ्या भावार्थचं किमान सरळ आकलन व्हावं इतपत शहाणपण समजून घेणाऱ्याकडे असायला लागतं. या माफक मागणीला वळसा घालून मार्गस्थ नाही होता येत. म्हणूनच असेल की काय अर्थासोबत अनेक अनर्थही अधिवास करून असतात.

बोलण्याच्या ओघात कुणी मनात असलेलं सहज बोलून जातो. त्याचे भलेबुरे पडसाद नंतर उमटतात. कधी शब्दांचे अर्थ सरळ लागतात. कधी आडवळणे आडवी येतात. कधी अर्थाचा अनर्थ होतो अन् अंतरी कायमचे ओरखडे ओढले जातात. खरंतर बोलणाऱ्याच्या विधानाला असणारा अर्थ आणि आकलनकर्त्याच्या अंतरी उभी राहणारी त्याची प्रतिमा अन् प्रकटणारी प्रतिमाणे सगळंच परिमाणांच्या परिभाषेत तंतोतंत बसवता नाही येत. सोबत परिणामांची पडछायाही पाहून, समजून घ्यायला लागते.

भूतवर्तमानभविष्य सोयीसाठी केलेले तुकडे असतीलही, पण त्या प्रत्येक तुकड्याला त्याचा काही अंगभूत अर्थ असतो अन् त्याच्या असण्याचे काही कंगोरे. काही कातर कोपरे असतात, तसे काही हळवे पळसुद्धा. किती किती ज्ञात, अज्ञात गोष्टींना आपल्या आत घेऊन धावत असतो तो अनवरत. त्याला फक्त गतीचे अर्थ तेवढेच अवगत असतात की काय कोणास ठाऊक. असेलही तसे. पण अधोगती शब्दाचं आकलन असतं, त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत, एवढं मात्र खात्रीने सांगता येईल.

काळ पुढ्यात अनेक गुंते पेरून ठेवतो. कोणाच्या वाट्याला काय यावं, हे काही कुणाला सांगता नाही येत. काहींच्या जगण्याला तो इतकं सजवतो की, सुखाच्या व्याख्येचे उत्तर यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकतं असं वाटतं अन् काहींच्या पदरी तो एवढ्या वेदना पेरत राहतो की, वेदनांचे अर्थही विचलित व्हावेत. काहींच्या जगण्याचा ऋतू सतत बहरलेला, तर काहींच्या आयुष्यात सदासर्वदा वैशाख वणवा. असं का व्हावं? नेमकं सांगणं अवघड आहे. काही प्रश्नांची उत्तरे सहजी हाती लागत नसतात हेच खरे. दुःखानेही ते दुःख पाहून क्षणभर दुःखी व्हावं इतकं दुःख काहींच्या आयुष्यात असतं. याला कोणी नियती म्हणा की, प्राक्तन किंवा कर्माचे भोग. कारण काही असले तरी काळ खेळत असतो माणसांशी एवढं म्हणायला प्रत्यवाय आहे.

काळाने पुढ्यात पेरलेल्या प्रश्नांची नेमकी अन् हवी तेवढी आणि हवी तशीच उत्तरे लिहता यावीत म्हणून आयती सूत्रे नसतात की, कोणीतरी करून ठेवलेल्या अचूक व्याख्या. पदरी पडलेल्या प्रश्नांच्या मुळाशी पोहचण्यासाठी किमान काही गोष्टी अवगत असायला लागतात. त्या काही कुठून विकत नाही आणता येत, ना उसनवार. आयुष्यात आगंतुकासारख्या आलेल्या अवधानांच्या, अनावधानांच्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. परिशीलनाने प्रकट होता येतं.

काळाची समीकरणे सोडवताना कुणाचा कुठलातरी हातचा सुटतो अन् गणित चुकतं. खरंतर काळ नावाची गोष्ट ही अशी अन् अशीच असते, म्हणून दाखवता नाही येत. त्याचं असणं-जाणवणं एक अमूर्त अनुभूती असते. त्याच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थही लावता येतात. ते सम्यक असतीलच असं नाही. हाती लागलेल्या त्याच्या तुकड्यातून आयुष्याला अर्थपूर्ण करणारी सूत्रे सगळ्यांनाच गवसतात असं नाही. जगण्याला वेढून बसलेल्या अन् मूर्त-अमूर्ताच्या झोक्यांवर झुलणाऱ्या तुकड्यांच्या सोबत अव्याहत झोके घेत झुलत राहणं प्राक्तन असतं का माणसाचं? असेलही अथवा नसेल, नक्की नाही सांगता येत. पण काळाचा कुठलातरी अज्ञात तुकडा खेळत असतो आयुष्याशी, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment