अक्षरांना अर्थपूर्ण आशय असतो, तो काही आपणहून अक्षरांकित नाही होत, त्याला काळाच्या कपाळी कोरावं लागतं. नुसती अक्षरे कुठेतरी खरवडून साफल्याच्या परिभाषा अधोरेखित नाही होत. अक्षरांना काहीएक आकार असला तरी त्यांना अर्थ द्यावे लागतात.
काहींचे जीवनग्रंथ काळच आपल्या हाताने सजवतो. त्याने गोंदलेल्या खुणा कर्तृत्व बनून चमकत राहतात. काहींच्या जीवनग्रंथावर चारदोन ओळी लेखांकित होतात. काहींची पाने कोरीच राहतात. काहींच्या कहाण्या काळाच्या कुशीत हरवतात. काहीं समोर येतात अन् एक आश्वस्तपण अंतरी जागवतात. काही कवडसा बनून पावलापुरती वाट उजळत राहतात.
काळ आपल्याच नादात पळत राहतो. खेळ त्याचेच असतात अन् नियमही त्यानेच तयार केलेले. खेळत राहतो तो फक्त. क्षणपळांची सोबत करीत तो पुढे पळत असतो अनवरत. त्याचा हात धरून चालता येतं, त्यांना प्रवासाचे अर्थ अन् प्रगतीची परिमाणे अवगत असतात. पुढे पडणाऱ्या पावलांना पायबंद पडले की, प्रवासाची प्रयोजने संपतात. मुक्कामाची ठिकाणे हरवली की, पावले केवळ दिशाहीन वणवण करीत राहतात. जगण्यावर दिवस, महिने, वर्षांची धूळ साचत जाते. विस्मृतीचा अंधार गडद होत जातो. ओंजळभर अस्तित्व असलेल्या कुण्या अनामिक आयुष्याचा कोरभर अध्याय काळाच्या अफाट विवरात सामावून गेलेला असतो.
कुणी पथ चुकलेला पांथस्थ कधीतरी येतो. अनामिक बनून पडलेल्या ग्रंथाची काही पाने त्याच्या हाती लागतात. त्यावर जमा झालेले धुळीचे थर कुतूहल म्हणून कुणी झटकतो. कुणी कोरून ठेवलेल्या ओळी वाचतो. कुणी शोधत राहतो अक्षरांचे अर्थ. उलटत जातात एकेक पाने अन् उलगडत जातात काळाच्या कुशीत विसावलेल्या कहाण्यांचे काही अर्थ. समोर येतात काही हवे असणारे आणि नको नसणारे संदर्भ. आकळत जातात अन्वयार्थ. त्यांना वेढून असतं आठवणींचं कोंदण अन् भावनांचं गोंदण. समोरच्या पसाऱ्यात विखरून पडलेले एकेक बिंदू सांधले जातात, जुळत जातात एकेक रेषा अन् साकारते एक चित्र. कधी अर्थांची चौकट घेऊन, तर कधी चौकट हरवलेलं. हाती लागलेल्या तुकड्यातून गोळा केले जातात एकेक धागे. उपसल्या जातात तर्काच्या राशी. ढवळून काढला जातो प्रवाह. घेतले जातात गोते तळ गाठण्यासाठी. लागतं काही हाती. पण बरंच निसटून जातं. तरीही शोधत राहतात माणसे काही ना काही.
काळाची सोबत करीत पडलेल्या अज्ञात परगण्यातील रहस्यांना जिज्ञासेची लेबले लावून उपसले जातात एकेक ढिगारे. सापडतात कधी आपलेच काही अवशेष अंधाराची चादर ओढून निजलेले. जागी असणारी माणसे अंधाराला जागवतात. कवडशाच्या सोबतीनं चालत राहतात. आपलं असणं-नसणं पाहतात. परत मांडतात. तुलना करून पारखून घेतात आयुष्याला. अज्ञाताच्या कुशीत शिरून काढू पाहतात आपल्या अस्तित्वाचे अंश. शोधून पाहतात आपल्या सभ्यतेच्या संदर्भांना. धांडोळा घेतात संस्कृती नावाच्या प्रवासाचा. लावतात अर्थ संस्कार बनून वाहणाऱ्या प्रवाहाचे नव्याने. अदमास घेत राहतात. अनुमानाच्या चौकटीतून काही हाती आलेले, कधी हवे असलेले शोधत राहतात. वेचू पाहतात अंधाराच्या विस्तीर्ण पटावर चमकत पडलेली चारदोन नक्षत्रे.
पण तरीही अंधार असतोच आसपास नांदता. किती उपसावा त्याला? शतकांची साचलेली रहस्ये किती खोदावीत? गणती नाही करता येत सगळ्याच गोष्टींची अन् शोधताही नाही येत सगळंच. विचारांच्या वर्तुळात वसतीला उतरलेलं काही सापडतं. काही संदर्भांच्या चौकटीतून शोधून काढावं लागतं. काही संदेहाच्या परिघातून निसटलेलंही असतंच. सगळेच तुकडे हाती लागतात असं नाही. सापडलेल्या तुकड्यांना जोडत काही आकृत्यांना आकार देता येतो. त्याचे अर्थ कधी अनुमानाने तर कधी अनुभवाने आकारास आणावे लागतात. बऱ्याच गोष्टी सूत्रातून सुटतात. तरीही आस्थेची पणती हाती घेऊन वाट तुडवत राहतात माणसे. काळाच्या अफाट विवरात काय काय दडले असेल? हा प्रश्न काही स्वस्थ बसू देत नाही हेच खरे, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
••
0 comments:
Post a Comment