प्रमादाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा

By
जगतात तर सगळेच. पण जगण्याचे सोहळे सगळ्यांनाच नाही करता येत. आयुष्य साऱ्यांच्या वाट्याला येतं, पण त्याला आनंदयात्रा करणं किती जणांना अवगत असतं? जीवन काही वाहत्या उताराचं पाणी नसतं, मिळाली दिशा की तिकडे वळायला. त्याला अपेक्षित दिशेने वळते करण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. त्यांची वळणे समजून घ्यावी लागतात. ती समजून घेता यावीत म्हणून पावलं योजनापूर्वक उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा निर्धारित करावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात. काही आराखडे तयार करून घ्यायला लागतात. काही गणिते आखायला लागतात. काही सूत्रे शोधायला लागतात. शक्यतांचा शोध घ्यावा लागतो. अंगीकारलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. असतील योग्य तर विचारांशी पडताळून पाहायला लागतात. राहिले असतील काही किंतु तर आपल्या विचारविश्वातून विलग करायला लागतात. पण याचा अर्थ असाही नसतो की, प्रत्येकवेळी आपले अनुमान योग्यच असतील.

घेतलेल्या अनुकूल प्रतिकूल निर्णयांची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून घ्यावी लागते. हे सगळं खरं असलं तरी कोणी कोणत्या प्रसंगी कसे वर्तावे, याचे काही संकेत असतात. नीतिनियमांची कुंपणे असतात. व्यवस्थेने मान्य केलेली वर्तुळे असतात. त्यांच्या विस्ताराचे अर्थ असतात. तशा मर्यादांच्या व्याख्याही असतात. त्यांचे संदर्भ तेवढे नीट समजून घेता यावेत.

व्यवस्थेतले सगळेच प्रवाह काही एका सरळ रेषेत वाहत नसतात. प्रतिकाराचे पर्याय असतात, तसे समर्थनाचे सूर असतात. परस्पर भिन्न आवाजांचे पडसाद आसपास उमटतात. काही होकार असतात, काही नकार. सगळ्यांना एक साच्यात कसं सामावून घेता येईल? तसे साचे अद्याप तरी बनले नाहीत. समजा तयार झाले तरी कितीकाळ टिकतील याची शाश्वती नाही देता येत. घडणं, घडवणं त्यांचं प्राक्तन असेल, तर मोडणं नियती असते. या घडण्यामोडण्याला म्हणूनच अर्थाचे अनेक कंगोरे असतात. साद-प्रतिसादाचे प्रतिध्वनी असतात.
कोणाचं वर्तन कोणत्या प्रसंगी कसं असावं, या प्रश्नाचे उत्तर अद्याप माणसाला मिळायचं आहे. पुढे मिळेल की नाही, माहीत नाही. कारण उत्तरे शोधणारा माणूस आणि ज्याच्यासाठी उत्तर शोधलं जातंय तोही माणूसच. माणूस म्हटले की, सोबत मर्यादाही चालत येतात. त्यांना वगळून माणूस समजून घेणं अवघड असतं.

आयुष्यातून वाहत राहणाऱ्या विचारप्रवाहांच्या कक्षा आक्रसत जावून स्वार्थाच्या सीमारेषेवर येऊन थांबल्या की, त्यांचे अर्थ बदलतात. स्वार्थाच्या प्रतलावरून सरकणारे प्रवाह कधीच समतल मार्गावरून प्रवास करत नसतात. वेडीवाकडी वळणे घेवून चालणं त्यांचं प्राक्तन असतं. केवळ अन् केवळ ‘मी’ आणि ‘मीच’ एवढा परीघ सीमित झाला की, माणूसपणाच्या विस्ताराचे अर्थ हरवतात. ‘स्व’ एकदाका स्वभावात येवून सामावला की, स्वाभाविकपण पोरके होते अन् सुरु होतो अभिनिवेशाच्या वाटेने प्रवास. प्रवास पुढे नेणारे असले तरी सगळ्याच पावलांना मुक्कामाची ठिकाणे गवसत नसतात अन् मुक्कामाच्या सगळ्याच ठिकाणांवर काही मान्यतेची मोहर अंकित झालेली नसते.

माणूस, मग तो कोणत्याही देशप्रदेशात वसती करून असला, तरी त्याच्या माणूसपणाच्या मर्यादा टाळून अन् अंतरी अधिवास करणारे अहं टाकून त्याला जगता येत नाही हेच खरं. काही अपवाद असतीलही, नाही असं नाही. पण ते केवळ अपवादापुरते. माणसाला हे सगळं समजत नाही असं नाही. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही.

खरंतर नाकासमोरचा रस्ता धरून सरळ मार्गाने प्रवास करणं फारसं क्लिष्ट नसतं. तरीही साधं जगणं अवघड करणाऱ्या प्रश्नांचा प्रत्यय परत परत का येत असावा? ज्यांना आपल्या मर्यादांचे परीघ कळलेले असतात, ते प्रमादापासून अंतरावर राहण्याचा प्रयास करतात. तसंही प्रमाद ठरवूनच करायला हवेत असं काही नसतं. कधीकधी परिस्थितीच प्रमादाच्या पथावरून प्रवास करायला बाध्य करीत असते. प्रमादांपासून परतायचा पथ असतो. फक्त पावलांना त्याच्याशी सख्य साधता यावं. एवढं करणं माणसाला जमलं की, प्रवासाच्या दिशाच नाहीत तर अर्थही बदलतात.

प्रमादांचे परिमार्जन करण्याचे पर्याय असले, तरी ते प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच याचीही खात्री देता येत नाही. प्रमादाच्या परिघाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना परिस्थितीनिर्मित कारणे असतात, तसे प्राक्तनाचे संदर्भही असतात, असं मानणारेही आसपास संख्येने कमी नसतात. अर्थात, त्यांनी तसे मानू नये असंही नाही. हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा भाग. जशी ज्याची श्रद्धा, तशी त्याची भक्ती. हे सगळं खरं असलं तरी, श्रद्धा असा परगणा आहे, जेथे तर्काच्या परिभाषा पुसट होत जातात. पण पुढे पडत्या पावलांना सात्विकतेची आस असेल अन् विचारांना मांगल्याचा ध्यास असेल तर प्रवासाचे अर्थ अन् मुक्कामाच्या ठिकाणांचे अन्वयही बदलतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment